कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही असा समज अमेरिकेमध्ये होता किंवा या साथीवर औषधांच्या माऱ्याने सहज मात करता येईल असे या समाजाला वाटत होते. पण तसे काही घडले नाही. या विषाणूने त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. हाच बेदरकारपणा त्यांनी १९१८ साली सुद्धा दाखवला होता.
१५ ते १७व्या शतकाचा कालखंड हा खूपच चित्तथरारक व विलक्षण होता. या कालखंडात जगाला धुंडाळले
जात होते व नवीन प्रदेश शोधला जात होता व नंतर तो पादाक्रांत केला जात होता. त्या काळचा युरोप वैज्ञानिक क्रांतीत अग्रेसर होता. त्यांनी नवनवीन अस्त्र तयार केली होती, दूर जाणारी जहाजे तयार असतं, त्यामुळे दुरच्या संस्कृतीत डोकावून पाहण्याचा व त्यांना बदलण्याचा मोह त्यांना आवरत नव्हता. इंग्लंडने १५८५ मध्ये अशीच एक अमेरिकेतील नवीन प्रदेश धुंडाळण्याची मोहीम आखली होती. त्यासाठी त्यांनी त्या काळच्या एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाला, थॉमस ह्यरियत, यांना या मोहिमेचे नेतृत्व बहाल केले होते. इंग्लंडने आधीच अमेरिकेत आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. त्यांना आजच्या अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतात पाठवण्यात आले होते. तिथे अल्गोन्क्वेन जमात राहत होती. त्यांना या जमातीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे व तिथे कोणती व कशा प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती अस्तित्वात आहे याचा आढावा घेण्याचे काम देण्यात आले होते.
थॉमस यांचा अनुभव काय व कसा होता?
थॉमस यांनी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रदेशात पाय ठेवला तेव्हा त्यांनी त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाअंती त्यांच्या लक्षात आले की ही जमात अनेक सांस्कृतिक कसोट्यांवर पुढारलेली आहे. त्यांची शिकार व मासेमारी तसेच कृषिकर्म करण्याची पद्धत पुढारलेली होती. त्यांचे कौटुंबिक व समूहातील बंध घट्ट व सामंज्यसाचे होते. त्यांच्या समाजाची एक घट्ट वीण होती. समाजात बंधुता होती.
पण थॉमस यांना त्यांच्याशी फक्त मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे नव्हते तर त्यांच्यावर अधिकार गाजवायचा होता, त्यांना पराभूत करून त्यांच्यावर गुलामी लादायची होती. ते आपल्यासोबत त्यांच्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांना घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यात जायचे व तिथल्या लोकांना त्यांच्या अधिपत्याखाली येण्याची समज द्यायचे. ही मग्रुरी त्यांच्याकडे असणाऱ्या बंदूक व इतर शस्त्रास्त्रांमुळे आली होती. पण जरी त्या जमातीला लिहिणे-वाचणे येत नसले तरी त्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान होता. कोणीही येऊन आपल्यावर अधिकार गाजवणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही अशी खूणगाठ त्या जमातीतील योद्ध्यांनी बांधली होती. त्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार होते. पण थॉमस प्रत्येक खेड्यात जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. या साऱ्या प्रयत्नात त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. ज्या ज्या खेड्यातून ते व त्यांचे सहकारी भेट देऊन येत त्या त्या खेड्यात एक-दोन दिवसानंतर तेथील काही स्थानिक मरण पावत.
हे मरण अतिशय जलद व अचानक असायचे आणि स्वाभाविकपणे त्याच्यावर कोणताही इलाज नव्हता.
स्थानिकांना या अचानक येणाऱ्या मरणाचे व आजाराचं कोणत्याही प्रकारचे ज्ञान नव्हते. पण थॉमस यांना हा नेमका कोणता आजार आहे हे लक्षात आले होते. त्यांनी हा आजार इंग्लंडमध्ये अनुभवला होता. त्यांना स्थानिकांच्या लक्षणावरून हा आजार गोवर, देवी व शीतज्वर प्रकारातला आहे हे लगेच लक्षात आले. स्थानिक जमातीतील काही जाणत्या मंडळींशी बोलल्यानंतर त्यांना कळले की हा आजार त्यांच्या जमातीत आधी कधीच झाला नव्हता. थॉमस यांना समजले की परदेशातून आलेल्या आपल्या लोकांनीच हा आजार अमेरिकेत आणला आहे. पण त्यांनी ही बाब स्वीकारली तर स्वतःचा गुन्हा मान्य करावा लागला असता. पण आपल्या अपराधीपणाची भावना कमी करण्यासाठी त्यांनी स्वतःलाच समजावले की कोणती तरी दैवी शक्ती या जमातीला शिक्षा करते आहे.
