एका हिमनदीची प्रेतयात्रा

एका हिमनदीची प्रेतयात्रा

आइसलँड व ग्रीनलँड हे दोन देश वैश्विक हवामान बदलाच्या दृष्टीने पर्यावरणवाद्यांच्या लेखी फार महत्त्वाचे प्रदेश आहेत. इथला फार मोठा परिसर बर्फाने व्यापलेला आहे. हिमनद्याही इथे फार मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. त्यामुळे ‘ओकजोकूल’ वा अन्य हिमनदीचा ऱ्हास किंवा त्यांचे लुप्त होणे हा हवामान बदलाचा फार मोठा पुरावा ठरतो.

हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड
भारतातील पर्जन्यात वाढ होण्याची शक्यता!
अंटार्क्टिकावरील एका तळाचे तापमान १८.३ अंश सेल्सियस

१८ ऑगस्टला आइसलँड इथे तेथील नागरिकांनी हिमनदीची प्रेतयात्रा काढली. त्यांनी एक शोकसभा घेतली व हिमनदीला दफन केले. ही नदी वैश्विक हवामान बदलामुळे नष्ट पावली व त्याचे प्रायश्चित घेण्यासाठी काही उपाययोजना करायला हवी याचे प्रतिपादन तिथल्या जमलेल्यांनी केले. ‘ओकजोकूल’ हे त्या हिमनदीचे नाव.

काही दशकांपूर्वी या हिमनदीचा विस्तार सुमारे ६ किलोमीटर इतका होता. पण त्याची व्याप्ती दरवर्षागणिक कमीकमी होत राहिली. खरंतर २०१४साली त्यांनी या हिमनदीचे नाव बदलले होते. ‘जोकूल’ या आईसलँडिक शब्दाचा अर्थ ‘हिम’ असा होतो. त्यांनी ‘जोकूल’ हा शब्द कापून फक्त्त ‘ओके’ हा शब्द राखून ठेवला.

हिमनदीची प्रेतयात्रा (छायाचित्र एपी)

हिमनदीची प्रेतयात्रा (छायाचित्र एपी)

आइसलँड व ग्रीनलँड हे दोन देश वैश्विक हवामान बदलाच्या दृष्टीने पर्यावरणवाद्यांच्या लेखी फार महत्त्वाचे प्रदेश आहेत. इथला फार मोठा परिसर बर्फाने व्यापलेला आहे. हिमनद्याही इथे फार मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचा ऱ्हास किंवा त्यांचे लुप्त होणे हा हवामान बदलाचा फार मोठा पुरावा ठरतो.

नॉर्वेच्या रस्त्यांवरून जेव्हा वायकिंग एका प्रदेशात आले तेव्हा तिथल्या नैसर्गिक सौंदर्याने त्यांचे मन भरून आले आणि त्यांनी तिथे राहायचे निश्चित केले. पण त्यांना इतरही काही लोकं येऊन तेथे वास्तव्य करतील याची भीती होती. त्यामुळे त्यांनी त्या प्रदेशाचे नामकरण ‘आइसलँड’ असे केले.

आइसलँड म्हणजे थंड प्रदेश. काही लोकं उत्तरेकडे थोडे पुढे गेले व त्यांना तेथे बर्फाच्छादित डोंगरदऱ्यांचा प्रदेश दिसला पण ती जागा राहण्यासाठी अतिशय प्रतिकूल आहे, असे लक्षात आले तेव्हा त्यांनी या प्रदेशाचे नाव ‘ग्रीनलँड’ असे ठेवले.

पहिल्या वास्तव्यास गेलेली ही लोकं अतिशय हुशार होती. अनुकूल प्रदेशाला धोकादायक नाव दिले व प्रतिकूल जागेला सुसह्य नाव दिले. त्यांच्या अस्तित्वासाठी ही चलाखी आवश्यकच होती.

