सेक्स आणि इज्जत का सवाल!

सेक्स आणि इज्जत का सवाल!

नातेसंबंध आणि लैंगिकता - आकर्षण ही समाजासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आकर्षणाची निःष्पत्ती असणारे लैंगिक संबंध हे विकसित प्राणीमात्रांचे जीवनासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे तंत्र आहे. पण मानवी लैंगिक संबंधांमध्ये निव्वळ पुढची पिढी निर्माण करण्यासाठीची निसर्गनिर्मित तरतूद असे तिच्याकडे न पहाता तो एक आनंदाचा आविष्कारही आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

हैदराबादला हवाय विकास पण मिळतोय धार्मिक द्वेष
‘हेट स्पिच’ला सत्ताधाऱ्यांकडूनच पाठबळः न्या. नरिमन
गलवान खोऱ्यातील हिंसेला चीन जबाबदार

“माझ्या आईवडिलांना लहानपणीच कोणीतरी माझे भविष्य सांगितले होते की माझा प्रेम-विवाह होईल. त्यामुळे माझे आईवडील घाबरून सतत मला सांगत असत, की आम्ही कष्टाने कमावलेली इज्जत तू असे काही करून धुळीला मिळवू नकोस.”  युथ इन ट्रान्झिशन रिसर्चमध्ये एक मुलगी सांगत होती.

तिच्या आईवडिलांनी खूप हालाखीत  दिवस काढले आहेत, त्याची आठवण सांगून ते तिच्यावर मानसिक दबाव टाकत असत, सतत लक्ष ठेवून असत.

“कॉलेजमध्ये गेल्यावर मला एक मुलगा खूप आवडू लागला. भावनिकरीत्या मी त्याच्यामध्ये गुंतलेले आहे, परंतु तो कुठल्याही बांधिलकीस तयार नाही. त्याला बांधिलकी नकोच आहे. या गोष्टीमुळे मीही कुठलेच शारीरिक नाते त्याच्याशी ठेवत नाही. एकीकडे वाटते, शारीरिक नाते ठेवले तर कदाचित तो होकार देईल. पण त्याची खात्री काय? कधीकधी वैतागून मी नाते संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे, त्याच्याशी बोलणे तोडलेदेखील आहे पण मला ते जमत नाही. घरी तर या सगळ्याविषयी विषय काढणेही अवघड आहे. आता पुढे काय होणार आहे त्याची भीतीच वाटू लागली आहे. पण मी स्वतःला तयार करत आहे.”

नाते ठेवायचे की नाही, ठेवले तर कशाप्रकारचे ठेवायचे, त्याला नाव कोणते द्यायचे, त्यामध्ये प्रेम-भावनिक गुंतवणूक, बांधिलकी आणि शारीरिक जवळीकीच्या मात्रा किती-किती प्रमाणात असाव्यात याबाबत तरुण मंडळी विचार करत आहेत, नात्यांची विविध रूपे निर्माण करत आहेत हे आपण पाहिलेच. पण समाजाच्या नीतिनियमांच्या चौकटीचा त्यावर हरप्रकारे परिणाम होतो.

कुठल्याही समाजातल्या मानवी घटकांना परस्परांबद्दल आकर्षण वाटत असते, हे सर्वांना माहीत असते. भर दिवाणखान्यात उभा असलेला हत्ती सर्वांना दिसत तर असतोच, तो आहे हे सिद्ध करण्याची म्हटले तर काहीच गरज नसते, तरीही त्याची भीती वाटत असल्याने तो तिथे नाहीच, असे मानायचा सर्वांचा प्रयत्न चालू असतो. खरे पाहिले तर हे आकर्षण ही समाजासाठी अत्यंत आवश्यक  गोष्ट आहे. ढोबळपणे पहाता आकर्षणाची निःष्पत्ती असणारे लैंगिक संबंध हे विकसित प्राणीमात्रांचे जीवनासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे तंत्र आहे.

पण मानवी लैंगिक संबंधांमध्ये निव्वळ पुढची पिढी निर्माण करण्यासाठीची निसर्गनिर्मित तरतूद असे तिच्याकडे न पहाता तो एक आनंदाचा आविष्कारही आहे, हे आपण जाणतो. उदाहरणार्थ, समान लिंगाच्या व्यक्तींनाही परस्परांविषयी आकर्षण वाटू शकते आणि स्त्री-पुरूष मूल निर्माण करता येण्याची शक्यता असून ती नाकारू शकतात.

