नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधील ‘इतिलात्रोज’ या वर्तमानपत्रातील दोन पत्रकारांना ते महिला आंदोलनाचे वार्तांकन केल्या प्रकरणात तालिबानने जबर मारहाण केली.
काबूल शहरात ८ सप्टेंबरला काही महिलांनी नव्या तालिबान राजवटीला विरोध म्हणून निदर्शने केली होती. तालिबानच्या नव्या सरकारमध्ये सर्व घटकांना प्रवेश नसल्याबद्दल निदर्शकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. ही निदर्शने सुरू झाल्यानंतर ४ तालिबान सैनिक घटनास्थळी आले व त्यांनी निदर्शने थांबवण्यास सांगितले. यातून वादावादी सुरू झाली. या दरम्यान तालिबानच्या सैनिकांनी या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेला व्हीडिओ एडिटर ताकी दर्याबी व त्याचा सहकारी नेमात नकदी या दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या जवळचे कॅमेरे हस्तगत केले. या दरम्यान २ विदेशी पत्रकारांनाही तालिबानने वृत्तांकन करण्यास अटकाव केला. यात लॉस एंजेलिस टाइम्सचा वार्ताहर होता. या सर्वांना नजीकच्या कार्ट चार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे अनेक अफगाण पत्रकारांना तालिबानने ताब्यात घेतले होते. या सर्व पत्रकारांची चौकशी सुरू होती. काही वेळाने विदेशी पत्रकारांना सोडून देण्यात आले पण अफगाण पत्रकारांना पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले.
महिलांच्या निदर्शनाची छायाचित्रे नष्ट करावीत असे तालिबानचे म्हणणे होते. पण या वादावादीत तालिबानच्या सैनिकांनी दोन अफगाण पत्रकारांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. आमचे हात व चेहरे दोरी, फडक्यांनी बांधले होते व केबलने मारहाण केली, आम्ही चालूही शकत नव्हतो, असे पीडित अफगाण पत्रकारांचे म्हणणे आहे.
अखेरीस या दोघांना सोडण्यासाठी आणखी तीन पत्रकार पोलिस ठाण्यात पोहचले, नंतर चर्चा होऊन या दोघांची सुटका करण्यात आली.
‘इतिलात्रोज’चे प्रकाशक झाकी दर्याबी यांनी ताकी दर्याबी यांना मारहाण केल्याचा व्हीडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केला. चार तास आमच्या पत्रकारांना जबर मारहाण करण्यात आली. यात हे पत्रकार अनेक वेळा बेशुद्ध पडले होते, असे झाकी दर्याबी यांचे म्हणणे होते.
दरम्यान या घटनेनंतर तालिबानचे नवे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी कोणतेही आंदोलन करायचे झाल्यास त्याची तीन तास अगोदर प्रशासनाला कल्पना द्यावी लागेल, असा नियम जाहीर केला आहे.
मूळ बातमी
COMMENTS