आधुनिक विचारांचा कलावंत हरपला

आधुनिक विचारांचा कलावंत हरपला

भारतीय इतिहास, प्राचीन मिथकं आणि लोककथा यातून भारतीय समाजजीवनाचा शोध घेणारे थोर नाटककार गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरू येथे राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेले काही महिने ते आजाराने ग्रस्त होते.

‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या नताशा नरवालला जामीन
म्युकरमायकोसिसवर ६० हजार व्हायल्स उपलब्ध होणार
आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !

६०च्या दशकात भारतीय नाटकांमध्ये कार्नाड यांच्या आधुनिक वाड्मयीन शैलीने खळबळ माजवली होती. वयाच्या केवळ २६ व्या वर्षी त्यांनी ‘तुघलक’ हे नाटक लिहिले आणि या नाटकाने एका वेगळ्याच प्रवाहाला जन्मास घातले. आजही हे नाटक अनेक पिढ्यातील नाटककारांना खुणावते. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेला भारतीय समाज धर्मनिरपेक्ष मूल्यावर उभा करण्यात आला होता, त्याला राज्यघटनेच्या मूल्याची चौकट होती. प्राचीनता व आधुनिकता यांच्यामध्ये अडकलेल्या भारतीय समाजाची अस्वस्थता शोधणारा धागा स्वीकारत कार्नाड भारतीय इतिहासातील घटना, पात्रांची आधुनिकोत्तर दृष्टिकोनातून मांडणी करत गेले.

मूळचे कानडी असलेल्या कार्नाडांना इंग्रजी कवी व्हायचे होते आणि त्यासाठी ते ऑक्सफर्डमध्ये गेले. त्यांना ऱ्होड स्कॉलरशीपही मिळाली पण त्यांनी आपले लेखन कन्नडमध्ये करायचे ठरवले व ते या भाषेकडे वळाले. पुढे ययाती, हयवदन, तुघलक, अंजू मल्लिगे, अग्निमतु माले, नागमंडला, तलेडेगा अशी एकसे एक सामर्थ्यशाली नाट्यनिर्मिती करून त्यांनी भारतीय साहित्यात स्वत:चा एक दबदबा निर्माण केला शिवाय जगाचेही लक्ष वेधून घेतले.

६०-७० दशकाचा काळ असा होता की, त्यावेळी बंगालीत बादल सरकार, मराठीत विजय तेंडुलकर, हिंदीच मोहन राकेश या साहित्यकारांनी नाटकात स्वत:ची भाषा, शैली उभी केली होती, त्यात कन्नडमध्ये गिरीश कार्नाडही अग्रेसर होते.

केवळ नाटकच नव्हे कार्नाड यांनी समांतर सिनेमा चळवळीतही आपल्या अभिनयाने योगदान दिले. शाम बेनेगल यांचा निशांत, मंथन, जब्बार पटेल यांचा उंबरठा या चित्रपटांतल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने ते सर्वांपर्यंत पोहचले.

अत्यंत अंतर्मुख करणारे त्यांचे सर्जनशील लेखन होते त्यामुळे केवळ नाटकच नव्हे तर चित्रपट कथा लेखनातही त्यांनी भर घातली. त्यांच्या साहित्य व चित्रपटातील योगदानामुळे ते आधुनिक भारतातील उदारमतवादी, धर्मनिरपेक्षवादाचा पुरस्कर्ता म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कर्नाटकातले थोर साहित्यकार कलबुर्गी व  निडर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांनी उजव्या सनातनवादी विचारांवर रस्त्यावर येऊन निषेध केला. त्यांनी जाहीरपणे हिंदुत्ववादी राजकारणावर टीका केली होती. तीन वर्षांपूर्वी टाटा लिटरली फेस्टिवलमध्ये नोबेल पुरस्कार विजेते व्ही. एस . नॉयपॉल यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याबद्दलही त्यांनी जाहीर टीका केली होती.

