मुंबईतील आरे येथे मेट्रो शेडसाठी शनिवार रात्री झाडे कापण्यास सुरवात केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मुंबई महापालिका, राज्य सरकार व मेट्रो कॉर्पोरेशनवर हजारो नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. नेटिझन्समध्ये जसे पर्यावरणवादी होते तसे,साहित्यित, कलावंत, पत्रकार, उद्योजक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकही होते. हा रोष केवळ मुंबईतून दिसला नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सरकारच्या दडपशाहीविरोधात व वृक्ष कत्तलीवर तो दिसून आला. या सर्वांच्या संतापाच्या काही मोजक्या प्रतिक्रिया.
पत्रकार निखिल वागळे यांनी म्हंटले आहे, “झाडांची कत्तल करणाऱ्यांना मतं न देण्याचा निर्धार आपण करणार आहोत काय? नाहीतर या कत्तलीला आपणही जबाबदार ठरू! आज झाडांची कत्तल करणारे उद्या माणसांचीही कत्तल करु शकतात. मुख्यमंत्री फडणवीस, पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत!”
पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सोशल मिडीयावर वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, “मनमोहनसिंहांच्या काळात पश्चिम घाट वाचला पाहिजे असा आग्रह धरणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता आरे होत असतांना वडनगरच्या कोणत्या बिळात लपून बसला आहे? आत्ता जयराम रमेश केंद्रीय पर्यावरणमंत्री असते, तर मेट्रोचे प्रमुख अधिकारी गजाआड दिसले असते. फौजदारी गुन्हे दाखल केले असते.” ते म्हणतात, “संसद, सरकार आणि न्यायालयं यांना राज्यघटना नियंत्रित करते. तिन्ही संस्था राज्यघटनेला बांधील आहेत. राज्यघटना सांगते, विकास की पर्यावरण असा पेच असेल तर पर्यावरण रक्षणाला प्राधान्य आहे. हवा, पाणी, टेकड्या, झाडं यांचं रक्षण ही सरकारची आणि पर्यायानं न्यायालयाची घटनादत्त जबाबदारी आहे.
सरकार म्हणजे सत्ता लोलूपता आणि स्वार्थ. सरकारकडून माझी अशीच अपेक्षा आहे. दुसरं ते काय करणार? सामान्य नागरिक म्हणून माझी न्यायालयाकडून अपेक्षा होती. माननीय न्यायालय किमान ‘तिकडे जाण्याची मुदत संपेपर्यंत झाडांना हात लावू नका’ असे स्पष्ट आदेश देईल अशी अपेक्षा. पुन्हा सांगतो, विकास की पर्यावरण असा पेच आला तर पर्यावरणाला झुकते माप द्यावे हाच राज्यघटनेचा आदेश आहे. संसदेला, सरकारला आणि न्यायालयाला सुद्धा.”
अर्थतज्ज्ञ प्रा. संजीव चांदोरकर म्हणतात, ऎशीच्या दशकांपासून जे काही घडत होते, घडत आहे त्याचे अर्थ कानफटात मारल्यासारखे समजू लागले आहेत. सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय, जंगल, जमीन, पाणी, आत्मसमानाच्या प्रश्नांवर झालेली आंदोलने, मोर्चे पावसाळ्यात केलेलं ट्रेकिंग, ओल्या मातीचे भरभरून घेतललले श्वास, कालच जन्मलेल्या कोवळ्या पानांना केलेले स्पर्श, पक्षांचे आवाज एकत्र गायलेली गाणी, रात्र रात्र तत्वज्ञान, एखादीच कविता, एखादे नाटक, एखादा सिनेमा यावर तावातावाने केलेल्या चर्चा आणि त्याचे लावलेले अर्थ आपल्या आवडत्या मुलावर व मुलीवर, सगळ्या जगाला फाट्यावर मारून, केलेले जीवघेणे प्रेम आणि मानवी जीवनावर आससून प्रेम करणारे काहीही यापैकी कशाकशाचे पुसटसे देखील पाणी न लागलेली पिढी मोठी झाल्यावर ज्यावेळी मंत्रालय व नगरपालिका व इतर सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी बनतात डॉक्टर, वकील, न्यायपालिका अधिकारी बनतात पोलीस, लष्कर, इतर कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे अधिकारी बनतात किंवा बँका, विमा, स्टॉक मार्केट्स, कारखाने, मार्केटिंग, जाहिराती, मीडिया वा तत्सम क्षेत्रातील फक्त करियर एके करियर करणारे, पैसे कमवण्याचे मशीन बनलेले प्रोफेशनल्स बनतात, त्यावेळी ते सर्व आतून किती कोरडे असू शकतात !
