कलाकार गप्प का आहेत?

कलाकार गप्प का आहेत?

‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ (एनजीएमए) येथे आयोजित प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात, सरकारी कला संस्थेच्या कारभारावर आणि निर्णयांवर टीका करणे सुरुवात केल्यावर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना भाषण करताना वारंवार थांबविण्यात येत होते. त्याविषयी त्यांनी आज पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली आणि कलाकार-प्रेक्षक गप्पा का आहेत, हा सवाल केला.

अमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण! सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य!
आज बौद्धिक सहिष्णुतेची गरज आहे
आम्ही एकत्र आहोत!

पुणे: ‘औचित्यभंग’ केल्याचा जो ठपका माझ्यावर मारण्याचा प्रयत्न होतो आहे, तो सर्वार्थाने चुकीचा आहे. माझ्या भाषणांमध्ये दोन गोष्टींवर मी बोललो –  प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचा रसास्वाद आणि त्यानंतर ते प्रदर्शन ज्या वास्तूमध्ये घडलं होतं त्या वास्तूची भविष्यात होऊ घातलेली मोडतोड! ज्येष्ठ नाट्य-चित्र अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर म्हणाले, की अभिव्यक्तीचा मुद्दा एकट्या पालेकरांचा नाही, सर्वांचा आहे. हा प्रसंग घडून आज 30 तास उलटून गेले तरी सुद्धा एकाही कलाकाराने त्याविषयी आवाज उठवू नाही हे खेदजनक आहे.

सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईमध्ये असलेल्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ (एनजीएमए) येथे आयोजित उद्घाटन कार्यक्रमात भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर पालेकर यांनी टीका करणे सुरु करताच, प्रदर्शनाच्या संयोजक जेसल ठक्कर, गॅलरीच्या संचालिका अनिता रुपवर्तम आणि ‘एनजीएमए’च्या मावळत्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सुहास बहुळकर यांनी अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच थांबविले होते. भाषणामध्ये, एनजीएमए सारख्या अत्यंत प्रेक्षणीय वास्तूमध्ये सध्याच्या प्रदर्शनानंतर कोणतेही प्रदर्शन यापुढे पाचही मजल्यांवर घडवले जाणार नाही; आता कलाकारांच्या स्थानिक सल्लागार समितीला बरखास्त करून थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर ठक्कर, बहुळकर आणि रुपवर्तम यांनी औचित्याभंगाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात आज पालेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे स्पष्टपणे विषद केले. पालेकर यांच्या पत्नी, प्रसिध्द वकील आणि लेखिका संध्या गोखले शुक्रवारी मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये असल्याने झालेल्या सर्व प्रसंगाच्या साक्षीदार होत्या.

अमोल पालेकर म्हणाले, “मला ज्यावेळी संस्थेकडून कार्यक्रमास बोलावले, त्यावेळी कोणत्या विषयावर बोलायचे आणि कोणत्या विषयावर नाही, याविषयी सांगण्यात आले नव्हते. जर तसे सांगण्यात आले असते, तर मी त्या कार्यक्रमाला गेलोच नसतो. ज्या वास्तूमध्ये प्रदर्शन घडले आहे त्या वास्तुचा जर अपमान होत असेल तर ते मुकाट सहन करणे माझ्यासारख्या कलावंताला अशक्य आहे. ‘एनजीएमए’बद्दल त्याच संस्थेच्या कार्यक्रमात बोलणे अप्रस्तुत कसे असेल? ‘एनजीएमए’मध्ये यापुढे पाच मजल्यांपैकी चार मजल्यांवर ‘एनजीएमए’च्याच संग्रहातील चित्रांची प्रदर्शने लावली जाणार असून, नव्या कलाकारांना फक्त वरचा एकच मजला मिळणार आहे, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. मेहली गोबाय आणि सुधीर पटवर्धन या अतिशय नावाजलेल्या कलाकारांची चित्र प्रदर्शने येथे आयोजित करण्याचा पूर्वीचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात रद्द करण्यात आला आहे. हे निर्णय अस्वस्थ करणारे आहेत. मात्र याविषयी पटवर्धन यांनी काहीही आवाज उठवलेला नाही. इतकेच नाही तर पटवर्धन शुक्रवारी प्रेक्षकांत बसले होते, तेव्हा सुद्धा त्यांनी “अमोलला का थांबवत आहात तो खरं बोलत आहे.” असे म्हणून त्यांनी माझ्या बोलण्यालाही पाठींबा दिला नाही. तरुण कलाकारांनी आणि इतर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मात्र कोणा एकानेही पालेकरांना भाषण पूर्ण करू द्या, असे सांगितले नाही. अभिव्यक्तीचा मुद्दा कलाकार आणि प्रेक्षकांनाही महत्त्वाचा वाटत नाही का?”

