वाडियाच्या अलादिनचे ‘मिञ’

वाडियाच्या अलादिनचे ‘मिञ’

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विस्फोटानंतर जगभरातल्या अडाणी, मूर्ख, वावदूक लोकांना इतर अडाणी, वावदूक-मूर्खांशी संपर्क साधणे सोपे झाले आणि लवकरच त्यांना आपल्यासारख्या लोकांनी अवघे जग खच्चून भरलेले असल्याचे दिसून आले. माणूस खोटे बोलतोय की खरे याला किंमत न राहता तो जे काही बोलतो आहे तेच जर एक मोठा वर्ग बोलत असेल आणि मान्यही करीत असेल तर या मान्यतेला सर्वमान्यतेचे स्वरुप येते.

‘झेंगट’ : तरुणाईचा समृद्ध कॅनव्हास
वाचनसंस्कृती आणि आपण सारे
प्रत्येक जिल्ह्यात साकारणार ‘पुस्तकांचे गाव’

अडाणीपणा, मूर्खपणा, वावदूकपणा हा काही देशांच्या पाचवीला पुजलेला आहे. तो तसा नेहमीच होता. बुद्धिप्रामाण्यवादाला विरोध करण्याची फॅशन आणि परंपरा इथे अनंतकाळापासून आहे आणि तिने देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत नेहमीच आपला सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मतप्रदर्शन करण्याचा अधिकार असल्याने हवी ती विधाने वा कृती करून आमचा अडाणीपणा, मूर्खपणा, वावदूकपणा हा तुमच्या ज्ञानाइतकाच महत्त्वाचा आहे अशा भ्रमात सध्याचे बहुसंख्याकवाद राजकारण सुरू आहे.

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विस्फोटानंतर जगभरातल्या अडाणी, मूर्ख, वावदूक लोकांना इतर अडाणी, वावदूक-मूर्खांशी संपर्क साधणे सोपे झाले आणि लवकरच त्यांना आपल्यासारख्या लोकांनी अवघे जग खच्चून भरलेले असल्याचे दिसून आले. माणूस खोटे बोलतोय की खरे याला किंमत न राहता तो जे काही बोलतो आहे तेच जर एक मोठा वर्ग बोलत असेल आणि मान्यही करीत असेल तर या मान्यतेला सर्वमान्यतेचे स्वरुप येते आणि अशा परिस्थितीत बहुसंख्याकांची सत्ता अस्तित्वात येऊन त्यातून आपल्या अडाणी, मूर्ख नीतीला सत्य ठरविण्यासाठी ते वास्तवात आणण्याचे प्रयत्न केले जातात.

बहुसंख्याकांची अशा प्रयत्नांवर अगोदरपासूनच निस्सीम श्रद्धा असल्याने हे प्रयत्न बरेचदा यशस्वीही होतात. त्यातून पुढे जे काही होते त्याने जगाचा अवघा सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास व्यापलेला आहे.

कुठल्याही देशाच्या जडणघडणीत नव्या सांस्कृतिक लाटा नेहमीच येत असतात. एखाद्या देशात दीर्घकाळ विचारस्वातंत्र्य, शांतता, आणि उदारमतवादाची लाट येते तेव्हा ती लाट ओसरतांना बुद्धिप्रामाण्यवादालाही ओहोटी लागते. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर आपला पदभार सोडताना मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या दैनिकात पुस्तकांच्या समीक्षा लिहिणाऱ्या मिशिको काकुतानी यांना एक दीर्घ मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आपण वाचलेल्या आणि अभ्यासलेल्या पुस्तकांची भलीमोठी यादीच ओबामा यांनी दिली. पुस्तकांमुळे आपले आयुष्य कसे घडले, आपल्या विचारांचा आलेख कुठल्या वाचनामुळे उंचावला आणि एकूण साहित्याचा माणसाशी असलेल्या संबंधावरही ओबामा बोलले.