मानवी हक्क कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी सुशांत देवरुखकर यांचे ‘आरे, हे जंगल नाही’ असे व्यंगचित्र शेअर केले असून, आरे मधील वृक्षांचे अस्तित्व निकालात आणि पर्यावरणाची हार, असल्याचे म्हंटले आहे.
आरे संवर्धन पेजवर (Aarey Conservation Group) म्हंटले आहे.
काल रात्री पासून जवळपास 1000 झाडं भुईसपाट केली गेलीत !त्यासाठी अत्याधुनिक मशीन आणि राक्षसी पोलीस फाटा मागवण्यात आला !
सुप्रीम कोर्टात केस जाई पर्यंत एक झाड शिल्लक राहणार नाही !
कसलं न्यायाचं राज्य ?
…………
स्वप्नील राऊत
ह्युस्टन (टेक्सास) हुन तलसा (ओकलाहामा) येथे जायला मी निघालो होतो. ह्युस्टन एअर पोर्टला मला ड्राइव्ह करताना सौ. विजू भडकमकर म्हणाल्या, ” या इथे आणखी एक विमानतळ करायचं चाललं होतं. ”
“मग का नाही झाला इथे विमानतळ ? ” मी विरक्तपणे विचारलं..
“इथे केवढी झाडं आहेत पाहिलत ना ? पक्ष्यांचा एक फार मोठा थवा स्थलांतर करताना दरवर्षी पंधरा दिवस या झाडांवर विसावा घेतो आणि मग पुढे जातो. अगदी नेमाने. विमानतळ करायचं तर हे जंगल तोडावं लागेल. मग ते पक्षी कुठे जातील? म्हणून विमानतळाची योजनाच रद्द करण्यात आली. ”
माझे डोळे पाणावले. अरे, आपल्या देशातील पक्ष्यांची जे इतकी काळजी घेतात ते माणसांची किती काळजी घेत असतील? मी तर किडामुंगी आणि माणूस यात फरक न करणाऱ्या देशातून आलो होतो. ‘ तीन मजूर ठार ‘ ही बातमी पेपरात कुठेतरी आतल्या पानावर येण्याइतकी आम्ही किरकोळ व बिनमहत्वाची मानतो. आपल्याकडे मानवी जीवन कवडीमोलाचे. त्यांच्याकडे माणूस सगळ्यात महत्त्वाचा. तो केंद्रबिंदू. त्याच्याभोवती सगळं फिरणार…
– शिरीष कणेकर (डॉलरच्या देशा)
…….
भाऊसाहेब आजबे
शांततापूर्ण मार्गाने एकत्र येऊन विरोध करण्याचा मुलभुत अधिकार घटनेच्या कलम 19 ने दिला आहे .’आरे’च्या परिसरात मात्र झाडांच्या कत्तलीबरोबर या मुलभुत हक्काचीही कत्तल होत आहे !
…….
राजीव वाघमारे
…सर्वांगावर चरे ओढणाऱ्या कर्कश आवाजानं भवतालची झाडं दचकली…भुईचा आधार अगदीच अपुरा असल्याचं त्यांना जाणवलं – पण पळून जाणं झाडांना शक्य नसतं.
छेदल्या जाणाऱ्या वृक्षाची आर्त विव्हळ यांत्रिक करवतीच्या कर्कशतेमध्ये गुदमरून गेली. अजूनहि त्याच्या पानांवर सोनेरी उन्हाचा वर्ख चमचमत होता. फुलं हसत होती. हिरवी आत्ममुग्ध कच्ची फळं पुरेशी टपोरली होती आणि सूक्ष्मपणे पिवळ्या-लाल छटांनी रंगत होती. झाडाला मात्र आतल्या आत आपला मृत्यू क्षणाक्षणानं अधिकाधिक जाणवत होता.