गिरीश कार्नाड यांचे एकूण साहित्य व सामाजिक क्षेत्रातले योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमीने ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना निधनाने आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारा एक कलावंत व एक दमदार साहित्यिक आपण गमावला आहे.

००००००००००००००

सृजनशील, समृद्ध आणि संपृक्त आयुष्य जगलेल्या गिरीश कार्नाड यांनी प्रयोगशीलतेला नेहमीच प्राधान्याने दिले. प्रस्थापित चौकटींना आव्हान देत संस्था-संघटनेच्या पातळीवर दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्याचे जाणीपूर्वक प्रयत्न त्यांनी केले. पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’च्या संचालकपदाचे धुरा सांभाळल्यानंतरचा काळही त्याला अपवाद ठरला नाही. त्यांच्या त्या प्रयत्नांचे दर्शन घडवणारा राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘खेळता खेळता आयुष्य’ या उमा कुलकर्णी अनुवादित आत्मकथेतला हा संक्षिप्त उतारा…

संस्था आणि चित्रपट उद्योग

मी फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेचा संचालक झाल्या झाल्या माझ्या नजरेला पडलेली पहिली असंबंध गोष्ट म्हणजे अभिनयाच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘स्क्रीन टेस्ट’ द्यावी लागत होती. उमेदवारानं आपल्या अर्जाबरोबर आपला फोटो पाठवणं तर अपेक्षित होतंच, इथे आल्यावर त्यांना कॅमेऱ्यापुढे उभं राहून त्यांचं वेगवेगळ्या बाजूनं चित्रीकरण करून नंतर त्या उमेदवाराचं रुप रजतपटासाठी योग्य आहे की नाही, हे बघितलं जाई, म्हणजेच तो उमेदवार सुस्वरूप आहे की नाही हे पाहून त्याच्या सौंदर्यावर त्याला प्रवेश द्यायचा की ही हे ठरवलं जाई.

मला आधीपासूनच हे ‘स्वयंवर’ हास्यास्पद वाटलं होतं. उत्तम नट किंवा नटी व्हायची शक्यता असणाऱ्यांना निवडणं हेच आपलं कर्तव्य असून मुंबईच्या स्वप्नाच्या कारखान्यात कुणाच्या आकर्षक अंगांगांना किती मागणी मिळेल, हे आजमावणं हे आपलं काम नाही, असा माझा ठाम अभिप्राय होता.

त्यामुळे मी ती स्क्रीन टेस्ट रद्द केली. उमेदवारानं मुलाखतीच्या वेळी आमच्यासमोर एक-दोन दृश्यांवर अभिनय करून दाखवला, तर पुरेसं आहे, अशी अट घातली. याला काही अधिकाऱ्यांकडून-विशेषत: अभिनयवर्गाचे प्राध्यापक रोशन तनेजा यांच्याकडून – विरोध झाला. मी तिकडे लक्ष दिलं नाही.

प्रवेशाच्या नियमांमध्ये केलेल्या बदलाचा परिणाम इतक्या लवकर दिसेल, असं मला वाटलं नव्हतं. त्याच वर्षी उमेदवारांमध्ये राष्ट्रीय नाट्यशाळेमधून एक विद्यार्थी आला होता. चेहऱ्यावर निऱ्या आणि देवीचे वण होते. किरकोळ देह, उभा चेहरा, गालावर डाग, स्क्रीन टेस्टच प्रमाण मानायची असती, तर या उमेदवाराला संस्थेच्या आवारातील पाय ठेवायला मिळालं नसतं. मुलाखतीच्या वेळी मात्र त्यानं दिपवून टाकणाऱ्या प्रतिभेचं दर्शन घडवलं.