लवकरच त्यांची जागा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली. ओबामांच्या बुद्धिप्रामाण्यवादाच्या प्रेमात असणाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फारशा काही अपेक्षा नव्हत्या, तरीही कुतुहूल म्हणून बरोबर सहा महिन्यांनी काही पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या वाचनाविषयी विचारले. त्यावर ट्रम्प यांनी मला पुस्तके आवडतात, मला पुस्तके वाचायला आवडतात, मला पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही पण पुस्तक वाचण्याचा मी विरोधात नाही असे उत्तर दिले. या नंतर ते लोकांना कुठले पुस्तक वाचायला सुचवू इच्छितात असे विचारल्यानंतर ट्रम्प यांनी एकाही पुस्तकाचे नाव सांगितले नाही. आपल्याला २०० पानी पुस्तकापेक्षा दोनचार ओळीत मुद्दे लिहिलेले असल्यास ते जास्त योग्य वाटते असेही ट्रम्प यांनी एका ठिकाणी म्हटले होते. यानंतर ट्रम्प यांनी फारसे काही वाचलेले नाही आणि त्यांच्या आवडीनिवडी एकदमच उथळ स्वरुपाच्या आहेत माध्यमातल्या काहींनी त्यांच्यावर आरोप केला.

याचा परिणाम मात्र नेमका उलटा झाला. आपला अध्यक्षही आपल्याप्रमाणेच बुद्धिवाद्यांच्या विरोधात आहे आणि त्यालाही पुस्तके वाचण्यात वेळ घालवावासा वाटत नाही हे पाहून ट्रम्प यांची समर्थक जनता सुखावली. किंबहुना किमान आकलनाची अपेक्षा असणाऱ्या अनेक प्रश्नांना उथळ आणि ज्ञानविरोधी उत्तरे देऊन ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना खुश केले. कशी जिरवली विचारवंताची! अशी सरशीची भावना ट्रम्प समर्थकांमध्ये पसरली. या नंतर सामूहिक मतप्रदर्शनात अमेरिकेच्या बुद्धीप्रामाण्यवादाला उतरती कळा लागून त्याची जागा ट्रम्प यांच्या उथळ विधानांनी आणि चिडचिड्या व्यापार कलहाने घेतली.

एखाद्या द्वाड कार्ट्याप्रमाणे ट्रम्प दर आठवड्याला आपल्या व्यापार धोरणावर आडमुठेपणाचे धोरण घेऊन जगभरातल्या अर्थव्यवस्थांशी पोरखेळ करीत असतात. हा पोरखेळ त्यांच्या आवडत्या वृत्तवाहिन्यांवर रोज संध्याकाळी दाखविला जातो आणि केएफसीचे चिकन, मॅक्डोनाल्ड्सचा बर्गर खात खात ट्रम्प आणि त्यांचे समर्थक आवडीने हे कार्यक्रम पाहात असतात. अमेरिकेतील विचारवंतांना सध्या ‘अँटी अमेरिकन’ आणि ‘अँटी नॅशनल’ -देशद्रोयांची लेबले लावण्यात आली असून या प्रजातीची ट्रम्प यांनी वेळेवर नांगी ठेचावी अशी अपेक्षा अनेक ट्रम्प समर्थकांची आहे.

गेली आठ वर्षे जगभरात सुरू असलेल्या बौद्धिक दुष्काळात ब्रिटनसारख्या एरवी हुशार समजल्या जाणाऱ्या देशाचाही प्रवेशही असाच काहीसा आहे. युरोपियन युनियनपासून फारकत घेण्याच्या निर्णयावर जून २०१६मध्ये जेव्हा ब्रिटनमध्ये सार्वजनिक चर्चा सुरू झाल्या तेव्हा या फारकतीच्या पक्षात असणारे आणि जीव तोडून तिचा प्रचार करणारे ब्रिटनचे कायदे सचिव मायकेल गोव्ह यांनी ‘ब्रिटनची जनता आता बुद्धिप्रामाण्यवाद्यांना कंटाळली आहे, त्यांचे फार झालेय’, अशी भूमिका घेतली. ‘स्काय न्यूज’च्या फैजल अहमद यांना मुलाखत देताना या तथाकथित विचारवंताचे म्हणणे नेहमीच चुकीचे राहात आलेले आहे आणि त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले जाणार नाही असेही धडकावून सांगितले. त्यांनी विचारवंताना सडेतोड उत्तर कसे दिले हे पाहून टीव्ही चॅनेलच्या प्रेक्षागृहात असलेल्या प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या पिटल्या. बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या पक्षात असणाऱ्या फैजल अहमद यांच्याही विधानांना समर्थकांकडून टाळ्या मिळाल्या पण त्यांची संख्या निश्चितच कमी होती. लवकरच ब्रेक्झिटच्या निर्णयावर मतपेटीतून शिक्कामोर्तब झाले आणि हा निर्णय नक्की झाला असला तरी त्याचे स्वरुप काय असावे याबद्दल त्या देशाचा अजूनही पक्का निर्णय झालेला नाही.