पण समाजमनामध्ये अविवाहित तरुण मुलामुलींसाठी हा हत्ती अमान्य झालेला आहे हे खरे!

जगण्यातील एका मूलभूत, स्वागतार्ह अनुभवाला उथळ, थिल्लर, चेष्टेयोग्य किंवा अपवित्र मानले जाते.

सेक्स या शब्दाचा अर्थ लैंगिक दृष्टिने केलेली कुठलीही कृती असा आहे. पण सर्वसामान्यपणे  त्याचा अर्थ लिंगप्रवेशी संबंध (म्हणजे लैंगिक संबंध ठेवताना शिश्न किंवा इतर कुठल्यातरी वस्तूचा योनीमार्ग, गुदद्वार अथवा मुखामध्ये प्रवेश करणे) असा घेतला जातो.

आत्ताच्या तरुणांच्या डेटिंगच्या भाषेतील ‘चौथा बेस’ हा त्या उतरंडीमध्ये सर्वात वरचढ मानला जात आहे. चौथ्या बेसवर झेंडा गाडला की सर्व मैदान फत्ते! सगळी गोळाबेरीज संभोगक्रियेशी येऊन का थांबते?

समाजाच्या दृष्टीनेदेखील अविवाहित व्यक्तींनी लिंगप्रवेशी संबंध केले म्हणजे आता व्हायचे ते सगळे झालेच! “प्रेमात पडतील आणि काय करून ठेवतील त्याची भीती वाटते”, असे पालकांचे शब्द आपण ऐकत असतो. संशोधनातील चर्चेमध्ये मुला-मुलींच्या बोलण्यामध्येही ह्या हत्तीची झलक वारंवार दिसली. मुलग्यांना तेच हवे असते, मुलींचे शील त्यामध्ये सामावलेले असते, असे त्याला दिले गेलेले ‘सर्वश्रेष्ठ महत्त्व’ त्यांच्या बोलण्यामध्ये येत असे. (संशोधनामध्ये २८% मुलामुलींचे म्हणणे होते की  पुरुषांना नेहेमीच  सेक्स हवा असतो.)”सेक्स करून झाल्यानंतर त्याने मला सोडले, ही माझी मोठी फसवणूक आहे,” असेही  काहींच्या म्हणण्यात आले.

‘योनिशुचिते’च्या (virginity/कौमार्य जपणे) कल्पना, त्याविषयीची गुप्तता, पुरुषाला लैंगिकदृष्ट्या आकर्षित करणाऱ्या स्त्रीविषयी इतरांची वाईट मते असणे, लग्नसंस्थेस असलेले अवाजवी महत्व, शारीरिक संबध व विवाह यांचे एकास एक नाते हे सगळे ओळीनेच येते.

योनिशुचिता ही संकल्पना आजही आपल्या सामाजिक मनामधून नाहीशी झालेली नाही. कदाचित वेगवेगळ्या पद्धतीची नाती समजून घेण्याचा, जगण्याचा प्रयत्न करताना व्यक्तीच्या मनामध्ये अधिक प्रगतीशील असा वेगळा विचार घडत असेल, तरीदेखील समाजमनातील संकल्पनांचे अस्तित्व आहेच आणि व्यक्तीच्या मनावर त्याचा दबावही आहे.

या दबावाबद्दल तरुण मंडळी बर्‍याच विस्ताराने बोलली. (संशोधनामध्ये लग्नाच्या आधी सेक्स केल्यास मुलगी आपले चारित्र्य गमावून बसते असे १०% मुला-मुलींना वाटत होते.)

लिंगप्रवेशी संबंध केले तर मुलींना अपराधी वाटते कारण लिंगप्रवेशी संबंधांना होकार देणे, म्हणजे सर्वस्व अर्पण करणे, अशी भावना तिच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ही भावना निर्माण होण्यामागे समाजाने दिलेल्या धारणा आहेत, हे तर स्पष्टच आहे.