…झाड अखेर भुईसपाट झालं. शुन्याभोवती अनेक शुन्यांनी फेर धरावा, तशी वर्षानुवर्षांच्या आवर्तनांच्या खुणा सांगणारी गडदफिक्की मंडलं उन्हात सुकवत, हातभर भोंडा बुंधा थडग्यासारखं उभा आहे. त्या खुणा उन्हात जळून जातील, पुसट होत जातील, आणि कीडामुंग्यांनी पोखरलेला तो बुंधा मातीत विरून जाईल… सूर्याचं स्वप्न पाहणारं, आभाळाचं विश्व कवेत घेऊ बघणारं झाड भुईसपाट झालं.
आम्ही सजीव झाडं नव्हतोच; आम्ही संपत्तीची केवळ साधनं होतो. व्यवहाराची सोय एवढंच आमचं प्रयोजन. असं एक झाड सोयीनुसार छाटणारे हात – ते हात तर परकेच होते; आपल्या सवंगड्यांची सहवेदना आमच्या अंतरी तरी कितपत होती?
मी आपणहून उन्मळून पडलो…हा सूड मी कुणावर उगवला होता? ह्या निष्क्रिय, निगरगट्ट, संवेदनाहीन बोथट समुहावर? की त्या समुहापैकीच एक असलेल्या स्वतःवर?
उन्मळून पडता पडता एक विचार माझ्या मनात तरळून गेला –
उन्मळून पडायचंच तर शस्त्र चालवणाऱ्याच्या अंगावर का नाही उन्मळून पडलो?
(गर्दीतलं झाड (अंशतः) / पूर्वप्रसिध्दी: निसर्गसेवकचा अभिजात, दिवाळी २००४)
…….
असिफ अमीन बागवान
होय माय लॉर्ड, आम्ही डेव्हिडच!
बायबल मधली डेव्हिड आणो गोलिएथ ची गोष्ट साऱ्यांनाच माहीत असेल. ख्रिस्तपूर्व 11व्या शतकाच्या सुमारास इस्रायल आणि फिलिस्तान यांच्यात घनघोर युद्ध सुरू होत. इस्रायल चा राजा सौल आणि सेना फिलिस्तानशी झुंज देत असतानाच फिलिस्तानचा वीर योद्धा गोलिएथ रणांगणात उभा ठाकतो. नऊ फूट उंच धिप्पाड गोलिएथला पाहूनच इस्रायली सैन्य आणि राजा गाभ्याभोत होतात. तो दिसेल त्या इस्रायली सैनिकाला मारून टाकतो आणि इस्रायली राजा ला आपल्याशी द्वंद्व करण्याचं आव्हान देतो. सौल हादरतो आणि काग हटतो. त्याचवेळी डेव्हिड नावाचा मेंढपाळाचा मुलगा येतो व गोलिएथ शी लढण्याची इच्छा व्यक्त करतो. राजाने देऊ केलेलं चिलखत नाकारून डेव्हिड हातातील गोफण आणि सहा सात मोठे दगड घेऊन मैदानात उतरतो आणि गोफणीच्या मदतीने गोलिएथ वर दगडाचा मारा करतो. त्यातला एक दगड त्या अजस्त्र योध्याच्या डोक्यात बसतो आणि तो जमिनीवर कोसळतो. इस्रायली सैन्यासाठी तो विजयाचा क्षण ठरतो..
गेली अनेक वर्षे ही कथा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या वर्णनासह ऐकली. पण प्रत्येक कहाणीत डेव्हिड ने गोफणीच्या मदतीने गोलॉइथ चा खात्मा केल्याचं आहे. या गोष्टीची आता आठवण होण्याचं कारण म्हणजे शुक्रवारी आरे च्या वृक्षतोडीला परवानगी देताना उच्च न्यायालयाने पर्यावरणवाद्यांची देवीडशी केलेली तुलना.