२०१६ मध्ये ब्रिटनमध्ये बुद्धिवाद्यांची अशी राजरोस टिंगल सुरू झाली तशी चीनमध्ये ती २०१५ सालीच सुरू झाली होती तीही योगायोगाने जूनच्याच महिन्यात. चीनच्या शिचुआन प्रांताच्या ऑनलाईन लेखकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून झोउ शाओपिंग या तरुण लेखकाची निवड करण्यात आली. त्याच्या वर्षभरआधी हुवा क्वीनफँग या दुसऱ्या एका तरुणाची फुशुन शहरातल्या लेखकांच्या संघटनेच्या उपसचिवपदी निवड करण्यात आली होती. झोउ आणि हुवा यांच्या कार्याचा आलेख पाहता त्यांच्याकडे फारसे शिक्षण नाही, अर्थात वैचारिक उंचीसाठी पदवी हा कुठल्याही प्रकारे निकष मानला जाऊ शकत नाही. पण झोउ आणि हुवा यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एकही पुस्तक वाचलेले नाही, वा कलेशी त्यांचा कुठलाही संबध नाही. असे असूनही त्यांना बीजिंगच्या साहित्य संमेलनात इतर ख्यातनाम लेखक आणि कलाकारांसोबत मानाने निमंत्रितांच्या खुर्चीत बसविण्यात आले. मोठ्या साहित्यिक आणि कलाकारांना मिळणारा आदर आणि सन्मान देण्यात आला. हा सन्मान झोउ शाओपिंग आणि हुवा क्वीनफँग यांना मिळण्याचे कारण काय? तर ते कडवे राष्ट्रवादी आहेत. ते पाश्चिमात्यांच्या सांस्कृतिक आक्रमणांविषयी वेळोवेळी लिहीत असतात आणि हे पाश्चिमात्य आक्रमण गाडले पाहिजे अशी भूमिका घेतात. अशी भूमिका घेताना ते ‘विचारवंताना अक्कल आहे का?’ ‘यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये’ आणि ‘यांना भल्याबुऱ्याची समज तरी आहे का?’ अशा स्वरुपाची विधाने करतात.

चीनच्या सत्तेला झोउ आणि हुवाचा खूप चांगला उपयोग सापडला आहे. जिथे म्हणून चीनच्या तहहयात हुकूमशहा शी जिनपिंग यांच्यावर सार्वजनिक टीका होते वा निर्गवी काम करणारे बुद्धिमान लोक त्यांच्या धोरणावर टीका करतात तिथे झोउ आणि हुवाला मोकाट सोडून दिले जाते. ही जोडगोळी मग माध्यमांत आणि सोशल मीडियात या विचारवंतावर इतकी शाब्दिक आक्रमणे करतात की समोरच्याला श्वास घ्यायचीही उसंत राहात नाही. त्यांच्या आक्रमक बोलण्याला तसा कुठलाही निश्चित आधार नसतो, सबळ पुरावे नसतात पण केवळ राष्ट्रवादाची भूमिका घेऊन आपल्या विरोधातल्या लोकांची तोंडे बंद करण्याची कला दोघांनीही सहीसही साधली आहे.

झोउ शाओपिंग हा आपला आवडता माणूस असून तो जनतेत सकारात्मक ऊर्जा पसरविण्याचे फार मोठे कार्य करतो आहे अशी शाबासकी खुद्ध चेअरमन शी जिनपींग यांनी झोउला दिली आहे.

