देश सोडून जणाऱ्यांची काबूल विमानतळावर तोबा गर्दी

देश सोडून जणाऱ्यांची काबूल विमानतळावर तोबा गर्दी

काबूलः तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेत ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’ची घोषणा केली. या घोषणेनंतर पहिला- सोमवारचा दिवस काबू

अमेरिकेच्या पूर्ण माघारीनंतर तालिबानचा जल्लोष
तालिबानने अफगाणिस्तानातील ६वी प्रादेशिक राजधानी बळकावली
‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ला विरोधचः भारत

काबूलः तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेत ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’ची घोषणा केली. या घोषणेनंतर पहिला- सोमवारचा दिवस काबूल विमानतळावरचा गोंधळ वगळता शांततेत गेल्याचे वृत्त अल-जझिराने दिले आहे. तालिबानच्या हातात काबूल जाण्याआधी ४८ तास अगोदर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक मिळेल त्या संसारोपयोगी वस्तू घेऊन पलायन करताना दिसत होते. शहरात सर्वत्र ट्रॅफिक जॅम दिसत होता. बँका, व्हीसा कार्यालये, पर्यटन कंपन्यांच्या बाहेर लोकांनी गर्दी केलेली दिसत होती. मात्र सोमवारी शहरात कोठेही पोलिस बंदोबस्त दिसत नव्हता. शहरातील चेकनाके-चौक्या ओस पडलेल्या दिसत होत्या. वाहतुक रस्त्यावर कमी दिसत होती. शहरातील काही भागात उद्योगधंदे सुरू होते, दुकाने उघडलेली दिसत होती. बॉम्बशोधक यंत्रणा ओस पडल्या होत्या. विमानतळाकडे जाणारी वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलिस उपस्थित नव्हता.

काबूलमध्ये देशाच्या ३४ प्रांतातून आलेले बंदुकधारी तालिबानी सत्ता मिळाल्याने आनंदात दिसत होते. अनेक ठिकाणी तालिबानचे काळे-पांढरे झेंडे, फलक लागलेले दिसून आले. अनेक चार चाकी गाड्यातून तालिबान आपला विजय साजरा करताना शहरात फिरत असताना दिसत होते.

तालिबानची नवी पिढी

सुमारे २० वर्षानंतर काबूल पुन्हा तालिबानच्या हाती पडले आहे. या दोन दशकातील तालिबानच्या वर्तनातही फरक पडलेला दिसत होता. पूर्वी छायाचित्र काढण्यावर तालिबानची बंदी होती, पण सोमवारी अनेक तालिबान सेल्फी काढताना दिसत होते. बहुसंख्य तालिबान्यांकडे स्मार्टफोन दिसत होते. आम्ही येथे अफगाणिस्तानच्या जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. आमच्या देशाचे हित सांभाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी प्रतिक्रिया तालिबानी प्रसार माध्यमांना देताना दिसत होते. काही नागरिक तालिबान्यांसोबत सेल्फी काढताना दिसत होते.

विमानतळावर गर्दी

काबूल विमानतळावर मात्र देश सोडून जाणार्यांची तोबा गर्दी दिसत होती. शेकडो नागरिक विमानात प्रवेश मिळावा म्हणून धडपड करताना दिसत होते. अमेरिकेचे एक विमान उड्डाण घेत असताना विमानाच्या पंख्यांचा आसरा घेतलेले दोघेजण खाली पडतानाची दृश्ये सोशल मीडियात व्हायरल झाली. विमानतळावर एवढा गोंधळ व गर्दी झाली की तेथे गोळीबार झाला, त्यात ५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पण या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. हे ५ जण चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत की गोळीबारात हे स्पष्ट झालेले नाही. रॉयटर्सने या व्यक्ती कोणत्या कारणाने मरण पावल्या याची माहिती उपलब्ध झालेली नाही, असे म्हटले आहे.

दरम्यान परागंदा झालेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी यांनी देशात हिंसाचार व यादवी जन्माला येऊ नये म्हणून आपण पलायन केले, असे उत्तर दिले आहे.

अमेरिकेने आपली वकिलात खाली केलेली दिसून आली. अमेरिकेचा झेंडाही उतरवलेला दिसून आला. अमेरिकेचे अडकलेले काही अधिकारी विमानतळावर असून अनेक देशांनी आपल्या वकिलाती बंद केल्या आहेत. प्रत्येक देश आपल्या राजनयिक कर्मचार्यांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करत आहे.

भारतानेही अडकलेल्या आपल्या नागरिकांना व वकिलातीतील कर्मचार्यांना आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी मात्र एअर इंडियाचे एक विमान रद्द करण्यात आले तर अमेरिकेहून दिल्लीला येणार्या दोन विमानांनी आपला मार्ग बदलला. या विमानांनी अफगाणिस्तानच्या हवाई प्रदेशावरून उडण्याऐवजी शारजाहावरून जाण्याचा निर्णय घेतला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0