आगरकर समजून घेताना

आगरकर समजून घेताना

आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. समाजभयाने आणि दबावाने व्यक्तीचे स्थान झाकोळून जाता कामा नये, व्यक्तीच्या आशाआकांक्षा आणि इच्छा यांचा विचार केला जावा असे त्यांचे म्हणणे होते. खाजगीपणाच्या अधिकाराबद्दल (Right to Privacy) बद्दल आपण आज चर्चा करत आहोत, परंतु आगरकरांनी ती व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करताना केलेली आहे. कोणीही कोणावरही आपल्या आवडीनिवडी लादू नयेत असे त्यांचे म्हणणे होते.

सावरकरांचे चरित्रकार संपत यांच्यावर साहित्यचोरीचे आरोप
गांधीजींची धर्मभावना
जिथे पुस्तके जाळली जातात, तिथे माणसेही जाळली जातील

महाराष्ट्राला पुरोगामी का म्हणावे याचे दाखले द्यायचे झाल्यास काही नावे घेणे अपरिहार्य ठरते. मग ती नावे कदाचित खूप माहितीची नसतील, असतील तरीही त्यांचे विचार किंवा त्यांचे निश्चित योगदान लोकांना ठाऊक असेलच याची खात्री देता येत नाही. अशाच अनेक नावांपैकी एक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर.

बहुतांश वेळा आगरकरांचे व्यक्तिमत्व ‘टिळकांचे मित्र आणि नंतर झालेले शत्रू’, ‘टिळकांचे प्रतिस्पर्धी’, ‘टिळकांचे विरोधक’ या आणि अशा प्रतिमांनी झाकोळून गेलेले दिसते. सामान्य माणसांच्या चर्चाविश्वात टिळक आधी आणि मग अपरिहार्यपणे आगरकर येताना दिसतात. आगरकरांचा मृत्यूदिन नुकताच १७ जूनला होता आणि जन्मदिवस या महिन्याच्या १४ तारखेस आहे. त्यानिमित्ताने आगरकरांच्या विचारांवर प्रकाश टाकणे आणि त्या विचारांवर विचार करणे महत्त्वाचे ठरते.

आगरकरांना समजून घेताना त्यांचे आयुर्मान आणि ते कोणत्या परिस्थितीत जगले हेही लक्षात घेतले पाहिजे. आगरकरांचे अवघ्या ३९व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे एवढ्या लहान काळात निर्माण झालेला हा भव्य विचारपरीघ आहे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी साताऱ्यामधील टेंभू या गावी झाला. आगरकर ज्या काळात जन्माला आले आणि शिकले तो महाराष्ट्राच्या सुधारणा चळवळीतील सुवर्णकाळ होता, असे म्हणण्यास हरकत नाही. सामाजिक आणि राजकीय सुधारणेसाठी जे प्रयत्न होत होते त्या अंतर्गतही विविध प्रवाह होते- जसे प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज इत्यादी. यातील प्रत्येकाच्या सुधारणा आणि प्रगतीसंदर्भात वेगवेगळ्या धारणा होत्या. प्रत्येक गटाचे नेते आणि अनुयायी तो तो विचार पुढे घेऊन जात होते. त्याला विरोध करणारे आणि सनातनी गटही मोठ्या संख्येने अस्तित्वात होतेच. थोडक्यात, विचारांच्या घुसळणीचा आणि वादविवाद- वितंडाचा तो काळ होता, असे म्हणावे लागेल.  या सगळ्यामध्ये कोणत्याही विचारसरणीची कड न घेता विवेकाचा आवाज धैर्याने बुलंद करणारे आगरकर उठून दिसतात, वेगळे ठरतात.

आगरकरांचे उच्चशिक्षण पुण्यात झाले, जिथे त्यांची टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांशी घनिष्ठ मैत्री झाली. या मैत्रीचे प्रमुख कारण म्हणजे तिघेही स्वभाषा आणि स्वदेश यांचे भोक्ते होते आणि त्यासाठी कृतिशील होण्याची त्यांची तयारी होती. आगरकरांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरनिराळ्या उत्तम संधी उपलब्ध असूनही न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. यथावकाश ते ‘केसरी’चे संपादक झाले. १८८४ साली या सगळ्यांनी आपल्या इतर काही सहकाऱ्यांसमवेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. फर्ग्युसन महाविद्यालय हे या सोसायटीचेच अपत्य, जिथे सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये टिळक आणि आगरकरांनी अध्यापन केले. आगरकरांच्या आयुष्यातील शेवटची तीन वर्षे (१८९२ ते १८९५) या काळात ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

टिळकांशी वाद झडल्यानंतर आगरकरांनी ‘केसरी’मधील पदाचा राजीनामा देऊन ‘सुधारक’ हे वर्तमानपत्र सुरू केले. ‘सुधारक’चे ते शेवटपर्यंत संपादक होते.

