युद्धाच्या ढगांखालचा गाव…

युद्धाच्या ढगांखालचा गाव…

युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली की, अवघा देश ढवळून निघतो. राजकीय पातळीवर कधी सबुरीची, कधी आक्रमणाची भाषा होते. त्याचा परिणाम म्हणून जनतेची देशभक्ती उफाळून येते. परंतु, प्रत्यक्ष युद्धाचे ढग ज्या गावावर दाटलेले असतात, तो गाव कोणकोणत्या प्रसंगांतून जात असतो, त्याची त्या काळातली मानसिक-भावनिक स्थिती काय असते, सीमेवरचा युद्धाच्या छायेतला गाव असण्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतात...आदी प्रश्नांचा वेध घेत भारत-चीन संघर्षात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या लडाख परिसरातल्या चुशुल गावाची चरित्रात्मक ओळख करून देणारा हा लेख...

भारताची भू-राजकीय रचना ब्रिटिशकाळापासूनच कमालीची गुंतागुंतीची राहिलेली आहे. म्हणजे, देशाच्या सीमांवरचा जो भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, तोच भाग लष्करीदृष्ट्या संवेदनशीलही राहिलेला आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांची पावले वळली तरीही, सीमेवरच्या सततच्या तणावाच्या स्थितीमुळे या भागांमध्ये अस्थिरतेचेही सावट आजवर कायम राहिले आहे. काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ईशान्येकडची राज्ये, उत्तरेकडचे राजस्थान ही या विचित्र संयोगाची काही ठळक  उदाहरणे आहेत.

भारताची चीन व पाकिस्तान बरोबर जवळपास ७००० किलोमीटरची सीमा आहे. पश्चिमेला गुजरातपासून थेट काश्मीर आणि पुढे अरुणाचल प्रदेशपर्यंत सर्व सीमा भागांतल्या गावांमध्ये मोठ्या संख्येने जनता वास्तव्यास असते. सदैव मृत्यूच्या छायेत जगत असताना विशेषतः पुंछ, राजौरी, सुचितगड या ठिकाणी कधी तोफगोळ्यांचा मारा सुरू होईल आणि कधी काय घडेल याचा नेम नसतो. पण तसे असूनही हे लोक तिथे टिकाव धरून असतात. नुकताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने तो मान्यही केला. पण गेल्या एका वर्षात पाच हजारहून अधिक वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग केला आहे. यावरून येथील जनता मृत्यूच्या छायेत कशी जगत असेल, याचा आपल्याला सहज अंदाज लावता येतो.

हाच धागा पकडून असे म्हणता येते की, गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून उत्तरोत्तर वाढत गेलेल्या भारत-चीन दरम्यानच्या लष्करी संघर्षामुळे सर्वाधिक तणाव लडाख प्रदेशातल्या सीमेवरच्या गावांना अनुभवावा लागला आहे. त्यातलेच एक युद्धाच्या दाट छायेखाली वावरलेले एक गाव आहे, चुशुल.

चुशुल गावाला पहिल्यांदा भेट दिली, ती २०१५ मध्ये. निमित्त अर्थातच पर्यटनाचे होते. काही साहसी मंडळींची टूर घेऊन गेलो होतो. लेहवरून प्रसिद्ध पँगाँग लेककडे जाताना वाटेत, पँगाँग लेक आणि सोमोरिरी यांच्यामधोमध चुशुल नावाचे हे विरळ वस्तीचे सीमेवरचे गाव लागते. तसे लष्करीदृष्ट्या संवेदनशील गावांना यापूर्वी या ना त्या निमित्ताने भेटी देऊन झाल्या होत्या. त्यामध्ये अरुणाचलमधली वालाँग, काहो, किबिथु ही गावे होती. अरुणाचल प्रदेशातील भारत-म्यानमार सीमेवरचे पंगसाऊ नावाचे गाव होते, त्रिपुरा आणि मेघालय राज्यातल्या भारत-बांगला देश सीमेवरची गावे होती, भारत-पाक सीमेवरचे बाल्टिस्तान परिसरातले तुर्तुक गाव होते, कारगिल एलओसी भागातले दारचिक, गारकोन आदी गावे अनुभवता आली होती. पण यात चुशुल हे पटकन नजरेत न भरणारे, पण कधीही न विस्मृतीत जाणारे असे गाव होते.

एकाकी आणि अस्वच्छ

सुमारे ५०० वर्षांपूर्वी वसलेले १४,५०० फूट उंचीवरचे बौद्धधर्मीयांचे प्राबल्य असलेले  चुशुल हे गाव आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम ११५० इतकी आहे. चुशुल गावापासून तिबेट म्हणजेच चीनची सीमारेषा फक्त १० किलोमीटर आहे. चुशुल गाव आणि आजूबाजूच्या गावांच्या परिसराला चांगथांग रिजन असेही संबोधण्यात येते. त्यात श्योकर, खलसर, हानले, नुकुंद तत्सम गावांचा समावेश होतो. त्याला ईस्टर्न लडाख असे संबोधतात. विरळ लोकवस्ती हे लडाख भागातल्या गावांचे वैशिष्ट्य आहे. तेच चुशुल या गावाचेही वैशिष्ट्य आहे. गावाची भू रचना अशी आहे की, एका बाजूला नजरेला सुखावणारे डोंगर आहेत आणि गावाची भूमी बऱ्यापैकी सपाट आहे. याच सपाट भूमीवर अंतराअंतरावर घरे, बौद्ध मठ आणि मध्येमध्ये शेतजमीन, भारतीय लष्कराचे अस्तित्व ठसवणारे झेंडे, फलक, स्मृतिस्तंभ, आय.टी.बी.पी., पोलीस यांचे कार्यालय असे गावाचे स्वरुप आहे. तिबेटियन चेहरेपट्टी असलेले इथले नागरिक कमालीचे प्रेमळ, अतिथ्यशील आणि शरीराने काटक आहेत. आम्ही गेलो होतो ऑगस्ट महिन्यात. तेव्हा तिथला, उन्हाळा सुरू होता. म्हणजे, या भागात दोन ऋतु असतात. उणे तापमानातला हिवाळा आणि अंग भाजून काढणारा उन्हाळा. ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर हे इथले उन्हाळ्याचे महिने. तापत्या उन्हात गावात गेलो, तेव्हा दूरवर डोंगरावर किंवा शेतात थोडीफार हालचाल दिसली तर दिसली अन्यथा नजरेत भरले, ते गावचे एकाकीपण त्यातून गडद होत गेलेले भकासपण, तिथली निरव शांतता आणि गावात पसरलेली अस्वच्छता. बहुदा त्याचमुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकास अस्वस्थ करेल इतक्या डासांच्या झुंडी इथे दिवसाढवळ्या फिरत होत्या. सांडपाण्याची योग्य व्यवस्था दिसत नव्हती. शहरी सोडून द्या ग्रामीण भागातल्या वीज, आरोग्य अशा प्राथमिक सोयीसुविधांचीही वानवा दिसत होती. पण अशाही अवस्थेत हसऱ्या मुद्रेचे स्त्री-पुरुष आपापल्या नित्याच्या कामात गढलेले दिसत होते. मध्येच एखाद दुसरे वाणसामानाचे छोटेखानी दुकान होते, त्याच्या आसपास शाळकरी वयातली मुले घोळक्याने भटकत होती. सगळेच अंतराअंतरावर, सगळेच तुटक-तुटक. उद्या बरा-वाईट प्रसंग आला, तर काय व्हायचे या लोकांचे, कसे राहत असतील हे लोक या गावात, हा त्यावेळी सोबत असलेल्या प्रत्येकाच्या तोंडून निघालेला उद्गार होता. अर्थात, गावाची स्थिती शोचनीय असली तरीही गावातील नागरिक निःसंशयपणे हळवे, विश्वासू आणि मैत्री करण्यालायक आहेत, यावर सगळ्यांचे एकमतही झाले होते.

लष्कर हाच आधार

हिवाळ्यात येथे प्रचंड थंडी असते. म्हणजे तापमान उणे २५ ते उणे ३० पर्यंत जाते. याचमुळे मुख्यत्वे वर्षातून आठ महिने चुशुल गावाचा इतर जगाशी असलेला संपर्क तुटतो. हा काळ अत्यंत खडतर मानला जातो. आपण दळणवळणाच्या विविध साधनांनी जगाशी चोवीस तास जोडलेलो असतो. पण त्यात जरा जरी खंड पडला की, आपला चरफडाट होतो. अशात कल्पना करा, चुशुल गाव जगापासून आठ महिने बेखबर असते. अर्थात, अशा वेळी तिथे तैनात भारतीय लष्कराचा गावकऱ्यांना मोठा आधार मिळतो. भारतीय लष्कराच्या सहाय्याने त्यांना तिथे सावरण्यास मदत होते. किंबहुना, येथील बहुतांश जनता उदरनिर्वाहासाठी भारतीय लष्करावर सर्वार्थाने अवलंबून असते. गावातले बहुसंख्य लोक लष्करासाठी लोडरचे काम करतात. लष्कराकडून होणाऱ्या आमदनीची त्यांना शाश्वती असते. शेतीच्या संदर्भाने बोलायचे झाल्यास, येथे वर्षातून केवळ एकदाच पीक घेण्यात येते. त्यात प्रामुख्याने गहू, मटार आणि फुलकोबी, टॉमॅटे, कांदा अशा काही मोजक्याच पिकांचा समावेश होतो. बहुतांशी स्थानिकांच्या वापरासाठीच ही पिके कामी येतात.

लडाखमध्ये एखाद्यास इंग्लिश, उर्दू अवगत नसेल तर अशिक्षित समजले जाते. असे असले तरी बुद्धिस्ट स्क्रिप्ट येथे महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे बहुतांश ८० टक्के ते ९० टक्के लोक बुद्धिस्ट स्क्रिप्ट जाणतात. १९६२ च्या युद्धाअगोदर न्योमा गावात असिस्टंट कमिशनर या दर्जाची नेमणूक येथे होती. त्यामुळे तेव्हा चुशुल येथे विमानतळ होते. पण आज ते नेहमीच्या वापरण्याजोगे नाही. सगळे दळणवळण रस्ता मार्गानेच होते. येथील रस्ते कच्चे-पक्के, कधी वळणावळणाचे, मोठ-मोठ्या दगडधोंड्यांनी व्यापलेले म्हणून प्रसंगी धोकादायकही ठरतात.

युद्धाच्या धूसर आठवणी

१९६२ नंतर मागील काही महिन्यात पुन्हा भारत आणि चीन दरम्यान सीमावाद उफाळून आला. अजूनही बर्‍याच घडामोडी सीमा भागात घडत आहे. एका मोठ्या खंडानंतर, १६ ऑगस्ट २०२० ला भारतीय सैन्य परत सीमेवर गेले. कारण इतके वर्षे ‘नो मॅन्स लॅण्ड’ अशी या भागाची नोंद होती. शत्रूला ललकारण्याच्या आवेशात रिझांग-ला येथे पोहोचल्यावर चीनला लक्षात आले की, आपण भारताच्या टप्प्यात आलोय, आणि तिथून भारत-चीन लष्करी संघर्ष चिघळत गेला. चुशुल गावाच्या परिसरात याआधी १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते. त्या युद्धात झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे जागतिक कीर्ती पसरलेल्या पं. नेहरुंच्या स्टेट्समन प्रतिमेवर झाकोळ पसरली होती. नेहरुंचेच नव्हे, देशाचे मनही खचले होते. त्या संघर्षकाळात पं. नेहरू गावाला भेट देण्यास आले होते, अशी ऐकीव माहिती आपल्याला असल्याचे काही जण सांगतात. अन्यथा, त्या युद्धाच्या आजच्या चुशुल गावात राहणाऱ्या गावकऱ्यांकडे फारशा आठवणी नाहीत.

एका अर्थाने, बहुतांश लोक युद्धसदृश परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवत होते. किंबहुना, इतक्या मोठ्या संख्येने लष्काराचे जवान चुशुल गावाने गेले कित्येक वर्षांत प्रथमच पाहिले होते. त्यांची सतर्कता, त्यांच्या सावध हालचाली, त्यांच्यात होणारी आदेश-संदेशांची देवाणघेवाण यामुळे भय, अनिश्चितता आणि अस्थिरतेचा गावकऱ्यांना सतत अनुभव येत होता. मानसिकदृष्ट्या गावातील नागरिकांमध्ये निश्चितच भांबावलेपण आले होते. मात्र, तशाही अवस्थेत प्रत्येक घरातून जास्तीत जास्त नागरिक लष्कराच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले. यात एकच दिलासादायक बाब होती, ती म्हणजे, पाकिस्तान सीमेवर जसे वारंवार शेलिंग होते, तसे इथे घडत नव्हते. परंतु, एकाबाजूला राजकीय-लष्करी पातळीवर तोडग्याची भाषा सुरु असताना भारत आणि चीनचे जवान थेट एकमेकांना भिडत असल्याने गावकऱ्यांमध्ये तणाव मात्र निश्चित होता.

