पीटर ब्रुक – महाभारताचा वैश्विक पट उलगडणारा रंगद्रष्टा

पीटर ब्रुक – महाभारताचा वैश्विक पट उलगडणारा रंगद्रष्टा

१९७५ साली व्हिएतनाम युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला होता. युद्धाचे परिणाम भयंकर होते. पुढे एका मुलाखतीत ब्रुक यांनी व्हिएतनाम युद्ध आणि महाभारत नाट्यरूपात येणं यांचा असलेला संबंध नोंदवला आहे.

लष्कर भरती घोटाळाः ५ कर्नल, १७ अन्य जणांवर गुन्हे दाखल
टॅटूवाला विराट
जीडीपीचा अन्वयार्थ: म्हणे, भारताने इंग्लंडला मागे सारले

माझा आत्मा विकसित कर, तू माझाच आहेस

मला शुद्ध कर, उज्ज्वल, सुंदर कर

बांग्ला भाषेत गायलेले गुरुदेव रवींद्रनाथांच्या लेखणीतून उतरलेले शब्द अत्यंत तरलपणे जणू काही एखाद्या पोकळीतून जन्माला येऊन कानावर पडू लागतात. तसा साधारण १४ / १५ वर्षांचा मुलगा बाजूच्या उजेड बाहेर फेकणाऱ्या निळ्या चौकटीतून प्रवेश करतो. आधुनिकतेकडून प्राचीनतेकडे. डोळ्यांत कुतूहल दाटलेलं. पणत्या, समयांनी उजळवलेल्या, मातीने लिंपलेल्या लालसर-पांढुरक्या भिंतींचे कक्ष तो एकटाच ओलांडत पुढे पुढे चालत राहतो. कक्षांमध्ये बैठका मांडलेल्या. एके ठिकाणी भिंतीवर टांगलेला चमचमत्या सोनेरी मण्यांनी आणि लाल गोंड्यांनी सजवलेला हत्तीचा मुखवटा तो न्याहाळतो. तिथून पुन्हा नवीन कक्षात प्रवेश. तिथे समोरच नागदेवता झेंडूच्या माळांनी पूजलेली.

पुढे एका चौकटीतून फुलं, बैठका, देवघर, समया अशा सगळ्या राजसी वातावरणातून अलिप्त पण तरी त्याच्याशी जोडलेल्या अंधाऱ्या, खोल, कक्षवजा दालनात पायरीवरून खाली उडी मारून तो प्रवेश करतो. जणू एखादी गुहाच. मोजक्याच पणत्यांच्या अंधुक उजेडात तो पुढे जात राहतो आणि थबकतो. समोर एक वृद्ध पांढरे केस आणि दाढी, काहीसे मुक्त, अस्ताव्यस्त, चेहऱ्याच्या वरच्या भागावर भस्म, त्यावर लाल गंध लावून डोळे मिटलेल्या अवस्थेत प्रदीप्त अग्निसमोर बसलेला, ध्यानस्थ ! मुलाची चाहूल लागते. डोळे उघडतात.

वृद्ध विचारतो ‘तुला कसं लिहायचं ते माहित आहे का?’

मुलगा उत्तरतो ‘नाही, का?’

‘मी एका महान काव्याची रचना केली आहे. मला कुणीतरी हवंय जे ते काव्य लिहून काढू शकेल.’

मुलगा पुन्हा एक प्रश्न विचारतो, ‘तुमचं नाव काय?’

उत्तर येतं, ‘व्यास’

‘तुमची ही कविता कशाबद्दल आहे?’

‘तुझ्याबद्दल’

मुलगा डोळे मोठे करून म्हणतो ‘माझ्याबद्दल?’

पीटर ब्रुक यांच्या महाभारतातील द्रौपदी मल्लिका साराभाई.

पीटर ब्रुक यांच्या महाभारतातील द्रौपदी मल्लिका साराभाई.

उठता उठता व्यास उत्तरतात, ‘होय, ही तुझ्याच वंशाची कथा आहे. तुझे पूर्वज कसे जन्माला आले, मोठे झाले. ते प्रचंड युद्ध कशामुळे झालं? हा मानवजातीचा काव्यात्मक इतिहास आहे. जर लक्षपूर्वक ऐकलास तर सरतेशेवटी तू एका वेगळ्याच माणसात परिवर्तित झालेला असशील.’

तेवढ्यात अजून एका पात्राचा लिखाणाच्या साहित्यानिशी प्रवेश होतो. त्याने मघाशी दिसलेला हत्तीचा मुखवटा परिधान केलेला असतो. व्यास हर्षोल्लासाने उद्गारतात ‘गणेश!’

आणि महाभारताचं दस्तऐवजीकरण सुरु होतं. आणि माझ्यासमोर पीटर ब्रुकच्या महाभारताचं सादरीकरण. नाटकातल्या या पहिल्याच प्रसंगाने वेगळेपणाची नांदी गायलेली असते. पुढचा सगळा अनुभव हा अनेकांगांनी समृद्ध करणारा असतो.

