गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार

गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार

गांधींनी सत्याग्रहाचे जे अजेय शस्त्र निर्माण केले आणि केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिश सत्तेविरोधात किती प्रभावीपणे उभारले त्या सत्याग्रहाची मूळ कल्पना हेन्री थोरोची होती. थोरोचा ‘Civil Disobedience' हा सुप्रसिद्ध निबंध गांधीजींनी वाचला होता. या निबंधाने गांधीजींना विलक्षण प्रभावित केले. सविनय कायदेभंग या निबंधात थोरोने सत्याग्रहाचे जे बीज रोवले त्याला आफ्रिकेत गांधीजींच्या रूपाने अंकुर फुटले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर गांधींनी त्याचे विशाल महावृक्षात रूपांतर केले.

परकेपण लादलेल्या समूहाचा सम्यक वेध
ओबामा यांचं आत्मचरित्र ‘ए प्रॉमिस्ड लँड’
‘कृषिक्षेत्राचे बायबल’

१८४६ सालची गोष्ट. हेन्री डेव्हिड थोरो तेव्हा वॉल्डन तळ्याकाठी स्वतःच्या हातांनी बांधलेल्या घरात राहात होता. स्वतःचे अन्न स्वतः मिळवायचे म्हणून स्वतः शेती करत होता. संपूर्णपणे निसर्गाचे लेकरू बनून राहण्याचे त्याचे स्वप्न थोरो प्रत्यक्षात आणत होता. त्यासाठी जनलोकांपासून दूर विजनवास त्याने पत्करला होता. पण याचा अर्थ त्याला लोकांची संगत आवडत नव्हती असे नव्हे. साऱ्यांनाच असते तशी जनसंगतीची आवड थोरोलाही होती. त्यासाठी तो अधूनमधून गावांत फेरफटका मारत असे. एकदा थोरोने त्याचा बूट दुरुस्त करण्यासाठी मोच्याकडे टाकला होता. तो दुरुस्त झाल्यावर थोरो तो आणायला त्याच्या दुकानी जात असताना त्याला अटक झाली. कारण काय, तर थोरोने सरकारला द्यायचा वार्षिक कर भरला नव्हता.

करवसुली करणाऱ्या अधिकाऱ्याने थोरोला अटक करण्याआधी अनेकवार भेटून वार्षिक कर भरण्याची विनंती केली होती. अन्यथा नाईलास्तव आणि स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाऊन मला तुम्हाला अटक करावी लागेल, असे सांगितले होते. थोरो मात्र काही झाले तरी कर न भरण्यावर ठाम होता. आणि त्याची जी शिक्षा सरकार देईल ती विनातक्रार भोगण्याची त्याची तयारी होती. त्यामुळे थोरोच्या अटक झाली तेव्हा त्याला त्याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. ती एक रात्र थोरोला तुरुंगात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी कुणीतरी थोरोला न कळवता त्याची कराची रक्कम भरल्यामुळे त्याची सुटका झाली.

सरकारला कर न देण्यामागील थोरोची भूमिका नंतर त्याने आपल्या भाषणांतून आणि निबंधांतून विषद केली. जे सरकार गुलामगिरीसारखी अनिष्ट प्रथा राबविण्यास हातभार लावते, त्या सरकारला कसल्याही प्रकारचे प्रोत्साहन माझ्याकडून मिळणार नाही. त्या सरकारला मी करही देणार नाही. अशी त्याची भूमिका होती. हा अर्थातच सरकारच्या दृष्टीकोनातून कायदेभंग होता आणि शिक्षेस पात्र होता. थोरोला त्याची पुरेपूर जाण होती. मात्र केवळ शिक्षा टाळण्यासाठी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्याला मान्य नव्हते.

नंतरच्या काळात कर न देण्यामागील आणि सरकारविरुद्ध त्याने पुकारलेल्या असहकारामागे असणारी त्याची भूमिका ‘Civil Disobedience’ तथा ‘सविनय कायदेभंग’ या निबंधात विषद केली. या निबंधात थोरोने म्हटले; “मानवी हक्काबद्दल, न्याय्य असेल त्याबद्दलची भावना पोसायची ती कायद्याबद्दल पोसणे इष्ट नाही. ज्या वेळी मला जे योग्य, प्रशस्त दिसते ते करणे, हे एकमेव कर्तव्य मानण्याचा मला हक्क आहे.’‘….जे स्वतःला गुलामगिरीचा नायनाट करायला प्रवृत्त झालेले समजतात, त्यांनी सरकारला आपला जो काही पाठींबा आहे, तो ताबडतोब काढून घ्यावा असे म्हणायला मला बिलकूल संकोच वाटत नाही.’…”वस्तुतः मी अगदी शांतपणे माझ्या पद्धतीने राज्यसरकारशी युद्ध पुकारतो आहे.’ [1]

या घटनेनंतर ६० वर्षानंतरचा एक प्रसंग. स्थळ होते, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग हे शहर. आफ्रिकेत भारतीयांच्या विरोधात येऊ घातलेल्या वर्णद्वेषी कायद्याच्या विरुद्ध काय पाऊल उचलावे हे ठरविण्यासाठी शेकडो भारतीय प्रतिनिधी ‘इंपिरियल थिएटर’मध्ये जमले होते. सभेसाठी जमलेले बहुसंख्य लोक संतप्त मनस्थितीत होते. कारण या कायद्यानुसार स्त्रियांना वाटेत हटकण्याची पोलिसांना मुभा होती. त्यामुळे संतापून एका भारतीयाने हिंसक होत म्हटले, “अशा प्रकारे कोणी माझ्या पत्नीकडून प्रमाणपत्राची मागणी करण्यासाठी आला तर त्याला मी गोळी घालून ठार करेन.’ तिथे उपस्थित असणाऱ्या जवळपास सर्वच भारतीय प्रतिनिधींची भावना कमी-अधिक प्रमाणात अशाच स्वरूपाची होती. संतापाच्या या लाटेचे अतिशय तीव्र आणि घातकी परिणाम उद्भवतील अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. पण तसे व्हायचे नव्हते. कारण त्या समुदायाचे नेतृत्व एक अतिशय संयत आणि बुद्धिमान व्यक्तीच्या हातात होते. ती व्यक्ती होती, मोहनदास करमचंद गांधी.

संतापलेल्या समूहाला संबोधित करण्यासाठी गांधी उभे राहिले आणि हळुवार पण दृढ आवाजात बोलू लागले, “आपण एक प्रकारच्या वणव्यात सापडलो आहोत. त्या प्रसंगी सर्वस्व पणाला लावून आपण त्याचा प्रतिकार करायला हवा. अन्यथा ते भ्याडपणाचे ठरेल. मात्र या प्रतिकारामुळे सरकार आपल्याला तुरुंगात टाकेल, मारहाण करेल, किंवा अपमानित करेल, आपले हालहाल करून या देशातून हाकलून देईल. हा झगडा अनेक वर्षेही चालू शकेल. पण मला खात्री आहे, उपस्थित लोकांपैकी किमान एक जरी व्यक्ती अखेरपर्यंत तग धरून राहिला, तर आपला विजय निश्चित आहे. या कायद्याला प्रतिकार करत मला मृत्यू जरी आला तरी मी त्याला सामोरा जाईन मात्र सरकारपुढे मान तुकवणार नाही. मात्र हे करत असताना आपल्या प्रतिस्पर्ध्याला क्लेश देणे आपल्या तत्वात बसत नाही.’

अशा प्रकारच्या लढ्याला गांधींनी सत्याग्रह अर्थात सविनय प्रतिकार असे म्हटले. सत्याग्रह म्हणजे, प्रतिस्पर्ध्याला क्लेश न देता स्वतःच क्लेश सहन करायचे आणि सत्याचे समर्थन करायचे. सत्याग्रह नेहमी शांततामय मार्गाने करायचा असतो. जशास तसे या न्यायापेक्षा सत्याग्रहातून अधिक चांगले परिणाम मिळू शकतील असे गांधींना वाटत होते.

'सिव्हील डिसओबोडीयन्स'ची स्पॅनिश भाषेतील प्रत.

‘सिव्हील डिसओबोडीयन्स’ची स्पॅनिश भाषेतील प्रत.