चुशुलवासीयांना प्रतीक्षा साधनसुविधांची

या काळात मुख्यत्वे संभाव्य स्थलांतराचाही मुद्दा पुढे आल्याचे दिसले. आजची स्थिती पाहता भविष्यातल्या संभाव्य स्थलांतरावर मात करण्यासाठी सीमावर्ती भागात आरोग्य आणि दूरसंचार सुविधा वाढल्यात तर परिस्थिती बदलू शकते. या गावात सध्या मोबाइलची थ्री-जी सेवा उपलब्ध आहे. विजेची कमतरता आहे. येथील भटके म्हणून गणले गेलेले, शेफर्ड अर्थात, मेंढपाळ जमातीची अतिकठीण जीवनशैली आहे. याक, घोडा, मेंढ्या (पश्मिना) यावर हे मेंढपाळ अवलंबून असतात. सदर चांगथांग परिसरात एकूण ८ जमाती आहेत. त्यात चंग्पा जमात येथे बहुसंख्येने आढळते. चंग्पा मेढपाळ हा असा समूह आहे, ज्यास कसेही वातावरण असले तरी, उदरनिर्वाहासाठी वर्षाचे ३६५ दिवस घराबाहेर पडावे लागते. पण मेंढपाळ्यांच्या नव्या पिढीला या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे आहे. चांगथांग परिसरातून ७० ते ८० टक्के पश्मिना याचा कच्चा माल तयार होतो. जो जागतिक दर्जाचा असल्याची मान्यता आहे. पश्मिनाच्या लोकरीपासून तयार होणारे अंतिम उत्पादन म्हणजेच, शॉल वा तत्सम वस्तू. या वस्तू बनवण्यास बराच कालावधी अर्थात संयम लागतो आणि ही प्रक्रिया बरीच खर्चिकसुद्धा आहे. अशा वेळी झटपट मोबदला मिळण्याकडे काहींचा कल असल्यामुळे आपल्या प्रमुख उत्पादनाकडे चुशुलवासीयांचे दुर्लक्ष होताना दिसते आहे. हे ही खरेच आहे की, शॉल व इतर वस्तू बनवण्याचे कसब स्थानिकांकडे नसल्यामुळे मेहनतीचा अपेक्षित मोबदलादेखील त्यांना मिळत नाही. येथे अनोखे असे ‘रेबो’ याकच्या केसापासून करण्यात येते. त्याचा तंबूसाठी वापर करतात. थंडी व पाण्यापासून बचाव करण्यासाठी वापरले जाणारे हे ‘रेबो’ आतिशय टिकावू असते. मात्र, इतर ठिकाणी विपणन व विक्रीची व्यवस्था उभी न राहू शकल्याने स्थानिकांना त्यातून हवा तसा रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणजे, हवामानामुळे येथे उद्योगांना पोषक वातावरण मिळत नाही. त्यात जी काही थोडीफार संधी चालून येते, त्यावेळी स्थानिक कलाकौशल्यात आणि उद्योजकतेत कमी पडतात. अशा वेळी लष्कर हाच आधार उरतो, पण त्यालाही असलेल्या  मर्यादा वेळोवेळी दिसून येतात.

याचा एकूण परिणाम असा दिसतो की, चुशुल गावातली, पाच टक्के जनता ही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगताना आढळते. यावर स्थानिक असे म्हणतात, अगोदर जम्मू आणि काश्मीर या राज्याचा दर्जा असताना ही स्थिती होती, परंतु आता केंद्रशासित प्रदेश झाल्यावर पुढील ४-५ वर्षात त्यांना अपेक्षा आहेत. त्यामध्ये गावाला पुरेशी वीज मिळावी, गावात खात्रीचे आरोग्य केंद्र सुरु व्हावे, गावात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाव्यात आणि गावात पश्मिना उद्योगासाठी साधनसुविधा पुरवल्या जाव्यात इतक्या साध्या चुशुलवासीयांच्या मागण्या आहेत. भारतातल्या कोणत्याही अभावग्रस्त खेड्यातल्या नागरिकांच्या यापेक्षा वेगळ्या मागण्या नाहीत. त्या अर्थाने, चुशुल हे गाव आणि उर्वरित भारतातले खेडे अभावग्रस्ततेत एकसमान पातळीवरचा अनुभव घेत आहे.

