कन्नूर/शिमोगाः केरळमधील कन्नूर जिल्ह्यात तलास्सेरी येथे रविवारी रात्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा)च्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.
कन्नूर/शिमोगाः केरळमधील कन्नूर जिल्ह्यात तलास्सेरी येथे रविवारी रात्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा)च्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. तर कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
केरळमध्ये मृत माकपा कार्यकर्त्याचे नाव कोरमबिल हरिदास असे असून ते पेशाने मच्छिमार होते. रविवारी रात्री कामावरून घरी येत असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेतील हरिदास यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. हरिदास यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला व नंतर ते दोन मोटार सायलकलवरून फरार झाल्याचा आरोप हरिदास यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
केरळ पोलिसांच्या मते पुन्नोल भागात गेल्या आठवड्यात एका मंदिराच्या प्रश्नावरून भाजप व माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता. या संदर्भात पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार हरिदास यांच्या हत्येनंतर एक व्हीडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला होता. यात एक स्थानिक भाजप नेता के. लिजेश आपल्या पक्षाच्या-भाजप- कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्यानंतर त्याचे प्रत्युत्तर कसे चोख दिले जाते याविषयी बोलत होता.
तर हरिदास यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप माकपने केला आहे. या आरोपावर आरएसएसने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
दुसरी घटना कर्नाटकात झाली असून शिमोगा जिल्ह्यात बजरंग दलाचा २३ वर्षाचा कार्यकर्ता हर्षा याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास भारती कॉलनीमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी हर्षा याच्यावर हल्ला केला. त्यात हर्षा जागीच ठार झाला. हर्षा विणकर म्हणून काम करत होता. हर्षाच्या हत्येनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांना आग लावली व दगडफेक केली. या हत्येमागचे कारण अद्याप समजलेले नाही. शिमोगामध्ये काही दिवसांपासून हिजाब प्रकरणावरून तणाव पसरला होता.
हर्षाच्या हत्येनंतर शिमोगा येथे १४४ कलम लावण्यात आले आहे व सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मूळ बातमी
COMMENTS