श्रीलंकेत आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसले, पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा

श्रीलंकेत आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानात घुसले, पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा

श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो निदर्शकांनी शनिवारी राष्ट्रपती सचिवालयाला घेराव घातला आणि राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेश केला. मात्र, निषेधाच्या भीतीने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारीच निवासस्थान रिकामे केले होते.

“छत और आसमां” – एका असामान्य प्रेमाची कथा…
डॉ. ढेरे, देशात कोणती शाही आहे? – जयंत पवार
विना मास्क दंडः गुजरातची २५२ कोटी रु.ची वसूली

कोलंबो: श्रीलंकेत हजारो आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मध्य कोलंबोच्या उच्च सुरक्षा असलेल्या फोर्ट भागातील बॅरिकेड्स हटवून त्यांच्या अधिकृत निवासस्थानात प्रवेश केला.

दुसरीकडे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गेल्या मे महिन्यात महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले होते.

ट्विटरवर राजीनामा जाहीर करताना विक्रमसिंघे यांनी लिहिले, की “सर्व नागरिकांच्या सुरक्षेसह सरकारचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन.”

यापूर्वी त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. एका निवेदनात ही माहिती देताना, श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले, की पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे आणि सर्वपक्षीय सरकारचा मार्ग मोकळा करण्यास ते तयार आहेत.

देशातील गंभीर आर्थिक संकटामुळे आंदोलक सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.

राजपक्षे यांच्यावर मार्च महिन्यापासून राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होतं. एप्रिलमध्ये विरोधकांनी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कब्जा केल्यापासून ते अध्यक्षीय निवासस्थान हे त्यांचे निवासस्थान आणि कार्यालय म्हणून वापरत होते.

राष्ट्रपतींच्या निवासस्थानात काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, शनिवारच्या विरोधाचा अंदाज आल्याने राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारीच घर रिकामे केले होते.

इंडियन एक्स्प्रेसने वृत्तसंस्था एएफपीच्या हवाल्याने म्हटले आहे, की राष्ट्रपतींनी घरातून पळ काढल्याची बातमी समोर आल्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानात प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचे फवारे मारले, पण तरीही आंदोलक अडथळे तोडून राष्ट्रपती निवासस्थानात घुसले.

दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी शनिवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावून देशातील सार्वजनिक आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या संकटावर चर्चा केली.

राष्ट्रपती निवासस्थानात आंदोलक.

राष्ट्रपती निवासस्थानात आंदोलक.

विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी पक्षांची तातडीची बैठक बोलावली असून संसदेचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती सभापतींना केली आहे.

आंदोलक राष्ट्रपती निवासाच्या भिंतीवर चढले आणि ते आत गेले. मात्र, त्यांनी कोणत्याही मालमत्तेचे नुकसान केले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार केला नाही.

दरम्यान, निदर्शनांदरम्यान दोन पोलिस अधिकाऱ्यांसह किमान ३० जण जखमी झाले असून त्यांना कोलंबो येथील राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गाले, कॅंडी आणि मातारा या शहरांमध्ये आंदोलकांची रेल्वे अधिकाऱ्यांशी झटापट झाली आणि अधिकाऱ्यांना कोलंबोला जाणाऱ्या गाड्या चालवण्यास भाग पाडले.

याच परिसरात पोलिस, विशेष टास्क फोर्स आणि लष्कराची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे.

आंदोलनाच्या संयोजकांनी सांगितले की, लोक उपनगरातून पायी निघून कोलंबो आंदोलकांमध्ये सामील होत आहेत.

गोटाबाया राजपक्षे राजीनामा देत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.

तत्पूर्वी, वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर श्रीलंका पोलिसांनी शनिवारी सात विभागांमधून कर्फ्यू हटवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला होता, ज्यात नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, उत्तर कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो मध्य यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

श्रीलंकेच्या बार असोसिएशनने कर्फ्यूला विरोध केला आणि तो बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले.

बार असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे, “असा कर्फ्यू स्पष्टपणे बेकायदेशीर आहे आणि आपल्या देशातील लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे सरकार मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा निषेध करत आहेत.”

श्रीलंकेच्या मानवाधिकार आयोगाने कर्फ्यूला मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन म्हटले आहे.

त्याचवेळी कुमार संगकारा आणि सनथ जयसूर्या यांसारखे श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आंदोलकांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. या निषेधाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत संगकाराने लिहिले की, ‘हे आमच्या भविष्यासाठी आहे.’

२.२ कोटी लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेत कर्जबाजारी अर्थव्यवस्था हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. हा देश १९४८ मध्ये ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यापासून अभूतपूर्व आर्थिक संकटाशी झुंज देत आहे.

देशाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात महिंदा राजपक्षे यांना हिंसक संघर्षानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्या राजीनाम्याच्या काही तास आधी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर राजधानी कोलंबोमध्ये लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. या हल्ल्यात १३८ जण जखमी झाले होते.

त्यानंतर ७३ वर्षीय रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी नियुक्ती केली.

दरम्यान, नागरिकांची निदर्शने सुरूच राहिली आणि ६ मे रोजी राष्ट्रपती राजपक्षे यांनी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मध्यरात्रीपासून आणीबाणी जाहीर केली. जवळपास महिनाभरात श्रीलंकेत आणीबाणी जाहीर होण्याची ही दुसरी वेळ आहे. तूर्तास आणीबाणी मागे घेण्यात आली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0