२०१४ साल. निमित्त होतं ज्येष्ठ कथक नृत्यांगना विदुषी शमा भाटे यांच्या ‘अतीत कि परछाईयां-महाभारत कि पुनर्खोज’ या नवीन नृत्यसंरचनेचं. विषयाचा सर्वांगीण अभ्यास व्हावा म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही महाभारतावर आधारित साहित्य आणि कला माध्यमांमध्ये झालेल्या कलाकृती वाचत आणि बघत होतो. अर्थ-निर्वचनाची व्याप्ती आणि शक्यतांवर चर्चा करत होतो. पीटर ब्रुक यांचं महाभारत हा त्याचाच एक भाग होता.  २ जुलै २०२२ला या ब्रिटिश रंगकर्मीने जगाचा निरोप घेतला. बातमी कळली तसं त्यांचं महाभारत बघताना कुतुहल मिश्रित आश्चर्याने भरलेला माझा चेहरा आणि विचारप्रवण करणाऱ्या अनुभवाचीही आठवण झाली.

१९७०च्या दशकाच्या मध्यात, ब्रुक यांनी जीन-क्लॉड कॅरीएर या फ्रेंच कादंबरीकारासमवेत भारतीय महाकाव्य महाभारताचे नाटकात रूपांतर करण्याचे काम सुरू केले, जे प्रथम १९८५मध्ये सादर केले गेले. मूळ नाटक ९ तासांचं होतं पुढे फिल्म स्वरूपात ते ६ तासांचं बनवलं. तीच फिल्म आम्ही बघत होतो. विशेष म्हणजे पीटर ब्रुक यांनी पुढे २०१५ मध्ये मेरी-हेलन एस्टिएन यांच्याबरोबर ‘बॅटलफिल्ड’ बसवलं ते जेव्हा भारतात आलं तेंव्हा आम्ही सगळे एन.सी.पी. ए. मुंबई इथे बघायला गेलो होतो. महायुद्धानंतरच्या रिक्ततेवर आधारित हे नाटक प्रतीके, मिथक इत्यादींच्या वाटेनं जाणारं असलं तरी त्यात वेगळेपण होतं. अधिकांशी अर्थ-निर्वचनात्मक आणि काहीसं अमूर्ततेकडे झुकणारं.

१९७५ साली व्हिएतनाम युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला होता. युद्धाचे परिणाम भयंकर होते. पुढे एका मुलाखतीत ब्रुक यांनी व्हिएतनाम युद्ध आणि महाभारत नाट्यरूपात येणं यांचा असलेला संबंध नोंदवला आहे. सत्ता, उपभोगाची कधीच न संपणारी लालसा, अविवेकी, अनियंत्रित महत्वाकांक्षा, क्षमाशीलता, सहिष्णुता अशा गुणांची कायमच असणारी वानवा, मान-अपमान, सूड यांचं कधीच न संपणारं चक्र आणि या सगळ्याच्या शेवटी हातात काय उरलं हा पडणारा चिरंतन प्रश्न. देश-काळपरत्वे प्रत्येक माणूस या प्रश्नांना रोजच्या जगण्याच्या संदर्भात सामोरा जात असतो. माणसाच्या या थकवणाऱ्या, रक्त सांडणाऱ्या लढ्याचं आणि अंतर्मुख करणाऱ्या फोलपणाचं काव्य म्हणजे महाभारताची कथा आहे हे ब्रुक यांनी ताडलं होतं. युद्धाची व्यर्थता अत्यंत ठळकपणे दाखवणारं ते एक सामर्थ्यशाली वैश्विक प्रतीक आहे या जाणिवेमुळे या निर्मितीला एक मजबूत वैचारिक बैठक मिळालेली दिसते.

पण ब्रुक यांचं महाभारत केवळ याच कारणामुळे महत्वाचं नाही. लहानपणापासून रामायण, महाभारतातल्या कथा दृक वा श्राव्य वा दोन्ही रूपात आपल्यापर्यंत पोहोचत असतात. परंपरा या कथा आपल्यापुढे आणते आणि संस्कृती त्या चक्षुंपुढे उभ्या करते. त्यातून नायक-नायिकांच्या शारीर आणि स्वाभाविक वैशिष्ट्यांपासून ते स्थळ-काळाची चित्रं आपल्या स्मरण आणि आदर्शविश्वात कोरली जातात. ब्रुक यांच्या महाभारतात पहिला धक्का हा इथेच बसतो.