एकजण म्हणाली, “या विचारांना मुलांकडूनही वेगळ्याप्रकारे आधार मिळतोच. त्यांना वाटते, एकदा हा होकार दिला की ती मुलगी अडकली. आता मनात असेल तरीही ती सोडून जाणार नाही, न जमणारे नातेही निभावेल, प्रसंगी हिंसा सहन करेल, जमवून घेईल.

“आमच्या दोघांच्या लग्नाला घरून विरोध आहे. आम्ही दोघांनी खूप आधीपासून ठरवले होते की काही झाले तरी आपण घरच्यांचा होकार मिळवायचा. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिल्यास घरच्यांची मंजुरी मिळणे सोपे जाईल, या विचाराने आम्ही नोकरी करून पैसे मिळवत आहोत. पण नोकरीसाठी माझ्या जोडीदारास दुसऱ्या गावी जावे लागले आहे. या दरम्यान आमच्या भेटीगाठीही कमी झाल्या आणि आता मला त्याचा स्वभाव बदलल्यासारखा वाटतोय. कधीकधी तर वाटते इतक्या सगळ्या अडचणी, त्याच्या घरच्यांकडून माझा होणारा अपमान आणि त्यात आमची भांडणे, यापेक्षा हे सगळे  सोडून द्यावे. आमच्यामध्ये जर शारीरिक संबंध झालेले नसते, तर मला कदाचित हे नाते सोडून देणे शक्यही झाले असते. पण आता मी हे नाते सोडले तर पुन्हा माझे लग्न ठरणे खूप अवघड आहे.”

याचा अर्थ  नात्याची वाट पुढे चालायची की नाही हा निर्णयही योनिशुचितेच्या मुद्द्याभोवतीच  फिरतो आहे.  लग्न न ठरण्याचे कारण आधी दुसर्‍या पुरूषाशी संबंध केलेल्या बाईला दुसरा कोणी पुरूष कसा स्वीकारणार? स्त्रीला वस्तूसमान मानणारी ही मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे. (संशोधनातील ५०% मुलामुलींना सेक्स झाल्यानंतर ते नाते तोडणे अवघड आहे, असे वाटत होते.)

एकजण म्हणाली, “मी आणि माझा जोडीदार यांचे नाते सुरु झाले, तेव्हा जोडीदाराच्या आधीच्या लग्नातील, घटस्फोटातील काही कायदेशीर बाबी उरलेल्या होत्या. तेव्हा माझ्या मित्र -मैत्रिणींनी सल्ला दिला की त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी तुम्ही बाकी काहीही केलंत तरी चालेल मात्र फार पुढे जाऊ नका.”  फार पुढे म्हणजे काय हे स्पष्ट करायची गरज नव्हतीच.

यामध्ये एक प्रश्न पुन्हापुन्हा येताना दिसतो. लग्नापूर्वी लैंगिक संबंध दोघांच्या मर्जीने घडलेले असले तरी प्रामुख्याने मुलीवरती त्याची जबाबदारी असल्याचे समाजाच्या दृष्टिकोणात स्पष्ट आहे. आदम आणि ईव्हच्या कहाणीमध्ये  आदमला  प्रतिबंध असलेले फळ खाण्यास मदत करणारी ईव्हच पापी ठरते.

नैतिकतेचे हे संकेत व्यवहारामध्ये ‘सेक्स’ या चुकीपासून  लोकांचा बचाव करण्याप्रित्यर्थ निर्माण केले गेलेले दिसतात. त्यामुळे  लैंगिकतेविषयी, त्यातील आनंद व सुखाविषयी, त्यातील निर्णय आपल्याला पटेल आणि रूचेल असाच आहे ना, कोणत्याही दबावाखाली आपण तो घेत नाही ना याविषयी ठरवणे एक अवघड किंबहुना अशक्यच काम होऊन बसते. किशोरवयीनांनाही या विषयाच्या चर्चेपासून  दूर ठेवण्याविषयी जोरजोरात चर्चा होतात.