पुढे महात्मा गांधींनी सत्याग्रह अर्थात सविनय प्रतिकाराचे स्वरूप ‘हिंद स्वराज्य’ या ग्रंथातून सविस्तरपणे लिहिले. “सविनय प्रतिकार ही स्वतः कष्ट सोसून हक्क मिळविण्याची एक पद्धत आहे; हा प्रतिकार सशस्त्र प्रतिकाराच्या नेमका उलट आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला तिरस्करणीय वाटणारी गोष्ट करायला मी नकार देतो तेव्हा मी माझे आत्मबळ वापरतो. उदाहरणार्थ, विद्यमान सरकारने मला लागू होणार कायदा केला. मला तो मान्य नाही. जर मी शासनाला तो कायदा मागे घेण्यासाठी हिंसक मार्गाने भाग पाडले, तर मी शारीरिक बळाचा वापर केला असे होईल असे म्हणता येईल. मी जर कायदा पाळला नाही आणि तो मोडल्याबद्दल शिक्षेचा स्वीकार केला, तर मी आत्मबळ वापरतो. यात स्वतःचे बलिदान गुंतलेले असते.’ [२]

वरील दोन्ही प्रसंग ध्यानात घेतले तर, स्थळकाळाचे संदर्भ भिन्न असले तरी दोन्ही प्रसंगांतून थोरो आणि महात्मा गांधी यांनी व्यक्त केलेली भावना समानधर्म होती हे लक्षात येते. आणि ते साहजिकही आहे. कारण गांधींनी सत्याग्रहाचे जे अजेय शस्त्र निर्माण केले आणि केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिश सत्तेविरोधात किती प्रभावीपणे उभारले त्या सत्याग्रहाची मूळ कल्पना हेन्री थोरोची होती. थोरोचा ‘Civil Disobedience’ हा सुप्रसिद्ध निबंध गांधीजींनी वाचला होता. या निबंधाने गांधीजींना विलक्षण प्रभावित केले. सविनय कायदेभंग या निबंधात थोरोने सत्याग्रहाचे जे बीज रोवले त्याला आफ्रिकेत गांधीजींच्या रूपाने अंकुर फुटले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तर गांधींनी त्याचे विशाल महावृक्षात रूपांतर केले.

महात्मा गांधींनी उभे केलेल्या सत्याग्रहाच्या चळवळीमागे थोरोच्या निबंधाचे पाठबळ अनेक गांधी आणि थोरो संशोधकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. पण सत्याग्रहाची संपूर्ण कल्पना गांधींनी थोरोपासून घेतली असे नव्हे. सविनय कायदेभंग या निबंधाचे वाचन हे निमित्तमात्र झाले. या निबंधाचे वाचन करण्याआधीपासून ते अहिंसेचे भोक्ते बनले होते. मुख्य म्हणजे आफ्रिकेत राहात असताना अन्यायी ताकदीविरुद्ध लढण्यासाठी अहिंसक आणि नैतिक मार्ग काय असावेत यांवर चिंतन करत होते. थोरोची कल्पना, त्याचे विचाररूपी बीज रुजण्यासाठी पोषक जमीन महात्मा गांधींच्या मनात तयार झाली होती. अशा काळात त्यांनी थोरोच्या निबंधाचे वाचन केले आणि ते बीज सत्याग्रहाच्या महावृक्षात विकसित झाले.

गांधीजी आणि थोरो दोघांनीही सविनय प्रतिकाराचे शास्त्र उगारून केवळ एकटा मनुष्यही क्रांतीची सुरवात करू शकतो हे दाखवून दिले. थोरोने आपल्या निबंधात म्हटले आहे, “हजार माणसे, शंभर माणसे मी सांगतो तशी दहा माणसे, फक्त दहाच प्रामाणिक माणसे-छे! फक्त एकच प्रामाणिक माणूस, जर या राज्यात पदरी गुलाम ठेवण्याचे सोडून देऊन जर आपली त्यातली भागीदारी ताडकन तोडून टाकील, आणि त्यामुळे जर तुरुंगात अडकून पडेल, तर तिथेच अमेरिकेतल्या गुलामगिरीचा नायनाट होईल. कारण सुरवात किती लहान असते यावर काहीच अवलंबून नसते; जे सत्कृत्य एकदा केले, ते सर्वदा चांगलेच राहते.’[३]

