जीएसटी, वाहन उद्योग, शेअर बाजार : अर्थव्यवस्थेची घसरण सुरूच

जीएसटी, वाहन उद्योग, शेअर बाजार : अर्थव्यवस्थेची घसरण सुरूच

नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना ग्राहकांचा ओघ खरेदीकडे वाढवण्यासाठी एकीकडे मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असले, तरी अर्थव्यवस्थेतील घसरण मात

बंद पडलेल्या गृहप्रकल्पांकरिता २५,००० कोटी रुपये मंजूर
पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर घसरून ५ टक्क्यांवर
एका वडापावची दुसरी गोष्ट…!

नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना ग्राहकांचा ओघ खरेदीकडे वाढवण्यासाठी एकीकडे मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असले, तरी अर्थव्यवस्थेतील घसरण मात्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या सप्टेंबर महिन्यातील वाहन खरेदीची टक्केवारी पूर्वीपेक्षा खाली गेली असून, कॉर्पोरेट कर कमी केल्याने शेअर बाजारात एकाएकी उत्साहाचे वातावरण दिसत असले तरी ते वातावरण अल्पकाळच दिसून आले आहे. आता या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात रिझर्व्ह बँकचे वित्तीय धोरण कसे असेल याकडे उद्योगजगताचे लक्ष लागून राहिले आहे.

जीएसटी महसूलाचे प्रमाण घसरले

मंगळवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ऑगस्टमध्ये ९८,२०२ कोटी रु. जीएसटीचा महसूल मिळाला होता. हा आकडा सप्टेंबरमध्ये ९१,९१६ कोटी रु. इतका घसरला आहे. गेल्या वर्षी याच सप्टेंबर महिन्यात जीएसटी महसूल हा ९४,४४२ कोटी रुपये इतका होता. अर्थतज्ज्ञांच्या मते महिन्यात एक लाख कोटी रुपये जीएसटी महसूल मिळणे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगले असते. आता सप्टेंबरमध्ये एक लाख कोटी रु.चे उद्धिष्ट्य सरकारला गाठता आले नसल्याचा अर्थ असा की, अर्थव्यवस्थेला मंदी भेडसावत आहे.

मारुती व टाटा मोटर्सचा व्यवसाय मंदीतच

मारुती व टाटा मोटर्सचा सप्टेंबर महिन्यातला धंदा फारसा चांगला झाला नसल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यात मारुती सुझुकीचा व्यवसाय २४.४ टक्क्याने घसरला असून या कंपनीच्या गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १ कोटी ६२ लाख मोटार गाड्या विकल्या गेल्या होत्या. तर या सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या एक कोटी २२ लाख गाड्या विकल्या गेल्या आहेत.

टाटा मोटर्सला मंदीचा तडाखा बसला असून या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीने ३६,३७६ मोटारी विकल्या आहेत, ही टक्केवारी गेल्या वर्षीच्या विक्रीशी तुलना केल्यास ४८ टक्क्याने कमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या ६९,९९१ इतक्या गाड्या विकल्या गेल्या होत्या.

मोटार गाड्यांची खरेदी कमी झाल्यामुळे कंपनीने गाड्यांचे उत्पादन कमी केले असून मोटारींच्या सुट्या भागांवर लक्ष्य केंद्रीत केल्याचे टाटा कंपनीचे व्यावसायिक वाहन उत्पादन विक्रीचे प्रमुख गिरीश वाघ यांनी सांगितले. आम्ही सरकारच्या मदतीकडे पाहात आहोत. सरकारने काही पावले उचलल्यास बाजारात तेजी येईल असा आम्हाला आशावाद आहे, असे वाघ म्हणाले.

कारखानदारीही खालावली

सप्टेंबर महिन्यात भारतातील एकूण कारखानदारीही खालावल्याचे दिसून आले. देशातल्या कारखानदारीचा पर्सचेसिंग मॅनेजर्स इंडेक्सही वधारला नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या ऑगस्टमध्ये पीएमआय हा ५१.४ इतका होता तो सप्टेंबरमध्ये कायम आहे. गेल्या वर्षी मे पासून पीएमआय हा सातत्याने घसरत चालला आहे.

७०० अंशाने शेअर बाजार घसरला

मंगळवारी शेअर बाजारातील प्रमुख ३० कंपन्यांचे शेअर घसरून शेअर बाजार ७०० अंकाने खाली आला आहे. येस बँकेचे शेअर २५ टक्क्याने घसरले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अवसायनात निघाल्याने बँकिंग व्यवस्था बुडीत कर्जाने पोखरली गेली असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. रिअल इस्टेटमध्येही मंदीचे वातावरण आहे. त्यात बँकांची परिस्थिती योग्य नसल्याचे वातावरण असल्याने त्याची झळ या उद्योगाला अधिक बसली आहे.

‘एस अँड पी’चे विकास दर खालावेलचे इशारे

‘स्टँडर्ड अँड प्युअर’ या जागतिक पतमापन करणाऱ्या कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीपर्यंत ६.३ पर्यंत खाली येईल असे म्हटले आहे. या कंपनीने या पूर्वी ७.१ टक्के विकासदर असेल असा अंदाज वर्तवला होता. परकीय गुंतवणूकदारांचा भारतात गुंतवणूक करणाऱ्याकडे असलेला निरुत्साह हे एक प्रमुख कारण विकास दर खालावल्याचे आहे, असे या कंपनीचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0