’अ‍ॅप’ले आपण!

’अ‍ॅप’ले आपण!

संगणक: क्रांती, उत्क्रांती आणि माणूस - गेल्या वीस वर्षांच्या काळात जगण्याचे वेगाने होत जाणारे संगणकीकरण, त्याचा अफाट वेग यांच्याशी जुळवून घेताना ज्येष्ठांचीच काय पण मध्यमवयीन व्यक्तींचीही दमछाक होते आहे. संगणक युगाने माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात जी उलथापालथ घडवली, तिचे अनेक बरे नि बुरे परिणाम घडू लागले आहेत. तांत्रिक जंजाळात न अडकता यांचा वेध, तो ही माहितीस्वरुप न घेता सेंद्रीय विकासाच्या स्वरुपात घेणे, हा या मालिकेचा हेतू आहे.

इंटरनेट: संस्थळांचे आगमन
इंटरनेटच्या जगात
संगणकानां सर्व्हरोऽहम्

मागच्या वर्षीच्या १२ ऑगस्टची ही बातमी आहे. मुंबईची झीनत बानो हक नावाची एक शालेय शिक्षिका काही कामानिमित्ताने बाहेर गेली गेली होती. घरी परत येत असताना आपला मोबाईल हरवल्याचं तिच्या लक्षात आलं. तो नक्की कुठं हरवला हे अर्थातच तिला आठवत नव्हते.  सामान्यपणे हे हरवणे/चोरी यावर एकच उपाय असतो आणि तो म्हणजे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा. ते ही मोबाईल महाग असेल किंवा ऑफिसच्या मालकीचा/कामाचा असेल तर ती तसदी घेतलीही जाते. एरवी मोबाईल सारखी इतकी छोटी वस्तू हरवणे ही नित्याची बाब असल्याने, त्याबाबत  पोलिसही स्वतंत्र असा तपास करणे शक्यच नसते. त्यामुळे असा हरवलेला  मोबाईल परत मिळणे जवळजवळ अशक्यच.

पण झीनतने हार मानली नाही. तिने प्रथम आपल्या दुसर्‍या मोबाईलवरून आपले गुगल अकाऊंट लॉगिन केले. दोनही मोबाईल गुगलच्याच अँड्रॉईड या सिस्टमवर चालणारे असल्याने एकाच गुगल अकाऊंटशी जोडले होते. आता या अकाऊंटवरुन ती दोनही मोबाईलवरील घडामोडी पाहू शकत होती. त्यामुळे हरवलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलवरही ती लक्ष ठेवू शकत होती. त्या दरम्यान चोराने त्या मोबाईलवरुन रेल्वेचे तिकीट बुक केले आणि ते त्या मोबाईलवर सेव्ह केले. आता ते झीनत पाहू शकत असल्याने तो कोणत्या गाडीने प्रवास करणार आहे नि त्याचा सीट नंबर कोणता आहे ते घरबसल्याच तिला माहित झाले. मग रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्या चोराला पकडून आपला मोबाईल तिने हस्तगत केला.

आज साठीत असलेल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला हा किस्सा सांगितला तर त्याला ती रचून सांगितलेली गोष्ट वाटण्याचा बराच संभव आहे. सामान्य माणसाने आपली हरवलेली वस्तू स्वत:च शोधण्याचे हे तंत्र मोबाईल युगापूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते. गेल्या वीस वर्षांच्या काळात जगण्याचे वेगाने होत जाणारे संगणकीकरण, त्याचा अफाट वेग यांच्याशी जुळवून घेताना ज्येष्ठांचीच काय पण मध्यमवयीन व्यक्तींचीही दमछाक होते आहे. वर उल्लेख केलेला घटनेतून दिसून येणारी  तंत्रज्ञानाची ताकद सहजपणे वापरणार्‍या झीनतच्या तरुण पिढीच्या आयुष्याचा मोबाईल हा अक्षरश: अविभाज्य भाग झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी हातात मोबाईल नसलेला तरुण वा तरुणी अपवादानेच दिसते. या पिढीतील तरुण-तरुणींना  फुटलेला हा तिसरा हात आहे असे गंमतीने म्हटले जाऊ लागले आहे.

