मुंबई : मुंबई मेट्रो शेड योजनेसाठी शहरातील आरे कॉलनी लगतच्या जंगलतोडीविरोधात स्थानिक नागरिकांनी पुकारलेले आंदोलन चिघळले असून माजी केंद्रीय पर्यावरणमंत
मुंबई : मुंबई मेट्रो शेड योजनेसाठी शहरातील आरे कॉलनी लगतच्या जंगलतोडीविरोधात स्थानिक नागरिकांनी पुकारलेले आंदोलन चिघळले असून माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने हा विषय राजकारणाकडे झुकू लागला आहे.
सोमवारी जयराम रमेश यांनी एक ट्विट केले असून यात त्यांनी, मुंबईकरांनी आरे कॉलनीतल्या जंगलतोडीच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे विधान केले आहे. या भागात मी वाढलो असल्याने मुंबईचे फुफ्फुस जपण्यासाठी मेट्रो कारशेड दुसरीकडे हटवावे अशी विनंती मुंबई मेट्रो-३, मुंबई महापालिका व देवेंद्र फडणवीस यांना माझी आहे असे त्यांनी म्हटले आहेत. रमेश यांनी ट्विटरवर आरे कॉलनी जंगल वाचवा या नावाने सुरू असलेला #SaveAareyForest हा हॅशटॅगही वापरला आहे.
गेल्या गुरुवारी २९ ऑगस्टला मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी आरे कॉलनीतील २,७०२ झाडे कापण्यास परवानगी दिल्यानंतर आरे कॉलनी वसाहतीतील नागरिक रस्त्यावर येऊन या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करत आहे. रविवारी ‘सेव्ह आरे’ अशी मोहीम सुरू करून अनेक पर्यावरण संस्था व पर्यावरणप्रेमींनी मेट्रोचे जिथे काम सुरू आहे तिथे सुमारे दीडहजार नागरिकांनी साखळी करून निदर्शने केली. या निदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पावसातही नागरिक निदर्शने करत होते. लहानमुलांपासून तरुण, मध्यमवयीन व वृद्ध स्त्रीपुरुष या निदर्शनात आपणहून सामील झाले होते.
गेल्या आठवड्यात पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक वादळी झाली. या बैठकीत तज्ज्ञांच्या मंजुरीनुसार वृक्ष कापण्यास परवानगी दिली. पण डॉ. शशिरेका सुरेश कुमार व डॉ. चंद्रकांत साळुंखे या दोन तज्ज्ञांनी सरकारने आम्हाला अंधारात ठेवून वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला असा आरोप केला. या समितीचा निर्णयच अनेकांना धक्का देणारा होता. त्यावर गदारोळ झाला नंतर या दोघांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामाही दिला.
सुरेश कुमार यांनी आपल्या राजीनामा पत्रात वृक्ष प्राधिकरणने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही व हा निर्णय गडबडीत घेतला जात आहे असे म्हटल्याने हे प्रकरण अधिकच संशयास्पद झाले. नंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करून वृक्ष प्राधिकरण समितीच्या निर्णयावर टीका केली. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आम्ही सर्वजण Sustainable Development म्हणजे शाश्वत विकासाच्या बाजूने आहोत. जेव्हा पर्यावरण वाचवण्याचा पर्याय असेल आणि विशेषतः असा शहरातला झाडांनी भरलेला परिसर जिथे बिबटे आणि इतर प्राणी मुक्तपणे संचार करतात, सरकारनं त्याचं रक्षण करायला हवं. दुसरे पर्याय नाहीत असं नाही, पण हा हट्टीपणा झाला.’
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाच या विषयावर चुकीची माहिती दिली जात असल्याचाही आरोप केला आहे. मेट्रोची कल्पना चांगली आहे. तिचा उपयोग लाखो प्रवाशांना होणार आहे पण मुंबईत ज्या भागात हिरवाई, जंगल आहे ते कापण्याची योजना असेल तर भविष्यातील पिढी या शहरावर प्रेम करणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
आरे जंगलात मेट्रो कारशेड ठेवण्यापेक्षा कांजूरमार्ग भागात हा प्रकल्प नेल्यास पर्यावरणाचे नुकसान कमी होईल असे काही विरोधकांचे म्हणणे आहे. पण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने, जेवढी वृक्षतोड होईल त्याच्या तीनपट वृक्षांचे रोपण अन्य भागात लावण्यात येण्याने पर्यावरणाचे संरक्षणच होईल असे मत व्यक्त केले आहे
मूळ बातमी.
COMMENTS