नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्कर भरती प्रक्रियेवर हिंसात्मक विरोध शुक्रवारी अधिक दिसून आला. शुक्रवारी हिंसाचाराचे लोण बिहारसह ७ राज्यांत
नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्कर भरती प्रक्रियेवर हिंसात्मक विरोध शुक्रवारी अधिक दिसून आला. शुक्रवारी हिंसाचाराचे लोण बिहारसह ७ राज्यांत दिसून आले. या राज्यात १२ रेल्वे गाड्यांना निदर्शकांनी आगी लावल्या. तर तेलंगण मध्ये हिंसाचारात एका निदर्शकाचा मृत्यू झाला.
संतप्त तरुणांच्या या निदर्शनामुळे दिवसभरात देशातल्या ३१६ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले तर २१४ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.
अग्निपथ भरती प्रक्रियेवरून हिंसाचाराच्या प्रतिक्रिया गेले तीन दिवस बिहार व उ. प्रदेशात दिसून येत होत्या पण शुक्रवारी हरियाणा, म. प्रदेश, दिल्ली, प. बंगाल, तेलंगण या राज्यात मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरले होते व त्यांनी सार्वजनिक मालमत्तांची नासधूस केली. तेलंगणमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकात सुमारे ५००० हून अधिक निदर्शक घुसले व तेथे जमाव हिंसक झाला. यात रेल्वे डब्याला आग लावण्याचे प्रयत्न झाले. या डब्यात ४० प्रवासी होते. पण रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका १९ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला तर १५ हून अधिक जण जखमी झाले.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ६१ मेल एक्स्प्रेस व ३० पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्या तर ११ मेल एक्स्प्रेस अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या.
बिहारमध्ये राजकीय आरोप सुरू
अग्निपथवरून एकीकडे बिहार राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजदवर निशाणा साधत हिंसाचारामागे राजदचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. विद्यार्थ्यांना पुढे करून विरोध पक्ष सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करत आहे व राजकारण करत असल्याचे सिंह यांचा आरोप आहे. गुरुवारी निदर्शकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणु देवी यांच्या बेतिया येथील निवासस्थानावर हल्ला केला होता. त्याच बरोबर भाजपचे नेते संजय जायसवाल यांच्या घरावरही जमाव चालून गेला होता. या वेळी जायसवाल घरात होते. जमावाने त्यांच्या घराचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. घराच्या खिडक्यांच्या काचा निदर्शकांनी फोडल्या. निदर्शकांनी पटना शहरातील भाजप प्रदेश अध्यक्षांच्या घरावर हल्ला केला यात एक पोलिस जखमी झाला. तर उ. प्रदेशात शुक्रवारपर्यंत १०० निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. बिहारमधील बलिया येथील हिंसाचाराचे लोण मथुरा व आग्रामध्ये पसरले. बनारसमध्येही निदर्शने झाल्याचे वृत्त आहे.
COMMENTS