याच्या नावात फोन असले तरी त्याचा वापर केवळ कॉल करणे किंवा मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.  या हातभर लांबीच्या यंत्राच्या अंगी इतक्या नाना कळा आहेत की सर्वसामान्यांच्या आयुष्यातून संगणक वा त्याची सहज ने-आण करता येण्याजोगी आवृत्ती म्हणजे लॅपटॉप यांना जवळजवळ हद्दपार केले आहे असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या लहानशा सहाय्यकाने माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक कामे आपल्या शिरावर घेतली आहेत.  सेवा क्षेत्रातील विविध सेवादात्यांनी त्यांच्या अ‍ॅप्समार्फत ग्राहकांशी व्यवहार सुरू करून त्याला देवाण-घेवाणीचे साधन म्हणून वापरण्यास सुरुवात केली. यात मुख्यत: बॅंका, टेलेकॉम कंपन्या, वीज कंपन्या, शेअर बाजार आणि म्युचुअल फंडासारख्या गुंतवणूक कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, त्याचप्रमाणे ऑनलाईन वस्तू-विक्री करणार्‍या कंपन्या आणि अर्थातच इन्टरनेट सर्विस देणार्‍या कंपन्या यांनी मोबाईलवरील आपापल्या अ‍ॅप्स मार्फत सेवा आणि आर्थिक देवाण-घेवाण करणे सुरू केले  होते. किंबहुना म्हणूनच याला निव्वळ फोन असे नाव मिळता ’स्मार्टफोन’ असे म्हटले जाते.

संगणकावरील अ‍ॅप्लिकेशन्स पेक्षा स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सची व्याप्ती बरीच लहान असल्याने आणि ते तयार करण्यासाठी अनेक सोपे टूल्स उपलब्ध झाल्याने संगणकाच्या प्रोग्रमिंग बाबत बर्‍यापैकी  माहिती असलेले अनेक जण इतर कुणाच्याही मदतीशिवाय अ‍ॅप्स बनवू लागले. त्यासाठी एकाहुन अधिक जणांच्या ग्रुपने अथवा कंपनीनेच ती जबाबदारी घ्यायला हवी अशी गरज उरली नाही. याशिवाय संगणकावर उपलब्ध असलेल्या अनेक ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असलेल्या कोडचा आणि लॉजिकचा वापर करून त्यांना एखादा चांगल्यापैकी प्रोग्रामर त्याचे अ‍ॅप बनवू लागला. यामुळे अ‍ॅप्सची उलाढाल प्रचंड वाढली. निव्वळ रोजच्या किमान गरजांशी संबंधित सेवाच नव्हे तर त्या पलीकडच्या विशेष सेवांच्या क्षेत्रातही अ‍ॅप्स तयार करणार्‍यांनी मुसंडी मारली. गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअर यांच्यासारख्या अ‍ॅप्सच्या ऑनलाईन ’एक-खिडकी योजनां’मुळे छोट्या उत्पादकांना आपण बनवलेले अ‍ॅप्स सहजपणॆ ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देता येऊ लागले. ते विकण्यासाठी वा ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रथितयश माध्यमांतून  महागड्या जाहिराती देण्याची गरज उरली नाही. इतकेच नव्हे त्यात जाहिराती समाविष्ट करुन त्यांच्या मार्फत उत्पन्न मिळवणे शक्य झाल्याने प्रत्यक्ष अ‍ॅपसाठी कोणतीही किंमत न लावता ते ग्राहकांसाठी फुकटदेखील उपलब्ध करून देता येऊ लागले. काही जणांनी संगणकावरील ओपन-सोर्स किंवा फुकट अ‍ॅप्लिकेशनचे मॉडेल वापरुन, अ‍ॅपचा किमान काम करणारा अवतार – जो बहुसंख्येसाठी पुरेसा असतो – फुकट तर त्यावरील सर्विस किंवा अधिक फीचर्ससह अद्ययावत केलेले अ‍ॅप किंमत लावून विकणे सुरू केले.