त्याकाळातील सर्वांच्याच लेखणीला धार होती, परंतु आगरकरांच्या लेखणीत समाजाचे डोळे उघडण्यासोबतच विचारप्रवृत्त करण्याचेही सामर्थ्य होते. पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी जसा म. ज्योतिबा फुलेंना त्रास दिला तसाच आगरकरांचाही अतोनात छळ केला. पण आगरकरांची मान आणि लेखणी या विरोधाला न जुमानता नेहमीच ताठ उभी राहिली. त्यांच्याच काळातील रानडे, लोकहितवादी वगैरे मंडळींनी लोकापवादाला न भिता परंतु तरीही लोकांसोबत शक्य तेवढे जमवून घेऊन कार्य पुढे नेले. आगरकर मात्र अशा कुठल्याही दबावासमोर जराही झुकलेले दिसत नाहीत.  आगरकरांवर भारतीय तत्वचिंतनाप्रमाणेच पाश्चात्य विचारवंतांचाही मोठा पगडा होता. हर्बर्ट स्पेन्सर, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल ही त्यातील काही ठळक नावे. त्यांच्या व्यक्तिवादी-बुद्धिप्रामाण्यवादी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या विचारांना भारतीय चौकटीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी केला. वृत्तपत्र हे त्यातील प्रमुख माध्यम होय.

मिलप्रमाणेच आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. समाजभयाने आणि दबावाने व्यक्तीचे स्थान झाकोळून जाता कामा नये, व्यक्तीच्या आशाआकांक्षा आणि इच्छा यांचा विचार केला जावा असे त्यांचे म्हणणे होते. खाजगीपणाच्या अधिकाराबद्दल (Right to Privacy) बद्दल आपण आज चर्चा करत आहोत, परंतु आगरकरांनी ती व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार करताना केलेली आहे. कोणीही कोणावरही आपल्या आवडीनिवडी लादू नयेत असे त्यांचे म्हणणे होते. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर, आगरकर हे स्वतः देवधर्म-कुळाचार पाळत नसत. परंतु त्यांच्या पत्नी मात्र देवाधर्माचे सारे करत असत. कोणीतरी याबाबत आगरकरांना प्रश्न विचारला असता  त्यांनी जे उत्तर दिले त्याचा मथितार्थ असा होता- “जर मंदिरात जाणे तिला योग्य वाटत असेल तर तिने ते केले पाहिजे, तो तिचा हक्क आहे. मला ते मान्य आहे की अमान्य हा प्रश्न इथे उद्भवत नाही.’

बहुसंख्यांकांच्या मतांचा, जनमताच्या रेट्याचा व्यक्तीच्या मतावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होता कामा नये, व्यक्तीने सामाजिक जुलुमाचे बळी असता कामा नये असेही आगरकर म्हणत असत. असे झाले तर प्रगतीसाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी सुयोग्य वातावरण निर्माण होऊ शकते अशा मताचे ते होते.

त्यांच्या मते व्यक्ती आणि राज्यसंस्था यांत कायमच संघर्ष राहणे अटळ आहे. जर सत्तेचे केंद्रीकरण काही मोजक्या हातांत झाले तर उरलेल्या बाकी सगळ्यांचे शोषण होणारच. व्यक्तीपेक्षा सरकार माणसाचे जास्त नुकसान करू शकते असेही ते म्हणत. हे टाळायचे असेल तर लोकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हायला हवी. सक्षम कायदे केले जावेत.

कायद्याचं राज्य आगरकरांनी महत्त्वाचे मानले. जर शांतता आणि सौख्य हवे असे तर कायद्याचा सन्मान  केला पाहिजे. जर कायद्यात बदल हवा असेल तर तो क्रांती करून नाही, तर विचारपूर्वक टप्प्याटप्प्याने व्हायला हवा.

“डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवस’ या पुस्तकात ते म्हणतात, की मला झालेला तुरुंगवास हा कायद्याने झाला आहे, आणि मी तो मान्य करायला हवा. यासाठी त्यांनी सॉक्रेटिसचे उदाहरण दिले.  त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर- “मनुष्य सर्वज्ञ नाही त्या अर्थी त्याच्या प्रत्येक कृत्यात चूक असू शकते. अथेन्स प्रजासत्ताकात शेकडो लोकांच्या बहुमताने सॉक्रेटिसला दोषी ठरवले. पण कालांतराने सॉक्रेटिस खरा ठरून बाकीचे ५००-६०० लोक चुकले अशी लोकांची खात्री झाली. पण अशी उमज पडायला लोकांना अनेक वर्षे लागली.’

