तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम

तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम

काबूलः अफगाणिस्तानातून भारताला होणारा व्यापार हा पाकिस्तानमार्गे आहे. पण आता तालिबानने पाकिस्तान सीमा बंद केल्याने भारत-अफगाणिस्तान व्यापार बंद झाला आ

काबूलमध्ये अडकलेल्या काश्मिरींचे स्थलांतरासाठी केंद्राला आवाहन
अफगाणमधील तालिबानी वर्चस्व भारताला धोकादायक
अमेरिका तालिबान शांतता करार – भोंगळ पळवाट

काबूलः अफगाणिस्तानातून भारताला होणारा व्यापार हा पाकिस्तानमार्गे आहे. पण आता तालिबानने पाकिस्तान सीमा बंद केल्याने भारत-अफगाणिस्तान व्यापार बंद झाला आहे. यामुळे दोन्ही देशांचे लाखो डॉलरचे नुकसान होणार आहे.

पाकिस्तान सीमा बंद करण्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनने (एफआयईओ) दिली आहे. एफआयईओचे महासंचालक अजय सहायने बीबीसीला सांगितले की, अफगाणिस्तानातून भारताकडे होणारा व्यापार हा पाकिस्तानमार्गे होत असतो. पण आता तालिबानने ही सीमा बंद केल्याने संपूर्ण व्यापार बंद पडला आहे. ही सीमा केव्हा खुली होणार याबद्दल अनिश्चितता असून दोन्ही देशांचे निर्यातदार या निर्णयाने चिंतेत पडले आहे. सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे त्यावर आम्ही नजर ठेवून असल्याचे सहाय यांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तान-भारत व्यापार

अफगाणिस्तान एकूण जीडीपीमधील निर्यातीचा वाटा २० टक्के असून या निर्यातीतील ४५ टक्के हिस्सा गालिचे व रगचा आहे. त्या नंतर सुका मेवा (३१ टक्के) व औषध वनस्पतींचा (१२ टक्के) वाटा येतो. अफगाणिस्तानची सर्वाधिक निर्यात पाकिस्तानला (४८ टक्के), त्यानंतर भारत (१९ टक्के), रशियाला (९ टक्के) होते. त्यानंतर इराण, इराक व तुर्कीचा क्रमांक लागतो.

अफगाणिस्तान-भारत १० हजार कोटी रु.चा व्यापार

गेल्या २० वर्षांत भारत व अफगाणिस्तानात यांच्यात द्विपक्षीय व्यापारात मोठी वृद्धी झाली आहे. भारताने या दोन दशकांत अफगाणिस्तानमध्ये बंधारे, शाळा, रस्ते यांच्या विकास कामात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तान संसदेची इमारतही भारताने बांधली आहे.

२०२०-२१ या काळात भारत-अफगाणिस्तानमधील व्यापार १.४ अब्ज डॉलरचा म्हणजे सुमारे १०,३८७ कोटी रुपयांचा होता. २०१९-२०मध्ये हा व्यापार १.५ अब्ज डॉलर म्हणजे ११,१३१ कोटी रुपये इतका होता.

२०२०-२१ या काळात भारताने ६.१२९ कोटी रुपयांची निर्यात केली तर ३,७८३ कोटी रु.ची आयात केली.

२००१मध्ये तालिबानची राजवट पडल्यानंतर अफगाणिस्तानचा जगाशी व्यापार सुरू झाला. गेल्या २० वर्षांत अफगाणिस्तानच्या एकूण विकासात भारताचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे.

अफगाणिस्तानच्या सुका मेव्याच्या प्रमुख आयातदार देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक असून सुका मेवा, अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, मनुके, जर्दाळू, हिंग, जीरे, केसर यांची आयात भारताकडून मोठ्या प्रमाणात होते. अफगाणिस्तानचा माल हा ताजा असतो. त्यामध्ये काही मसाले व कांदेही भारतात येतात. आता व्यापार बंद झाल्यास त्याचा मोठा परिणाम सुक्या मेव्याच्या व्यापारावर होणार आहे.

अफगाणिस्तानकडून सफरचंद, चेरी, डाळिंब, टरबूजही निर्यात होतो. भारताकडून अफगाणिस्तानला औषधे, चहा, कॉफी, कापूस, मिरे यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो.

भारताची अधिक निर्यात इराण व दुबई द्वारे होत असते. पण सध्याची अस्थिर परिस्थिती पाहून निर्यातदार चिंतेत आहे.

मूळ वृत्त बीबीसी हिंदी

(वृत्त छायाचित्र – पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमेवर अडकून पडलेले ट्रक. बीबीसी हिंदी साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0