अमेरिकेतील ‘देशद्रोही’ जपानी

अमेरिकेतील ‘देशद्रोही’ जपानी

अमेरिकेतल्या जपानी नागरिकांना अमेरिकेनं देशद्रोही ठरवून चार वर्षं तुरुंगात लोटलं होतं त्याला कालच्या डिसेंबरमधे ८० वर्षं झाली. ७ डिसेंबर १९४१ रोजी

‘लिव्ह इन रिलेशनशीप कायदेशीरच’
तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम
यूजीसीकडून भारतीय इतिहासाचे ‘भगवेकरण’

अमेरिकेतल्या जपानी नागरिकांना अमेरिकेनं देशद्रोही ठरवून चार वर्षं तुरुंगात लोटलं होतं त्याला कालच्या डिसेंबरमधे ८० वर्षं झाली.

७ डिसेंबर १९४१ रोजी जपाननं पर्ल हार्बर या बंदरातल्या अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला केला. जपान, अमेरिका युद्ध सुरु झालं. अमेरिकन सरकारनं लगोलग अमेरिकेत रहाणाऱ्या तमाम जपानी लोकांना देशद्रोही म्हणून जाहीर करून टाकलं.

पर्ल हार्बर हे अमेरिकेच्या अधिपत्याखालच्या हवाई बेटांमधील एक बेट.

हवाई बेटं आपलीच आहेत असा जपानचा दावा होता.

१९४० च्या आधीची दहा वर्षं जपान आपलं साम्राज्य चीन, इंडोचीन, इंडोनेशिया, फिलीपीन्स इत्यादी विभागात फैलावत होता. अमेरिकेला ते मंजूर नव्हतं. जपानला वेसण घालणं, त्यांचा प्रसार रोखणं हे अमेरिकेचं उद्दीष्ट होतं. अमेरिकेनं जपानशी व्यापारी संबंध कमी केले, त्यांना मालाचा आणि तेलाचा पुरवठा थांबवला. दोन देशांत तणाव होते. दोन्ही देश एकमेकावर स्वारी करण्याच्या खटपटीत होते, सैन्याची जमवाजमव करत होते.

अमेरिका आपल्यावर हल्ला करेल असं वाटल्यानं पूर्वकाळजी म्हणून अमेरिकेवर हल्ला करायचं जपाननं ठरवलं. पर्ल हार्बरवर हल्ला केला.

हल्ला फार प्रभावी होता. अमेरिकेची विमानं नष्ट झाली, अनेक बोटी निकामी झाल्या, सुमारे २५०० माणसं ठार झाली.

अमेरिकेनं दुसऱ्या दिवशी जपान विरोधात युद्ध पुकारलं.

आधीची वीस ते तीस वर्ष जपान आणि अमेरिकेतले संबंध कधी नरम कधी गरम असे होते. कधी त्यांच्यात छान व्यापार चाले तर कधी अमेरिका जपानवर निर्बंध घाले. या वीस वर्षाच्या काळात लाखो जपानी अमेरिकेत स्थायिक झाले, त्यांनी अमेरिकेत कामधंदे उभारले.

पर्ल हार्बरवर हल्ला झाल्यानंतर युद्ध सुरु झालं, जपान हे अमेरिकेचं शत्रूराष्ट्र झालं.

लगोलग दुसऱ्याच दिवशी अमेरिकेतले जपानी लोक देशद्रोही झाले.

अमेरिकन सरकारनं तमाम जपानी लोकांना छावण्यात बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अमेरिकाभर बराकी तयार करून त्यात जपानी लोकांना डांबण्यात आलं. बराकीभोवती तारेचं, विजेचं कुंपण आणि टेहळणी बुरूज बसवण्यात आले.

कॅलिफोर्नियात सुमारे सव्वालाख जपानी होते.जपानी रहात होते त्या वस्तीत बसेस उभ्या राहिल्या. अमेरिकन पोलिस आणि आणि लष्करानं हुकूम केला की प्रत्येकानं फार तर एकादी बॅग घ्यायची आणि बॅगेत त्यांना हव्या तेवढ्या वस्तू घ्यायचा आणि अंगावरच्या कपड्यानिशी बसमधे बसायचं.बसेस गावाबाहेर रातोरात बांधलेल्या बराकी छावण्यात बसेस पोचल्या.

एक बराक. त्यात पाच पन्नास माणसं, रांगेनं कॉट्स ठेवलेल्या आणि भिंतीला लागून वस्तू ठेवण्यासाठी एकेक कपाट. कॉमन संडास. म्हणजे दहा कमोड एकमेकाशेजारी, सर्वांनी सामुहीक शी करायची.

छावणी म्हणजे तुरुंगच होते. तुरुंगातल्या माणसांना मिळतो तसा भत्ता अमेरिकन सरकार जपान्यांना देत होतं.

