भारतात सप्टेंबरचा महिना “The Big Butterfly Month” म्हणून साजरा केला जातो. शालेय अभ्यासक्रमात अतिशय साचेबद्ध व सपकपणे शिकलेल्या फुलपाखराचे जीवनचक्र प्रत्यक्षात अत्यंत क्लिष्ट असते. त्या जीवनचक्राचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
फुलपाखरू दिसायला जितके सुंदर व आकर्षक तितकेच त्याचे आयुष्यही नाजूक व अनिश्चिततेने भरलेले असते. आक्रमण सोडा पण बचावाचीही पुरेशी साधन सामुग्री नसते यांच्याकडे. बरं जीवनक्रमही चार अवस्थांमधून जाणारा. प्रत्येक अवस्था फार करणे ही एक प्रकारची कसरतच असते. हवामानातील बदल, अपुरे खाद्य व निसर्गातील भक्षक असे अनेक अडथळ्यांना सामोरे जाऊन हा नाजूक जीव अंडी, अळी, कोष अशा अवस्था पार करतो व फुलपाखरात रुपांतरित होतो.
शालेय अभ्यासक्रमात अतिशय साचेबद्ध व सपकपणे शिकलेल्या ह्या फुलपाखराच्या जीवनचक्र जेव्हा प्रत्यक्ष पहाण्यात आली त्यावेळी त्यांच्यातील क्लिष्टता खऱ्या अर्थाने मला जाणवली. तेच अनुभव गोष्टीरूपात व थोडे रंग भरून मनोरंजक करण्याचा हा एक प्रयत्न. फुलपाखराचे जीवनचक्र म्हणजे एक क्रिकेटची मॅच आहे ही कल्पना करून गोष्ट लिहिली आहे.
क्रिकेटची मॅच म्हणजे उत्कंठा, अतितटी, अनिश्चितता आणि टेन्शन यांनी पुरेपूर भरलेला अनुभव. बहुदा त्यामुळेच ती बघायला मजा येते. अशीच एक अतितटीची मॅच मी आमच्या टेरेसवर अनुभवली. तीच अनिश्चितता, तीच उत्कंठा आणि तसाच रोमहर्षक शेवट.
एक दिवस एक छोटेसे फुलपाखरू आमच्या टेरेसवर आले व सोनटक्क्याच्या झाडावर १०-१२ अंडी घालून उडून गेले. ग्रास डेमन असे त्याचे नाव. फुलपाखरे खूपच ब्रँड कॉन्शस असतात, म्हणजे प्रत्येक प्रजातीचे फुलपाखरू काही ठराविक झाडांवरील अंडी घालतात आणि त्यांच्या अळ्या त्याच झाडांची पाने खाऊन मोठ्या होतात.
अशाप्रकारे अंड्यांच्या रूपात बारा गडी ग्राऊंडवर उतरले आणि मॅचला सुरूवात झाली. टिम कोणत्या आणि कसली मॅच? तर, एक टीम होती फुलपाखराची व दुसरी बाकी निसर्गातील सगळ्या गोष्टी म्हणजेच शेष विश्व. आणि मॅच होती मोठे होण्याची व जगण्याची. पिच होते सोनटक्क्याचे झाड, आणि स्टेडियम म्हणजे आमची टेरेस व एकमात्र प्रेक्षक मी. जवळ जवळ एक महिना दिवसरात्र चाललेली मॅच खूप काही शिकवून गेली. छान अनुभव देऊन गेली.
फुलपाखराच्या टिममधे सगळेच नवखे आणि समोरच्या टिममधे ऊन, वारा, पाऊस सारखे खंदे ओपनिंग बॉलर. मग काय एक दोन तर भोपळाही न फोडता म्हणजे अंड्यातच आऊट झाले. काही अंडी हॅच झाली नाहीत, तशीच वाळून पोकळ झाली. सुरुवात तर काही छान नाही झाली फुलपाखरू टिमची. पण नंतरच्या बॅट्समननी म्हणजे अळ्यांनी सावधपूर्वक खेळायला सुरूवात केली. पानाची गुंडाळी करून त्यात सुरक्षित राहून स्वतःची क्रिझ आखून घेतली व त्याबाहेर शक्यतो जाणार नाही याची काळजी घेऊन रन बनवायला म्हणजे पाने खायला सुरूवात केली. एक तर हिट विकेट आऊट होणार असेच वाटत होते कारण पान खाता खाता अळी पानाच्या टोकाकडे गेली व देठाकडचा बराचसा भाग खाऊन टाकला. अजून थोडा खाल्ला असता तर पानाबरोबर अळी खाली पडून शेखचिल्ली झाली असती. पण सुदैवाने असे काही झाले नाही. या प्रजातीच्या अळ्या नाजूक पण मजबूत रेशमाच्या धाग्यांनी पानांची गुंडाळी अथवा घडी बनवतात व त्यात रहातात व पक्ष्यांसारख्या भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करतात.
