एक दिवस मुंबईत

एक दिवस मुंबईत

‘भटकभवानी’ हे पुस्तक म्हणजे समीनाने आयुष्यभर भटकता भटकता केलेल्या चिंतनातील काही परखड असे सत्याचे पुंजके आहेत आणि ते एका निर्भीड सत्यशोधकाच्या भूमिकेतून तिने मांडले आहेत. त्यातील एक प्रकरण.

‘वेटिंग फॉर गोदो’ – सॅम्युएल बेकेट
अदृष्टाच्या वाटेवरील असामान्य लेखक
आमार कोलकाता – भाग ८ :भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

मुंबईत एक दिवस मी बाहेर पडले. समीना नावासोबत पहिला स्टॉप होता फर्निचर खरेदीचा. दुकानदाराने भरपूर सल्ले दिले,

“आजकाल अशी फॅशन आहे मॅडम, असंच करावं लागतं घरात. तुम्ही काहीच चिंता करू नका, आम्ही सगळं करून देणार. विचार करायची गरजच नाय.

त्याचे आभार मानून आम्ही निघालो तर त्याने विचारलं,

“तुमचं नाव काय ?”

मी म्हटलं, “समीना.”

तो म्हणाला, “अरे व्वा, तुम्ही मराठी छानच बोलता.”

मी म्हटलं, “तुम्ही पण.”

तो म्हणाला, “पण मी तर मराठीच आहे.”

मी म्हटलं, “मी पण.’ ”

तो गोंधळला. “पण असं कसं, तुम्ही तर… नाव तर मुस्लिम…”

‘अरेच्चा’ मी मनात म्हटलं, ‘माणसाला भाषा असते आणि धर्मसुद्धा. केरळी ख्रिश्चन मल्याळम बोलतात आणि गुजरातमधील हिंदू गुजराती. मग

मराठी मुसलमानांनी काय भाषा बोलायची ?’ दुसरा स्टॉप मैत्रिणीबरोबर नवीन घर बघायला.

एजंटने उत्साहाने माहिती दिली. “सगळं एकदम छान आहे, बांधकाम, जागा, सुविधा… स्टेशन, मार्केट जवळ आहे…”

“असं का ? अरे वा!” आम्ही म्हटलं.

तो पुढे म्हणाला, “शेजारपण एकदम चांगला… इथे मॅडम राजकारणी, मुसलमान इत्यादी चालतच नाहीत.”
आम्ही म्हटलं, “अच्छा ? का बरं?”

तो म्हणाला, “नाही म्हणजे इथे फक्त चांगले, स्वच्छ, मध्यमवर्गीय लोक राहतात ना. ” मी म्हटलं, “छान, मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात यायला हवेत पण आमच्या

सोसायटीत मात्र मुसलमान नको?” तिसरा स्टॉप होता कॉलेजचा. नुकत्याच झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे खळबळ होती. वर्तुळात बसून चित्रं, पत्रकं बनविण्यासाठी चर्चा.

असादने सुरुवात केली, “मी मुसलमान आहे पण मी आतंकवादी नाही.’

मी केतकीला डोळा मारला.

ती म्हणाली, “मी हिंदू, मराठी ब्राह्मण, मीही अतिरेकी नाही.” बाकीचे टकामका एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.

म्हणजे गंमत आहे नाही! मुसलमान तरुणाने कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घ्यावी तर गांधींच्या खुनापासून, साध्वीच्या कटापर्यंतची माफी कोणी मागावी? मी निघाले तिथूनही.

घरी परतले तर माझी सात वर्षांची भाची मला येऊन बिलगली. म्हणाली, “आत्तू, शाळेत म्हणतात, तुझे बाबा तर मुसलमान दिसत नाहीत.”

“म्हणजे काय ?” मी विचारलं.

“म्हणतात, तुझे बाबा तर किती देखणे आहेत. मग मुसलमान कसे दिसतात ग?”

मी म्हटलं, “कमाल आहे. प्रिय भाचे, कसे दिसतात म्हणजे ? शाहरूख खान, आमीर खान, सलमान खान, सैफ अली खान यांच्यासारखेच की.”

एक दिवस अशा मुंबईत काढल्यावर मी विचार करते आहे, जर मुसलमानांनी आमची भाषा बोलू नये, आमच्या आसपास राहू नये, आमच्या मुलांबरोबर खेळू नये, आमच्या घरी जेवायला येऊ नये, सुंदरदेखील दिसू नये- मग त्यांनी हा देश आपला मानावा तो कसा ?

रात्री टीव्ही लावला तर न्यूज चॅनलवर आजचा सवाल, मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात येणं ही काळाची गरज आहे का ? हे आणखी एक नवल! हे मेनस्ट्रीम म्हणजे काय हो काका? सलवार-कुर्ता इस्लामी वेश, मेहंदी मुसलमानी, जिलेबी, पान, लाडके हिरो मुसलमान, जुन्या सर्व गायिका आणि नट्यासुद्धा मुस्लिम राष्ट्रभाषा हिंदुस्तानी ती अनेक भाषांचा मिलाप – पारसी, उर्दू, संस्कृत. मग मुसलमानांनी मेनस्ट्रीममध्ये यायचं म्हणजे नेमकं काय करायचं बुवा ?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0