महात्मा गांधींनीही सत्याग्रहाच्या लढ्याला एक प्रामाणिक माणूसही पुरेसा आहे हे वारंवार अधोरेखित केले. ‘सविनय प्रतिकार’ या प्रकरणात गांधीजी म्हणतात, “एक मात्र मी कबूल करीन; शरीराने कमजोर असलेला माणूसही या प्रकारचा प्रतिकार करू शकेल. स्त्रिया आणि पुरुष दोघेही हे आनंदाने करू शकतील. त्यासाठी सैनिकी शिक्षण आवश्यक नाही. त्यासाठी फक्त मनावरील ताबा हाच आवश्यक आहे. आणि एकदा ताबा मिळवला की असा माणूस वनराज सिंहासारखा मुक्तपणे वावरू शकतो आणि त्याच्या निवळ नजरेने विरोधक निष्प्रभ होतो.’[४]

खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहामागील आपल्या प्रेरणेचे श्रेय थोरोला वेळोवेळी दिले आहे. ‘हिंद स्वराज्य’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत गांधीजी लिहितात, “हिंद स्वराज्यमधील मते ही मी स्वीकारलेली आहेत. तरी टॉल्स्टॉय, रस्किन, थोरो, इमर्सन आणि इतर लेखक तसेच थोर भारतीय तत्वज्ञ यांना अनुसारण्याचा मी नम्र प्रयत्न केला आहे.’ [५]

१९४२ साली ‘इंडियन ओपिनियन’मध्ये गांधीजी आपल्या अमेरिकन मित्राना उद्देशून लिहितात, “थोरोच्या रूपात तुम्ही मला एक गुरू दिला आहे. थोरोच्या सविनय कायदेभंग या निबंधाने, मी जे कार्य दक्षिण आफ्रिकेत करत आहे, त्याची शास्त्रीय पुष्टी दिली आहे.’ [६]

महात्मा गांधींवर थोरोचा प्रभाव केवळ सविनय कायदेभंग या निबंधापुरता मर्यादित नव्हता तर ‘हिंद स्वराज्य’, ‘मंगल प्रभात’ या ग्रंथांचे काळजीपूर्वक वाचन केल्यास त्यांच्यावर थोरोचा किती खोल प्रभाव होता ते दिसून येते. यंत्रसामग्रीचा वापर, रेल्वे, साधी राहणी, नीतिमत्ता, तात्विक विचारांना अनुसरून जीवन या संदर्भात गांधींच्या विचारांचे वाचन करताना थोरोच्या ‘वॉल्डन’ या ग्रंथाशी आणि ‘तत्वहीन जीवन’ या निबंधाशी असणारे त्यांचे साम्य ध्यानात येते.

गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले असताना त्यांना वेब मिलर या अमेरिकन पत्रकाराने विचारले की, “तुम्ही हेन्री थोरोचे साहित्य वाचले आहे काय?’ त्यावर गांधीजी म्हणाले, “अर्थातच मी वाचले आहे. १९०६ साली दक्षिण आफ्रिकेत असताना मी पहिल्यांदा थोरोच्या वॉल्डनचे वाचन केले. थोरोच्या विचारांनी मला विलक्षण प्रभावित केले आहे. त्यातील काही कल्पना तर मी स्वतःच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मला मदत करणाऱ्या साऱ्या मित्रांना मी थोरोचे साहित्य वाचण्याचे आवाहन केले आहे.’[७]

अर्थात इथे हेही नमूद करायला हवे की, महात्मा गांधींनी सत्याग्रहाला जे नैतिक, अध्यात्मिक अधिष्ठान दिले आणि सामान्यातील सामान्य माणसापर्यंत सत्याग्रहाचे दरवाजे खुले केले ती केवळ महात्मा गांधींची देणगी आहे. थोरो गांधींना समकालीन असते, तर त्यांनाही महात्मा गांधींच्या विचारांनी तेवढेच प्रभावित केले असते यात मुळीच शंका नाही.

अवतरणे :

[१], [३] – सविनय कायदेभंग, हेन्री डेव्हिड थोरो, अनुवाद- दुर्गा भागवत

[२], [४] – हिंद स्वराज्य – अनुवाद रामदास भटकळ

[५], [६], [७] – George Hendric

संदर्भ :

१. हिंद स्वराज्य- महात्मा गांधी, अनुवाद- रामदास भटकळ, पॉप्युलर प्रकाशन, २०१७

२. चिंतानिका- थोरो, अनुवाद- दुर्गा भागवत, मॅजेस्टिक प्रकाशन, १९६८

३. Walden – Henry David Thoreau

४. Henry David Thoreau: A life – Laura Walls

५. The life of Henry David Thoreau- H. A. Salt

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1