अल्गोन्क्वेन जमातीला काय वाटत होते?
थॉमस यांची भावना अपराधीपणा कमी करण्यासाठी असली तरी ती समर्थनीय आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. पण त्या जमातीतील लोकांना काय वाटत होते? त्यांना माहिती होते की जे आगंतुक पाहुणे आलेले आहेत त्यांची संख्या कमी आहे. पण त्यांचे अंतर्मन त्यांना सांगत होते की फार मोठ्या संख्येने थॉमस यांच्याबरोबर अदृश्य लोक आहेत जे त्यांच्यावर अदृश्य गोळ्या झाडून त्यांना मारत आहेत. त्या बिचाऱ्यांना हे माहिती नव्हते की या परदेशी लोकांनी आपल्याबरोबर विषारी विषाणू आणले आहेत जे त्यांचा घात करत आहेत. त्यांनी आधी कधीच असल्या विषाणूंचा सामना केला नसल्यामुळे त्यांच्या शरीरात कोणतीही संरक्षक फळी निर्माण झाली नव्हती.
भारतानेही वसाहतवाद्यांकडून अशाच प्रकारे प्लेगच्या माध्यमातून नवीन विषाणूंचा मारा सोसला आहे. १८९६चा प्लेग अनेक लाख लोकांचे प्राण घेऊन गेला होता.
अमेरिका कोविड-१९चा मारा का परतवू शकली नाही?
अमेरिका सध्या कोरोना प्रादुर्भावाबाबतीत आघाडीवर आहे. चीन आणि इटलीला मागे टाकून हा देश पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. जेव्हा या आजाराचा प्रकोप त्या देशापर्यंत पोहोचला होता तेव्हा तिथल्या प्रशासनाने त्याला फारशा गांभीर्याने घेतले नाही. त्यांना वाटले हा आजार अमेरिकनांना होणार नाही किंवा त्याच्यावर औषधांच्या माऱ्याने सहज मात करता येईल. पण तसे काही घडले नाही. या विषाणूने त्यांना सळो की पळो करून सोडले आहे.
हाच बेदरकारपणा त्यांनी १९१८ साली सुद्धा दाखवला होता. त्यावेळी त्यांनी स्पॅनिश फ्लू बद्दल जितकं गांभीर्याने लक्ष द्यायला हवं होतं तितक्याने दिले नव्हते.
स्पॅनिश फ्लू आणि अमेरिका
पहिल्या महायुद्धावेळी व त्याच्या आगेमागे सुद्धा, फ्लूचा एक वेगळा विषाणू विकसित झाला होता. या विषाणूची लागण होऊन अनेक सैनिक मेले होते. या महायुद्धाचे सर्व प्रमुख भागीदार, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि अन्य युरोपीय देश या आजाराला महासाथीचा दर्जा द्यायला तयार नव्हते. त्याचे कारण त्यांना आपल्या राष्ट्राचे व सैनिकांच्या मनोबलाचे खच्चीकरण करायचे नव्हते. पण स्पेन हा देश पहिल्या महायुद्धात तटस्थ होता. जेव्हा त्या देशात विषाणूचा कहर सुरू झाला तेव्हा कुणाचेही मनोबल खच्ची होणार नव्हते. म्हणून त्यांना आपल्या देशाच्या नागरिकांपासून कोणतीही माहिती लपवण्याची गरज नव्हती. त्यामुळे या महासाथीची कथा सर्व वर्तमानपत्र व नियतकालिकातून कोणत्याही काटछाटीविना प्रसारित केली जायची. पण जेव्हा या विषाणूने साऱ्या जगाला वेठीस धरले तेव्हा त्याचे नामकरण स्पॅनिश फ्लू असे करण्यात आले. जसे काही हा आजार स्पेन देशात उद्गमित झाला होता!
