ट्रंप आणि बायडन यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग यात कमी आहे. अमेरिकेतलं लोकमत आणि अमेरिकेची आर्थिक-सामाजिक स्थिती हे अमेरिकेच्या या प्रतिमेचं मुख्य कारण आहे.
कुस्तीमधे खडाखडी नावाची एक स्थिती असते. कुस्तिगीर नुसते गोलगोल फेऱ्या मारत प्रतिस्पर्ध्याला जोखत असतात, मांडीवर आणि दंडावर थोटपत असतात, घडत काहीच नाही!
सध्या ती स्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे. रशियानं युक्रेनच्या हद्दीवर सैन्य उभं केलंय, क्रिमियासारखाच युक्रेन गिळायचा रशियाचा प्रयत्न दिसतोय. अमेरिका धमकी देतेय की बऱ्या बोलानं सैन्य मागं घ्या आणि युक्रेनच्या भानगडीत पडू नका. काही प्रक्षोभक केलंत तर कडक कारवाई करावी लागेल असं बायडन पुतीनना सांगत आहेत. होत काहीच नाहीये.ही अवस्था गेले कित्येक आठवडे आहे.
जवळपास तसंच चीनच्या बाबतीतही घडतंय. तैवानला उचकवण्याचा प्रयत्न कराल तर ते महागात पडेल असं चीन अमेरिकेला सांगतंय. तैवानच्या समुद्रात उभ्या असलेल्या अमेरिकन नौकादलाच्या प्रतिकृतीवर हवाई हल्ले करून एका नाटकाच्या रुपात चीन आपली ताकद आणि इच्छा अमेरिकेला दाखवू पहातेय. आणि तैवानला आपला पाठिंबा आहे, त्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत असं अमेरिका चीनला सांगतंय. नुसती भाषणबाजी, कित्येक आठवडे घडत काहीच नाहीये.
चीननं न बोलता पैसे गुंतवून अनेक देशांना आपलंसं करून ठेवलं आहे. त्यातला अगदी अलीकडं चीनला सामिल देश म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेतल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीननं पैसे घातलेत. अमेरिकाही युरोप आणि आशियात मित्रं गोळा करतेय. ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांना एकत्र गोवून त्यांच्याशी स्वतंत्रपणे संरक्षण आणि व्यापार करार अमेरिका करतेय. सुमो खेळाडू प्रतिस्पर्ध्याला मंचावरून ढकलून देतो तसं चीनला जगातून बाहेर ढकलण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
अमेरिका नुसत्या बाता मारतेय, प्रत्यक्षात घडत काहीच नाहीये.
अमेरिका मार आणि कच खातेय असं चित्र दिसतंय. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान यांना एकत्र करणारा करार अमेरिकेनं केला खरा पण तो करार अर्थपूर्ण व्हावा यासाठी आवश्यक खटपटी अमेरिकेनं केलेल्या नाहीत. भारताला आपल्या गटात पक्कं ठेवायचं तर भारतात आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे, भारतीय मालाला अमेरिकेची बाजारपेठ अधिक उघडी करून दिली पाहिजे, भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधे पैसे गुंतवले पाहिजेत. तसं घडताना दिसत नाहीये.
तिकडं ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये जुंपलीय. ऑस्ट्रेलियाकडून कच्च्या मालाच्या आयातीवर चीन बंधनं घालतंय. ऑस्ट्रेलियाला मजबूत करायचं असेल तर त्या कच्च्या मालाची काही तरी सोय करायला हवी, ऑस्ट्रेलियाचं निर्यात उत्पन्न वाढवण्याची काही तरी सोय केली पाहिजे. तसं अमेरिकेच्या हातून घडताना दिसत नाहीये.
जवळपास तीच स्थिती युरोपच्या बाबतीतही आहे. अमेरिका आपल्याला मित्र म्हणवते, नेतृत्व करू मागते पण त्यासाठी करत काही नाही अशी युरोप आणि आशियातल्या देशांची भावना आहे.
