सध्याच्या घडीला जर क्रिकेटमधील खरा संघर्ष, मैदानावरचे शत्रुत्व पाहायचे असेल तर ते भारत-ऑस्ट्रेलियामधील सामन्यांमध्ये पाहायला मिळते. काही प्रमाणात इंग्लंडविरोधातही तो दिसून येतो. काही महिन्यांपू्र्वी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही तसे चित्र दिसून आले होते. पण भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये या संघाविषयी तसा उन्माद निर्माण होताना दिसत नाही. एकूणात पाकिस्तानविषयी उन्माद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही.
२००७मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान अखेरचा कसोटी सामना झाला होता. आणि आजपर्यंत उभय देशांमध्ये कसोटी मालिका झालेली नाही. २०१३मध्ये दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय सामना झाला होता. त्यानंतर हे देश परस्परांच्या देशात जाऊन कसोटी मालिका किंवा एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. जे सामने दोन्ही देशांदरम्यान झाले आहेत ते आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये जे होतात तेच. आजच्या तरुण पिढीला सुमारे एक दशकापूर्वी भारत-पाकिस्तानदरम्यान मैदानावर कोणत्या प्रकारची खुन्नसगिरी असायची हे समजणार नाही. त्यावेळी दोन्ही संघ तगडे असायचेच पण मैदानावर जो एक प्रकारचा तणाव, दबाव दिसायचा तो आजच्या पिढीच्या प्रेक्षकांना सांगता येणे कठीण आहे. हे देश जेव्हा एकमेकांना भिडायचे त्यावेळी रसिकांमध्ये एक प्रकारचा रोमांच निर्माण व्हायचा, तो आता पूर्णत: लयास गेलेला आहे.
दोन दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना पाकिस्तानशी होता. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर दोनएक दिवस उगाचच राष्ट्रवादासारखे वातावरण तयार केले जात होते. त्याला जबाबदार दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती सुद्धा आहे. पण भारताचा संघ इतका तगडा होता की त्याच्यापुढे पाकिस्तानच्या संघाची डाळ शिजणे कठीण होते. हा संघ दुबळाच होता. भारत या स्पर्धेत पाकिस्तानच्या तुलनेत फार पुढे गेला आहे आणि पाकिस्तानची पार दैना उडाली आहे.
भारतीय संघ व पाकिस्तानचा संघ यांच्या एकूण क्षमतेत गेल्या दीड दशकात खूप मोठा फरक पडला आहे. भारताचा संघ हा आता व्यावसायिक पद्धतीने खेळताना दिसतो. संघाकडे उत्तम प्रशिक्षक आहेत, अद्ययावत सरावतंत्रे आहेत अन्य काही साधने आहेत. पण त्या तुलनेत पाकिस्तानच्या संघाकडे गुणवत्ता जोखणारी व्यवस्था नाही. त्यांच्याकडे व्यावसायिकता नसल्याने पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर परिणामकारक कामगिरी करू शकत नाहीत. ९०च्या दशकात ज्या तंत्राने मैदानावर क्षेत्ररक्षण केले जायचे तेच तंत्र पाकिस्तानचा संघ आजही अजमावताना दिसतो. बहुसंख्य खेळाडू तिशीच्या जवळ आले आहेत. त्यामुळे गुणवत्ता मार खाताना दिसते.
२००९मध्ये पाकदौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या घटनेने पाकिस्तान क्रिकेटला जबर धक्का दिला. या घटनेनंतर एकदा अपवाद वगळता पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा सामना खेळवला गेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने व्हावेत म्हणून आयसीसीसी व अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डशी सातत्याने चर्चा करत असते तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटच्या अर्थकारणाला झळ बसली आहे, त्याचे परिणाम निश्चितच गुणवान खेळाडू निर्मितीवरही होताना दिसतो.
आताच्या पाकिस्तानच्या संघात शोएब मलिक व मोहम्मद हफीज हे दोनच खेळाडू भारतीय क्रिकेट रसिकांना माहिती असतील. या दोघांची कामगिरी फार उत्तम आहे असेही नाही. मोहम्मद अमीर याची पार्श्वभूमी मॅच फिक्सिंगची असल्याने तोही तसा नवखाच.
पाकिस्तानच्या फलंदाजीत बाबर अझम व इमाम-उल-हक हे दोनच खेळाडू चांगले आहेत. या दोघांची आयसीसी रँकिंगमध्ये खालच्या स्थानावर असलेल्या संघांच्या विरोधात कामगिरी चांगली आहे पण त्यांची ओळख भारतीय क्रिकेट रसिकांना अजिबात नाही. हे दोघे खेळाडू असेही नाहीत की, अत्यंत दबाव, तणावाच्या परिस्थितीत बलाढ्य संघाविरोधात ते उत्तम कामगिरी करण्याची किमया दाखवू शकतात.