इंटरनेटवर नियंत्रण, मोबाईल फोनवर, कोणते चित्रपट पाहावेत यावर, कोणते फोटो पाहावेत यावर नियंत्रण, मुले व मुली एकत्र येणार नाहीत याची काळजी, प्रेमसंबंध हा विषय कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गांभीर्याने चर्चिला जाणार नाही, याची काळजी आणि माध्यमांवरतीही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

लैंगिकतेबद्दल शिक्षण फारसे दिले जातच नाही आणि प्रयत्न केला गेलाच, तर अगदी फार फार तर मुलींना मासिक पाळीबद्दल आणि दोघांना त्यातल्या धोक्यांबद्दल सांगण्याच्या पुढे त्यांची मजल जात नाही.

एका सहभागीने आपली गोष्ट सांगितली, “माझ्या आईवडिलांमध्ये सतत पैशांवरून व नातेवाईकांवरून भांडणे व्हायची. अजूनही होतात. इतकी की त्यांच्यातील एका भांडणांमध्ये आईने आमच्यासमोर जाळून घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यातले लैंगिक नातेही चांगले नसावे असे मला वाटते. वडील बहुतेक दिवस कामानिमित्त बाहेर असायचे त्यावेळी आईचा बॉयफ्रेंड रात्री घरी राहायला येत असे. वडिलांनाही हे माहीत होते असे मला वाटते. हे नाते पाहात, स्वीकारत मी मोठी होत असता, आईवडिलांकडून माझ्यावर मात्र खूप बंधने लादली गेली. एकदा दहावीची परीक्षा चालू असताना कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका मुलाशी बोलताना आईने पाहिले. शेजारच्या काकांनीही आम्हाला एकदा बोलताना पाहिले होते व घरी तक्रार केली होती. त्यादिवशी आईने मला बेदम मारले, वडिलांनीही हात उगारला. त्यादिवशी मी  आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.”

नैतिकतेचा सोटा, सेक्स करण्यास मज्जाव या एकाच दिशेने चालवणाऱ्या या समाजात राहणार्‍या मुलांना सेक्स ही परस्पर संमतीने घडवण्याची, जीवनाचा पाया उभारणारी, जगण्याची गुणवत्ता वाढवणारी, आनंद देणारी आणि आत्यंतिक प्रेमळ कृती आहे असे कधीच सांगितले जात नाही मग त्यांना तरी ती तशी आहे असे कसे वाटणार?

ट्रान्सजेंडर, ठराविक लिंगभाव न मानणाऱ्या, वेगवेगळे लैंगिक कल असलेल्या व्यक्तींमधील लैंगिक संबंधाविषयीही तेच. याविषयी इतरांना अनभिज्ञता, कुतूहल, हेटाळणी, तुच्छता असते. मुखसंभोग किंवा गुदसंभोगास आताआतापर्यंत गुन्ह्याचा दर्जा दिला जात होता. इतके अज्ञान, तिरस्कार आणि भीती या विषयाला आजतागायत व्यापून आहे.

लैंगिक संबंधांमध्ये जबाबदारी, विवेक, पारख यांची जाण ठेवणे योग्यच आहे. ती ठेवली जाण्याची गरज नाही, असा या लेखाचा हेतू मुळीच नाही. फक्त नैतिक नियमांची गरज व्यक्तीचे दमन करण्यासाठी नव्हे, तर माणसांना सुखाची नाती विरोधाशिवाय मिळावीत यासाठी असावी असे आमचे म्हणणे आहे. (संशोधनामध्ये लग्न करायचं की नाही हे स्वतः ठरवणे जवळपास ३०% मुलामुलींसाठी अवघड होते.)

कुठली लैंगिक कृती ‘नैतिक’ ह्या प्रश्नाचे खरे उत्तर, कृतीला मनापासून आवडीने दिलेल्या संमतीशी आणि फक्त तिथेच थांबते. पूर्ण स्वेच्छेने दोघांनी एकमेकांशी जोडलेले कोणतेही नाते नैतिकच असते. याउलट त्यातल्या एकाच्याच मनाप्रमाणे ठरवलेले आणि दुसर्‍यावर लादलेले नाते जबरदस्तीचेच (म्हणजेच बलात्काराचेच) असते मग ते लग्नानंतरचे  का असेना.

……………………

(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे)

क्रमशः

(या अभ्यासाशी संबधीत वेब सिरीज ‘सेफ जर्नीज’, येथे पाहता येईल.)

मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0