कर्कविज्ञानाची सखोल गोष्ट

कर्कविज्ञानाची सखोल गोष्ट

कालौघात उत्क्रांत नि प्रगत होत गेलेल्या कर्कविज्ञानाची ओळख तसेच वैज्ञानिक संशोधनाशी निगडित रसाळ गोष्टी सांगणारे डॉ. आनंद जोशी आणि शेखर देशमुखलिखित ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाकडून नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकातील कुतूहल निर्माण करणारे हे उतारे...

किरणोत्सारी उपचारांचा इतिहास

ज्ञान-विज्ञानाच्या शाखा एकमेकांना पूरक असतात. भौतिकीविज्ञान, रसायनविज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि आधुनिक वैद्यकविज्ञान अशा विविध शाखांमध्ये लागलेल्या शोधांच्या योगे कर्करोगावरील किरणोत्सारी उपचारपद्धती (रेडिएशन थेरपी) विकसित झाली. आधुनिक वैद्यकीय विज्ञानातील प्रत्येक शाखा अशी उत्क्रांत होत आली आहे. विविध कल्पनांच्या संकरातून नवीन कल्पना निर्माण होतात. एकदा घेतलेली गती थांबत नाही. त्यामुळे या शाखा सतत सुविकसित होत असतात. किरणोत्सारी उपचारपद्धती ही अशीच एक.

विचारांची साखळी

एकोणिसाव्या शतकात विद्युतशक्ती या विषयाचा व्यापक शोधाभ्यास सुरू झाला. एका काचेच्या नळीत असलेल्या वायूतून वीजप्रवाह सोडला, तर काय घडते, याचा शोध भौतिकीतज्ज्ञ घेत होते. या नळीच्या एका टोकाला होता निगेटिव कॅथोड आणि दुसऱ्या टोकाला होता पॉजिटिव अॅनोड.

१८६९च्या सुमारास जोहेन हिटॉर्फ आणि सर विल्यम क्रुक्स यांनी हिटॉर्फ-क्रुक्स ही नळी तयार केली. युजेन गोल्ड्स्टेन याने कॅथोडरेज ही संज्ञा तयार केली, १८९७मध्ये सर जोसेफ थॉम्पसन यांनी ‘इलेक्ट्रॉन’चा शोध लावला. असे करत करत विज्ञान राँटजेनशी येऊन पोचते.

प्रतिदीप्ती

राँटजेनने हिटॉर्फ-क्रुक्स नळीच त्याच्या प्रयोगासाठी वापरली. त्याला ही नळी युडार्ट अँटन लेनार्ड या हंगेरियन भौतिकीतज्ज्ञाने दिली होती. लेनार्ड हा जन्माने हंगेरियन, पण त्याने जीवनभर काम केले जर्मनीत. या नळीत निर्माण होणाऱ्या कॅथोड किरणांमुळे ‘बेरियम सायनाइड’चे स्फटिक प्रतिदीप्त (फ्लुरोसंट) होतात, असे लेनार्डला वाटले होते. कॅथोड किरणांचा शोध लेनार्डने लावला होता.

८/११/१८९५ हा राँटजेनच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस ठरला. या नळीतून बाहेर पडणारे कॅथोड किरण अडविले जावे, म्हणून त्याने ही नळी काळ्या कागदात गुंडाळून ठेवली होती. तरीसुद्धा त्या नळीजवळ पडलेला बेरियम प्लॅटिनो सायनाइड स्क्रीन प्रतिदीप्त झाला. लेनार्डनेसुद्धा हे पाहिले होते, पण त्याने त्याकडे कानाडोळा केला होता. राँटजेनला वाटले, काळ्या कागदात लपेटलेल्या या नळीतून काही अव्यक्त किरण बाहेर पडत असावेत. त्याने त्याच्या बायकोचा अंगठी घातलेला पंजा फोटोग्राफिक प्लेटवर ठेवला आणि या नळीतून वीजप्रवाह सोडला. त्याच्या बायकोच्या पंजाचा सांगाड्यासारखा फोटो निघाला. त्यात अंगठीही दिसत होती.