तरीही कमिटीनं म्हटलं, “याच्याकडे उत्तम नट होण्याची शक्यता असली तरी, चित्रपटासाठी याच व्यक्तिमत्व योग्य नाही. ” त्याला प्रवेश नाकारण्यात आला. मी हे मान्य केलं नाही. “त्याचं रुप हा त्याचा प्रश्न आहे, आपला नाही. त्याच्या प्रतिभेचा शोध घेऊन तिला आकार देणं एवढंच आपलं कर्तव्य आहे.” असा मी वाद घातला. निवड समितीमधल्या फक्त जयराज नावाच्या नटानं मला पाठिंबा दिला. इतरांनी मात्र ‘एवढा रुपहीन चेहरा असताना कसली भूमिका करणं शक्य आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला. एकंदरीत मी बहुसंख्यांचा निर्णय धुडकावून त्याला प्रवेश दिला.

पुढच्या काळात ओम पुरीनं माझी निवड सार्थ ठरवली!  तो जगप्रसिद्ध नट झाला. त्याला फिल्म-फेअरनं जीवन गौरव पुरस्कारानं (लाइफ टाइम अचिव्हमेंट) सन्मानित केलं, तेव्हा त्यानं “गिरीश कार्नाड नसते, तर मला या क्षेत्रात प्रवेश मिळाला नसता, मग मी इथे दिसलोच नसतो! असे उद्गगार काढले. कुणालाही तृप्ती देणारी गुरुदक्षिणा ही.

मी माझ्या संस्थामधल्या अनुभवांची सुरुवात या घटनेपासून करायला आणखी एक कारण आहे. त्यात आणखी एक श्रेष्ठ नट समाविष्ट आहे. तो म्हणजे राज कपूर!

ओम पुरीच्या प्रवेशाची घटना घडली. त्याच वर्षी आणखीही एक विद्यार्थी उमेदवार म्हणून होता. त्याचं नाव दिलीप धवन. निळे डोळे, आकर्षक चेहरा, पण मुलाखतीच्या वेळी त्यानं काही विशेष प्रतिभा दाखवली नाही. त्यामुळे प्रा. तनेजांनी त्याच्या बाजूनं वाद घातला, तरी त्याला प्रवेश मिळाला नाही.

दिलीपला सरळ प्रवेश मिळणार नाही हे समजल्यावर तनेजांनी लीप काढला, “इतक्या सगळ्या श्रेष्ठ निर्मात्यांनी शिफारस केलेली असताना आपण त्याला प्रवेश दिला नाही, तर त्या सगळ्यांचा अपमान केल्यासारखं होईल. त्यामुळे त्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, अशी घोषणा केली तर चालेल की नाही?”

संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर सी. व्ही. गोपाल यांनी लगेच याला विरोध केला, “याला प्रवेश द्यायचा असेल, तर देऊ या. नाही तर नाही म्हणून सांगा. पण ही वेटिंग लिस्टची अडनिडी व्यवस्था नको! त्याचं नाव हवं तर आपल्या आतल्या फाईलमध्ये असू द्या. पण तसं प्रकट करायला नको!”

मी त्यांच्या अनुभवी बोलण्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, पण त्या तेरा निर्मात्यांचं- त्याहीपेक्षा माझ्याबरोबर काम करणाऱ्या तनेजांचं समाधान व्हावं म्हणून मी तनेजांचा सल्ला मान्य केला. संस्थेच्या नियमांप्रमाणे अभिनयासाठी तरुण-तरुणींना प्रत्येकी दहा दहा जागा होत्या. मी दिलीपला प्रतीक्षा यादीत पहिल्या, म्हणजे एकूण अकराव्या जागेवर ठेवलं, नकळत सापळ्यात पाय ठेवला!

प्रवेश मिळालेल्यांची यादी बोर्डावर लावून जेमतेम दोन दिवस झाले असतील-नसतील. ऑफीसमध्ये माझी प्राध्यापकांबरोबर मीटिंग चालली असताना दाबक नावाचा माझा प्यून धावत आला. त्यानं सांगितलं, “बाहेर राज कपूर आले आहेत!”

