‘वायर’ विरोधातील उ. प्रदेश पोलिसांची फिर्याद उच्च न्यायालयाकडून रद्द

‘वायर’ विरोधातील उ. प्रदेश पोलिसांची फिर्याद उच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्लीः गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याच्या मृत्यूसंबंधीचे वृत्तांकन केल्या प्रकरणात उ. प्रदेश पोलिसांनी द

तिस्ता, श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्यावर आरोपपत्र दाखल
गंगेच्या पातळीत वाढ; तरंगताना आढळले मृतदेह
नोबेल पुरस्काराचे घोळ

नवी दिल्लीः गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याच्या मृत्यूसंबंधीचे वृत्तांकन केल्या प्रकरणात उ. प्रदेश पोलिसांनी द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन, वार्ताहर इस्मत आरा यांच्याविरोधात दाखल केलेली फिर्याद अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली.

गेल्या वर्षी ३० जानेवारी रोजी इस्मत अरा यांचे एक वृत्त द वायरने प्रसिद्ध केले होते. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडच्या दिवशी नवन्रीत सिंग यांचे ट्रॅक्टर पलटून झालेल्या दुर्घटनेत निधन झाले होते. पण दुर्घटनेची माहिती लगेच न कळवताच नवन्रीत सिंग यांच्यावर पोस्टमार्टम करताना आम्हाला कळवण्यात आली होती, असा कुटुंबियांचा आरोप होता. या पोस्टमार्टम अहवालात नवन्रीत सिंग यांचे निधन डोक्याला इजा झाल्याने झाले असे नमूद करण्यात आले होते. द वायरने हे वृत्त देताना पोलिस व डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. तसेच त्यांनी नवन्रीत सिंग यांच्या कुटुंबाकडून झालेले आरोप फेटाळून लावले होते ते नमूद केले होते.

या प्रकरणातील पहिली फिर्याद रामपूर जिल्ह्यातील रहिवासी संजू तुराहा यांनी दाखल केली होती. तर इस्मत अरा यांच्याविरोधातील तक्रार रामपूर जिल्ह्यातील एक रहिवासी साकिब हुसेन यांनी दाखल केली. नंतर वरदराजन व आरा या दोघांवर आयपीसीतील १५३ ब, ५०५(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

इस्मत अरा यांचे वृत्त व वरदराजन यांचे ट्विट यामुळे रामपूरमधील सामान्य माणसामध्ये संताप निर्माण झाला असून त्याने तणाव वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. रामपूरचे जिल्हाधिकारी यांनी वरदराजन यांच्या ट्विटला उत्तर देताना तुम्ही दिलेल्या वृत्तामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे तुम्हाला समजेल असे म्हटले होते.

बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने उ. प्रदेश पोलिसांनी दाखल केलेली फिर्याद रद्द करताना वरदराजन व आरा या दोघांनी स्वतःची अशी कोणतेही मते व्यक्त केले नव्हती, त्यांनी केवळ पीडित कुटुंबिय व डॉक्टर यांचे म्हणणे व पोलिसांनी केलेले नकार यांना आपल्या वृत्तात समाविष्ट केले होते, असे स्पष्ट केले. द वायरने परिस्थितीनुरुप वृत्तामध्ये दुरुस्त्या करत रामपूर पोलिसांचे म्हणणेही आपल्या वृत्तात समाविष्ट केले होते. ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.०८ मिनिटांनी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी रामपूर पोलिसांनी जाहीर केलेला तीन डॉक्टरांचा खुलासा दुपारी ४.४६ मिनिटांनी बातमीत समाविष्ट करण्यात आला होता, हे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे वरदराजन व आरा यांच्या वृत्तांकनातून हिंसा निर्माण झाली, दंगल भडकली, जनक्षोभ उसळला असे न्यायालयात या खटल्यात दिसून आले नाही, असेही न्या. अश्विनी कुमार मिश्रा व न्या. रजनीश कुमार यांच्या पीठाने स्पष्ट केले.

या फिर्यादीमागची पार्श्वभूमी

वरदराजन यांनी वृत्त ट्विट करताना नव्रनीत सिंग यांचे आजोबा हरदीप सिंग डिबडिबा यांचे वक्तव्य अधोरेखित केले होते. डिबडिबा यांनी आपल्या नातवाचा मृत्यू पोलिसांच्या गोळीमुळे लागल्याने झाल्याचा आरोप केला होता. पण दिल्ली पोलिसांनी नवन्रीत सिंग यांचा मृत्यू ट्रॅक्टर पलटून झाल्याचा दावा केला होता. दिल्ली पोलिसांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सीसीटीव्ही फुटेजही प्रसिद्ध केले होते. यात ट्रॅक्टर पोलिसांच्या बॅरिकेडला धडकल्याचे दिसत होते.

नवन्रीत सिंग यांच्या पोस्टमार्टम अहवालात गोळी लागली नाही, असे नमूद केले होते. पण नवन्रीत यांच्या कुटुंबियांनी सरकारच्या दबावामुळे गोळी लागल्याचे पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आले नाही, असा आरोप करत डॉक्टरांनी नवन्रीतचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे आम्हाला सांगितले होते, असा दावा केला होता.

द वायरने हे वृत्त देताना पोलिस व डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती. डॉक्टरांनी नवन्रीत सिंग यांच्या कुटुंबाकडून झालेले आरोप फेटाळून लावले होते व द वायरने तसे वृत्त दिले होते.

द वायरकडे रामपूरचे सीएमओ मनोज शुक्ला व वार्ताहर इस्मर अरा यांच्या दरम्यान झालेले दूरध्वनी संभाषणही मुद्रित केलेले आहे. यात डॉक्टरांनी नवन्रीत सिंग यांच्या कुटुंबियांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्ही नवन्रीत यांच्यावर पोस्टमार्टम तातडीने केले व त्याची प्रत एएसपी व एसएचओला पाठवून दिली होती, असे सांगितले होते.

नंतर नवन्रीत सिंग यांच्या शरीरावर गोळी लागली होती का असा प्रश्न शुक्ला यांना विचारला असता त्यांनी ते नाकारले नाही पण याचे उत्तर डॉक्टरच देऊ शकतील असे स्पष्ट केले होते.

द वायरने या वृत्तात बरेलीचे अतिरिक्त पोलिस उपमहानिरीक्षक अविनाश चंद्रा यांची अधिकृत प्रतिक्रिया समाविष्ट करण्यात आली होती. चंद्रा यांनी नवन्रीत सिंग यांच्या पोस्टमार्टम अहवालाची चौकशी करण्यासाठी एक समितीही नेमली होती व त्यांच्या मृत्यूचे कारण लपवण्याचा कोणाचाही प्रयत्न नव्हता असेही स्पष्ट केले होते. त्यानंतर रामपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती धरून वृत्त द्यावे अशी विनंती करणारे ट्विट वरदाजन यांना उद्देशून केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0