रेड बॉल, व्हाइट बॉल आणि पिंक बॉल करिता लागणारे तंत्र एकसारखे नसते. २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावरील सामना यासाठी मार्गदर्शक राहील. अहमदाबाद कसोटीचा निकाल भारत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्पर्धेत खेळू शकेल किंवा नाही हे ठरवेल. इथला पराजय भारताला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो.
भारतीय क्रिकेट टीमने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दुसऱ्या कसोटीत उत्तम कामगिरी करून मालिका बरोबरीत आणली, पण भारतीय संघाला नवीनच आव्हानाला सामोरे जावे लागते आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली असून स्पर्धेचा अंतिम सामना कोण खेळणार ही क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. न्यूझीलंडने प्रथम स्थान पटकाविले असल्याने भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धेत आहेत. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. ते स्पर्धेआधी कसोटी मालिका खेळणार नसल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. प्रश्न उरतो भारत की इंग्लंड, दुसऱ्या स्थानावर कोण येणार? त्यामुळे सद्य स्थितीत सुरू असलेल्या भारत इंग्लंड क्रिकेट मालिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
आयपीएल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या खेळाडूंच्या खरेदीसाठी “अर्थ”पूर्ण घटना जोरावर आहेत. आयपील धमाका भारतीय क्रिकेटमध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण करतो. गेल्या दशकापासून नवोदित भारतीय खेळाडूंना चांगली संधी मिळते आहे हे नक्की. प्रारंभीच क्रिकेट करिअरमध्ये या खेळाडूंना अनुभवी (देश-विदेशातील) खेळाडूंसोबत, विरुद्ध खेळायला मिळणे ही महत्त्वाची बाब आहे. नवोदित खेळाडूंमध्ये अशा संधीमुळे धाडस, समयसूचकता, जिद्द, प्रसंगानुसार खेळण्याची कला, खेळांतील बारकावे, क्षेत्ररक्षणात सुधारणा पाहावयास मिळते आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेतील भारतीय नवोदित खेळाडूंचे अभूतपूर्व यश याची साक्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आयपीएल स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेटचा स्तर निश्चितच उंचावला आहे. चांगल्या क्रिकेट खेळाडूंची संख्या निश्चितच बऱ्यापैकी वाढली आहे.
सध्या भारतीय क्रिकेट मंडळापुढे “कोणते ११ खेळाडू निवडायचे” हा खरोखरी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचे सुमारे दोन डझन खेळाडू निवड समितीसमोर उभे ठाकले आहेत. टीममधील प्रत्येक जागेसाठी भरपूर खेळाडू उपलब्ध आहेत. आघाडीच्या जोडीसाठी रोहित, शुभमन, मयंक, राहुल, शिखर, पृथ्वी. द्रुतगती गोलंदाजीसाठी बुमराह, ईशांत, उमेश, सिराज, नटराजन, शार्दुल. फिरकी गोलंदाजीसाठी आश्विन, जडेजा, सुंदर, यजुवेंद्र, कुलदीप सारखे खेळाडू उपलब्ध आहेत. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ, वृद्धिमान, राहुल आहेतच. मधल्या फळीत खेळण्यासाठी पुजारा, कोहली, अजिंक्य, हनुमा आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक, आश्विन व जडेजा आहेत. तिघांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. एकंदरीत काय, निवड करण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध असल्याने खेळणारे ११ निवडणे ही संघ व्यवस्थापन आणि निवड समितीसाठी अडचणीची बाब ठरते आहे.
खेळपट्टीसुद्धा कोणते खेळाडू निवडावे याकरिता मार्गदर्शक राहू शकते. खेळपट्टीची पाहणी करून निवडलेले खेळाडू यशस्वी राहतीलच याची खात्री देता येत नाही. सद्य परिस्थितीत निवडलेला खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही तरी निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागते कारण तितकाच योग्य खेळाडू बाहेर प्रतीक्षा करत असतो. एखादा खेळाडू वारंवार अपयशी होत असेल तर त्याला किती संधी द्यायच्या याचाही मापदंड ठरविता येत नाही. शेवटी काय तर संघ जिंकत असेल तोवर लहान सहान गोष्टींकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष्य होणे साहजिकच. पण संघ जर हरला की मग प्रत्येकजण आपले मत मांडण्यास मोकळा असतो. अलीकडे स्वदेशी टीकाकारांबरोबर विदेशी टीकाकार सुद्धा आपले स्वैर मत मांडताना दिसतात. थेट प्रक्षेपण, सक्रीय सोशल मीडिया इत्यादि गोष्टींमुळे निवड समितीला सदैव X- Ray मशीन समोर उभे राहावे लागते. निवडलेल्या खेळाडूकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याची कामगिरी यात जर तफावत आढळली तर संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्या विरुद्ध टीकेची झोड उठलीच म्हणून समजा. टीका करणारे हे आपसूकच विसरतात की अनुभवी आणि सातत्याने कामगिरी करणारे खेळाडू सुद्धा एकेकाळी त्यांनीच निवडले होते.