पुण्याच्या लगतच लोणी इथे राज कपूर यांचं फार्म होतं. पण ही संस्था सुरू झाल्यापासून तेरा वर्षांत ते एकदाही इकडे फिरकले नव्हते. आता ते असे अचानक आल्याची बातमी येताच सगळे प्राध्यापक दचकले. मीटिंग संपलीच असं गृहीत धरून त्यांनी आपल्या समोरच्या फायली आणि पुस्तकं बंद करायला सुरुवात केली.

पण मी दाबकला सांगितलं, “त्यांना म्हणावं, आमची प्राध्यापकांची मीटिंग चालली आहे. मला लगेच येता येणार नाही. त्यांच्यासाठी अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या खोलीत खूर्ची आणून ठेव. थोडी वाट पाहावी लागेल, म्हणावं.” संस्थेत एखादी उत्तम वेटिंगरुमही नव्हती.

मीटिंग संपली. प्राध्यापक विखरत असताना प्रा. सतीश बहाद्दूर माझ्या जवळ कानात म्हणाले, “ अभिनंदन! मागचे संचालक असते, तर त्यांनी राज कपूरला असं वाट बघायला लावलं नसतं”

राज कपूर माझ्या ऑफीसमध्ये आले. चहा-कॉफीची चौकशी करायलाही संधी न देता बोलू लागले, “हे काय केलं तुम्ही, गिरीशजी! मी दुबईहून आलो, तर यहाँ मातम चल रहा था, मातम! घरात कुणीतरी मरण पावलं असावा, असा शोक चालला होता!”

त्यांच्या येण्यामागचं कारण माझ्या लक्षात आलं होतं. मी म्हटलं, “ संस्थेत अभिनयाच्या अभ्यासक्रमासाठी फक्त दहाच जागा आहेत, त्यात दिलीप आला नाही. त्यामुळे त्याला निवडलेलं नाही. जर त्याला निवडलं असतं, तर एका योग्य विद्यार्थ्याला बाहेर ठेवावं लागलं असतं. तो अन्याय झाला असता!”

राज कपूरनी माझ्या या बोलण्यावर संपूर्ण सहमती दाखवत म्हटलं, “त्याच्यामध्ये काहीच प्रतिभा नसती , तर मीही काही म्हटलं नसतं. पण हा अकराव्या जागेपर्यंत आला आहे ना! मग त्याला पाठिंबा देणाऱ्या तेरा निर्मात्यांच्या शब्दाखातर त्याला प्रवेश देता आला नसता का? आम्ही तेराजण म्हणजे चित्रपटनिर्मिती हाच आमचा प्राण आहे, आमचं अस्तित्व आहे अशा विश्वासावर जगणारी माणसं आहोत. आम्ही फिल्मउद्योगासाठी आमचे प्राण ओवाळून टाकलेले असताना  या संस्थेत आमच्या शब्दांला काहीच किंमत नसावी?” त्यांनी विव्हल स्वरात विचारलं.

सी. व्ही. गोपालनं दिलेल्या इशाऱ्याकडे मी का लक्ष दिलं नाही, याचं मला दु:ख झालं. राज कपूर यांच्या बोलण्यातल्या तर्कशुद्धतेबरोबरच त्यांच्या बोलण्यातला नम्रपणा, विनय, त्यांच्या शब्दांमधु व्यक्त होणारी नाटकीय वेदना यालाही मी दाद दिली.

काही वेळा अशाच प्रकारे अतिविनयानं ओथंबलेल्या शब्दांत घासाघीस झाल्यावर मी सावकाश म्हटलं, “राजजी, तुम्ही निर्माते विद्यार्थ्यांसाठी शिफारसपत्र देता! त्याला आम्ही महत्त्व दिलं नाही, तर तुम्हाला मनस्ताप होतो! पण या संस्थेची स्थापना झाल्यापासून या तेरापैकी एका तरी निर्मात्यानं इथून बाहेर पडलेल्या किमान एका तरी विद्यार्थ्याला आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिलेली आहे का? नाही! शिफारसपत्र दिलं जातं! पण नोकरी दिली जात नाही!”

