मोदींच्या उपस्थितीत कोश्यारींवर अजित पवारांचा निशाणा

मोदींच्या उपस्थितीत कोश्यारींवर अजित पवारांचा निशाणा

पुणेः पुणे मेट्रोचे उद्घाटन व शहरातील एमआयटी महाविद्यालय मैदानावर रविवारी आयोजित विविध विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजि

सरकार अल्पायुषी नसल्याचे दर्शविणारे १०० दिवस
अजित पवार म्हणतात, मी राष्ट्रवादीतच
युती आणि आघाड्यांची अभद्रता आणि वास्तव

पुणेः पुणे मेट्रोचे उद्घाटन व शहरातील एमआयटी महाविद्यालय मैदानावर रविवारी आयोजित विविध विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर व नुकत्याच त्यांनी छ. शिवाजी महाराज व थोर समाजसुधारक जोतिबा फुले व सावित्री फुले यांच्यावर केलेल्या टिप्पण्णीवर थेट शब्दांत टीका केली.

अजित पवार म्हणाले, “पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल असूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो”.

अजित पवार यांनी पुणे मेट्रोप्रमाणे शहर व उपनगरातील अन्य प्रकल्पांनाही केंद्राने मदत करावी अशी विनंती केली. “अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचं काम सुरू आहे. जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल, असे पवार म्हणाले.

मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

शहरातील मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किलोमीटर मार्गिकेचे उदघाटन करण्यात आले. मोदींनी गरवारे मेट्रो स्थानक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.

पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

या कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार,  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतूकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल. 

नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा

देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या 60 कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतूकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.

आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले. 

वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा

पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

पुणे महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न- अजित पवार

अजित पवार यांनी, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणारी विकासकामे इथल्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या आहेत. पुण्याच्या विकासासाठी  एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन यावेळी केले.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पुण्याच्या जनतेने अडचणी सहन केल्या आहेत. १२ किलोमीटर मार्गावर ही मेट्रो रेल्वे धावणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट विस्तारीकरणाबरोबरच पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोड मार्गिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा काम चालू आहे. या प्रकल्पांसाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर टप्पा 2 च्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकासासाठी पर्यावरणाचा विचार करावा लागेल

मुळा-मुठा नदी सुशोभिकरण आणि जायका प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचे आहेत. पुण्यात साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर मुळा-मुठा नदी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत आणि जैवविविधतेला धक्का न लावता ही कामे करावी लागतील. पूर नियंत्रण रेषेचा विचारही होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असेही पवार म्हणाले.

पवार यांनी, सायकलचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वाहनांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार व्हावा, असे मतही व्यक्त केले. 

केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत संयुक्तपणे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी होत असून पहिल्या टप्यात पुणे येथील गरवारे ते वनाज आणि पिंपरी चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी असा एकूण १२ किलोमीटर मार्ग सुरू करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0