हा केवळ चार भिंतीतला लेखक नाही तर प्रसंगी रस्त्यावर येवून इतरांसोबत आपली मूठ आवळून अन्याय्य व्यवस्थेविरूध्द आपल्या स्वर बुलंद करणारा कृतीशील प्रतिभावंत आहे हे पाहून, 'अरे आपणही तर ह्याच कूळीचे' म्हणून गिरीश कर्नाडांबद्दल 'नाळ'बद्ध आस्था वाटायला लागली.
ऐंशीच्या काळात वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी ‘शिशा हो या दिल हो आखीर टूट जाता है’, म्हणत रीना रायच्या चॉकलेटी अदाकारीने जसं मन मोहून गेलं होतं, तसंच आंधळ्या माला(रामेश्वरी)चा मित्र दीपक देवांची खेळणी विकणारा काहीसा नास्तिक वाटावा असा गिरीश कर्नाडही त्याच्या सहज अभिनयाने विशेष लक्षात राहिला. त्या चित्रपटाच्या भव्यतेत ह्या सामान्य दिसणाऱ्या चेहऱ्यात असं खास काही तरी असलंच पाहिजे ज्यामुळे तो चेहरा लक्षात राहिला. पुढे साहित्य क्षेत्रातील वाचन भटकंतीत ह्या व्यक्तिमत्त्वाचं महात्म्य गवसत गेलं. हा केवळ चार भिंतीतला लेखक नाही तर प्रसंगी रस्त्यावर येवून इतरांसोबत आपली मूठ आवळून अन्याय्य व्यवस्थेविरूध्द आपल्या स्वर बुलंद करणारा कृतीशील प्रतिभावंत आहे हे पाहून, ‘अरे आपणही तर ह्याच कूळीचे’ म्हणून गिरीश कर्नाडांबद्दल ‘नाळ’बद्ध आस्था वाटायला लागली.
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘माथेरान’ मध्ये १९मे१९३८ मध्ये गिरीश कर्नाडांचा जन्म झाला. त्यांची मातृभाषा कोंकणी. १९५८ मध्ये धारवाड़ मधून कर्नाटक विश्वविद्यालयातून पदवी मिळवून, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लिंकॉन व मॅगडेलन महाविद्यालयांतून त्यांनी अर्थशास्त्र, राजनीति आणि तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिकागोमध्ये त्यांनी काळ व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणूनही काम केले. इंग्रजी भाषेत लेखन करून अंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्याची सहज संधी असतांना त्यांनी लेखनासाठी कन्नड भाषा निवडली. प्रादेशिक भाषेत लेखन करूनही राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठसठशीत मुद्रा उमटविणाऱ्या प्रतिभावंतांत गिरीश कर्नाड अव्वल ठरले.
१९६०-७० दशकात कन्नड साहित्य प्रांत पाश्चात्य साहित्य प्रवाहांनी भारलेला असताना गिरीश कर्नाडांच्या प्रतिभेला येथील पौराणिक कथांना वर्तमान संदर्भ जोडत भारतीय जनमानसाच्या भावभावनांना अभिव्यक्त करावेसे वाटले. १९६१ मध्ये त्यांच्या ‘ययाती’ या नाटकाने त्याच्या लेखन प्रवासाला प्रारंभ झाला. १९६४ मध्ये आलेल्या ‘तुघलक’ या नाटकाने त्यांच्या लेखन सामर्थ्याकडे जाणकारांचे लक्ष वेधले गेले. मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासातील आपल्या अफलातून निर्णयामुळे ‘वेडा महंमंद’ म्हणून ख्यात असलेल्या या ऐतिहासिक पात्रावरील ही नाट्यकृती तत्कालीन राजकीय स्थितीवरील चफखल आणि कडवट भाष्य म्हणून पहिली गेली. या नाटकातील भाषा आणि मंचीय आविष्कारातील वेगळेपणा भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील वळणरस्ता मानला जातो. बी.व्ही.कारंथ यांनी या नाटकाला हिंदीत भाषांतरीत केले, तर इब्राहिम अल्काजी यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक आजही नाट्यशास्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वाचे मॉडेल वाटते.
स्त्री-पुरुष संबंधावर आधारित ‘हयवदन’ या नाटकाबरोबरच तलेदंड, नागमंडल, बळी, ड्रिम्स ऑफ टीपू सुलतान यांसारख्या नाटकांनी ते नेहमीच भारतीय रंगभूमीवर चर्चेत राहिले. आपल्या कथानकांना लोक-संस्कृतीचा संपन्न बाज देऊन वर्तमानावर गंभीर सडेतोड भाष्य करणाऱ्या त्यांच्या बहुतांश साहित्यकृती इंग्रजी सहित भारतातील अनेक भाषांत भाषांतरित झाल्या आहेत.
चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. ‘निशांत’मधील शाळा शिक्षक, ‘मंथन’मधील डॉ. राव, ‘आशा’मधील दीपक, ‘अपने पराये’मधील हरीष, ‘उंबरठा’मधील अॅड. सुभाष महाजन, ‘चायना गेट’मधील फॉरेस्ट ऑफीसर सुंदर रंजन, ‘एक था टाइगर’मधील रॉ चीफ डॉ. शेणॉय, या हिंदी मराठी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक कन्नड, तेलगू, तामीळ, मल्याळम चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. अजूनही दूरदर्शनचा ९०च्या दशकातील प्रेक्षक, ‘मालगुडी डेज’ मधील ‘स्वामी’च्या पित्याची आठवण विसरलेला नाही. शुद्रक यांच्या ‘मृच्छकटीक’ या नाटकावर आधारित शशी कपूर निर्मित ‘उत्सव’ या गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील अजूनही ‘बेला क्यू महकां रे’चा गंध बेभान केल्या वाचून राहात नाही.
अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या गिरीश कर्नाड यांना संगीत नाटक अकादमी अवार्ड (१९७२), पद्मश्री(१९७४), पद्मभूषण (१९९२), साहित्य अकादमी (१९९४),ज्ञानपीठ(१९९८) यासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळूनही हा प्रतिभावंत सत्तेचा मिंधा मात्र कधीच झाला नाही.
पं.जवाहरलाल नेहरूंचा समाजसत्तावाद असो, की इंदिरांजींची आणिबाणी, ते नेहमीच सत्तेच्या विरोधात जनसामान्यांच्या भावनांना आपल्या कलाकृतीतून प्रतिकात्मक रितीने शब्दबद्ध करीत राहिले. सामान्यांसोबतची त्यांची ही बांधिलकी अलिकडच्या काळात तर ठाशीवपणे व्यक्त झालेली दिसून येते. गोध्रा हत्याकांडानिमित्ताने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींची जाहीर निर्भत्सना त्या काळात अनेक वेळा गिरीश कर्नाड यांनी केली. एवढेच नव्हे तर कॉँग्रेसच्या ‘धोरण लकव्या’वरही ते अनेक वेळा सडकून व्यक्त झाले. २०१४ निवडणुकीत दक्षिण बंगळुरूमधील कॉँग्रेसचे उमेदवार नंदन नीलेकणी यांच्या प्रचारात ते लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांच्यासह सक्रीय सहभागी झाले होते. एवढेच नव्हे, तर त्याच वेळी ते वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरोधी प्रचारात ते सक्रीय सहभागी होते. २०१५ मध्ये बंगळुरू अंतरराष्ट्रीय विमानतळास ‘केम्पा गौडा’ ऐवजी ‘टीपू सुलतान इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नामकरण करावे, ही मागणी कर्नाड यांनी केल्याने तेथील धर्मांध जनमत मोठे प्रक्षुब्ध झाले होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.
मध्यंतरीच्या काळात गोहत्येचं निमित्त करून, मॉब लिंचिंगचे सत्र देशभरात निर्माण करून एका विशिष्ट समुदायास भयकंपित करण्याचा जो प्रायोजित प्रयोग झाला, त्याने एक अस्वस्थता स्वाभाविकच सर्वत्र पसरली होती. ठिकठिकाणी रस्त्यावर येऊन येथील प्रज्ञावंतांनी नॉट इन माय नेम (NOT IN MY NAME) हे आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. बंगळुरूमध्ये इंडियन इंस्टीटयूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये येथील वर्दळीच्या वेळी टाऊन हॉलच्या पायऱ्यांवर गोळा होऊन हे आंदोलन चालविले तेव्हा आपले ऑक्सीजन सिलेंडर सोबत घेऊन नाकात श्वास घेण्यासाठी नळ्या असलेल्या अवस्थेत रामचंद्र गुहांच्या खांद्याला खांदा लावून गिरीश कर्नाड सामील झाले होते. त्यावेऴी ते म्हणाले होते, “You have to protest any kind of injustice. We have a Constitution. We have law and order. And it is terrible that is happening. It is happening for political purpose.” दादरी हत्याकांडावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले, “समाजातील वाढती असहिष्णुता सरकारमान्य प्रोत्सहनातून निर्माण होत असून, दादरी हत्याकांडानंतर आठवडाभर पंतप्रधानांचे त्यावरील मौन म्हणजे मूक संमतीच होय. ह्या शासनपुरस्कृत अहिसहिष्णुतेची आपण निर्भत्सना करतो.”
देशात विवेकाचा गळा आवळणे सुरू असतांना, सरकार विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्ते विचारवंतांची अर्बन नक्सलाईट म्हणून घरातून धरपकड करून अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. एकप्रकारे अघोषित आणिबाणीचे वातावरण देशांत उभे करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न सुरू झाला असताना, बंगळुरूमध्ये गौरी लंकेशच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने झालेल्या आंदोलनात गिरीश कर्नाड यांनी गळ्यात ‘ME TOO URBAN NAXAL’ चा बोर्ड लटकावून बेधड़क निषेध नोंदविला. हिंदू विधीज्ञ परिषदेच्या एका कार्यकर्त्याने यावर ‘कर्नाडांचे माओवाद्यांशी संबंध असल्या’ची तक्रार दाखल करुन त्यांवर तक्रार नोंदविण्यात आली. होती. एप्रील २०१९ मध्ये भारतातील २०० लेखकांनी स्वाक्षरी करून लोकसभा निवडणुकीमध्ये विविधता असलेल्या समान भारता (‘Deserve and Equal India’) साठी मतदान करा, अशी मोहीम चालविली, त्यातही गिरीश कर्नाड अग्रभागी होते.
गिरीश कर्नाडांच्या प्रतिभेची लय येथील समाजाच्या भावस्पदनांशी एकरूप झाली होती. म्हणूनच हा कलावंत चार भिंतीआडचं खुराडेवजा जग नाकारून रस्त्यावर येऊन राख जमलेल्या निखाऱ्यांना आपल्या ताकदीनिशी फुंकर घालत अधिक तेजोमय करीत होता. विवेकाची कास धरीत येणाऱ्या उद्यासाठी माणुसकीचा हंबर दशदिशांनी निनादावा यासाठी प्रयत्नरत होता, अगदी शेवटपर्यंत……!
COMMENTS