अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सुलेमानी ठार; तणाव वाढला

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सुलेमानी ठार; तणाव वाढला

वॉशिंग्टन /तेहरान : इराणच्या शक्तीशाली अशा ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे कमांडर जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेने हवाई हल्ल्यात शुक्रवारी ठार झाले. कासिम सुलेमानी यांना ठार मारण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते त्यानुसार त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. हा हल्ला बगदाद विमानतळावर झाला.

सुलेमानी यांच्या अशा हत्येनंतर इराण व अमेरिकेदरम्यान तणाव निर्माण झाला असून या हल्ल्याचा निषेध इराकने केला आहे पण इराणने या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, अशी धमकीही अमेरिकेला दिली आहे.

जनरल कासिम सुलेमानी हे इराणची शक्तीशाली रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख होते पण ते इराक-सीरियात कार्यरत असणाऱ्या अल-कुर्द या लढाऊ फौजेची प्रमुख पदही सांभाळत होते. ते इराणच्या संरक्षण दलात अत्यंत निष्णात अधिकारी म्हणून ओळखले जात असायचे. तसेच इराणच्या राजकारणातही ते प्रभावी होत चालले होते. ते इराणचे अध्यक्षही होतील असे अंदाज वर्तवण्यात येत होते.

अमेरिकेने कासिम सुलेमानी यांना ठार मारण्याचे आणखी एक कारण म्हणजे ज्या अल-कुर्द फौजेचे ते प्रमुख होते त्या संघटनेला अमेरिकेने कडव्या दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट केले होते. सुलेमानी हे प. आशियातील विशेषत: इराकमधील अमेरिकेच्या लष्करी व्यवस्थेला, बड्या लष्करी अधिकाऱ्यांना व राजनैतिक अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा कट रचत होते, त्यामुळे त्यांना ट्रम्प यांच्या आदेशानुसार ठार मारण्यात आले, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

शुक्रवारी सुलेमानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असता त्यांच्या वाहन ताफ्यावर ३ रॉकेट डागण्यात आली. त्या हल्ल्यात सुलेमानी यांच्यासह ‘हशद अल-शाबी’ या शक्तीशाली निमलष्करी दलाचा उपप्रमुख अबु महदी अल मुहंदिसही यांनाही ठार मारण्यात आले.

इराकमधील अमेरिकी दुतावासावरील हल्ल्याने ठिणगी पेटली

काही दिवसांपूर्वीच इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासावर जमाव चालून गेला होता. या जमावात कट्‌टर हशद गटाचे काही लोक होते. या जमावाने कित्येक तास या दुतावासाला चोहोबाजूंनी घेरले होते आणि जाळपोळ केली होती. या घटनेनंतर याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला होता. त्यानंतर सुलेमानी यांना लगेच ठार मारण्यात आले.

सुलेमानी यांना मारल्यामुळे अमेरिकेवर हल्ला करण्याचा इराणचा जो प्रयत्न तो ट्रम्प यांनी उधळून लावला, असे पेंटागॉनने म्हटले आहे. अमेरिकेच्या या हल्ल्याचे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी समर्थन केले आहे. त्याच बरोबर अनेक रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.

इराणमध्ये तीन दिवस शोक

दरम्यान, जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा इराण लवकरच बदला घेईल, अशी धमकी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी व या देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी दिली आहे. अमेरिकेची वाढती दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अमेरिका प. आशियातील अनेक देशांचे स्वातंत्र्य मान्य करत नाही व हा देश इस्लामी मुल्यांची कदर करत नाही अशा देशाला धडाच शिकवणे योग्य आहे, असे या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. इराणमध्ये सुलेमानी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरकारने ३ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

इराक सोडण्याचे अमेरिकी नागरिकांना आदेश

अमेरिकेवर हल्ला करण्याची इराणची धमकी पाहता अमेरिकी सरकारने इराकमध्ये राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर देश सोडावा असे आदेश दिले आहेत. विमान असो वा जहाज एकाही अमेरिकी नागरिकाने इराकमध्ये राहू नये, असेही अमेरिकेने बजावले आहे.

शुक्रवारी रात्री पुन्हा हल्ला

अमेरिकेने इराकच्या बगदादमध्ये शनिवारी पुन्हा हवाई हल्ला केला. उत्तर बगदादमध्ये पहाटे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ताजी स्टेडीयम जवळ इराणचा पाठींबा असलेल्या इराकच्या पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सवर हा हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीनजण गंभीर जखमी आहेत.

मूळ बातमी

COMMENTS