अमरावतीतील दंगलीला पोलिसांची अकार्यक्षमता जबाबदार!

अमरावतीतील दंगलीला पोलिसांची अकार्यक्षमता जबाबदार!

अमरावती: नुकत्याच उसळलेल्या हिंसाचाराच्या लाटेमध्ये हिंदू व मुस्लिम कुटुंबांचे सारखेच नुकसान झाले आहे, असे  अमरावती शहरातील हिंसाचार पीडितांच्या जबाबा

इलेक्ट्रोरल बाँडवर जेटलींचा सल्ला मोदींनी मानला
विलक्षण संशोधक जेन गुडाल
महापालिका निवडणुकाः २३ जूनला मतदार याद्या जाहीर

अमरावती: नुकत्याच उसळलेल्या हिंसाचाराच्या लाटेमध्ये हिंदू व मुस्लिम कुटुंबांचे सारखेच नुकसान झाले आहे, असे  अमरावती शहरातील हिंसाचार पीडितांच्या जबाबांमधून पुढे येत आहे. प्रथम हिंसाचाराचा धोका ओळखण्यात व त्यानंतर वेळेवर पुरेसे पोलीसबळ तैनात करण्यात स्थानिक पोलीस असमर्थ ठरल्याने परिस्थिती चिघळली असा आरोपही अनेक साक्षीदारांनी केला आहे.

भाजप नेते व माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यासह अनेकांना दंगल भडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या दंगली म्हणजे भाजपने रचलेले षड्यंत्र आहे, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

अमरावतीतील स्थानिक पोलीस यंत्रणेला जमावावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तसेच मुस्लिमांच्या जमावांमधील गुंडांना परस्परांच्या धार्मिक प्रार्थनास्थळांवर, दुकानांवर तसेच अन्य आस्थापनांवर हल्ले चढवण्यास मोकळे रान मिळाले, असे प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणे आहे. हिंदू किंवा मुस्लिम दोन्ही समुदायांतील नुकसान सोसावे लागणाऱ्या पीडितांमध्ये एक समान धागा मात्र दिसून येत आहे. हा धागा म्हणजे ते सर्व आर्थिक उतरंडीच्या सर्वांत निम्न स्तरांतील आहेत.

अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी ३५,००० मुस्लिमांच्या शांततापूर्ण मोर्च्याला हिंसक वळण लागले आणि त्यातून सांप्रदायिक दंगल भडकली. मोर्च्यातील काही जणांनी हिंदूधर्मीयांच्या दुकानांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. मोडतोडीची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आली आणि नंतर त्यांचा व्हॉट्सअॅपवरून सर्वत्र प्रसार झाला. स्थानिक भाजपतर्फे शनिवारी बंदचे आवाहन करण्यात आले व हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते शहरातील राजकमल चौकात सकाळी नऊच्या सुमारास गोळा झाले. ११ वाजेपर्यंत हा जमाव पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेला होता आणि त्यांनी जवळचे दोन दर्गे तसेच मुस्लिमांच्या मालकीची दुकाने उद्ध्वस्त केली होती.

शदाब खान यांचे राजकमल चौकातील इलेक्ट्रिकल सामानाचे दुकान जाळून टाकण्यात आले. लॉकडाउनमध्ये विस्कटलेली व्यवसायाची घडी जेमतेम पुन्हा बसत असतानाच हा धक्का बसला असे खान यांनी ‘द वायर’ला सांगितले. त्यांनी व्यवसायासाठी नुकतेच ८२,००० रुपयांची रोकड उभी केली होती. या पैशाचा कोळसा झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दुकानाचे कुलूप तोडल्याची माहिती खान यांना त्यांच्या काकांनी शनिवारी सकाळी फोनवरून दिली. ते दुकानावर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांनी त्यांना अडवले. काही तासांतच दंगलखोरांनी त्यांचे दुकान जाळून टाकले.

“दुकानातील रोख रक्कम व ग्राहकांकडून दुरुस्तीसाठी आलेली उपकरणे जळून खाक झाली आहेत. एकूण सगळे नुकसान १०-१२ लाख रुपयांच्या घरात आहे. मी या नुकसानीमुळे शुन्यावर आलो आहे,” असे खान म्हणाले.