तुम्ही विकसित केले अ‍ॅप सामान्यांना उपयुक्त असेल, वापरण्यास सोपे असेल आणि ते मोफत वा माफक किंमतीत उपलब्ध असेल तर त्यांचा वापर अनेक वापरकर्ते सहज करु लागले. मोठ्या कंपन्यांच्या आर्थिक ताकदीमुळे प्रसार माध्यमे नि वितरण माध्यमे यांच्यावर असलेल्या प्रभुत्वाला झुगारुन, निव्वळ गुणवत्तेच्या आधारे या मार्गे, या एका क्षेत्रात सामान्य माणूसही बस्तान बसवू शकतो. ओपन सोर्स प्रणालींनी ज्याप्रमाणे संगणकप्रणाली आणि त्यावरील सॉफ्टवेअर्सवरील बलाढ्य कंपन्यांच्या वर्चस्वाला शह देऊन सामान्यांसाठी संगणक वापर स्वस्त केला, तसेच अशा सामान्यांसाठी सामान्यांनी विकसित केलेल्या अ‍ॅप्सनी स्मार्टफोनच्या क्षेत्रात तरी मोठ्या कंपन्यांच्या नफेखोरीला वाव शिल्लक ठेवलेला नाही.

हा  स्मार्टफोन ज्या डिजिटल युगाचे सर्वात तरुण अपत्य आहे त्या युगाची सुरुवात कम्प्युटर ऊर्फ संगणकाने झाली.  या युगाने मानवोपयोगी अशा अनेक मशीन्सना अथवा उपकरणांना जन्म दिला. संगणकाची प्रगती होत असतानाच त्याच्या मदतीसाठी प्रिंटर, फोटोकॉपी मशीन, डिजिटल कॅमेरा, बायोमेट्रिक (अंगठा वा डोळ्याचा रेटिना स्कॅन करून) अटेन्डन्स अथवा सिक्युरिटी यंत्रे  यासारख्या सहाय्यकांचा जन्म झाला. संगणक क्रांती अनेक वाटांनी पुढे जाऊ लागली.  याला सर्वात मोठा आधार मिळाला तो इंटरनेट’च्या शोधाने.  आर्थिक व्यवहार, घराची आणि प्रियजनांची सुरक्षितता, वस्तू तसेच सेवांची खरेदी वा विक्री,  विविध स्वरुपातील माहितीची देवाणघेवाण, भौगोलिकदृष्ट्या अनेक कि.मी. वर असलेल्या व्यक्तींमध्ये कामाचे शेअरिंग अशा अनेक शक्यता, अनेक सोयी या नव्या जगाने निर्माण केल्या.

भारतापुरता विचार केला, तर ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर संगणकाने देशात पाऊल टाकले. अंदाजे तीन दशकांत आज संगणक आणि संगणक-प्रणालींच्या आधारे चालणारी उपकरणॆ यांनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण ताबा घेतला आहे. काही कारणाने संगणक, त्यांचे जाळॆ नि इंटरनेट संपूर्ण बंद झाले तर किमान गरजा भागवण्यापलिकडे माणूस पूर्णपणे गतिरुद्ध होऊन बसेल इतके आज आपण त्यावर अवलंबून आहोत. बाजारात चलन नसेल तर काय होईल?’ हा विचार जितका भयावह वाटतो तितकाच हा संगणक-विरहित जगणे हा ही.  देशांत प्रथम संगणक आणण्याचे धोरण आखले गेले त्यावेळी ’त्याने बेरोजगारी वाढेल’ असा कांगावा करत बैलगाडी मोर्चा घेऊन जाणार्‍यांच्या पुढच्या पिढीने निमूटपणे डिजिटल इंडिया’चा झेंडा खांद्यावर घेतला आहे. याला काव्यगत न्याय म्हणावे लागेल.

डॉ. मंदार काळे, सामाजिक-राजकीय विश्लेषक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: