३७० कलम : परप्रांतीयांचा रोजगार कायमचा गेला

३७० कलम : परप्रांतीयांचा रोजगार कायमचा गेला

५ ऑगस्टपासून जवळपास ९० हजार परप्रांतीय कामगार, मजूरांनी काश्मीर खोरे सोडले आहे. हे सर्व जम्मूपर्यंत सुखरूप पोहचले आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले
‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’
काश्मीरमधील पंचायत पोटनिवडणुका अनिश्चित काळ स्थगित

 

श्रीनगर : दहशतवादी हल्ले होणार असल्याचे सांगत ३ ऑगस्टला जम्मू व काश्मीर राज्यात आलेले सर्व पर्यटक व अमरनाथच्या यात्रेकरूंना तात्काळ राज्याबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले होते.

५ ऑगस्टला सर्वांच्या लक्षात आले की केंद्र सरकारला ३७० कलम रद्द करायचे असल्याने असे आदेश देण्यात आले होते.

३ ऑगस्टच्या आदेशात जम्मू व काश्मीरमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीयांना राज्य सोडून जाण्याचे आदेश नव्हते. पण जेव्हा राज्यात अनिश्चित काळापर्यंत संचारबंदी लागू होईल हे लक्षात आल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीपोटी अनेक परप्रांतीयांनी राज्य सोडण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण काश्मीरमध्ये अर्ध्या किमी अंतरावर तपासणी नाके असतानाही मोठ्या प्रमाणात निमलष्करी व लष्कराची वाहने येत होती. श्रीनगरमध्ये शेकडो परप्रांतीय टुरिस्ट रिस्पेशन सेंटरवर तिकीटे घेण्यासाठी जमा झालेले दिसत होते. अनेक परप्रांतीयांसोबत त्यांचे कुटुंब होते. बहुसंख्य परप्रांतीय खोऱ्यातील होते. प्रत्येकजण  विविध भागातून आपल्या कुटुंबासह श्रीनगरमध्ये येऊन धडकत होता. बसची कमतरता असल्याने श्रीनगरचे बसस्थानक गर्दीने ओसंडून वाहत होते.

जम्मूहून श्रीनगरला जाणारी सर्व वाहने उधमपूर येथे पोलिसांकडून थांबवली जात होती. जम्मूतल्या नागरिकांना खोऱ्यात जाण्यावाचून रोखण्यात येत होते. श्रीनगरहून जम्मूला जाणाऱ्या टॅक्सी मात्र रात्री उशीरा सोडण्यात आल्या.

गेले १९ वर्षे काश्मीरमध्ये कामधंदा करणारा बिहारचा ४० वर्षीय गुलाम सरवार सुमारे ९ किमी पायी चालत सौरा येथे बस पकडण्यासाठी आला होता. गुलामसोबत त्याची पत्नी, सहा मुली, सासू व त्याचा ३८ वर्षांचा भाऊ मोहम्मद शाब्दीन होता. मोहम्मद मजूर म्हणून काश्मीरमध्ये काम करतो.  मोहम्मदची पत्नी व त्याची चार मुले यांनी जम्मू येथून बस पकडण्याचे ठरवले होते.

३७० कलम रद्द केल्याचे संसदेत जाहीर झाल्यानंतर काही पोलिस मोहम्मद व गुलामच्या घरी आले आणि त्यांनी या दोघांना ताबडतोब घर सोडण्यास सांगितले. गुलाम हा दरमहिना १८ हजार रु. कमवतो. बिहारमध्ये त्याची इतकी कमाई होत नाही असे त्याचे म्हणणे आहे. ‘पण मी काश्मीरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माझे दुकान बंद केले. सर्व कुटुंबाला सोबत घेऊन दोन तासाने बस स्थानकापाशी पोहचल्यावर लक्षात आले की आमची बस चुकली आहे. सर्व बस, टॅक्सी गर्दीने फुलून गेल्या होत्या. बसच्या टपवर बसून लोक प्रवास करत होते. ’ असे गुलाम आपली कहाणी सांगतो.

गुलामची २३ वर्षांची मुलगी यास्मिन सांगते, ‘काश्मीर सोडल्याने काश्मीरमधील मुलाशी लग्न करण्याचे माझे स्वप्न भंग पावले. येथे जगण्याची आशाही संपुष्टात आली. माझे एका काश्मीरी मुलावर प्रेम होते आणि आम्हा दोघांच्या कुटुंबियांना ही गोष्ट माहिती होती. येत्या सप्टेंबरमध्ये आमचे लग्नही होणार होते. पण आता हे सगळं संपलं.’

गुलामने पुन्हा काश्मीरमध्ये न परतण्याचा निर्णय घेतल्याने यास्मिनची जगण्याची स्वप्ने उध्वस्त झाली आहेत. आपण आपल्या प्रियकराला पुन्हा पाहू शकणार नाही याचे तिला अपार दु:ख झाले आहे.

गुलाम सरवार ज्या घरात भाडेकरू म्हणून राहात होता, त्या घराच्या मालकाने गुलामला काश्मीर न सोडण्याची विनंती केली होती. पण गुलामचा बिहारमधील घरच्यांशी संपर्क होत नसल्याने व त्यात सोबतची पुंजीही संपत आल्याने, त्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेने व अस्वस्थतेने त्याला काश्मीर सोडण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

सध्या काश्मीरमध्ये संचारबंदी असल्याने श्रीनगरच्या टुरिस्ट रिस्पेशन सेंटरवर अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. या सेंटरवरची गर्दीही कमी झालेली नाही. काही वाहन चालकांनी लंगर चालू केल्याने खोळंबलेल्या शेकडो प्रवाशांना जेवण मिळत आहे. पण या प्रवाशांच्या डोळ्यामध्ये अनिश्चितता दिसत आहे. सध्या राहायला निवारा नसल्याने शेकडो परप्रांतीय आपल्या लहानमुलांसोबत, कुटुंबियांसोबत रस्त्यावर दिवस काढत आहेत.  प्रत्येक तासागणिक नव्या बस सुटत आहेत पण त्याचबरोबर प्रवाशांचा ओघही वाढत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्टपासून जवळपास ९० हजार परप्रांतीय कामगार, मजूर जम्मूपर्यंत सुखरूप पोहचले आहेत. प्रत्येकाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे टुरिस्ट रिस्पेशन सेंटरचे म्हणणे आहे.

(झुबेर सोफी हे जम्मू व काश्मीरस्थित पत्रकार असून त्यांचे अनेक लेख स्थानिक व आंतरराष्ट्रीय माध्यमांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे ट्विट @zubairsofii)

 मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0