भारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे

भारताने रक्तदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे

मागणी व पुरवठ्यातील फरक कमी करण्यासाठी, एक सामाजिक प्रथा म्हणून स्वैच्छिक रक्तदानाची संस्कृती रुजवण्याची गरज आहे.

डाव्यांचे ‘रक्तसंकलन शिबीर’
‘रक्त संकलना’मागचा डावा दृष्टिकोन
सर्वसमावेशक भारतीयत्वाचे खरे शत्रू कोण?

मागच्या काही वर्षांमध्ये, भारताने ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, आपल्या आरोग्यसेवा व्यवस्थेसाठी एक मूलभूत घटक असणारा, सुरक्षित आणि पुरेसा रक्ताचा पुरवठा होईल याची निश्चिती करणे हे अजूनही एक प्रचंड मोठे आव्हान आहे. यामध्ये सुधारणेला मोठा वाव आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही २०१६-१७ मध्ये भारतामध्ये १.९ दशलक्ष एकक – म्हणजे ६० टँकरइतके – रक्तकमी पडले.भारतासारख्या देशासाठी विशिष्ट अशा आव्हानांचा विचार केला – आरोग्याप्रति निष्काळजी वर्तणूक, रोगांचे मोठे प्रमाण, आरोग्यसुविधांना मर्यादित प्रवेश – तर रक्तपुरवठा प्रणाली चांगली असणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे.

आजसुद्धा, भारत मोठ्या प्रमाणात बदली रक्तदानाच्या पद्धतीवरच विसंबून आहे, ज्यामध्ये रुग्णाला दिलेल्या रक्ताच्या बदल्यात कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना रक्तदान करण्यास सांगितले जाते. मात्र, रक्तदानाच्या या पद्धतीमध्ये दिलेला रक्तगट किंवा तितक्या प्रमाणात रक्त मिळेलच असे नाही आणि ट्रान्सफ्यूजनमधूनसंक्रमित होणाऱ्या जंतुसंसर्गांची जोखीमही वाढते.

स्वैच्छिक रक्तदानाची संस्कृती हे भारताकरिता अजूनही लांबचे स्वप्न आहे – आणि त्याची प्रमुख कारणे आहेत चुकीच्या संकल्पना, चुकीची माहिती आणि रक्तदानाचे परिणाम आणि सुरक्षा याबद्दलचे अज्ञान.

रक्तदानाबद्दलचे चुकीचे समज

स्वैच्छिक रक्तदानाबद्दलचा एक सर्वात सामान्य समज म्हणजे त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त कमी होते, त्यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो, किंवा त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येतो आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. रक्तदान वेदनादायी आणि बराच वेळ चालणारी प्रक्रिया आहे अशा भीतीने किंवा त्यामुळे एचआयव्हीसारखे जंतुसंसर्ग होऊ शकतात या भीतीनेही लोक रक्तदान करणे टाळतात.

वरीलपैकी काहीही खरे नाही, आणि दुःखाची बाब अशी की अगदी सुशिक्षित लोकही अशा गोष्टींनी सहजपणे प्रभावित होतात. खरे तर रक्तदानाचे अनेक फायदेच आहेत. अनेक अभ्यासांच्या अनुसार रक्तदान करण्याने तुमची हृदयविकाराची आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची जोखीम कमी होते. इतर स्वाभाविक फायदे म्हणजे आरोग्यतपासणी आणि छोटी रक्तचाचणी या गोष्टी मोफत मिळतात.

भारतामध्ये परिणामकारक स्वैच्छिक रक्कदान कार्यक्रमामार्फत सुरक्षित रक्तदात्यांचा कायमचा आधार निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे रक्तदानाबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे. ज्यामुळे लोक पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करण्यास घाबरतात असे सगळे समज दूर करण्याची आणि एक सामाजिक प्रथा म्हणून रक्तदानाचे महत्त्व रुजवण्याची गरज आहे. भारतातील अगदी चांगले शिकलेले लोकही असे समजतात की रक्तदान आपत्कालीन परिस्थितीतच करण्याची गोष्ट आहे.

सांस्कृतिक बदलाची आवश्यकता

सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि याच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या लोकांमधील सहकार्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, रक्तदान करण्यासाठी, सुरक्षित रक्ताची गरज या विषयावर सार्वजनिक जागरूकता वाढवण्यासाठी सहज संधी निर्माण केल्या पाहिजेत. जेव्हा लोकांमध्ये सांस्कृतिक बदल घडवून आणण्याची बाब असते तेव्हा तरुणांना शिक्षित करणे आणि संवेदनशील बनवणे यांची भविष्यात स्वैच्छिक रक्तदात्यांचा एक समुच्चय तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल.

भारतामध्ये जगातील एक पंचमांश तरुण आहेत. भारताच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे आणि पाव लोकसंख्या १४ वर्षांखालील आहे.

यामुळे आपल्याला तातडीच्या वेळी बदली रक्त दान करण्याऐवजी वारंवार, माणुसकीच्या भावनेने स्वैच्छिक रक्तदान करण्याचा सामाजिक प्रघात निर्माण होणे अशा सांस्कृतिक बदलासाठी काम करण्याची संधी आहे.

म्हणून, विचार करण्यासारखी एक कल्पना म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमधील आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये रक्तदानाच्या विविध पैलूंबद्दल संवेदनशील बनवणारे कार्यक्रम समाविष्ट करणे. यामुळे चुकीच्या कल्पनांचे खंडन करण्याला आणि लहान वयातच नागरिकांमध्ये रक्तदानामधून जीवन वाचवणे या गोष्टीबाबत अभिमानाची भावना निर्माण करण्याला मदत होईल.

जागतिक स्तरावर, अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रक्तदात्यांसाठी शिक्षणाचे कार्यक्रम असतात, ज्यामध्ये मुलांना रक्तदान प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येईल अशा प्रकारचे व्हिडिओ असतात. ते तरुण रक्तदाते आणि रक्ताचा स्वीकार करणारे यांच्या व्यक्तिगत कहाण्याही दाखवतात ज्यामुळे ते आपलेसे वाटतात.

या कार्यक्रमांमध्ये प्रश्नावली असतात तसेच माहिती, शिक्षण आणि संवादाची सामग्रीही असते ज्यामुळे त्यांना रक्तदानाचे मूल्य समजण्यास तर मदत होतेच, परंतु पालक, मित्रपरिवार आणि समाजातील इतर नेटवर्कमध्ये स्वैच्छिक रक्तदानाचे प्रचारक होण्यासही प्रोत्साहन मिळते.

भारताकरिता, रक्ताचा सातत्याने आणि पुरेसा पुरवठा होण्याकरिता भावी पिढीला रक्तदानाचे महत्त्व तर समजले पाहिजेच, परंतु स्वैच्छिक रक्तदान हा एक सामाजिक प्रघात म्हणून संस्कृतीमध्ये रुजला पाहिजे. आपल्या रक्तपुरवठा व्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये जो मोठा फरक आहे तो कमी करण्यासाठी हा बदल गरजेचा आहे. आणि तो करण्यामध्ये तरुणांची खूपच मोठी भूमिका आहे.

सूर्यप्रभा सदाशिवन, या चेस इंडिया या सार्वजनिक धोरण संशोधन आणि सल्लागार संस्थेमध्ये आरोग्यसेवा प्रथा या विषयाच्या प्रमुख आहेत.

मूळ लेखयेथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1