परंतु याचा अर्थ असा नव्हे की कायद्याचा जुलूम होत असल्यास तो मुकाट्याने सहन करावा. आगरकर लिहितात- “दंडाच्या, तुरुंगाच्या किंवा शिक्षेच्या भयाने कायद्याचा जुलूम वर्षानुवर्षे सहन करणे चुकीचे आहे. भेकडपणामुळे युगानुयुगे पारतंत्र्यात राहणे मनुष्यत्वास लाजिरवाणे आहे.’

आगरकरांच्या मते समाजात तीन प्रकारचे नागरिक असायला हवेत. एक गट विचार करणाऱ्यांचा, दुसरा उपभोग घेणाऱ्यांचा आणि तिसरा काम करणाऱ्यांचा. या गटांमधील अंतर जितके कमी असेल तितकी जास्त प्रगती होऊ शकेल. आगरकर म्हणत की कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीचा उद्देश हा असायला हवा. यासाठी लोकांनीही सातत्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे.

यापुढे जाऊन समाजाने विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार कसा व का करावा याबद्दल विपुल लिखाण आगरकरांनी केले आहे. मराठीजनांना जगभरातील वैज्ञानिक शोधांची ओळख करून द्यायचा त्यांचा मानस होता. त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट अंधश्रद्धांना आणि जातव्यवस्थेला कडाडून विरोध केला. जोपर्यंत जातीची बंधने शिथिल होऊन लोकांना मोकळीक मिळत नाही, तोपर्यंत आपण समाज म्हणून प्रगती करू शकणार नाही हा विचार ते सातत्याने बोलून दाखवत.

आगरकरांचा विवेकी उत्क्रांतीवाद आणि अज्ञेयवाद त्यांच्या विचारांतील प्रमुख तत्वे मानली जातात. परिवर्तन आणि बदल यावर त्यांचा विश्वास होता. “परिवर्तनाची गती आणि दिशा जाणून घेऊन त्यानुसार वर्तन करणे आवश्यक असते असे त्यांचे म्हणणे होते. उत्क्रांती एका रात्रीत होत नाही, ती एक प्रक्रिया असते. त्यासाठी समाजात अंतर्गत सुधारणा होत राहणे आवश्यक असते. यात लोकशिक्षण महत्वाचे काम करते. लोकशिक्षणाचे काम हे शैक्षणिक संस्था आणि वृत्तपत्रांसारखी माध्यमे यशस्वीरित्या करू शकतात.

यामध्ये धर्म आणि जातीव्यवस्थेत बदल आणि सुधारणा होणे आगरकरांना महत्त्वाचे वाटे हे आधी नमूद केले आहेच. त्यांनी वेद आणि शास्त्रांचा सोयीने वापर करून घेण्यासही कडाडून विरोध दर्शवला होता. धर्मावर सातत्याने प्रश्न उभे केले पाहिजेत असेही ते म्हणत. रानडेंसारख्या विचारवंतांनीही हे म्हटले, पण त्यांची भूमिका धर्मपंडितांशी आणि शास्त्रींशी जुळवून घेऊन सामंजस्याने त्यांनाही सुधारणाप्रवाहात सामील करून घ्यायची होती. आगरकरांना मात्र हे मान्य नव्हते. त्यांच्यामते शास्त्री वगैरे तत्सम मंडळी कधीही खऱ्या अर्थाने सुधारणेचे पाईक होऊ शकत नाहीत, कारण त्यांना सुधारणेसंदर्भातल्या विचारांचे प्रशिक्षण दिले तरीसुद्धा धर्मातील त्यांचे स्थान बळकटच राहते, त्यांच्या हातातील सत्तेवर अंकुश घालता येत नाही. लोकशिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियांद्वारेच सुधारणा साधता येते या मताचे आगरकर होते.