खान यांच्या दुकानापासून काही पावलांच्या अंतरात असलेली मोहम्मद शाहबाज यांची पानटपरीही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी  उद्ध्वस्त केली आहे. शाहबाज पानटपरी चालवत होते आणि शेजारच्या दर्ग्याच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. साडेअकरा ते दुपारचे दोन या काळात ३०-४० गुंडांचा जमाव दर्ग्याची नासधूस करत होता, असे शाहबाज यांनी ‘द वायर’ला सांगितले. “या गुंडांनी बाहेरून पहारी व कुदळी आणल्या होत्या. त्यांनी दर्ग्याचे फाटक उखडले, फरशा तोडल्या आणि दर्ग्यावर वारंवार दगड फेकले,” असे ते म्हणाले. याशिवाय शाहबाज यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यांच्या टपरीवरील रेफ्रिजरेटर जमावाने बाहेर फेकला. तसेच टपरीवरील माल व गल्ल्यातील पैसा लुटून नेला. “पानटपरी दर्ग्याला लागून असल्याने मुस्लिम माणसाचीच असली पाहिजे हे गुंडांना माहीत होते. माझे यात ५०,०००-६०,००० रुपयांचे नुकसान झाले.”

दरम्यान, हिंसाचाराला बळी पडलेल्या हिंदू नागरिकांचे अनुभवही तेवढेच धक्कादायक आहेत. स्थानिक शनिमंदिरावरील हल्ल्याचा प्रतिबंध करण्यात तसेच जमावाला रोखण्यात पोलीस कसे अपयशी ठरले हे त्यांच्या जबाबातून स्पष्ट होते. सक्कर साठ भागातील हनुमान मंदिराचे पुजारी संजय शर्मा यांच्याशी ‘द वायर’ने संवाद साधला. शनिवारच्या हिंसाचारामध्ये या हिंदूंचे प्राबल्य असलेल्या भागाला लक्ष्य करण्यात आले होते. सुमारे १५०० मुस्लिमांच्या जमावावर आपण दगड फेकल्याचे संजय यांनी मान्य केले. हा जमाव शनिमंदिराची मोडतोड करण्यासाठी येत होता असा त्यांचा आरोप आहे. मुस्लिमांचा मोठा जमाव शनिमंदिर परिसरात आकार घेत आहे असा अंदाज शनिवार सकाळपासून येत होता व आपण याची माहिती सक्कर साठ भागातील नागरिकांनी पोलिसांना दिली, असे संजय म्हणाले. मात्र पोलिसांनी सुरुवातीला लक्ष दिले नाही व नंतर साडेबाराच्या सुमारास दोन सशस्त्र गाड्या पाठवल्या. सगळे मिळून ४-५ पोलीस कर्मचारी या भागात ठेवण्यात आले. एवढ्या जमावावर नियंत्रण आणण्यासाठी ते अजिबात पुरेसे नव्हते. त्यामुळे आम्हाला जमावाला रोखण्यासाठी दगड फेकावे लागले, असे संजय यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक जण आपल्या धर्मासाठी लढतो, मीही माझ्या धर्मासाठी लढलो. हे मंदिर माझे घर आहे. मग मी सगळे सोडून पळून कसा जाऊ शकत होतो?’ असा प्रश्न त्यांनी केला.

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न ‘द वायर’ सातत्याने करत आहे. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर हा वृत्तांत अद्ययावत केला जाईल.

या चकमकीत संजय शर्मा यांच्या डोक्यावर काही गुंडांनी दगड मारल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या डोक्यावर बॅण्डेज दिसत होते, चेहऱ्यावर खरचटल्याच्या खुणा होत्या आणि ते लंगडतही होते. शनिवारी प्रस्तुत वार्ताहराने सक्कर साथ भागातील आतील गल्ल्यांमध्ये फिरून लोकांशी संवाद साधला असता, ‘पुजाऱ्या’वर हल्ला झाल्याचे, शनिमंदिरात नासधूस झाल्याचे तसेच या घटनांमुळे हिंदू मुस्लिमांविरोधात एकत्र आल्याचे अनेकांनी सांगितले.

“पोलीस योग्य वेळी आम्हाला मदत करण्यासाठी पुढे आले नाहीत हीच माझी मुख्य तक्रार आहे. ते नंतर आले पण आम्ही जेव्हा त्यांना बोलावत होतो, तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केले. ही या भागात दंगल होण्याची पहिली वेळ नाही. १९८३ सालापासून शहरात जेव्हा-जेव्हा दंगली झाल्या आहेत, तेव्हा-तेव्हा सुरुवात या भागातून झाली आहे. हा भाग संवेदनशील आहे हे पोलिसांना माहीत आहे आणि तरीही त्यांनी या भागात वेळेवर पुरेसे पोलीस संरक्षण तैनात केले नाही.”

सोमवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती आणि नवीन हिंसाचाराची बातमी कोठूनही आलेली नाही. १० पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण ११३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजप नेते व राज्य मंत्रिमंडळातील माजी मंत्री अनिल बोंडे यांचा समावेश आहे. शहरातील इंटरनेट सेवा अद्याप निलंबित ठेवण्यात आल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0