‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात तरुणांची निदर्शने

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात तरुणांची निदर्शने

नवी दिल्लीः भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल सूचवणाऱ्या अग्निपथ योजनेवर बुधवारी बिहार, राजस्थान, उ. प्रदेशमधून तरुणांच्या तीव्र प्रतिक्र

अग्निपथ भरती योजनेला स्थगिती देण्याची नेपाळची विनंती
बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी
तुम्हाला सैन्यात यायला कुणी सांगितले? – व्ही.के. सिंग

नवी दिल्लीः भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल सूचवणाऱ्या अग्निपथ योजनेवर बुधवारी बिहार, राजस्थान, उ. प्रदेशमधून तरुणांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच बरोबर निवृत्त लष्करी अधिकारी व सामरिक तज्ज्ञांनीही या योजनेवर शंका उपस्थित केल्या आहेत.

बुधवारी बिहारमधील बक्सर व मुझफ्फरपूर येथे शेकडो युवक रेल्वे स्थानकानजीक जमा झाले व त्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. या युवकांकडे हातात लाठ्या-काठ्या होत्या. निदर्शकांनी बेगुसराय राष्ट्रीय महामार्गावर धरणे धरले व ही योजना तरुणांवर अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काही ठिकाणी आग लावण्याच्याही घटना घडल्या.

राजस्थान व उ. प्रदेशातही अग्निपथला विरोध दिसून आला. उ. प्रदेशात आंबेडकरनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर दिसून आले. जयपूरमध्येही निदर्शक तरुणांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केली. आम्ही दोन वर्षे लष्कर भरतीची वाट पाहात होतो व आता आमच्यापुढे ही योजना सरकारने पुढे ठेवली असे तरुणांचे म्हणणे होते. खासदार, आमदार ५ वर्षांसाठी सत्तेवर असतात आम्ही फक्त ४ वर्षेच का काम करायचे असा सवाल युवकांचा होता. आम्हाला पेन्शन व कँटिनच्या सोयी मिळणार नाहीत, असाही तरुणांचा आरोप होता.

एनडीटीव्हीशी बोलताना वाराणसीच्या २२ वर्षांच्या राहुलचे म्हणणे होते की, कोरोनाने आमची तीन वर्षे वाया घालवली. आम्ही या काळात तयारी करत होतो. आता चार वर्षांची योजना आली आहे. त्यानंतर आम्ही कुठे जाणार असा सवाल राहुलने उपस्थित केला. प्रीतम शर्मा या युवकाने चार वर्षानंतर आम्ही कुठे जाणार असा सवाल करत सरकार आम्हाला मूर्ख बनवत असून आमचे कुटुंब, मुले चार वर्षानंतर कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित केला.

२० वर्षांच्या राहुल गुप्ताने आपण गेली ६ वर्षे लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. चार वर्षानंतर आम्ही कुठे जाणार असाही सवाल त्याने उपस्थित केला. चार वर्षानंतर आम्ही पुन्हा अभ्यास करायचा का असा सवाल अविनाश यादव याने उपस्थित केला. हे करण्यापेक्षा आम्ही पोलिस दलात भरती होऊ असे त्याचे म्हणणे होते.

माजी लष्करी अधिकारी योजनेवर नाराज

अग्निपथ योजनेवर माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या वर्गातून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) विनोद भाटिया यांनी अग्निपथ योजना योग्य रित्या तपासली नसून त्याची चाचपणी करण्याअगोदर ती थेट लागू केली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अशा योजनेमुळे समाजाचे लष्करीकरण होण्याचा धोका असून दर वर्षी लष्करातून निवृत्त झालेले ४० हजार युवक बेकार होतील, त्यांच्या हातात नोकरी नसेल. शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतलेले हे तरुण माजी अग्निवीर म्हणून ओळखले जातील याचा कोणालाच फायदा नाही, असे मत भाटिया यांनी व्यक्त केले. पेन्शन वाचवण्यासाठी अशी योजना आणल्याने भारतीय संरक्षण दलाची ताकद कमी होईल. जंगल, दऱ्याखोऱ्यात, उंच ठिकाणी भारतीय जवान शत्रूवर मात देत असतात, ते जवान केवळ ४ वर्षांसाठी लष्करात तैनात राहणार असतील तर ते कसे काम करणार असा सवाल भाटिया यांनी उपस्थित केला आहे.

मेजर जनरल (सेवानिवृत्त) यश मोर यांनीही अग्निपथ योजनेवर टीका करत लाखो तरुणांना या योजनेने निराश केल्याचे म्हटले. दोन वर्षे भरती नाही, त्यात सारी उमेद या तरुणांची गेली, असे ते म्हणाले.

मेजर जनरल (सेवानिवृत्त) सतबीर सिंह यांनीही ही योजना भारतीय लष्कराची परंपरा, लोकरित, नैतिकता व मूल्यांनुरुप नसल्याचा आरोप केला. या योजनेमुळे सैन्यावर विपरित परिणाम पडेल असा इशारा त्यांनी दिला.

मूळ सविस्तर वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0