तेव्हा राज कपूर म्हणाले, “गिरीशजी, तुम्हालांही ठाऊक आहे, फिल्मनिर्मिती हा किती जंजाळाचा विषय आहे, ते! आमच्या मनात एखाद्याला घ्यायची इच्छा असली तरी घेता येत नाही. असा कठोर व्यवसाय आहे हा.”

“ठीकाय! निदान आता तरी या तेराजणांपैकी एकजणानं आपल्या पुढच्या चित्रपटात दिलीपला एखादी महत्त्वाची का होईना भूमिका देऊ असं कबूल करू द्या. मी फार महत्त्वाची भूमिका म्हणत नाही, उपपात्र असलं तरी चालेल. तसं कबूल केलं, तर मी आता या क्षणी त्याला प्रवेश देईन.”

राज कपूरनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं. खूर्चीवर रेलून अत्यंत सौहादपूर्ण दृष्टिक्षेप माझ्याकडे टाकला. नंतर हात फैलावत म्हणाले, “कबूल केलेलं काम मी केलयं. तुम्हाला जे योग्य वाटेल, ते तुम्ही करा.” आणि ते उठलेच.

त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवायला जात असताना मी म्हटलं, “राज कपूर आपण होऊन या संस्थेत आले आहेत, ही काही सामान्य घटना नाही. आम्हांला निश्चितच तुमच्यासारख्यांकडून प्रोत्साहन आणि उत्तेजनाची आवश्यकता आहे. तुम्ही इथपर्यंत आला आहात. आमच्या दृष्टीनं ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हांला मी नाही म्हणणार नाही. दिलीपला म्हणावं त्याला प्रवेश मिळालाय!”

राजजी हसले. “थँक्यू…” म्हणत शेकहँड करून ते गाडीत चढले.

निघून गेल्याबरोबर राजजींनी दिलीप धवनला बोलावून सांगितलं म्हणे, “तुला संस्थेमध्ये अँडमिशन मिळवून दिली आहे. यानंतर आणखी काही मागून मला त्रास देऊ नकोस.”

पुढच्या काळात दिलीप माझा विद्यार्थी झाला आणि त्याच्या-माझ्यात सलगी वाढली, तेव्हा त्यानं हे मला सांगितलं.

दिलीप संस्थेतला अभ्यासक्रम संपवून मुंबईला गेला, तेव्हा त्याला शिफारसपत्र देणाऱ्या तेरा निर्मात्यांपैकी कुणीही त्याला आपल्या चित्रपटात काम दिलं नाही. त्याच्याच बरोबरीनं शिकणाऱ्या सईद मिर्झानं निर्माण केलेल्या “नुक्कड” या अत्यंत लोकप्रिय मालिकेनंतर तो लोकप्रिय झाला.

पण त्या वर्षी सत्यजित राय संस्थेत प्रमुख पाहुणे म्हणून आले असता राज कपूरनी त्यांच्या सन्मानार्थ त्यांना आणि ज्येष्ठ विद्यार्थ्यांना एक भली मोठी मेजवानी दिली.

राज कपूरबरोबरच्या माझ्या या अनुभवानं फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेविषयीच्या आठवणींना मी सुरुवात केली आहे, ती यासाठी की त्यावेळी या संस्थेविषयी फिल्म व्यवसायात काय मत होतं त्याची कल्पना यावी. मी १९७४ साली इथे दाखल होण्याआधी या संस्थेने दोनशेपेक्षा अधिक अभिनेत्यांना शिक्षण देऊन फिल्म जगतात पाठवलं होतं. पण या दोनशेपैकी एकाही कलाकाराला या उद्योगानं आपल्या चित्रपटांत महत्त्वाची भूमिका दिली नव्हती. अनिल धवन, शत्रुघ्न सिन्हा, रेहाना सुलताना, नवीन निश्चल यांसारख्या चार-पाच विद्यार्थ्यांना संधी मिळाली असली, तरी तीही बी. आर.इशारांसारख्यांच्या लहान बजेटवाल्या दिग्दर्शकाच्या सिनेमांमधून.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0