साधारण तीन दशकांपूर्वी भारतीय संघात आघाडीच्या फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी दोन खेळाडू मिळण्याची वानवा होती. सुनील गावस्कर संघात येईपर्यंत कोणीतरी दोघे आघाडीला जायचे. गावस्कर टीममध्ये आल्यावर तो निवृत्त होईस्तोवर त्याला साथीदार मिळण्याची मारामार होती. कपिलदेवच्या आधी गावस्कर, सोलकर, वाडेकर किंवा चक्क फिरकी गोलंदाजांनी आघाडीची गोलंदाजी सांभाळली होती. गावस्करच्या फलंदाजीतील यशाने भारतीय फलंदाज आघाडीला जाऊन फलंदाजी करू शकतात हा विश्वास निर्माण झाला. कपिलदेव मुळे तरुणाई द्रुतगती गोलंदाजीकडे आकर्षित झाली. नंतर तेंडुलकर, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, युवराज इत्यादि खेळाडूंनी मध्यक्रमात कसे खेळायचे हे दाखवून दिले. किरमाणी, धोनी यांनी यष्टीरक्षक कसा असावा याचे धडे दिले. भारत विश्वचषक किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा जिंकू शकतो हे कपिल देव, गावस्कर आणि धोनीने जगाला दाखवून दिले. या सर्व खेळाडूंना निवडणारी त्या काळची निवड समितीच होती. निवड समिती खेळाडूंना निवड करून संधी देऊ शकते, पण निवड झाल्यावर स्वतःला सिद्ध करणे ही त्या खेळाडूची जबाबदारी. पर्याप्त मात्रेत संधी देणे हे निवड समितीचे कार्य, पण अपयशी ठरल्यास त्याला खेळाडूच जबाबदार. सध्या उपलब्ध खेळाडू भरपूर असल्याने खेळाडूंना संधी मिळण्यास उशीर लागू शकतो. खेळ जरी जिंकण्यासाठी खेळायचा असला तरी संघ हा भविष्यावर नजर ठेऊन निवडायचा असतो. खेळाडूंचे वय, त्यांच्यातील क्षमता आणि बराच काळ त्याची संघाकरिता उपयुक्तता या गोष्टीचा बारकाईने विचार करणे हे निवड समितीचे कर्तव्य.
निवड समितीमध्ये कोणते सदस्य असावेत हा सुद्धा एक चर्चेचा विषय. यशस्वी क्रिकेट कारकीर्द, क्रिकेटचा सखोल अभ्यास, दूरदर्शिता, गुणग्राहक शक्ती आणि निरपेक्ष वैचारिक शैली असणारे सदस्य निवड समितीत असणे आवश्यक. राहुल द्रविड, सौरव गांगुली सारखे यशस्वी खेळाडू अशा प्रक्रियेत येणे सुरू झाल्याने नवीन खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कामगिरी करू शकत आहेत. त्यामुळे भरपूर अनुभवी असलेल्या खेळाडूंना निवड समितीत प्राधान्य देणे भारताच्या क्रिकेटच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त राहील.
महिला क्रिकेटमध्ये भारतीय तरुणींनी केलेली कामगिरी लक्षणीय आहे. शांता रंगास्वामी, डायना एडुलजी, अंजुम चोप्रा, मिथाली राज, झूलन गोस्वामी सारख्या खेळाडूंनी भारतात महिला क्रिकेट लोकप्रिय होण्यांस सक्रीय योगदान दिले आहे. भारतीय महिला सुमारे पांच दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या यशाची कमान वाढती आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत त्यांनी दुसरे स्थान पटकाविले होते. थेट प्रक्षेपणामुळे महिला क्रिकेट घराघरांत पोहचले आहे, लोकप्रिय झाले आहे. महिला क्रिकेटकडे भारतीय तरुणी आकर्षित होत आहेत ही समाधानाची बाब आहे. तरीसुद्धा महिला क्रिकेटकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता वाटते. महिला खेळाडूंमध्ये क्रिकेट क्षेत्रात जगज्जेता होण्याची क्षमता नक्कीच आहे. आयपीएलसारखी स्पर्धा, सामन्यांची संख्या वाढविणे, चांगले प्रायोजक महिला क्रिकेटकडे आकर्षित होणे इत्यादी गोष्टी महिला क्रिकेट अधिक लोकप्रिय होण्यास आणि भारतीय महिलांची कामगिरी उंचावण्यास कारणीभूत ठरू शकतील यात शंका नाही.
सध्या पिंक बॉल क्रिकेट माफक प्रमाणावर खेळल्या जाते. दिवसरात्र खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या अफाट लोकप्रियतेमुळे नजीकच्या भविष्यात पिंक बॉल क्रिकेट सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा क्रिकेटमध्ये आवश्यक असणारे फलंदाजी आणि गोलंदाजीचे तंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज ठरू शकते. दुर्लक्ष झाल्यास अॅडलेड कसोटीसारखी नामुष्की वारंवार पदरात पडणे साहजिकच राहू शकते. रेड बॉल, व्हाइट बॉल आणि पिंक बॉल करिता लागणारे तंत्र एकसारखे नसते.
२४ फेब्रुवारी पासून अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावरील सामना यासाठी मार्गदर्शक राहील. जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून प्रसिद्धी पावलेले आणि एक लाखावर प्रेक्षक बसू शकणाऱ्या मैदानाची खेळपट्टी काय रंग दाखवते हे बघणे महत्त्वाचे. अहमदाबाद कसोटीचा निकाल भारत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्पर्धेत खेळू शकेल किंवा नाही हे ठरवेल. इथला पराजय भारताला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो. त्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा राहील. दुसऱ्या कसोटीतील पराभवाने डिवचलेला इंग्लंड संघ आपले सर्वोत्तम देण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. पिंक बॉलचा अवांतर स्विंग खेळणे भारतीय फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरणार, हे सत्य नाकारता येणार नाही. इंग्लंडजवळ अँडरसन, ब्रॉड, स्टोन आणि स्टोक्सच्या रूपाने अनुभवी द्रुतगती गोलंदाज असल्याने त्यांचे पारडे जड वाटते. जी टीम खेळपट्टीचा वापर योग्य रीतीने करेल आणि संयमी फलंदाजी करेल तीच विजयी होईल. नाणेफेक देखील महत्त्वाची ठरेल. घोडामैदान दूर नाही. १८ जूनला भारत लॉर्ड्स मैदानावर खेळेल अशी आशा करूया.
COMMENTS