आइसलँड हा देश आपल्या महाराष्ट्राचा दूरचा चुलत भाऊ आहे. सहा साडेसहा कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य, तसेच कर्नाटक, गोवा व मध्य प्रदेशचा काही भाग लाव्हारसाने व्यापून गेला होता. इथे ज्वालामुखी उद्रेकामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण भूभाग कणखर व काळ्या बेसॉल्ट खडकाने आधीच्या खडकांवर विसावलेला आहे.

नासाने ओकजोकुलचे १४ सप्टेंबर १९८६ (डावीकडे)आणि १ ऑगस्ट२०१९ (उजवीकडे) घेतलेले फोटो. हिमनदीचे आकुंचन पावलेले क्षेत्र.

नासाने ओकजोकुलचे १४ सप्टेंबर १९८६ (डावीकडे)आणि १ ऑगस्ट२०१९ (उजवीकडे) घेतलेले फोटो. हिमनदीचे आकुंचन पावलेले क्षेत्र.

आइसलँड हा देश दरवर्षी ५ सेंटीमीटर इतक्या गतीने वाढतो आहे. या उलट आपला देश इतक्याच गतीने आकुंचन पावतो आहे. आइसलँड हा मध्य-अटलांटिक पर्वतावर विसावलेला आहे. या इथे दोन भूभाग एकमेकांपासून दूर जात आहेत.

पृथ्वी अनेक तुकड्यांत विभागलेली आहे. तिचे सात मोठे खंड व अनेक अनेक छोटे भूभाग पृथ्वीच्या अंगावर विखुरलेले आहेत. आइसलँड ज्या ठिकाणी आहे तिथे पृथ्वीचे दोन भूभाग एकमेकांपासून दूर जात आहेत. युरेशियन खंड पूर्वेला तर उत्तर अमेरिका खंड पश्चिमेला भ्रमण करत आहेत. हे दोन्ही खंड दूर जात असल्याकारणाने इथे फार मोठी दरी निर्माण होते व तिथून लाव्हारस बाहेर पडतो. हा लाव्हारस थंड झाल्यानंतर नवी जमीन तयार होते. थंड झालेल्या जमिनीला भेदून नंतर पुनः लाव्हारस बाहेर पडतो व तिथल्या जमिनीला एकमेकांपासून दूर सरकवतो. अशातऱ्हेने या देशाची व्याप्ती वाढते आहे.

भारताचा विचार केला तर इथली जमीन कमीकमी होते आहे. भारतीय उपखंड हा उत्तरेच्या दिशेने मार्गस्थ आहे पण यूरेशिअन खंड त्याला उत्तरेकडे जाऊ देत नाही. त्याला त्याने हिमालयाच्या पट्ट्यात गोठवून ठेवले आहे. पण भारतीय उपखंड जमिनीची घनता यूरेशिअन जमिनीच्या घनतेपेक्षा कमी असल्याकारणाने आपला उपखंड खाली जातो आहे. त्यामुळे आपली जमीन दरवर्षी काही अंशाने कमी होते आहे.

जरी आइसलँड व ग्रीनलँड बर्फाने व्यापलेले असले तरी इथे फार मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखी व गरम पाण्याचे झरे आढळून येतात. उत्तर ध्रुवाजवळचे देश असल्या कारणाने इथे थंडी आहेच. पण लाव्हारसाच्या फुग्यावर विसावलेला असल्या कारणाने व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या दोन भू-तुकड्यांच्या माथ्यावर वास्तव्यास असल्यामुळे इथे भूगर्भीय परिस्थिती फार जटिल आहे.

पर्यावरणवादी फक्त्त लुप्त होणारे हिमनग व हिमनद्यांबाबतीत चिंता करताहेत. पण त्यापाठची कारणमीमांसा शोधून काढण्याचे किंवा समजावून घेण्याचे टाळत आहेत. इथे दोन परस्परविरोधी प्रवृत्ती कार्यरत आहेत.