वेगवेगळ्या देशातले, भाषा आणि धर्मातले अभिनेते आणि अभिनेत्रींची ते कौरव आणि पांडव स्त्री-पुरुषांच्या भूमिकेत निवड करतात. एक त्यांचा मूळ स्वभावगुण सोडता काहीच असं नसतं कि जे आपल्या मनातल्या त्या प्रतिमांशी साधर्म्य सांगू शकेल. पण हळूहळू उलगडा होत जातो कि हे सर्वव्यापकतेच्या दृष्टीने उचललेलं सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल आहे आणि मुळात ही निर्मिती जगभरच्या तरी मुख्यत्वेकरून पाश्चात्त्य प्रेक्षकवर्गाला समोर ठेऊन केली आहे. एका सार्वत्रिक त्रिकालाबाधित संदेशाची वाहक म्हणून!

हाच धागा पुढे संगीत, ज्यात भारतीय जास्त पण अभारतीय वाद्यांचाही वापर येतो, वेष, जे मध्ययुगीन छाप असलेले, कशिदाकारी केलेले तसेच पांढऱ्या छटांमधले घेरदार झगे असतात, संवाद कि जे इंग्लिश मध्ये येतात इ. बाह्य घटकांमध्येही गुंफलेला असतो. त्याहून सूक्ष्म गोष्ट अशी कि तुमची संस्कृती म्हणजे तुमचे संपूर्ण अस्तित्व असते. तुमचं बोलणं, चालणं, तुमच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेगवेगळ्या भावांमध्येही ती असते. ब्रुक यांचं महाभारत संमिश्र शारीर भाषा बोलतं. पण तरीही त्यात त्यांनी पक्के भारतीय असतील असे घटक पेरलेले दिसतात उदा. कृष्ण एकेठिकाणी अर्धस्वस्तिकात उभा राहतो, तर विश्वाची निर्मिती, त्रिदेव इ. सांगताना मुद्रांचा वापर केला जातो, नमस्काराचा शिष्टाचार येतो, तर एकलव्य कलरीपयट्टू करताना दिसतो. नेपथ्यामध्येही हे दिसते. याशिवाय विदेशी पण मुख्यत्वे आशियाई संस्कृतीतल्याही काही गोष्टीही त्यात दिसतात.

ब्रुक भारतीय मनामध्ये असलेल्या महाभारताला पूर्णतः छेद न देता त्याचंच स्वतःच्या शैलीमधे, त्यांच्या दृष्टिकोनातून अर्थ-निर्वचन करून, विशिष्ट नाट्यभाषेमधे प्रकट करतात. गूढाचं वलय काढून टाकत नाहीत पण त्याला पूर्णतः मानुषीही बनवत नाहीत. तरीही मनुष्यस्वभावाच्या मर्यादा, त्यातलं कच्चेपण दाखवून दिलं जातं. व्यक्तिगत पातळीवर तुमच्या-माझ्या समजेच्या, विश्वासाच्या कक्षा रुंदावायला आणि प्रस्थापित धारणांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारी शैली. इतके सगळे संमिश्र, व्यामिश्र स्वरूप असतानाही हा सगळा खेळ का मांडला आहे, यातून नेमकं काय सांगायचं आहे हे आपल्या मनावर ठसवण्यात ते यशस्वी होतात. या सगळ्याच्या संयोगातून ब्रुक यांचं महाभारत मिश्र-सांस्कृतिक रूप असलेली वैश्विक कथा बनते. स्थळ, काळ, वंश, भाषा अशा सगळ्याच सीमा संपवून टाकते आणि हेच ह्या नाटकाचं सगळ्यात मोठं यश म्हणता येईल. त्यातल्या घटनांचा क्रम आणि इतर अनेक गोष्टींविषयी मतं-मतांतरं आहेत तरी ही एक अजरामर कलाकृती आहे. ज्या काळात ती निर्मिली गेली त्या काळाच्या दृष्टीने निर्णायक भूमिका घेणारी आणि खरंतर अनेकांगांनी काळाच्या पुढे असणारी.

युद्ध होणार हे पक्के झाल्यावर कृष्ण अर्जुनाला म्हणतो ‘निवड ही शांतता आणि युद्ध यामध्ये नसतेच. ती हे युद्ध का दुसरे यामध्ये असते. हे दुसरे युद्ध हे रणांगणावर किंवा तुमच्या हृदयात सुरु असते आणि मला या दोन्हीमध्ये काहीच फरक दिसत नाही’.

मनुष्याला पडणाऱ्या शाश्वत प्रश्नांचे अर्थ शोधायला प्रवृत्त करणारं महाभारत विभिन्न क्षेत्रांमधील लोकांना प्रभावित करत आलं आहे.  हे प्रश्न अत्यंत मूलभूत असतात. ते माणसाला निवृत्त बनवतात किंवा प्रवृत्त. पहिला मार्ग अवलंबून सत्याचा शोध घ्यायला बाहेर पडलेली उदाहरणंही आपल्याकडे आहेतच पण कवि, चित्रकार, नर्तक, नाटककार दुसऱ्या मार्गावरचे पथिक असतात आणि कलाकृती जन्माला येते.

पीटर ब्रुक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

विदुला हेमंत, या कला इतिहासकार असून, त्या सध्या पीएचडी संशोधन करीत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0