तुरुंगात असलेल्यांत कित्येक लोक अमेरिकेत जन्मलेले होते, अमेरिकन नागरीक होते. बहुतेक लोक अनेक वर्षं अमेरिकेत राहिल्यानं सवयीनं अमेरिकन नागरीक झाले होते. जपानी सरकारनं हल्ला केला म्हणजे या जपान्यानी हल्ला केला नव्हता.अमेरिकेतल्या जपान्यांना त्यासाठी जबाबदार धरणं योग्य नव्हतं.

युद्ध वगैरे भानगड आली की जनता भारावून जात असते. देशासाठी काहीही न केलेली माणसं एकदम देशभक्त होतात आणि एकाद्याला गाठून देशद्रोही म्हणून बडवलं की आपण देशभक्त झालो अशी भावना लोकांमधे निर्माण होते. एकादं टोळकं जेव्हां एकट्या दुकट्याला गाठून ठेचून मारतं तेव्हां त्यात हात धुवून घेणारा माणूस कितीही दुबळा असला तरी त्या क्षणी त्याला आपण सिंह आहोत असं वाटतं, तेवढंच सुख त्याला मिळतं.

यालाच युद्धज्वर असं म्हणतात. मुंबईत, दैनिकाच्या कचेरीत, एका संरक्षीत खोलीत, बसलेला संपादक या तापानं फणफणतो आणि युद्धाच्या गोष्टी पेपरात रंगवू लागतो. मरणाऱ्या सैनिकाला चहात बिस्कीट बुडवता बुडवता आगे बढो म्हणून सांगू लागतो.

जपानी माणसांना चारेक वर्षं छळ सहन करावा लागला.

नंतर चाळीसेक वर्षांनी रोनाल्ड रेगन यांनी प्रेसिडेंट झाल्यावर जपान्यांची क्षमा मागितली, आमची चूक झाली (आमची म्हणजे व्यक्तिगत आपली नव्हे, अमेरिका या देशाची) हे मान्य केलं आणि छळ झालेल्या लोकांना काही एक नुकसान भरपाईही जाहीर केली.

आज कॅलिफोर्निया विश्वशाळेत चार वर्षांची कहाणी इतिहासाचा भाग म्हणून शिकवली जाते. जपानी आणि जपानी नसलेले विद्यार्थी ही कहाणी अभ्यासतात. पुन्हा आपल्या हातून असं घडता कामा नये असं या विद्यार्थ्यांच्या मनात येतं.

जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटीश राजमुकुटातर्फे भारताची अधिकृत माफी मागण्यात आली होती.

अल्जेरियात फ्रेंच सरकारनं केलेल्या अत्याचाराबद्दल फ्रेंच जनतेच्या वतीनं फ्रेच अध्यक्षांनी अल्जेरियात जाऊन तिथल्या जनतेची माफी मागितली.

दुसऱ्या महायुद्धातली एक घटना सांगितली जाते. इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात युद्ध सुरु झालं होतं. एका जर्मन माणसाला लंडनमधे कुठल्या तरी कारणासाठी अटक झाली होती. त्याला कोर्टात उभं करण्यात आलं. कोर्टानं त्याला एक नागरीक म्हणून वागवलं, त्याला जर्मन आहे म्हणून शत्रुत्वाची वागणूक देऊ नका असं पोलिसांना बजावलं.

१९८४ साली दोन शिख जवानांनी इंदिरा गांधी यांचा खून केला. देशभर दुःख आणि संतापाची लाट उसळली होती. शिखांच्या विरोधात वातावरण तयार झालं होतं. कित्येक ठिकाणी (उदा. औरंगाबाद) शिखेतर माणसं गोळा झाली आणि त्यांनी शिखांच्या वस्त्यातं जाऊन त्यांचं संरक्षण केलं, त्यांच्यावर हल्ला होणार नाही याची काळजी घेतली.

पण दिल्लीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या वातावरणाचा फायदा घेऊन दिल्लीत शिखांना मारलं.

मनमोहन सिंग सुवर्ण मंदिरात गेले आणि तिथं ग्रंथसाहेबासमोर डोकं टेकवून क्षमा मागितली.

परवापरवाची गोष्ट. टेक्सासमधे एक चक्रम मुस्लीम सिनेगॉगमधे (ज्यूंचं मंदिर) बंदुक घेऊन घुसला, तिथं जमलेल्या लोकांना ओलीस ठेवलं. टेक्सासच्या तुरुंगात दहशतवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका मुस्लीम महिलेला सोडवा नाही तर या ज्यूंना मारतो असं तो म्हणत होता. पोलिसांनी कारवाई केली, ओलिसांना सोडवलं. या खटाटोपात तो चक्रम मारला गेला.तो चक्रम ब्रिटनचा नागरीक होता.

ब्रिटनमधल्या आणि अमेरिकेतल्या मुसलमान संघटनांनी पत्रक काढलं, त्या चक्रमाचा निषेध केला आणि तो चक्रम मुसलमानांचा प्रतिनिधी मानू नका असं म्हटलं. ज्यू संघटनांनी पत्रक काढलं आणि आता अखिल मुस्लीम समाजाच्या विरोधात लढाई वगैरे करू नका असं म्हटलं.

माणसं आणि देश कधी कधी शहाण्यासारखं वागतात. बरं वाटतं.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0