बीजगणितात अव्यक्त किंवा अज्ञात राशीला ‘X’ – क्ष असे संबोधतात म्हणून राँटजेनने या किरणांना ‘एक्स-रेज’ म्हणजेच ‘क्ष-किरणे’ हे नाव दिले. १९०१मध्ये भौतिकी विज्ञानाचे पहिले नोबेल राँटजेनला मिळाले. पण राँटजेनच्या या शोधात आधीच्या कितीतरी वैज्ञानिकांचे योगदान होते, हे लक्षात घेतले पाहिजे. विज्ञान असे निर्माण होते आणि पुढे जाते.

राँटजेनने याबाबतचा शोधनिबंध वैद्यकीय पत्रिकेत जर्मनीत प्रकाशित केला. त्याची बातमी लंडनला ६/१/१८९६ साली पोचली. ‘टेलिग्राफ’ म्हणजेच सांकेतिक संदेशवहन यंत्रणेमुळे ही बातमी काही तासांत जगभर पसरली.

त्या आधीची पन्नास वर्षांपूर्वीची घटना. बोस्टन येथे भूल (अॅनॅस्थेशिया) देण्याचा यशस्वी प्रयोग झाला होता. त्याची बातमी बोटीने लंडनला पोचायला तीन आठवडे लागले होते. राँटजेनच्या शोधाची बातमी मात्र काही तासांत टेलिग्राफने जगभर पसरली. हा शोध महत्त्वाचा आहे, याची जाणीव भौतिकीतज्ज्ञांना झाली. त्यामुळे कित्येक भौतिकीतज्ज्ञांनी स्वत:चे हातचे संशोधन सोडून क्ष-किरणांवर संशोधन सुरू केले. क्ष-किरण विज्ञानाची झटपट वाढ झाली.

क्ष-किरण विज्ञानाचे दोन उपयोग होऊ लागले. एक रोगाच्या निदानासाठी व दुसरा रोगावरील उपचारासाठी. निदानीय शाखेला ‘रेडिऑलॉजी’ तर उपचाराच्या शाखेला ‘रेडिओथेरपी’ किंवा ‘रेडिएशनथेरपी’ म्हणतात. १९१५ साली डच क्ष-किरण तज्ज्ञ जी. एफ. गाटिनस्त्रूब यांनी केलेल्या विधानाचा आशय असा, ‘‘ट्रायल अँड एरर’ ‘प्रयत्न आणि प्रमाद’ या पद्धतीने अनुभव गोळा करत एकमेकांचे अनुभव पडताळत आम्ही पायरी-पायरीने सप्रयोग पुढे जात आहोत; त्यामुळे आमचा असा विश्वास आहे की, किरणोत्सारी उपचारपद्धती कर्करोगावर गुणकारी ठरेल.’ यातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे.

नैसर्गिक किरणोत्सर्गाचा धांडोळा

राँटजेनने कृत्रिम पद्धतीने क्ष-किरण तयार केले होते. त्याने इतर वैज्ञानिकांना पत्रे लिहून माहिती कळवली. एक पत्र त्याने हेन्री पॉइनकॅरे याला जानेवारी १८९६ पाठविले होते. हेन्री पॉइनकॅरे हा फ्रेंच गणिती, भौतिकी तज्ज्ञ, आणि विज्ञानाचा तत्त्वज्ञ. हा एक ‘पॉलिमॅथ’ होता, म्हणजे ‘बहुविद्याज्ञानी’! ‘अशा प्रकारची किरणोत्सारी घटना निसर्गातही घडत असाव्यात’ असा मौलिक विचार त्याने चर्चेत मांडला. अँटनी हेन्री बॅकरेल हा भौतिकी विज्ञानाचा प्राध्यापक. त्याने हेन्री पॉइनकॅरेचे ‘गृहितक’ तपासण्याचे ठरविले. त्याने युरेनियम सल्फेटचे स्फटिक काळ्या कागदात गुंडाळून फोटोग्राफीक प्लेटवर ठेवले. ती प्लेट एक्सपोज झाली. त्याच काळात बॅकरेलच्या हाताखाली मेरी क्युरी डॉक्टरेट करत होती. तिने ‘नॅचरल रेडिओअॅक्टिविटी’ ही संज्ञा तयार केली. पुढे मेरी व पिअरे क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. विज्ञानातील शोधांची, विचारांची साखळी ही अशी असते. मराठीत ‘डिस्कवरी’ आणि ‘इन्वेन्शन’ दोहोंना शोध हा एकच शब्द आहे. शोध घेणे म्हणजे डिस्कवरी आणि नवीन शोध लावणे म्हणजे, इन्वेन्शन. राँटजेनचे इन्वेन्शन, तर मेरी क्युरीची डिस्कवरी! हा तरल फरक. या संकल्पना पाश्चात्त्य भाषेत तयार झाल्या, म्हणून त्याला दोन निराळे शब्द मिळाले. मराठीत या संकल्पना तयार झाल्या नाहीत, म्हणून शोध हा एकच शब्द वापरावा लागतो. ज्या भाषेत नवीन ज्ञान तयार होते, तेथे नवीन शब्द आपोआप तयार होतात.

