आपल्याकडील माध्यमांमधील अलीकडच्या तरूण मुलामुलींची माहिती व सामान्य ज्ञान याविषयीची एकूण परिस्थिती बघता त्यांना मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याविषयी कितपत माहिती असेल याचा अंदाज करता येतो. पण ही परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे का? की इतरही देशात काहीशी अशीच परिस्थिती आहे?
परवाच निधन पावलेले सोवियेत यूनियनचे अखेरचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हे नाव उच्चारले की आज पन्नाशीच्या पुढे असलेल्यांना जास्त काही सांगण्याची काही गरज नाही. गोर्बोचेव्ह यांनी राबवलेल्या ग्लास्तनोस्त आणि पेरेस्त्रॉईका या दोन संकल्पना आणि त्यातून त्यांनी बदललेली जागतिक परिस्थिती हे या लोकांच्या मनात घट्ट घर करून बसले आहे.
पण त्यानंतरच्या पिढ्यांचे काय? त्यांना गोर्बाचेव्ह यांच्या ऐतिहासिक कामगिरीविषयी किती व काय माहिती आहे. आपल्याकडील माध्यमांमधील अलीकडच्या तरूण मुलामुलींची माहिती व सामान्य ज्ञान याविषयीची एकूण परिस्थिती बघता त्यांना या सगळ्याविषयी कितपत माहिती असेल याचा अंदाज करता येतो. पण ही परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे का? की इतरही देशात काहीशी अशीच परिस्थिती आहे? इतर देश सोडाच, प्रत्यक्ष रशियात काय परिस्थिती आहे किंवा होती? किती नव्या पत्रकारांना गोर्बाचेव्ह यांच्या जागतिक स्तरावरील महत्वपूर्ण कामगिरीची माहिती वा कल्पना होती?
या विषयीचा एक वृत्तांत काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाला होता आणि तो वाचून खूपच गंमत वाटली होती. नेमके वर्ष आठवत नाही साधारणपणे २००७ च्या सुमारासची ही घटना. गोर्बाचेव्ह हे नाव जागतिक राजकीय पटलावरून केव्हाच नाहीसे झालेले होते. त्यांनी केलेल्या सुधारणा व त्याचे परिणाम १९८९-९० च्या सुमारासचे. मधे १५-१६ वर्षे गेलेली. क्वचित कधी एखादा लेख त्यांच्यावर छापून येत असेल किंवा कुठच्या तरी एखाद्या लेखात काही संदर्भात त्यांचा उल्लेख केला जात असेल तेव्हढाच. बाकी गोर्बाचेव्ह या नावाचे बातमीमूल्य संपल्यात जमा होते.
त्या काळात मरीन लाइन्स भागात असलो आणि जरा वेळ मिळाला तर लगेचच मी अमेरिकन लायब्ररीत जात असे आणि तेथील वृत्तपत्रे आणि नियतकालिके वाचत वेळ घालवत असे. असाच एकदा तेथे जाऊन एक वृत्तपत्र (नीट आठवत नाही, पण बहुधा फायनान्शियल टाइम्स होता) वाचायला घेतले आणि त्याच्या पहिल्याच पानावर एक बातमी वाचायला मिळाली. प्रचंड लांबलचक अशी ती बातमी पहिल्या पानावरून पुढे आत दुसऱ्या एका पानावर छापली होती.
बातमी होती ती मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी आपली मृत पत्नी रईसा हिच्या नावे सेंट पीटसबर्ग येथे सुरू करत असलेल्या एका रुग्णालयाविषयी. त्या रूग्णालयाच्या संदर्भात गोर्बाचेव्ह सेंट पीटसबर्गला आलेले होते आणि रूग्णालयाविषयी महिती देण्याकरता त्यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती, त्या पत्रकार परिषदेचा वृत्तांत त्या बातमीत होता. पण साधारणपणे अशी बातमी जशी लिहिली जाईल (रूग्णालयाच्या माहितीने सुरूवात) तशी ती लिहिली नव्हती. पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी सांगून लगेचच बातमी रोख एका तरूण पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाकडे वळली होती.
त्या तरूण वार्ताहराने विचारलेला प्रश्न होता, मिस्टर गोर्बाचेव्ह हे रूग्णालय उभारण्याव्यतिरिक्त इतर काही मोठे काम आपण आयुष्यात केले आहेत का? प्रश्न ऐकून स्वतः गोर्बोचेव्ह आणि हजर असलेले इतर काही जेष्ठ पत्रकार खुर्चीत नक्कीच कोलमडले असतील. प्रश्नावरूनच त्या तरूण पत्रकाराला आपल्याच देशाचा आधीच्या २०-२५ वर्षांचा इतिहासही माहीत नव्हता हे स्पष्ट होते. जागतिक पातळीवरील उलथापालथ करणारा एक नेता आपल्याच देशात होऊन गेला, त्याच्याशी बोलण्याची संधी मिळतेय पण त्याचे नेमके महत्त्वच माहीत नाही याइतका कर्मदरिद्रीपणा दुसरा नसेल. महत्त्व माहीत नाही ही दोष असला तरी ते माहीत नसेल तर माहीत करून न घेणे हा खूपच मोठा गुन्हा आहे. त्यावर कळस म्हणजे आपल्या अज्ञानाचे निर्लज्जपणे इतके उघड प्रदर्शन मांडणे.
पण हे असे का होते? खरतर पूर्वी (म्हणजे फार पूर्वी नव्हे तर अगदी आत्ता आत्ता ८०च्या दशकापर्यंत) पत्रकारिता शिकवणारे अभ्यासक्रम नव्हते. माध्यमांचा आणि माहितीचा आजच्याइतका स्फोट झालेला नव्हता. परदेशातील वृत्तपत्र आपल्याकडे पोचायला दोन दिवस लागायचे. असे असतानाही पत्रकारांना, लोकांना बऱ्यापैकी माहिती असायची. आता पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे शेकड्यांनी अभ्यासक्रम आहेत. इंटरनेट, टेलिव्हिजन आणि समाजमाध्यमामुळे कोणतीही माहिती त्वरीत उपलब्ध होत असल्याने माहितीचा विस्फोट झाला आहे, माहिती मिळवायला अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. तरीही वानवा कसली आहे तर माहिती असलेल्या पत्रकारांची, वाचणा-या पत्रकारांची. नेमक काय चुकते आहे ते शोधून दुरुस्त केले नाही तर अश्या न वाचणाऱ्या नव्या पत्रकारांमुळे पत्रकारिताच वाचणार नाही.
COMMENTS