नवी दिल्ली: भारतात २४ जुलैला मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आढळला. आधीचे तीन रुग्ण केरळमध्ये आढळले होते आणि त्यांनी नुकताच परदेश प्रवास केला होता. मात्र, दिल्
नवी दिल्ली: भारतात २४ जुलैला मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आढळला. आधीचे तीन रुग्ण केरळमध्ये आढळले होते आणि त्यांनी नुकताच परदेश प्रवास केला होता. मात्र, दिल्लीत आढळलेल्या या चौथ्या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नाही. तज्ज्ञांच्या मते यात घाबरण्याजोगे काहीच नाही पण साथीचा सामना करण्यासाठी धोरण आखण्यातील ढिलाई महाग पडू शकते.
दरम्यान, मंकीपॉक्स (एमपीएक्स) साथीबाबतच्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची ही काही उत्तरे.
संक्रमणाची गतीशीलता
केवळ वैज्ञानिकांनाच नव्हे, तर सामान्य लोकांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे- मंकीपॉक्सच्या विषाणूचे संक्रमण कसे होते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मंकीपॉक्स प्रादुर्भाव विभागाच्या प्रमुख रोजामंड लेविस यांनी ९ जून रोजी डब्ल्यूएचओच्या एका सोशल मीडियावरील कार्यक्रमादरम्यान सांगितल्यानुसार, हा विषाणू चेहऱ्याच्या व त्वचेच्या निकट संपर्कातून संक्रमित होतो.
“आत्तापर्यंत तर असेच सांगितले जात आहे. साथीदरम्यान काही नवीन गोष्टी घडत असतील, तर त्या सगळ्यांची कल्पना आपल्याला नाही. अद्याप खूप काही समजून घ्यायचे आहे,” असे त्या म्हणाल्या होत्या. पुरुषांशीच लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आत्तापर्यंत हा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे, असेही लेविस यांनी सांगितले होते. अशा पुरुषांच्या संपर्कातील लोकांना, यात त्यांचे कुटुंबीयही येतात, सर्वाधिक धोका आहे. अर्थात, डब्ल्यूएचओपुढील आव्हान दुहेरी आहे. यातील वैज्ञानिक मुद्दे जसे आहेत तसे लोकांपुढे मांडणेही आवश्यक आहे आणि त्याचवेळी एमएसएम (समलैंगिक पुरुष) समुदायाबद्दल कलंकाची भावना निर्माण होऊ नये याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रियसस यांनी मंकीपॉक्स साथीला ‘सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेतील आपत्कालीन स्थिती’ म्हणून जाहीर करतानाच, सर्व देशांनी एमएसएम समुदायासोबत ‘काम करावे’ असे आवाहन केले आहे तसेच प्रभावी माहिती व सेवांची आखणी व प्रसार करण्याची सूचनाही केली आहे.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने (यूकेएसएचए) मंकीपॉक्सची चाचणी पॉझिटिव आलेल्या ४०००पैकी ५७६ लोकांचे सर्वेक्षण घेतले. त्याचे निष्कर्ष २२ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या ५७६ जणांपैकी ९६ टक्क्यांनी गे, बायसेक्शुअल असल्याचे किंवा पुरुष असून पुरुषांसोबत समागम करत असल्याचे सांगितले. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (एनईजेएम) सुमारे १६ देशांमधील प्रादुर्भाव मालिकेचे विश्लेषण प्रसिद्ध करण्यात आले आहे. लैंगिक क्रिया, विशेषत: गे किंवा बायसेक्शुअल पुरुषांमधील लैंगिक क्रिया, हाच मंकीपॉक्स विषाणूच्या संक्रमणाचा संशयित मार्ग असावा, असे त्यातही दिसून आले आहे.
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ चंद्रकांत लहरिया यांच्या मते, त्वचेच्या जखमा साधारणपणे जननेंद्रीयांच्या भागात आढळतात. “या आजाराशी लांच्छनाची भावना जोडली गेल्यास संशयित रुग्ण निदान व उपचारांसाठी पुढेच येणार नाहीत आणि त्यामुळे साथीची तीव्रता आणखी वाढेल,” असे लहरिया यांनी ‘द वायर’ला सांगितले.
