स्वीडनमधील युवा पर्यावरण कार्यकर्ता वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवर दोन दिवसांच्या बैठका आणि भाषणांच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी इतर तरुण कार्यकर्त्यांबरोबर सामील झाली होती.
वॉशिंग्टन: मंगळवारी वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवर इतर तरुण कार्यकर्त्यांबरोबर दोन दिवसांच्या बैठका आणि भाषणांच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना स्विडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने अमेरिकन राज्यकर्त्यांना केवळ स्तुती नाही, तर कृती करा असे आवाहन केले.
या आठवड्यातील कार्यक्रम शुक्रवारच्या जागतिक “क्लायमेट स्ट्राईक’पूर्वी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहेत. हवामानासाठीच्या संपामध्ये जगभरातील विद्यार्थी आणि कामगारांना शाळांमधून आणि नोकऱ्यांवरून बाहेर पडून ग्लोबल वॉर्मिंगबद्दल कृती करण्याची मागणी करण्यासाठी आणि याच महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेस हजर राहणाऱ्या नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
“कृपया आपली प्रशंसा आपल्याकडेच ठेवा. आम्हाला ती नको,” थनबर्गने सिनेट क्लायमेट चेंज टास्क फोर्सला सांगितले. “काहीही कृती न करता केवळ आम्हाला इथे बोलावून आम्ही किती प्रेरणादायी आहोत हे सांगू नका, कारण त्याचा काहीच उपयोग नाही.”
अवघ्या १६ वर्षे वयाच्या या कार्यकर्तीने लाखो विद्यार्थी आणि इतरांना हवामानबदलाबाबत कृतीची मागणी करण्यासाठीच्या तिच्या साप्ताहिक संपामध्ये – ज्याचे नाव आहे “फ्रायडेज फॉर फ्यूचर” – सामील होण्यासाठी प्रेरित केले आहे. नोबेल पुरस्कारासाठीही तिचे नामांकन करण्यात आले आहे.
टास्क फोर्सचे अध्यक्ष असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर एड मार्के यांनी तरुण आंदोलनकर्त्यांची वाढती संख्या हा राजकारणातील नवीन “एक्स-फॅक्टर” असल्याचे, तसेच पुढच्या वर्षीच्या यूएस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा हा जोश महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे म्हटले आहे.
“२०२० ही हवामान बदलावरील जनमत चाचणी ठरणार आहे,” मंगळवारी मार्के यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. “ती डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध संपूर्ण नवीन ग्रीन न्यू डीलची दिशा यांच्यामधील जनमत चाचणी असणार आहे.”
द ग्रीन न्यू डील हा एक बंधनकारक नसलेला काँग्रेसचा ठराव आहे. मार्के आणि आणखी एक डेमोक्रॅटिक नेत्या अलेक्झांड्रिया ओकाशिओ-कोर्टेझ त्याचे सहप्रायोजक आहेत. एका दशकामध्ये यूएसची अर्थव्यवस्था जीवाश्म इंधनापासून दूर नेण्याचे त्याचे ध्येय आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर आणि ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी यांनी ही योजना म्हणजे स्वप्नरंजन असल्याची टीका केली आहे.
अध्यक्ष ट्रम्प हे हवामानबदलामागच्या विज्ञानाबाबत उघडपणे शंका व्यक्त करणाऱ्या जगातील थोड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या मते ओबामांच्या काळात हवामान रक्षणासाठी जे काही उपाय अंमलात आणले गेले त्यांची काही गरज नाही आणि त्या उपायांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे.
अमेरिकेतील झीरो अवर या तरुणांच्या चळवळीची सदस्य असलेली १७ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती अनेया थॉमसने सिनेटरना सांगितले की त्यांनी हवामानबदलाबद्दल तातडीने उपाय करायला हवेत आणि ग्रीन न्यू डीलसारख्या प्रस्तावांना पाठिंबा दिला पाहिजे.
“पाच वर्षांमध्ये नव्हे, हळूहळू नव्हे, उद्याही नव्हे, तर आजच्या आज कृती करण्याचा निश्चय करणे महत्त्वाचे आहे,” ती म्हणाली.
मूळ लेख
COMMENTS