सामूहिक उदासिनता 

१९६२ च्या युद्धात १३ कुमाऊ रेजिमेंटच्या ११४ जवानांनी मेजर शैतानसिंग यांच्या नेतृत्त्वात अतुलनीय पराक्रम केला. असाच पराक्रम अरुणाचल प्रदेश येथील वॉलाँग येथे लष्कराने केला. या दोन ठिकाणी चिनी सैन्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या लढाईत मरण पावलेल्या जवानांच्या स्मरणार्थ ‘रिझांग-ला मेमोरियल’ उभारण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती दिल्लीनजीकच्या गुडगावजवळ आहे. कारण त्यात हरियाणातील अहिर समाजातील जवानांचा समावेश होता. अरुणाचल येथे ‘जसवंतगड वॉर मेमोरियल’ आहे. तेथे मराठा बटालियनच्या शौर्याचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान तुर्कस्थानमध्ये गॅलिपोली येथे प्रचंड मोठी लढाई झाली. त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि कॅनडाचे सैनिक मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडले. तेथील स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी सदर देशांतील हजारो नागरिक तुर्कस्थानमध्ये केवळ ‘गॅलिपोली डे’च्या दिवशी दरवर्षी जातात. परंतु हा अभिवादन भाव आपल्याकडे फारसा जाणवत नाही. मुळात, हा अशाप्रकारचा आदरभाव व्यक्त होण्यासाठी केवळ भावनेची किनार असून भागत नाही, तर समाजामध्ये वस्तुनिष्ठ इतिहासाचे आकलन आणि इतिहासपुरुषांबद्दल आत्मियता असणेही आवश्यक असते. सत्तेच्या सोयीनुसार इतिहास बदलत जाण्याची परंपरा जिथे रुजत जाते, त्या समाजात गॅलिपोलीचे दृश्य दिसणे संभव आहे, का असा प्रश्न विचारणेही इथे अप्रस्तुत ठरू नये. यासंदर्भाने, चुशुल गावाबाबत असे म्हणता येईल की, भारतीय नागरिकच अशा ठिकाणी अभावाने जातात तिथे परदेशी भारतीय नागरिक (NRI) जातील, ही अपेक्षा करणे व्यर्थ ठरते.

योजनाबद्ध पर्यटनाच्या संधी

परंतु, ही परिस्थिती बदल्याचे सामर्थ्य योजनाबद्ध पर्यटनकेंद्री अमलबजावणीमध्ये आहे, यात माझ्या मनात संशय नाही. गावांची नैसर्गिक रचना पाहता, ग्रीन हाऊसला येथे चांगले भवितव्य आहे. पर्यटनाच्यादृष्टीने विचार करायवयाचा झाल्यास, होमस्टे हा चुशुलसाठी उत्तम पर्याय आहे. बॉर्डर टुरिझम, रुरल टुरिझम किंवा बॅटल फिल्ड टुरिझम हे युरोपीय देशात प्रसिद्ध पर्यटनप्रकार आहेत, त्या दृष्टीने भारतात खूप वाव आहे. पुढेमागे चुशुल हे पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय झाल्यास येथे नोमॅडिक टुरिझमदेखील करता येईल. वॉर म्युझियमदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकेल. कॅम्स, रेस्टॉरंट यांनाच जर प्रोत्साहन मिळत असेल तर ठराविक वर्गात प्रगती होईल, पण होमस्टे हा उत्तम उपाय नक्कीच ठरेल जेणेकरुन गावातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. ती सुधारली की, त्याचा सकारात्मक परिणाम चुशुलचे मानसिक-भावनिक स्थैर्य परतण्यास होईल. तेव्हा जे लोक हौसेने चुशुल गावाला भेट देतील, युद्धाच्या ढगाबरोबरच भयाचे, अस्थिरतेचे आणि आर्थिक हलाखीचे ढगही गावावरून दूर सरल्याचा सुखद अनुभव त्यांना येत राहील. पर्यायाने चुशुल गावाचे भागधेयही बदलून जाईल.

समीर देशमुख पर्यटन व्यावसायिक आहेत. तणावग्रस्त प्रदेशातले समाजसमूह हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

मुक्त संवादच्या १५ मार्च २०२१च्या अंकातून साभार.

COMMENTS