एक काळ असा होता की, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंची भारताला धास्ती असायची. त्यावेळी पाकिस्तानच्या संघात वसिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर व सईद अन्वर यांच्यासारखे गुणवान खेळाडू असायचे. अगदी मोईन खान व अकीब जावेदही भारतीय क्रिकेट रसिकांना माहिती असायचा. त्यावेळी पाकिस्तानच्या खेळात सातत्य नसायचे, शिस्त नसायची पण त्यांच्याकडे गुणवत्ता असायची. त्यांना स्टारडम असायचे. आताचा पाकिस्तानचा संघ अगदीच अनोळखी आहे. युएईविरोधातल्या सामन्यात प्रेक्षकांच्या गॅलऱ्या रिकाम्या दिसल्या इतकी परिस्थिती चिंताजनक आहे. म्हणजे एकेकाळी जो संघ गुणवत्तेने ठासून भरलेला होता आज त्याची अवस्था फारच दयनीय अशी झाली आहे.
भारताचे चित्र बरोबर उलटे आहे. भारताच्या क्रिकेटने जगाच्या क्रिकेटला एक वलय दिले आहे. बीसीसीआयचा क्रिकेट विश्वात स्वत:चा दबदबा आहे पण गेल्या अनेक वर्षांत भारतीय क्रिकेट गुणवत्तेनेही फुलत चाललेय. विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय संघात रोहित शर्मा, जसप्रीत भूमराह व हार्दीक पंड्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत.
भारताच्या क्रिकेटचा दर्जा व त्याला आलेले स्टारडम व पाकिस्तानचा दर्जा व स्टारडम पाहता दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये मोठी दरी दिसेल. भारतीय क्रिकेट रसिकांना पाकिस्तानचे खेळाडू माहिती नसणे पण त्याचवेळी भारतीय संघातील खेळाडूंना मिळालेले आंतरराष्ट्रीय महत्त्व व प्रसिद्धीमुळे ते सर्वांना माहिती असणे हा मोठा फरक लक्षात घेतला पाहिजे.
काही वर्षांपूर्वी चॅम्पियन्सशीप स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला होता. या स्पर्धेत भारताने अन्य प्रतिस्पर्धी संघाना पराभूत केले होते पण पाकिस्तानने भारताचा केलेला प्रभाव हा केवळ दारुण नव्हता तर तो अपमानास्पद करणारा होता. या पराभवाची शल्ये भारतीय संघात कुठेतरी बोचत असणार व त्याचा सूड घेण्याची भारतीय संघाची इच्छा असणार, तो सूड रविवारच्या सामन्यात भारताने घेतलेला दिसतो. २०१८च्या आशिया कपमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थित भारताने पाकिस्तानचा एक नव्हे तर दोनवेळा पराभव केला होता.
रविवारच्या सामन्यातले वातावरण राजकीय परिस्थिती पाहता उगाचच उत्तेजित केलेेले दिसून आले. सामन्याचे समालोचन करणाऱ्यांनी व मीडियाने त्यात भर घातली. जसे काही युद्ध आहे असे सांगितले जात होते. जो मीडिया, पाकिस्तानवर बंदी, बहिष्कार घालण्याची भाषा करत होता, त्या मीडियाची भूमिका वातावरण जसे तापत गेले तशी बदलत गेली. आता पाकिस्तानला हरवणं एवढंच शिल्लक असून एक राजकीय सूड उगवल्याची मीडियाची गरज होती.
माजी क्रिकेटपटू व भाजपचा खासदार गौतम गंभीर याने असे वातावरण उत्तेजित करण्यास काहीच हरकत नसल्याचे विधान क्रिकेट सामन्याचे समालोचन करता केले होते. विरेंदर सेहवाग व हरभजन सिंग शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलवर सामन्याची चर्चा करण्यासाठी आले होते.
पाकिस्तानशी क्रिकेट नको असा सातत्याने टाहो फोडणाऱ्या इंडिया टुडे या वृत्तवाहिनीवरील दोन पत्रकार रोहित सरदाना व गौरव सावंत यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एक क्रिकेट कॉनक्लेव्ह आयोजित केली होती. या कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित होते वसिम अक्रम, युनिस खान व मिसबाह-उल-हक हे एकेकाळचे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होत जातील व त्यावेळी वातावरणही असेच तापले गेलेले असेल, सगळीकडे उन्माद पसरलेला दिसला जाईल. कारण दोन्ही देशांमधला तणाव आजही कायम आहे. भविष्यात दोन्ही देशांनी आपले संबंध सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर हा उन्माद कमी होईल असे वाटते. अशा उन्मादाने काय साध्य होईल असे वाटत नाही. त्यासाठी भारत-पाकिस्तानदरम्यान सामने होण्याची गरज आहे.
सध्याच्या घडीला जर क्रिकेटमधील खरा संघर्ष, मैदानावरचे शत्रुत्व पाहायचे असेल तर ते भारत-ऑस्ट्रेलियामधील सामन्यांमध्ये पाहायला मिळते. काही प्रमाणात इंग्लंडविरोधातही तो दिसून येतो. काही महिन्यांपू्र्वी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातही तसे चित्र दिसून आले होते. पण भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये या संघाविषयी तसा उन्माद निर्माण होताना दिसत नाही. एकूणात पाकिस्तानविषयी उन्माद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही.
पार्थ पंड्या, मुक्त क्रीडापत्रकार आहेत.
COMMENTS