प्रत्येक गोष्टीला विवेकाच्या कसोटीवर सातत्याने घासून पाहणारे आगरकर धर्माला पूर्ण रद्दबातल न ठरवता धर्मसुधारणेचा सातत्याने विचार करत. त्यासाठी त्यांनी ‘अज्ञेयवादी’ भूमिका घेतली होती, ज्याप्रमाणे ते कुठल्याही एका देवास अथवा धर्मग्रंथास प्रमाण मानायला नकार देत. कुठल्याही धार्मिक रितीरिवाजांवर ते विश्वास ठेवत नसत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- “सध्याच्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे ते माहीत करून घेण्याच्या मागे न लागता इहलोकात लोकांचे सुखसंवर्धन करण्याचा मार्ग स्वीकारणे श्रेयस्कर आहे.”

आपल्या तत्वांचा पुरस्कार आगरकर लोकापवादाचे भय न बाळगता करत. ‘तत्वांसाठी मी गरिबी आणि तुरुंगवास भोगायलाही तयार आहे’, असेही त्यांनी म्हणून ठेवले आहे. यासाठी तत्कालीन काळातील अनेक दिग्गजांशी त्यांनी कलह ओढवून घेतले आणि त्यांच्यावर टीकाही केली. यासाठी दोन उदाहरणे देता येतील. पहिले म्हणजे संमतीवयावरून टिळकांशी झडलेला वाद. लग्नाच्या वेळेस व्यक्तीचे वय निश्चित करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कायदा करावा कि करू नये असा तो वाद होता. टिळकांचे मत होते की, सरकारने विवाहसंबंधी कायदा करणे म्हणजे अंतर्गत बाबतींत हस्तक्षेप करणे आहे. त्याउलट आगरकरांचे म्हणणे पडले की, अशा सुधारणा कायद्याद्वारेच होऊ शकतात. आज मागे वळून पाहताना या प्रश्नाला अनेकानेक बाजू आहेत असे आपल्याला वाटू शकते. पण त्याकाळी हा वाद या दोन तत्वनिष्ठ माणसांनी बराच काळ चालवला होता हे दिसून येते.

दुसरे उदाहरण न्यायमूर्ती रानडेंचे. ‘पंच हौद’ येथे ब्रिटिशांच्या समवेत चहा प्यायल्याबद्दल रानडेंसहित बाकी सुधारकांनी शंकराचार्यांची माफी मागावी असा फतवा काढला गेला होता. हे प्रकरण ‘पंचहौद टी पार्टी’ म्हणून ओळखले जाते. रानडे याप्रकरणी अखेर शंकाराचार्यांना शरण गेले. यावर आगरकरांनी आश्चर्य तर व्यक्त केलेच, शिवाय असेही म्हटले की रानडेंसारख्या सुधारकाला त्याचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी परंपरावाद्यांना शरण जावे लागले हे त्यांच्या भावी चरित्रकाराला खेदाने नमूद करावे लागेल.

आगरकरांच्या विवेकवादाला त्यावेळचा, किंबहुना आत्ताचाही समाज पूर्णतः समजून घेऊ शकला नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. गेल्या काही वर्षांत विवेकी विचारांचे ज्यापद्धतीने दमन करण्यात आले, त्यावरून हे सहज दिसून येते. आगरकरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याच विचारसरणीत नीट बसवता येत नाही. त्या काळात विवेकाच्या आणि बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर त्यांना जे योग्य वाटले, ते ते बोलत आणि लिहीत राहिले. आगरकरांसारख्या विचारवंतांचा याच कारणासाठी पंथ निर्माण होऊ शकत नाही, ते कुठल्याही गटाचे महंत होऊ शकत नाहीत. कारण प्रश्न विचारणे आणि तत्वाधिष्ठित भूमिका घेणे हे त्यांच्याच विचारांनी शिकवलेले असते, जे दुर्दैवाने फार कमी व्यक्तिंना जमते.

आगरकरांच्या मृत्यूनंतरही त्यांचा आणखी एक मृत्यू झाला. त्यांचा श्राध्दावरचा, एकूणच रितीरिवाजांवरचा अविश्वास माहित असूनही पुण्यातील सनातन्यांनी त्यांची मुद्दामहून अंत्ययात्रा काढली. आपल्या विचारांची अशी हार पाहणे त्यांना मृत्यूनंतरही चुकले नाही.

परंतु अशातही आशावादी राहण्याचे बळ आगरकरांचेच शब्द देतात. ते म्हणतात- ‘जसजसा लोकांच्या विचारांचा विकास होत जाईल तसतसे आचारांचे अनौचित्य लोकांच्या लक्षात येईल. अंतिमतः श्रद्धा आणि विवेक यांच्या संघर्षात विवेकाचा विजय होणार आहे.’

(छायाचित्र – या. दि. फडके यांनी लिहिलेल्या आगरकर या पुस्तकाचे मुखपृष्ठ)

गायत्री लेले, राज्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1