जगभर चाललेल्या बौद्धिक दुष्काळात ‘वाडीया प्रजासत्ताका’चे उदाहरण जरा जास्तच बोलके ठरावे. आपल्या ‘आली लहर केला कहर’ या स्वभावासाठी आणि विचार करण्यात जास्त वेळ न घालविता झटपट निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले तिथले राष्ट्राध्यक्ष जनरल अ‍ॅडमिरल अलादिन यांनी त्यांच्या देशात विचारवंताची चालविलेली गोची पाहाता त्याचा अमेरिका, ब्रिटन आणि चीनलाही हेवा वाटावा. वाडीयात आजमितीला अनेक टीव्ही चॅनेल्स आणि इतर माध्यमे असली तरी ही सर्व माध्यमे एकाच माणसाच्या व त्याच्या परिवाराकडून नियंत्रित केली जातात. अवघ्या दोन लाख लोकांकडे वाडीयाची जवळजवळ सर्व संपत्ती आहे. सार्वजनिक क्षेत्रांतल्या बँकाकडून अलादिन साहेब आपल्या मित्रांना मोठमोठी कर्जे देतात आणि जुगारबाज मित्रांना हे कर्ज फेडणे अवघड झाले की त्यांचे कर्ज माफही करतात. आपल्या सार्वजनिक भाषणांत वेळोवेळी शत्रूराष्ट्रांवर आगपाखड करुन आपण शांततेचे पुजारी आहोत पण या देशांना योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशीही शेरेबाजी करीत असतात. या देशांशी युद्ध केल्याने काय काय फायदे आहेत याचा पाढा ते वेळोवेळी वाचत असतात. १६ मे २०१२ रोजी सत्तेत आल्यापासून त्यांनी देशभरातल्या विचारवंताची पळता भुई थोडी केली आहे. आपल्याला विचारवंताचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी थेट वाडीयाची भाषाच बदलून टाकली आहे. वाडीयन भाषेत ‘हो’ या शब्दाऐवजी ‘अलादिन’ असा शब्द वापरला जातो तर ‘नाही’ या शब्दासाठीही ‘अलादिन’ हाच शब्द वापरला जातो. भाषेच्या या मुलभूत बदलांमुळे सामन्य नागरिकांनी अलादिन यांच्या धोरणाला विरोध केला तरी त्याचा शाब्दिक अर्थ हा नेहमी सकारात्मकच असतो. याच कारणामुळे वाडीयाच्या कुठल्याही टीव्ही चॅनेलवर कुठल्याही बातमीत अलादिन यांच्यामुळेच कशी समस्या सोडवली जाणार आहे, आणि अलादिन यांनीच कसे देशाचे भले केले आहे याबद्दल सतत बातम्या चालू असतात. किंबहुना ‘अलादिन’ या शब्दाशिवाय इथे कुठली बातमीच लिहिली जात नसावी की काय असा संशय अनेकांना येतो.

वाडीयात अलिकडे ‘मित्र’ हा शब्द ‘मिञ’ असा लिहिला जातो. वास्तविक ‘ञ’ या अक्षराचा उच्चार आणि उपयोग ‘त्र’ पेक्षा पूर्णतः भिन्न आहे. तो कसा भिन्न आहे हे तिथले विचारवंत अधूनमधून ओरडून सांगत असतात पण ‘या विचारवंतांना त्यातले काय कळते?’ असा सूर लावून त्यांना गप्प केले जाते.

वाडीयाच्या भूतकाळात ‘ञ’ हे अक्षर स्वर असून त्याचा उच्चार नेमका माहीत असल्याने तो तिथल्या बाराखडीत त्याचा समावेश होता, हे अक्षर आजही बाराखडीत असले तरी अनेक शाळांमधून ते आता ‘त्र’ असेच शिकवले जाते. बाराखडीच्या स्वरांमध्ये मग ‘त्र’ अक्षर जोडण्याची गरज तरी काय आहे? असे कुणी विचारल्यास त्याचा प्रश्न नेमका काय आहे हेदेखील अनेकांना समजून येत नाही.

हे असे नेमके का झाले हे अधिक शोधायला गेल्यास अलादिन आपल्या समर्थकांना ‘मित्र’ मानतात असे दिसून आले. या मित्रांनी वाडीयाच्या समाजमाध्यमात आणि टीव्हीवरती सध्या धुमाकूळ घातला आहे. कधीकाळी या देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत सक्रीय सहभाग असलेल्या अनेक जेष्ठ विचारवंतांना आजकाल या मित्रांचा वैचारिक सामना करावा लागतो आहे.

अलादिनजींचे हे ‘मिञ’ न बोलाविता विचारवंताच्या वॉलवर जाऊन त्यांच्या स्टेटसखाली यथेच्छ धुमाकूळ घालतात, या विचारवंतांना देशद्रोही ठरवितात, एव्हढाच पुळका असेल तर सुदानला चालले जा असेही धमकावितात. एकूण अलादिन ‘मिञां’ची सध्याची आक्रमकता पाहता लवकरच वाडीयात भाषिक संक्रमणाचा पुढचा काळ सुरू होऊन त्यात अलादिनविरोधी वाटणारे सर्व शब्द भाषेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. अलिकडे अलादिन यांनी ‘भाषेचा खून चालविला’ आहे असे काही विचारवंतांनी जाहीररीत्या सांगितले होते. त्या विचारवंताना अलादिन ‘मिञां’नी नेमकी कुठली उत्तरे दिली असतील हे इथे वेगळे सांगायला नको.

राहुल बनसोडे, हे मानववंशशास्त्राचे अभ्यासक असून ते सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0