औद्योगिकीकरण नावाच्या गोलिएथ शी लढणारे तुम्ही सारे डेव्हिड आहात. ज्याच्याकडे साहस आणि विश्वास आहे पण त्यांची नौका दिशाहीन आहे, अस कोर्टाने म्हटलं. बरोबरच आहे कोर्टाच. आज सर्वसामान्य जनता डेव्हिड बनलीय आणि सरकार, उद्योगपती, कारखानदार, झुंडप्रमुख यासारख्या गोलिएथ्यांसमोर आम्ही सगळे डेविड च आहोत. या गोलिएथचो तोंड तरी किती? रावणालाही लाजवतील इतक्या तोंडांच्या या गोलिएथपैकी किती टाळकी फोडणार आम्ही डेविड? बर आमच्याकडे तशी गोफण तरी हवी न? वाटलं निसर्गाचा नाश करण्याच्या इर्षेनेच पेटून उठलेल्या या गोलिएथ चा कपाळमोक्ष करण्यासाठी मा. उच्च न्यायालय आमची गोफण बनेल. खर तर प्रस्थापित गोलीएथकडून कोणत्याही प्रश्नावर सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अनेकदा होतो. अशा वेळी न्यायव्यवस्था ही त्याच चिलखत बनेल अशी त्याची खात्री असते. त्या विश्वासपोटी तो न्यायालयाच्या पायऱ्या चढतो. पण दुर्दैवाने अनेकदा तो अपयशी ठरतो. कारण न्यायव्यवस्था पुरावे आणि दस्तावेज यांच्यावर फैसला घेत असते. कायद्याचं तत्व तेच असत. जेव्हा सारी सरकारी यंत्रणाच तुमच्याविरोधात उभी ठाकते तेव्हा असे पुरावे उपलब्ध होणं कठीणच. आरे च्या बाबतीत हेच घडलं. आरे हे जंगल नाही हे सांगण्यासाठी सरकारी पक्षाने सादर केलेली जमिनीची कागदपत्रे 100 वर्षे जुन्या झाडांपेक्षाही उंच ठरली. मागे नवी मुंबईतील एक पाणथळ जमीन केवळ सरकारी नोंदीत शेतजमीन असल्यानं त्याच सरंक्षण हटवण्यात आलं.आरेचही तेच झालं. आता अजून बुलेट ट्रेन साठीच्या पर्यावरण नाशाचा मुद्दा आहेच. पण डेव्हिड ला तेही झेपेल का, याबाबत शंका आहे. त्यामुळे मायलॉर्ड तुमचं बरोबर आहे, “greens have failed” कारण या डेविडकडे साहस आणि विश्वास आहे, पण गोफण नाही!
……
मिलिंद धुमाळे यांनी कविता लिहिली आहे.
झाडं बोलत नाहीत
झाडं भांडत नाहीत
झाडं काही मागतही नाहीत
झाडांनी तक्रार देखील कधी केली नाही
झाडांना उमेदवारी नको
झाडांना लाखोंचे सूटही नकोत
झाडं सेल्फ्या काढत नाहीत
झाडांना खोटं बोलता येत नाही
झाडांना फसवणूक जमत नाही
झाडं निवडणूकाही लढवत नाहीत
झाडांनी दिली असती भरमसाठ आश्वासने
अच्छेदिनची बुलेट/मेट्रोट्रेनची
झाडं करत नाहीत जातीय दंगे
झाडं करत नाहीत मॉब लिंचिंग
झाडांनी लावली असती ओपन जीम
झाडांनी तापवला असता भाषिक प्रश्न
झाडांनी तापवला असता सीमा प्रश्न
झाडांनी आणला असता दाऊदला फरफटत
झाडांनी दिली असती घोषणा उठाव लुंगी बजाव पुंगी
झाडंही म्हणाली असती केम छो आरे?
झाडंही म्हणाली असती मंदिर वही बनाऐंगे
झाडं यातलं काहीच करत नाहीत
कारण…
झाडं बोलत नाहीत
झाडं भांडत नाहीत
झाडं काही मागतही नाहीत
झाडांनी तक्रार देखील कधी केली नाही
झाडं फक्त जगवतात मला तुम्हाला
आपणा सर्वांना
झाडं कत्तल झाली तरी रडत नाहीत
मोर्चा काढत नाहीत
झाडं पोलिसात जात नाहीत
झाडं कोर्टातही जात नाहीत
झाडं उपोषण करून ब्लॅकमेल सुद्धा करत नाहीत
पानं सळसळून हसतात की रडतात कळत नाही
पण त्यातही गारवा देतात
झाडांना मरण नसतं
कारण..
