विद्यार्थी आणि राजकारण – भगतसिंग (१९२८)

विद्यार्थी आणि राजकारण – भगतसिंग (१९२८)

‘विद्यार्थी आणि राजकारण’ या राजकीय विषयावरील भगतसिंग यांनी लिहिलेला हा लेख जुलै १९२८ मध्ये 'कीर्ति' या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. त्या काळात बरेच नेते विद्यार्थ्यांना राजकारणात भाग घेऊ नये असा सल्ला देत असत, ज्याला उत्तर म्हणून भगतसिंग यांनी हा लेख लिहीला.

उना प्रकरणातील खटले मागे न घेतल्यास, मेवानींचा बंदचा इशारा
शासनसत्ता, बाजारव्यवस्था आणि समष्टी
अमरावतीतील दंगलीला पोलिसांची अकार्यक्षमता जबाबदार!

शिकत असलेल्या तरुणांनी (विद्यार्थी) राजकीय किंवा राजकीय कार्यात सहभागी होऊ नये, असे म्हणणारा एक मोठा आवाज ऐकायला मिळतो आहे. पंजाब सरकारचे मत एकदम वेगळे आहे. महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून राजकीय कामात भाग घेणार नाही, या आशयाच्या पत्रावर सही घेतली जाते. त्यात आमचे दुर्दैव हे आहे की लोकांनी निवडलेले मनोहर, जे आता शिक्षणमंत्री आहेत त्यांनी शाळा व महाविद्यालयांना शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या कोणीही राजकारणात भाग घेऊ नये यासाठी परिपत्रक किंवा परिपत्रक पाठविले आहे. काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये जेव्हा विद्यार्थी संघटना किंवा विद्यार्थी सभेच्या वतीने विद्यार्थी-सप्ताह साजरा केला जात होता. तेथेही सर अब्दुल कादर आणि प्राध्यापक ईश्वरचंद्र नंदा यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये, यावर भर दिला.

राजकीयदृष्ट्या पंजाबला सर्वात मागासलेला (Politically backward)असल्याचे म्हटले जाते. याचे कारण काय? पंजाबने कमी बलिदान दिले आहे का? पंजाबने कमी समस्यांचा सामना केला आहे का? मग पंजाबच्या या मागासलेपणाचे काय कारण आहे? कारण स्पष्ट आहे; आपल्या शिक्षण विभागातील अधिकारी पूर्णपणे मुर्ख आहेत. आज पंजाब कौन्सिलचे कामकाज वाचून हे लक्षात येते, की यामागचे कारण आपले शिक्षण निकृष्ट व व्यर्थ आहे आणि विद्यार्थी-युवा आपल्या देशाच्या चर्चेत सहभाग घेत नाहीत. त्यांना याविषयीचे काहीच ज्ञान नाही. जेव्हा ते शिकून बाहेर पडतात,  तेव्हा त्यापैकी काही मोजकेच पुढे अभ्यास करतात. परंतु ते सुद्धा इतक्या अर्धवट गोष्टी बोलतात, की त्या ऐकून स्वतः निराश होऊन दु:ख करण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उद्याची देशाची वाटचाल/दिशा ज्या तरुणांच्या हातात आहे, त्यांना आज बुद्धिहीन बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे परिणाम आपल्याला स्वतःला समजून घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांचे मुख्य कार्य अभ्यास करणे आहे, त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे आम्ही जाणतो/ मानतो. परंतु देशातील परिस्थिती आणि त्यांच्या सुधारणांचा विचार करण्याची क्षमता निर्माण करणे, हे या शिक्षणात समाविष्ट नाही? नसल्यास, आम्ही त्या शिक्षणाला निरर्थक मानतो, जे केवळ कारकुनीसाठीच प्राप्त केले पाहिजे. अशा शिक्षणाची गरजच काय आहे? काही अती हुशार लोक असे म्हणतात, “काका तुम्ही राजकारणाविषयी वाचा आणि विचार जरूर करा, परंतु त्यात व्यावहारिक भाग घेऊ नका.” त्याने तुम्ही अधिक सक्षम बनून देशासाठी फायदेशीर ठराल.