जमिनीवर थंड व जमिनीखाली गरम अशी परिस्थिती अस्तित्वात आहे. त्याचाही विचार व्हावा लागेल. जमिनीखाली किती मोठ्या प्रमाणावर ऊर्जा अस्तित्वात आहे आणि तिचा वावर कशाप्रकारे आहे याचा अंदाज जाणकारांना आहे. काही महिन्यापूर्वीच तिथे एक नवीन जमीन तयार झालेली आहे.

हवामानबदल व तापमान विसंगतीबद्दल जगात सर्वत्र अभ्यास सुरू आहे. कुठे नैसर्गिक प्रक्रियांमध्ये बदल व कशा प्रकारचे घडत आहेत याचा निरंतर आढावा घेतला जातो आहे. आइसलँड हा देश हवामानबदलासंबंधी माहिती घेण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. वरचेवर इथे हिमनद्या दिसत असतात व त्यांची व्याप्ती कमीजास्त झालेली अगदी पटकन लक्षात येते.

हिमालयात जर हिमनद्यांच्या अभ्यास करायचा असेल तर ती फार जटिल प्रक्रिया बनून जाते. एकतर उंचावरच्या प्रदेशात जाऊन आपल्याला राहावे लागते, नंतर आखीव-रेखीव नकाशे बनवावे लागतात, व त्यानंतर कालानुरूप घडणारे बदल त्या नकाशांवर अधोरेखित करावे लागतात. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. आधीतर हिमनद्यांच्या मुखापासून ते शेपटापर्यंत पायी चालत त्याची व्याप्ती मोजावी लागत असायची. आणि ही प्रक्रिया निरंतर काही वर्षे करावी लागायची. आता उपग्रह छायाचित्रित नकाशे बघून कमीजास्त व्याप्तीचा अभ्यास करणे सोपे झाले आहे.

आज शास्त्रज्ञांजवळ फार मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा झालेली आहे. ही आकडेवारी अनेक प्रकारच्या घटकांबद्दल आहे. १०० ते १५० वर्षांपूर्वीची तापमान व पावसाबद्दलची आकडेवारी अनेक वैज्ञानिक संस्थांजवळ उपलब्ध आहे. पण ही आकडेवारी फक्त्त काही ठिकाणचीच उपलब्ध आहे. इंग्लंड व भारतातील काही ठिकाणी १५-२० दशकांची आकडेवारी मिळते. पण ज्या ठिकाणी ही आकडेवारी उपलब्ध नाही तिथे एवढ्या पाठीचा अभ्यास व संशोधन कसे करता येईल? त्यासाठी मॉडेल्स व प्रतिरूप असतात.

जगात काही ठिकाणी प्रतिरूप बनवून पाहिजे असेल त्या ठिकाणचा व पाहिजे असेल त्या घटकाचा अभ्यास सुरू आहे. पुढच्या काही वर्षात कोणते हवामानविषयक बदल किती व कोणत्या प्रमाणात कुठे व कसे घडतील याची प्रतिरूप बनवलेली आहेत.

आइसलँड व ग्रीनलँडबद्दल सुद्धा अशी प्रतिरुपे बनवलेली आहेत. पण ही सारी प्रतिरूपे इथल्या बदलांना योग्य प्रकारे मांडण्यास असमर्थ ठरलेली आहेत.

१९४०च्या दशकात या दोन देशात तापमान बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते. त्यावेळी औद्योगिकरणाच्या तसा फारसा प्रभाव आपल्या सृष्टीवर पडलेला नव्हता.

आजच्या घडीला जे काही तापमान व हवामानबदल या देशात घडत आहेत ते बदलही अनेक प्रतिरूपात दिसून आलेले नाहीत. त्याचाच अर्थ असा की इथली परिस्थिती इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. ती वेगळी अशासाठी आहे की आपण इथल्या भूगर्भीय प्रक्रियांचा विचारच करत नाही आहोत. जर केला असता तर हिमनदी ऱ्हासाचा शोक केला नसतो.

प्रवीण गवळी‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिक’ येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0