दिवसागणिक अळ्यांचा आकार म्हणजेच स्कोअर वाढू लागला तशी मॅचमधली मजाही वाढू लागली अन एक अनपेक्षित धक्का बसला. एक चांगला बॅट्समन पुढे येऊन मारायला गेला अन क्रिझ आऊट झाला. पानांच्या गुंडाळीतून बाहेर आलेल्या अळीला एका कोळ्याने बरोबर पकडले व त्यातून सुटका केवळ अशक्य. असाच एक प्लेअर दोन तीन मुंग्यांमुळे रनआऊट झाला. पुन्हा एकदा टेन्शन व काळजीचे वातावरण.
बाकीचे प्लेअर टिकून होते हळूहळू स्कोअर व त्यांचा आकार वाढत होता. मॅच तशी दिवस रात्र चालू होती माझी सगळी कामं सांभाळून बॉल टू बॉल मॅच बघणं शक्य नव्हतं. एका दिवशी सकाळी बघितलं तर अजून एक गडी बाद झाला होता. बहुदा रात्रीच्या पालीने त्याच्या स्टंप्स उडवल्या होत्या. त्यानंतर एके दिवशी संध्याकाळी बघतो तर सकाळचे दोन गडी गायब. बुलबुल किंवा मैना किंवा लेग स्पिनर चपळ गोलंदाज शिंपी यांच्यापैकी कोणाचे तरी हे काम असणार असा मी अंदाज केला. निसर्गात भक्ष्य आणि भक्षक यांच्यात कायम चढाओढ चालू असते, दोघांनाही जगण्यासाठी दुसऱ्यावर मात करावी लागते अशात कधी भक्ष्य तर कधी भक्षक यशस्वी होतात व त्यामुळेच निसर्गाचा समतोल रहातो.
आता मोजकेच प्लेअर राहिले होते. पिचही खेळून खेळून खराब झाले होते. व रन बनवणे (पाने शोधून शोधून खाणे) अवघड होत होते. माझी काळजी वाढत होती. पण एक प्रेक्षक म्हणून सर्व खेळ बघत असल्याने त्यात मी फिक्सिंग किंवा हुल्लडबाजी करून मॅचमध्ये व्यत्यय आणणार नव्हतो. आणि अशातच एक प्लेअर नर्वस नाईंटीमध्ये पोहोचला (अळीचा कोष झाला). वा दिल खुष हो गया! अशा अवघड पिचवर व बलाढ्य संघाविरुद्ध असा खेळ खरंच कौतुकास्पद होता.
पण पुन्हा गोची झाली. त्याचा स्कोअर काही पुढे सरकेना आणि अशातच एक जोरदार अपील झाले व थर्ड अंपायरनी रिप्ले बघून त्याला आऊट दिले. कोष तयार झाला खरा पण अळीच्या अवस्थेत असतानाच त्यावर वास्प प्रकारच्या माशीने अंडी घातली होती व बाहेरून अळी वाढून कोष झाला पण आत त्या वास्पचेही अनेक कोष तयार होत होते टॉर्चच्या प्रकाशात कोषातील कोष स्पष्ट दिसत होते. अखेर फुलपाखराचा कोष मरून गेला व त्यातून काही डझन वास्पच्या माशा बाहेर पडल्या.
पुन्हा निराशा, टेन्शन, फिंगर्स क्रॉस्ड म्हणतात तसे झाले. आता दोन तीनच खेळाडूच राहिले होते. फुलपाखरू मॅच हरणार असे वाटू लागले अन बघता बघता एका बॅट्समनने सेंचुरी मारली. दुसराही त्याच्या मागून शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला. व त्यानेही एकदम झोकात शतक पूर्ण केले. अगदी विथ फ्लाईंग कलर्स म्हणतात अगदी तसे. आणि महिनाभर चाललेली ही रोमहर्षक मॅच अखेर संपली. मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार अर्थातच शतकवीराला मिळाला.
आता तुम्ही म्हणाल कोण जिंकले? तर अशा या निसर्गाबरोबरच्या मॅचमधे हार जीत नसते काही वेळा फुलपाखरू वरचढ तर कधी निसर्ग जिंकणार असे वाटते. पण सरतेशेवटी मॅच कायम ड्रॉ होत असते. पुन्हा काही दिवसांनी हेच शतकवीर त्यांची अकादमी सुरू करतील आणि परत अशीच एक अटीतटीची मॅच अजून एखाद्या सोनटक्क्याच्या मैदानावर सुरू होईल. माझा प्रयत्न चालू आहे की माझे सोनटक्क्याचे मैदान तोपर्यंत परत हिरवेगार होईल व अशीच एखादी रोमहर्षक मॅच मला पुन्हा एकदा घरबसल्या बघता येईल.
भारतात सप्टेंबरचा महिना “The Big Butterfly Month” म्हणून साजरा केला जातो. या मधील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकला भेट द्या.
(फोटो सौजन्यः रजत जोशी)
पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा
COMMENTS