मनोबल उंच राखण्याच्या हट्टामुळे अमेरिकेला फार मोठी किंमत मोजावी लागली. या आजाराने त्या काळचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनाही पछाडले होते. स्पॅनिश फ्लू जेव्हा अमेरिकेत दाखल झाला तेव्हा त्याबद्दल जनजागृती झाली नाही व हा वेगळ्या नावाचा सामान्यच फ्लू आहे अशी त्याची थट्टा केली गेली. सामान्य फ्लू बहुत करून एकतर फार कमी किंवा फार वयस्क लोकांना आपले लक्ष्य बनवतो. स्पॅनिश फ्लू मात्र निरोगी जवानांना आपल्या कवेत घेतो. आणि त्याकाळी निरोगी जवानांचा मोठा जत्था सैनिकी छावणीत सापडत असे.
फिलाडेल्फिया आणि फ्लू
त्याकाळच्या वर्तमानपत्र व प्रशासकीय अधिकाऱ्यांना या विषाणूची दाहकता लक्षात आली होती. पण लोकांपर्यंत त्याची माहिती किंवा लोकजागरण केले गेले नाही. फिलाडेल्फियात एक सैनिकी परेड आयोजित करण्यात आली होती. तिथल्या डॉक्टरांनी ही परेड रद्द करावी, असा आग्रह धरला होता. पण त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. त्याची लागण इतरांनाही होईल, अशी डॉक्टरांनी इशारावजा सूचना केली होती आणि झालेही तसेच. दोनच दिवसात स्पॅनिश फ्लूची साथ पूर्ण शहरात पसरली. इतके होऊनही प्रशासन जागे झाले नाही. त्यांनी ही लागण इतरांना होऊ नये किंवा दुसरीकडे पसरू नये यासाठी कोणतीही योजना आखली नाही.
परिणामतः हा विषाणू अमेरिकेतील इतर ठिकाणीही पोहोचला. पण जेव्हा प्रशासनाला स्पॅनिश फ्लूच्या धोक्याची पूर्ण कल्पना आली तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यांनी सामाजिक विलगीकरण व अलगीकरणाचे उपाय अमलात आणायचे प्रयत्न केले. तरीसुद्धा अमेरिकेत सप्टेंबर ते ऑक्टोबर १९१८ या मर्यादित काळात सुमारे ७० लाख लोक मृत्युमुखी पडले व जगात इतरत्र ५०० लाख लोकं मेली.
गेल्या काही दशकातील साथीच्या रोगांचा अंत कसा झाला?
गेल्या काही दशकात बोटांवर मोजण्याइतपत फार गंभीर साथीचे रोग साऱ्या जगभर पसरले होते. त्यांचा त्रास साऱ्या जगाला झाला. या विषाणूंचा एक परत परत लक्षात येणारा गुणधर्म म्हणजे त्यांच्यात होणारे अनुवांशिक बदल. या बदलानंतर जर त्यांचा शिरकाव मानवाच्या शरीरात झाला तर तो मानवाच्या शरीराला मानवणारा नसतो. आपल्या शरीरात जे लाखो-करोडो सूक्ष्मजीवाणू असतात त्यांना आपल्या शरीरात येणारा जीवाणू किंवा विषाणू आपला मित्र आहे की शत्रू हे माहिती असते. शत्रूंना कसे परतवून लावायचे हे आपल्या सूक्ष्मजीवांना माहिती असते. पण बदललेल्या विषाणूंना परतवून लावायचे कसब त्यांना ज्ञात नसते. त्यामुळे आपला घात होत असतो.
मे २००२ साली सार्सचा उपद्रव सुरू झाला होता. हा विषाणू पहिल्यांदा चीन येथील गवोन्गडॉन प्रांतात आढळला होता. हा प्रदेश हॉंगकॉंगच्या नजीक आहे. या फ्लू सारख्या विषाणूने जेव्हा आपल्या शरीराची संरचना बदलली तेव्हा तो आपल्यासाठी घातक झाला व जगभर त्याने थोड्याच दिवसात ८ हजार लोकांना संक्रमित केले व ८०० लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरला. सुरुवातीला या विषाणूंवर मारा करणारी कोणतीही लस अस्तित्वात नव्हती. पण साफसफाई व स्वच्छतेची योग्य काळजी घेतल्यानंतर ही महासाथ कमी झाली. जाणकारांच्या मते मोसम बदलल्यामुळे सुद्धा हा विषाणू आटोक्यात आला. WHO ने जुलै २००३ साली ही महासाथ संपली हे घोषित केले होते, पण २००४च्या पहिल्या काही महिन्यात सुद्धा काही रुग्ण आढळले होते. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, अनेक विषाणूबाधीत रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की संक्रमित झालेले रुग्ण स्वतःच विषाणूविरोधी संरक्षक प्रणाली तयार करतात.