भारतात आढळलेले चार रुग्णही पुरुषच आहेत. मात्र, ते एमएसएम आहेत की नाही याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मंकीपॉक्सचे वर्गीकरण ‘लैंगिक समागमाद्वारे संक्रमित आजार (एसटीडी)’ म्हणून केले जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, तो दूषित वस्तू किंवा साहित्य अशा अन्य मार्गांनीही पसरू शकतो. प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवरील पुरळाशी दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या त्वचेचा संपर्क झाल्यास तिला हा आजार होऊ शकतो आणि म्हणून विलगीकरण अपरिहार्य आहे. हवेमार्फत होणारे संक्रमण हा आणखी एक मार्ग असून, तोही महत्त्वपूर्ण आहे. मात्र, या मार्गाने मंकीपॉक्सचे संक्रमण होऊ शकते हे सिद्ध करणारा पुरावा अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. या विषाणूचे सुक्ष्म थेंब हवेत किती काळ राहू शकतात याचे उत्तरही अद्याप मिळालेले नाही. डब्ल्यूएचओने सावध भूमिका घेतली आहे आणि ‘छोट्या पल्ल्याच्या एअरोसोल्स’मुळे संक्रमण होऊ शकते असे म्हटले आहे. आणि म्हणूनच प्रादुर्भावित व्यक्तीच्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमुळे खोलीतील अन्य व्यक्तींना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
यूकेएचएसएने दिलेल्या माहितीनुसार, यूकेमध्ये ‘मर्यादित घरगुती संक्रमण’ आढळले आहे. आरोग्यसेवा कर्मचारी अर्थातच धोक्याखाली आहेत, कारण, यूकेमध्ये आरोग्य आस्थापनांमधील हवेत हा विषाणू आढळला आहे. म्हणूनच एमपीएक्सचे रुग्ण हाताळताना पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट वापरण्याची सूचना सर्व आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा यंत्रणांनी दिली आहे.
लशी व औषधे
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) जिनिऑस आणि एसीएएमटूथाउजंड या लशींची शिफारस केली आहे. या लशींचा जगभरातील पुरवठा अगदीच अल्प आहे. यातील जिनिऑस ही लस आत्तापर्यंत केवळ प्राण्यांमध्ये परिणामकारक ठरली आहे. तर दुसरी एसीएएमटूथाउजंड मानवावरील क्लिनिकल चाचण्यांमध्येही परिणामकारक ठरली आहे. या दोन्ही लाइव्ह व्हायरस लशी आहेत. म्हणजेच त्यांच्यात एमपीएक्स विषाणूच अत्यंत अल्प प्रमाणात वापरण्यात आहे. हा विषाणू शरीरात सोडला असताना प्रतिकारयंत्रणेला प्रतिसादक्षम करतो.
सर्व ज्ञात रुग्ण व संशयितांना लस देण्याचा निर्णय अमेरिका सरकारने घेतला आहे. युरोपीयन मेडिसिन्स एजन्सीने (ईएमए) आयमॅनव्हेक्स लशीला मंजुरी दिली आहे. ही लस यापूर्वी देवीच्या रोगासाठी वापरण्यात आली होती. देवीच्या आजाराचे १९८० मध्ये निर्मूलन झाले.
सर्व राष्ट्रींनी आपल्या तंत्रज्ञानात्मक सल्लागार समूहांची लसीकरणाबाबत बैठक घ्यावी आणि लसीकरण धोरणाबाबत निर्णय करावा, अशी सूचना डब्ल्यूएचओने केली आहे.
मंकीपॉक्सवर विशिष्ट असे औषध नाही. ईएमएने टेकोव्हायरिमॅटला मंजुरी दिली आहे. मंकीपॉक्ससह ऑर्थोपॉक्सशी संबंधित सर्व प्रादुर्भावांसाठी हे विषाणूरोधक औषध दिले जाते. या औषधाचे उत्पादन व पुरवठा मर्यादित असल्यामुळे सर्व देश औषधाची व्यवस्था करण्यासाठी झगडत आहेत. आजार गंभीर झाला तरच हे औषध द्यावे अशी शिफारस आहे.
