मागण्या मान्य झाल्यावरच कारवाई मागेः पुतीन

मागण्या मान्य झाल्यावरच कारवाई मागेः पुतीन

आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतरच युक्रेनमधील रशियाची लष्करी कारवाई मागे घेण्यात येईल, असे वक्तव्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी केले.

साथीचे रोग प्रतिबंध कायदा कसा अस्तित्वात आला…
भारताची अफगाणिस्तानला पहिली अधिकृत भेट
आरसेपचा धोका टळला, पण बाकी समस्यांचे काय?

आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतरच युक्रेनमधील रशियाची लष्करी कारवाई मागे घेण्यात येईल, असे वक्तव्य रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी केले.

रविवारी मरियूपोल या बंदराचा कब्जा घेण्यासाठी रशियन समर्थक बंडखोर व युक्रेनचे नॅशनल गार्ड यांच्यातील संघर्ष कायम होता. मरियूपोलमध्ये शस्त्रसंधीचे आवाहन करण्यात आले होते पण दोन्ही बाजूंनी ही शस्त्रसंधी फेटाळली गेली. निर्वासितांना सुखरूप जाता यावे यासाठी शस्त्रसंधीचे आवाहन करण्यात आले होते. पण ही शस्त्रसंधी उधळून लावण्याचे प्रयत्न झाले असे आरोप दोन्ही बाजूंनी एकमेकांवर केले.

दरम्यान युक्रेनवर रशियाकडून लष्करी कारवाई झाल्यानंतर सुमारे १५ लाखाहून नागरिकांनी युरोपकडे पलायन केले असून दुसऱ्या महायुद्धानंतर नागरिकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पलायन करण्याची ही पहिलीच घटना घडत असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. या संघर्षात रशियाचे ११ हजाराहून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र युक्रेनने या संघर्षात आपले किती सैन्य ठार झाले याचा तपशील जाहीर केलेला नाही.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना फ़ॉर्म भरण्याचे आवाहन

रविवारी युक्रेनमध्ये विशेषतः खारकीव व पीसोचेन येथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारतीय दुतावासाने गूगल फॉर्म भरण्याचे आवाहन केले आहे. हे फॉर्म नागरिकांनी तत्काळ भरावेत असेही दुतावासाने म्हटले आहे. या फॉर्ममध्ये नाव, इमेल, मोबाइल क्रमांक, सध्याचा वास्तव्याचा पत्ता, पासपोर्टमधील माहिती, लिंग व वय असा तपशील भरावयाचा आहे. या फॉर्ममध्ये आपण कुठे अडकलो आहे, याची माहितीही दुतावासाने मागितली आहे.

ऑपरेशन गंगा मार्फत युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने रुमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, मॉलडोव्हा या देशांच्या मदतीने भारतीयांची सुटका सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत ६३ विमानांद्वारे १३,३०० भारतीयांना मायदेशात आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील समी या शहरात अद्याप ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0