जे आर्थिक बाबतीत तेच सामरीक बाबतीतही. रशियाच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी अमेरिका आपली फौज युक्रेनच्या हद्दीवर नेऊन ठेवेल काय? रशियन रणगाड्यांवर बाँबफेक करेल काय? युरोपीय लष्कराला आणि हवाई दलाला अधिक चांगली शस्त्रं अमेरिका देणार आहे काय? युरोपातल्या लष्करावर अमेरिका अधिक पैसा खर्च करणार आहे काय? काही कळत नाहीये. तिकडं तैवानला घाबरवण्यासाठी जसं चीन तालमी करून आपण अमेरिकन नौकादलावर हल्ले करतोय असं दाखवतंय तसं अमेरिका काय करतेय? चीनच्या समुद्रातलं आपलं नाविक अस्तित्व अमेरिका अधीक मजबूत करतेय काय? तसं दिसत नाहीये.
एकेकाळी अमेरिका आक्रमक होती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका ताकदीनिशी उतरली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं कोरिया आणि व्हिएतनाममधे सैन्य घुसवलं. शीत युद्ध संपल्यानंतर कुवैत, इराक आणि अफगाणिस्तानात सैन्य घातलं. शिव्या खाल्ल्या पण दबदबा निर्माण झाला, अमेरिकेचं नेतृत्व अनेक देशांनी मान्य केलं. शेवटी समोरचा माणूस तुमचं ऐकतो जेंव्हा तुमच्याकडं ताकद असते. एक तर समोरच्याला आर्थिक आमिष दाखवावं लागतं नाही तर दंडुका उगारावा लागतो. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं दंडुक्याचा वापर केला आणि जर्मनी, जपान, कोरिया हे देश आर्थिक दृष्ट्या उभे राहतील यासाठी पैसे ओतले. आता अमेरिका ना पैसे ओततेय, ना दंडुका दाखवतेय.
अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडलीय. अफगाणिस्तानात अमेरिकेनं पचका केला. धड अफगाणिस्तान उभं केलं नाही, धड ताकदवान केलं नाही, अफगाणिस्तान आधी होतं त्यापेक्षा अधीक अशक्त करून अमेरिका बाहेर पडली. ट्रंप आक्रमक होते, पण जगाच्या जबाबदारीतून बाहेर पडू पहात होते, जगाचं नेतृत्व करायला तयार नव्हते. बायडन आक्रमक नाहीत, हलक्या आवाजात बोलतात, आर्जवं केल्यासारखं वागतात. ट्रंप असोत की बायडन, अमेरिका आता नेतृत्व करू इच्छीत नाही, अमेरिकेची आता नेतृत्व करण्याची ताकद नाहीये असं चित्र निर्माण झालंय.
ट्रंप आणि बायडन यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग यात कमी आहे. अमेरिकेतलं लोकमत आणि अमेरिकेची आर्थिक-सामाजिक स्थिती हे अमेरिकेच्या या प्रतिमेचं मुख्य कारण आहे.
अमेरिकन लोकमत विभागलेलं आहे. फार माणसं आता म्हणतात की जगाच्या भानगडीत आपण पडतो आणि त्यापायी किती तरी अमेरिकन माणसं परदेशी भूमीवर मरतात. आपल्या मुलाभावांच्या शवपेट्या पहायचं दुःख नको असं अमेरिकन माणसं बोलू लागलीत. युरोपीय देश, कोरिया, जपान, यांच्या मदतीसाठी पैसा खर्च करणं आता थांबवा कारण आपलीच आर्थिक स्थिती खराब आहे असं अमेरिकन लोक आता म्हणू लागले आहेत. इतके अब्ज जपान आणि कोरियात सैन्य ठेवण्यासाठी खर्च करतो आणि अमेरिकेतल्या गरीबांवर खर्च करायला आपल्याकडं पैसे नाहीत हे बरोबर नाही असं अमेरिकन नागरीक म्हणू लागलेत. खुद्द अमेरिकेतलंच इन्फ्रास्ट्रक्चर वाईट स्थितीत आहे. वादळं, कोविड, आगी आणि पूर यांच्या फटक्यामुळ अमेरिकी अर्थव्यवस्था म्हणावी तितकी प्रबळ नाहीये असं लोकांना वाटू लागलंय.
नेतृत्व करावंसं वाटतंय आणि करू नयेसं वाटतंय अशी द्विधा मनस्थिती अमेरिकेत आहे. तोच गोंधळ बायडन यांच्या धोरणात प्रतिबिंबित होतोय.
निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.
COMMENTS