भारत सरकारचा प्रतिसाद
आजाराच्या व्यवस्थापनासाठी भारत सरकारने २१ मे रोजी निर्देश जारी केले. मात्र, केंद्र सराकरने अद्याप मंकीपॉक्सला ‘अधिसूचनीय आजार’ म्हणून जाहीर केलेले नाही. जर आजार अधिसूचनीय जाहीर झाला, तर सर्व क्लिनिशियन्सना त्यांच्याकडे येणाऱ्या या आजाराच्या रुग्णांची माहिती सरकारला देणे बंधनकारक होईल. केवळ दिल्ली सरकारने अशा प्रकारची अधिसूचना जारी केली आहे.
मंकीपॉक्ससाठी लशी खरेदी करण्याची या क्षणी कोणतीही योजना नाही, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र, हा दृष्टिकोन योग्य नाही असे मत लहरिया यांनी व्यक्त केले. “सरकारला लशी मिळवण्यासाठी भल्यामोठ्या रांगेत प्रतीक्षा करावी लागणार आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि भारतातील विविध ठिकाणांवरून आणखी रुग्णांची नोंद होणार आहे हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे सरकारने निदान झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी तरी लशी खरेदी करण्याचा विचार केलाच पाहिजे. त्याचप्रमाणे चाचणी घेण्यात अडथळे येऊ नयेत म्हणून त्यासाठी आवश्यक सामुग्री खरेदी करून ठेवावी,” असे ते म्हणाले.
सध्या सर्व नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे चाचणीसाठी पाठवले जात आहे. सरकारला चाचण्यांची सुविधाही वाढवावी लागणार आहे. ‘हा विषाणू हाताळू शकणाऱ्या अधिकाधिक लोकांना प्रशिक्षित करणे, अधिकाधिक आस्थापने स्थापन करण्याहून, अधिक महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले. यापूर्वी भारतात कधीही मंकीपॉक्सची लागण कोणाला झाली नव्हती.
आजाराची तीव्रता
मंकीपॉक्सच्या साथीत आत्तापर्यंत १६,००० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बहुसंख्य रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासली नाही. मात्र, वेदनादायक जखमांमुळे रुग्णांसाठी हा आजार त्रासदायक ठरत आहे.
एनईजेएम अभ्यासात असे आढळून आले की, १३ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल करण्यामागील प्रमुख कारण वेदनेचे व्यवस्थापन हे होते, या आजारात अॅनोरेक्टल भागात तीव्र वेदना होतात आणि सॉफ्ट टिश्यूंना प्रादुर्भावही होतो. त्यामुळे तोंडावाटे अन्न घेण्यावर मर्यादा येतात, डोळ्याला जखम होते, मूत्रपिंडाला जखम होऊ शकतो, मायोकार्डिटिस होतो. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणात्मक व्यवस्थापनाची आवश्यकता असते आणि प्रादुर्भावामुळे झालेला आजार फारसा गंभीर नसतो.
या साथीबद्दलची चिंता अशी आहे: यातून कोविड-१९ साथीच्या वेळी निर्माण झाली तशी परिस्थिती निर्माण होईल का?
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व तज्ज्ञांनी ही शक्यता फेटाळली आहे. “या विषाणूमध्ये साथीची संभाव्यता दिसत नाही,” असे लहरिया म्हणाले. सार्स-सीओव्ही-टू हा आरएनए विषाणू होता, तर मंकीपॉक्स डीएनए विषाणू आहे. आणि म्हणूनच तो स्थिर आहे, त्यात म्युटेशनची क्षमता फारशी नाही.
अर्थात तज्ज्ञ लोकांना न घाबरण्याचा सल्ला देत असले, तरी ताप व पुरळासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणेही गुंतागुंतींना निमंत्रण ठरू शकते.
COMMENTS