‘सत्याचे प्रयोग’ ही संजीवनी

‘सत्याचे प्रयोग’ ही संजीवनी

मित्रांजवळ महात्मा गांधींचा ज्या ज्या वेळी संदर्भ निघत असे त्यावेळी त्यांच्या ऐकीव अज्ञानाच्या आधारे ते गांधींजींवर वेगवेगळे आरोप करत तसेच अपशब्द देखील वापरत. मध्येच ५५ कोटी, फाळणी यांसारखे विषय काढत. त्यावेळी त्या विषयीचे ज्ञान नसल्यामुळे मला निरुत्तर व्हावे लागे. अजून काही पुस्तके वाचल्यानंतर मात्र हे आरोप किती निराधार व कसे फसवे आहेत ते कळून चुकले.

मी आणि गांधीजी
पुण्यात गोली मारो गँग – तुषार गांधी
गांधी – जगण्याचा मार्ग

गांधी समजून घेण्याची सुरुवात सामान्य ज्ञानाच्या पुस्तकापासून झाली असे म्हणता येईल.

प्रश्न होता – महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द ?

उत्तर – हे राम!

त्यावेळी फार लहान होतो. पाचव्या इयत्तेत १५ ऑगस्टला धोतर घालून (गांधीजींचे सहकारी की अंधश्रद्ध माणसे यांपैकी कोणत्या पक्षात होतो ते आता आठवत नाही) अभिनय करावा लागला. विषय काहीसा असा होता. काही अंधश्रद्ध लोक नवस फेडण्यासाठी एका बकऱ्याचा बळी देणार असतात. तेवढ्यात त्यांची गाठ गांधींशी पडते. गांधींना हिंसा मान्य नव्हती. गांधींजींच्या सांगण्यावरून त्यांचं मतपरिवर्तन होतं व ते नवस फेडण्याचा संकल्प रद्द करतात.

पुढे अभ्यासक्रमात वेगवेगळ्या टप्प्यावर गांधी भेटत गेले. उदा. स्वावलंबन हा हिंदीतील धडा. त्यात एक सज्जन गृहस्थ बापूंना भेटण्यासाठी आश्रमात येतात. त्यांचे कपडे फाटलेले असतात. गांधी त्यांना विचारतात, “तुम्ही फाटके कपडे का घालता?’ त्यावर ते म्हणतात, की पत्नीला कपडे शिवायला वेळच मिळत नाही. त्यावर बापू म्हणतात, “द्या ते कपडे इकडे मी शिवून देतो.’

तेव्हा ती सज्जन व्यक्ती विचार करते की जर गांधी हे काम करू शकतात तर मी का नाही करू शकत?

गांधी विचारांकडे खरा वळलो व विचारांचे परिवर्तन झालं ते महात्मा एज्युकेशन सोसायटीत अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत असताना. एकतर अभ्यासक्रमात वर्धा शिक्षण पद्धती (नयी तालीम) अर्थात कृतीतून शिक्षण यावर भर होता. तेथे शिक्षणतज्ज्ञ गांधी पहिल्यांदाच अनुभवयास मिळाले. आणि दुसरे महत्त्वाचे कारण असे की त्यावेळी आम्हा सर्वांना नवजीवन ट्रस्टचे “माझे सत्याचे प्रयोग-संक्षिप्त आत्मकथा’, हे पुस्तक वितरित करण्यात आले.

प्रस्तावनेपासूनच मी या पुस्तकाच्या मोहात पडलो; तो अजूनही सुटलेला नाही. आज माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव याच पुस्तकाचा आहे.

२०११ मध्ये आलेले अण्णांचे लोकपाल आंदोलन व ते गांधीवादी असल्याचे समजल्यावर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा पाहता मीही मनोमन त्याकडे आकृष्ट झालो. त्यावेळी तरी देशातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती कोण?असं विचारल्यावर अण्णा डोळ्यासमोर दिसायचे.

नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांसारखे दिग्गज आपल्या देशातील एका नेत्याकडून इतके प्रभावित आहेत, हे वाचून हर्ष वाटायचा.

२०१४ मध्ये ‘नवा काळ’ या दैनिकातून महात्मा गांधींचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत असे. ते मी नियमित वाचण्याचा प्रयत्न करीत व कात्रण काढून ठेवत असे. आजही सत्याचे प्रयोगाची मालिका ‘दैनिक तरुण भारत’मधून प्रसिद्ध होत आहे.

मध्यंतरी मित्रांजवळ महात्मा गांधींचा ज्या ज्या वेळी संदर्भ निघत असे त्यावेळी त्यांच्या ऐकीव अज्ञानाच्या आधारे ते गांधींजींवर वेगवेगळे आरोप करत तसेच अपशब्द देखील वापरत. मध्येच ५५ कोटी, फाळणी यांसारखे विषय काढत. त्यावेळी त्या विषयीचे ज्ञान नसल्यामुळे मला निरुत्तर व्हावे लागे. अजून काही पुस्तके वाचल्यानंतर मात्र हे आरोप किती निराधार व कसे फसवे आहेत ते कळून चुकले.

पुढे सोशल मीडियावर तुषार गांधी सर, संकेत मुनोत, डॉ. विश्वंभर चौधरी  यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांना वाचल्यानंतर/ ऐकल्यानंतर मात्र माझ्या मनात शंकेला जागा राहिली नाही. मी आपल्या आदर्शाला बुद्धीच्या कसोटीवर तोलून मापून स्वीकारले. पुढे कधीतरी संकेत मुनोत यांना साम टीव्हीवर वादविवाद करताना पहिले. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग करणाऱ्या शरद पोंक्षे यांना त्यांनी निरुत्तर केले होते व पोंक्षेंना चर्चेतून काढता पाय घ्यावा लागला होता.

खोट्याला हातपाय नसतात, ते लुळेपांगळे असते. सत्याचा मुकाबला ते करू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. त्यानंतर फेसबुक वर एखाद्या ग्रुपशी जोडल्या जावं असं वाटायला लागलं.त्यातच नोईंग गांधीइझम ची माहिती मिळाली.तदनंतर निधी चौधरी मॅडम यांचं वादग्रस्त ट्विट व त्यावर त्यांची सफाई यामुळे या मित्रांच्या चळवळीशी अधिक जवळचा संबंध आला.

आज नथुरामचे उदात्तीकरण चालू आहे, ते पाहून फार चीड येते. ह्या झोपेचे सोंग घेतलेल्या त्याच्या वैचारिक वारसांना धडा शिकवावसा वाटतो.नथुरामपेक्षाही घोर अपराध हे लोक हत्येचे समर्थन करून करत आहे. जर नथुरामला खरा हिंदू मानत असाल तर त्या धर्माचे भविष्य अंधारात आहे, असे मला वाटते.

आज सत्याचे प्रयोग हे माझ्यासाठी संजीवनीचे काम करत आहे. भविष्यात गांधीविचारांशी संबंधित एखाद्या चळवळीशी जोडल्या गेलो तर आनंदच होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0