मौसमबदलाने H1N1 विषाणूला सुद्धा निष्प्रभ केले होते. या विषाणूने २००९ साली घातक रोगाची साथ सुरू केली होती. गेल्या काही साथीचा अभ्यास केल्यानंतर जाणकारांच्या असे लक्षात आले आहे की काही साथीचे रोग मौसमी असतात. ते हिवाळ्यात मोठ्या संख्येने लोकांना संक्रमित करतात व उन्हाळ्यात त्यांचा जोर ओसरतो. हे असे का होतं याचा योग्य अंदाज कोणीही अजून बांधू शकलं नाही. पण असं घडत. कोरोनाबाबत असंच काहीसं घडेल का? हा लाखमोलाचा अंदाज खरा ठरू दे अशी सर्वजण अपेक्षा करत आहेत.
आजपर्यंतच्या मोठ्या साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी लस आणि विषाणू-विरोधी औषधांचा उपयोग करून त्यांचा कहर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यात ते यशस्वीही झालेले आहेत. पण हा मार्ग अवलंबल्यानंतर तो यशस्वी होईपर्यंत काही कालावधी खर्ची घालावा लागतो. यात फार मोठी जीवितहानी होऊ शकते. लस विकसित करण्यासाठी संशोधन अन् पैशाची गरज असते. त्याचे मार्केटिंग तितकेसे कठीण नसते कारण नवीन विकसित केलेल्या लसीचा वापर करण्यासाठी सारे रुग्ण आतूर असतात. इबोलानामक विषाणूज्वराचे २०१४साली लसीच्या मदतीने निर्मूलन करण्यात यश आले होते. हा रोग पश्चिम आफ्रिकेत उद्गमित झाला होता व नंतर साऱ्या जगात पसरला होता. त्याचे समूळ उच्चाटन झाले असा सर्वांचा समज झाला होता. पण २०१८ साली त्याचे पुनरुज्जीवन काँगो देशात झाले होते. पण त्याचा लागलीच लसीच्या साहाय्याने खात्मा करण्यात आला होता.
कोरोना उच्चाटन
इतिहासात डोकावून पाहताना साथीचे रोग कशाप्रकारे जगाला मरणयातना देतात व त्यांना कशाप्रकारे निष्प्रभ केले जाते याचे पक्के ज्ञान आपल्याला आहे. कोरोनाबाबत आपल्यापाशी सध्यातरी अचूक मारा करणारी लस नाहीये, पण सामाजिक विलगीकरण व अलगीकरण करून नवीन रुग्ण तयार होणार नाहीत याचा गुणमंत्र अवलंबवून या विषाणूला काही काळासाठी थोपवण्यात आपण यश मिळवू शकतो. तोपर्यंत नवीन व परिणामकारक लस निर्माण होऊ शकेल ही आशा फोल ठरणार नाही.
सुरुवातीला कोणत्याही नव्या विषाणूबाबत व त्याच्या मारकशक्तीबाबत सारे अनभिज्ञ असतात. त्याच्यामुळे या अशा विषाणूविरोधात कोणत्या प्रकारची योजना बनवावी याबाबत संभ्रम असतो.पण एकदा का हा संभ्रम निघून गेला की सरकारच्या साऱ्या यंत्रणा कामाला लागतात. कोरोनाबाबत आपण त्या स्थितीत पोहोचलेलो आहोत. साऱ्या जगभर कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
अजून थोड्या दिवसात किंवा आठवड्यात परिस्थिती बदलेल यात कोणतीही शंका नाही. पण तोपर्यंत एकमेकांपासून अंतर राखणे हाच एक सकारात्मक पर्याय आपल्यासमोर आहे.
प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
COMMENTS