यापुढे आपण काय भाषण करणार आहोत, याची स्क्रिप्ट आधी द्यायची का, असा प्रश्न विचारून पालेकर म्हणाले, “जो काही प्रकार घडला, त्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागले आहे. सेन्सॉरशिपची ही कोणकोणती रूपे आपल्यापर्यंत येत आहेत. त्यासंदर्भात बोलायचे नाही का? संचालिका रुपवर्तम म्हणाल्या की ही सरकारची संस्था आहे. म्हणजे ही आपल्या करामधून उभी राहिलेली संस्था आहे. मग फक्त कलावंत म्हणूनच नाही तर करदाता म्हणून सुद्धा याविषयी बोलायचा मला अधिकार आहे. यामागे कोणती तरी शक्ती आहे, जी आपली मुस्कटदाबी करीत आहे, हे मला मान्य नाही. सरकारी आणि सरकार बाह्य सेन्सॉरशिपला माझा विरोध आहे. त्या विरोधात मी न्यायालयात ही लढत आहे. अशा घटना २०१४ पूर्वीही घडत होत्या, मात्र, आता त्याचे प्रमाण वाढले आहे.”

पालेकर यांनी यावेळी एकूणच घटनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीन महिला सहगल यांचा मुखवटा घालून शांतपणे बसल्या होत्या. त्यांना मंडपातून बाहेर काढले गेले. मात्र त्यासंदर्भात व्यासपीठावरील कोणीही काहीही बोलले नाही आणि बाहेरही कोणी काही बोलले नाही.  माझे भाषण रोखण्याच्या घटनेला चोवीस तास झाले तरी त्यावर कोणीही बोलले नाही. हे अंधकारमय परिस्थितीचे उदाहरण आहे.प्रदर्शने कोणाची असावीत, हे आता दिल्लीतून ठरविले जाणार आहे का आणि या संदर्भात बोलायचे नाही का?”

यावेळी बोलताना संध्या गोखले म्हणाल्या, “तुम्ही आमच्या प्रश्नांना वाचा फोडली हे बरे झाले, असे तरुण मुलांनी येऊन आम्हाला सांगितले. पण मोठ्या कलाकारांनी गप्प बसणे पसंत केले. सुहास बहुळकर, जे स्थानिक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष होते,  त्यांनी अयोग्य पद्धतीने भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. जैसल ठक्कर, ज्या या प्रदर्शनाच्या क्युरेटर आहेत, यांनीही काही भूमिका घेतली नाही. बर्वे यांच्यासारख्या कलाकाराचे असे प्रदर्शन लावण्यासाठी २४ वर्षे लागली. पण असे या पुढे या वास्तुत घडणार नाही, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.”

गोखले पुढे म्हणाल्या की बर्वे आज असते, तर मूर्तरूपाखाली दडलेल्या अमूर्ताची जाणीव करून दिली असती. त्या पुढे म्हणाल्या, “सत्ता कोणत्या पक्षाची आहे, हे महत्त्वाचे नाही. कारण हे कोणत्याही सरकारच्या काळात घडत आहे. हा प्रस्थापित व्यवस्थेने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा प्रश्न आहे. सेन्सॉरशिपचा मुद्दा हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही. शासनाबाहेरचे लोकही आपली मुस्कटदाबी करीत आहेत. भावना दुखावल्या म्हणत दगडफेक करीत आहे.”

पालेकर म्हणाले, “संस्थेच्या संचालिका स्वतःच त्यांच्या भाषणात म्हणाल्या, की त्यांना कलेबद्दल काही कळत नाही आणि बर्वे यांच्याबद्दल काही माहित नाही. मग तुम्ही त्या पदावर का आहात? त्या तिथे संचालिका आहेत, हे किती गंभीर आहे. कलेविषयी काही माहित नसलेल्या व्यक्तींनी कला संदर्भातल्या व्यवहारांचे निर्णय घेणे किती गंभीर आहे! हे सगळ्यांचे प्रश्न आहेत फक्त मूठभर लोकांचे नाहीत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0