ती कुठेतरी कशाततरी दडून बसतात
घराचा आधार
आधाराला काठी बनतात
मुकी बिचारी मेल्यानंतरही काहीतरी देवूनच जातात
माणूस साला कृतघ्न
झाडाशिवाय जगू शकत नाही
अन झाडाशिवाय अंत्यविधीही करू शकत नाही
झाडं बोलत नाहीत
झाडं भांडत नाहीत
झाडं काही मागतही नाहीत
झाडांनी तक्रार देखील कधी केली नाही
…………..
हृषीकेश रांगणेकर
एक झाड कापलं जातं तेव्हा
झाडाच्या मुळातून एखाद्या ज्वाळेसारखा वरवर चढणारा जीवनरस थिजून जातो एका खटक्यात.
घरघर आवाज करत यंत्राचं पातं लगट करत भिडतं बुंध्याला तेव्हा गदगदतं, गलबलतं आणि वेदनेने तडफडत आक्रोश करतं झाड झाडांच्या भाषेत.
इतर झाडं सांत्वन करतात आणि नंतर RIP म्हणतात त्यांच्या भाषेत.
कसलेला शाक-कसाई जेव्हा निर्दयपणे शेजारच्या झाडावर चाल करुन जातो तेव्हा आधीच्या झाडाचा सगळा प्राण गेलेला नसतो. आवाज मात्र क्षीण झालेला असतो. अर्धमिटल्या डोळ्यांनी ते पाहत राहतं आपल्या सख्या शेजाऱ्यांचं मरण.
मरता मरता त्याच्या डोळ्यासमोरून जातो अक्खा जीवनपट गप्पा आणि मस्तीचा. आपल्यावर कोण कोण येऊन गेले त्या सर्वांच्या वस्तीचा.
फांद्यांच्या वरच्या टोकांना, जिकडं वाढत जाणारी पालवी असते तिला बऱ्याच वेळाने समजतं की आपण सुकून गळणार नाही आहोत तर भुकेने मरणार आहोत ते. ती पालवीही हतबल आसवे गाळते.
आपल्याला वाटत असतं की मुळापासून विलग केलं झाड की मेलं! पण तसं नसतं. झाड मरणं ही एक प्रोसेस, एक प्रक्रिया असते. टप्प्याटप्प्याने, वेळ घेत, आक्रोश करत मरत राहतं झाड, एकेक फांद्याफुलंपानाने. तिळतीळ मरतं झाड टाचा घासत.
एका खऱ्याखुऱ्या साधुप्रमाणे उभ्याने तप करत असलेलं झाड जेव्हा आपल्याला फळ देतं तेव्हा त्याला सगळ्यात जास्त आनंद होत असतो. सावली देताना होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त! झाड मरताना त्या आनंदाची आठवण त्याला होतेच होते.
एक झाड मरतं तेव्हा त्या झाडावरची एकशे बारा पक्ष्यांची कुटुंबे बेघर होतात. पन्नासेक पिले अनाथ होतात.
झाडाच्या बुंध्याफांद्यांवर खेळणाऱ्या डझनभर खारी वेडसर वागू लागतात त्यांच्या त्यांच्या आयुष्यभरासाठी.
त्या झाडाच्या आश्रयाला अवचित येणारे फिरते पक्षी खिन्न होऊन दुसरा आसरा शोधू लागतात.
झाडाच्या खुनाचा गुन्हा कुणी नोंदवून घेत नसला आणि त्यांच्या मृत्यूचीही नोंद जन्म-मृत्यू कार्यालयात होत नसली तरी त्याच्या त्वचेच्या पापुद्र्याखाली लगबग करणाऱ्या मुंग्यांचं आणि इकडेतिकडे करणाऱ्या छोट्या छोट्या किड्यांचं काय होतं ते काही माहीत नाही ब्वा.
.
COMMENTS