ही गोष्ट ऐकायला खूप छान वाटते, परंतु आम्ही ते देखील रद्द करतो, कारण ही फार उथळ गोष्ट आहे. पुढील गोष्टीवरून हे स्पष्ट होते. एक दिवस एक विद्यार्थी ‘Appeal to the young, ‘Prince Kropotkin’ ( प्रिन्स क्रोप्टोकिन यांचे तरुणांना आव्हान) हे पुस्तक वाचत होता. प्राध्यापक त्याला म्हणाले, हे कोणते पुस्तक आहे? आणि हे तर एखाद्या बंगाली व्यक्तीचे नाव वाटतं आहे. मुलगा म्हणाला  – प्रिन्स क्रोप्टोकिनचे नाव खूप प्रसिद्ध आहे. ते अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. या नावाशी परिचित असणे प्रत्येक प्राध्यापकासाठी आवश्यक होते. प्राध्यापकाच्या ‘योग्यतेवर’ मुलगा हसला व त्याने सांगितले की हे अभ्यासक रुसी सज्जन होते. झालं! रुसी? गहजब झाला, प्राध्यापक म्हणाले तू बोल्शेविक आहेस, कारण तू राजकीय साहित्य वाचतोस.

ही त्या प्राध्यापकाची योग्यता! आता ते बिचारे विद्यार्थी यांच्याकडून काय शिकणार? अशा परिस्थितीमध्ये तरुण काय शिकू शकतात?

दुसरी गोष्ट म्हणजे व्यावहारिक राजकारण काय असतं? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचे स्वागत करणे आणि भाषण ऐकणे हे झाले व्यावहारिक राजकारण. परंतु आयोग किंवा व्हायसराय यांचे स्वागत करणे म्हणजे काय? असे करणे ही राजकारणाचीच दुसरी बाजू नाही का? सरकारे आणि देशांच्या व्यवस्थापनाशी संबंधित कोणतीही बाब राजकारणाच्या क्षेत्रातच मोजली जाते, तर मग हे ही राजकारणाच नाही का? यावर असे म्हटले जाईल, की यातील एकाने सरकार खुश होते तर दुसऱ्याने नाराज? पण मग हा तर सरकारच्या ख़ुशी आणि नाराजीचा प्रश्न झाला. काय विद्यार्थ्यांना जन्मतःच चापलुसीचे शिक्षण दिले पाहिजे? आम्ही समजतो की जोपर्यंत भारतावर परकीय डाकू राज्य करीत आहेत, तोपर्यंत निष्ठा करणारा निष्ठावान नाही तर देशद्रोही आहे, मनुष्य नाही तर पशु आहे, पोटाचा गुलाम आहे. तर मग आम्ही असे कसे म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी निष्ठा शिकावी?

आपण सर्वजण हे जाणता की आत्ता भारताला अशा देशवासीयांची गरज आहे, जे तन, मन आणि धन  देशाला अर्पण करून आपले सर्व जीवन वेड्यासारखे देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करतील. काय वयस्कर लोकांमध्ये अशी लोकं मिळू शकतील? कौटुंबिक आणि दुनियादारीच्या गोंधळात अडकलेल्या लोकांमधून असे लोक मिळू शकतील? असे लोक त्याच तरुणांमधून मिळू शकतात, जे कोणत्याही जंजाळात अडकलेले नाहीत. जंजाळात दुनियादारीत पडण्याच्या आधी विद्यार्थी किंवा तरुण लोक व्यावहारिक ज्ञान घेत असतील तरच विचार करू शकतात. जे फक्त गणित आणि भूगोलाच्या परीक्षेच्या पेपरात अडकलेले नसतील.

काय इंग्लंडमधील सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सोडून जर्मनीविरूद्ध लढा देण्यासाठी बाहेर जाणे राजकारण नव्हते? तेव्हा आमचे उपदेशक कुठे होते, जे म्हणतात, ‘जा आणि शिक्षण मिळवा.’ आज, अहमदाबादच्या नॅशनल कॉलेजमधील जी मुले सत्याग्रहातील बारडोली लोकांना मदत करत आहेत, ते मूर्ख आहेत काय? त्यांच्या तुलनेत पंजाब युनिव्हर्सिटी किती पात्र  व्यक्ती घडवते ते पाहूया?  सर्व देशांना स्वातंत्र्य मिळवून देणारे त्या देशातील विद्यार्थी आणि तरुणच आहेत. भारतातील तरुण वेगळे वेगळे राहून स्वतःचे आणि आपल्या देशाचे अस्तित्व वाचवू शकतील? १९१९ मधील विद्यार्थ्यांवरील अत्याचार तरुण विसरू शकत नाहीत. ते  हे देखील जाणून आहेत की त्यांना क्रांतीची आवश्यकता आहे. त्यांनी शिकावे, जरूर शिकावे. पण त्याचबरोबर राजकारणाचेही ज्ञान मिळवावे आणि गरज पडेल, तेव्हा राजकारणात उडी घ्यावी आणि या कार्यात आपले जीवन द्यावे. यालाच आपले जीवन समर्पित करावे. याखेरीच यातून वाचण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही.

अनुवाद – मधुरा जोशी 

या लेखाला त्या काळातील संदर्भ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0