सुरुवातीचा काळ

व्हिएन्ना येथील ऑस्ट्रियन त्वचारोग तज्ज्ञ लिओपोल्ड फ्रुंड (१८६८-१९४३) यांना रेडियोथेरपीचे जनक असे सर्वसाधारणपणे मानले जाते. या दोन्ही पद्धतींचा युरोप, ब्रिटन आणि अमेरिका या देशात झपाट्याने प्रसार झाला. पहिल्या महायुद्धात रेडिऑलॉजी या निदानीय तंत्राचा अनेक दुखापतींच्या निदानासाठी उपयोग झाला.

एखादे नवीन उपकरण हाती आले, नवीन तंत्रज्ञान हातात आले, म्हणजे त्याचा उपयोग आणि दुरुपयोगही होतो. क्ष-किरण सगळ्या रोगांवर वापरण्यास सुरुवात झाली. असा वापर हा फलदायी नसून धोक्याचा आहे, हे कळू लागले. आगजाळ आपल्याला दिसतो, म्हणून आपण त्यात हात घालत नाही. क्ष-किरण दिसत नाहीत, त्यामुळे त्याची ऊर्जा आपल्याला कळत नाही. क्ष-किरण अव्यक्त असले; तरी त्यातून निघणारी ऊर्जा अत्यंत प्रभावी असते, याची जाणीव होऊ लागली.

रेडिअमच्या बाबतीतसुद्धा तेच घडले. फेसक्रिम, बाथसॉल्ट्स, लिपस्टिक यातही रेडिअम वापरला जाऊ लागला. इबेन बायर्स हा अमेरिकन धनाढ्य माणूस. बायर्स स्टील कंपनीचा मालक. याला एका बोगस डॉक्टरने रेडिअम मिश्रित पाणी पिण्याचा सल्ला दिला. ‘यामुळे तुझी मर्दानी ताकद वाढेल,’ असे त्याला सांगण्यात आले. १९२८ ते १९३० ही दोन वर्षे तो रोज एक बाटली असे पाणी पित असे. १९३२ साली तो रेडिअम विषबाधेने मेला. त्याची सर्व हाडे ठिसूळ झाली, जबडा निखळला, रक्ताचा रोग झाला. ही बातमी अमेरिकेत वाऱ्यासारखी पसरली. रेडिअमच्या वापरावर निर्बंध आले.

रेडिअमपासून अल्फा, बिटा आणि गॅमा असे तीन किरणोत्सर्ग निघतात. यातील बिटा आणि गॅमा ही उपचारासाठी वापरतात. वर सांगितलेल्या घटनेसारख्या अनेक घटनांमुळे किरणोत्सर्गाचे जैविक परिणाम काय, कसे आणि का होतात याचा शोध घेण्याची गरज विज्ञानाला वाटू लागली. १९०९च्या आसपास किरणोत्सर्गाच्या जैविक (रेडिओ-बायॉलॉजी) परिणामांचा अभ्यास करणारी शाखा विकसित होऊ लागली. सुरूवातीला किरणोत्सर्गाचा पेशींवर काय परिणाम होतो, हे कोणालाच ठाऊक नव्हते. काही वैज्ञानिकांना वाटत होते की, किरणोत्सर्गामुळे ऊतींमध्ये, पेशींमध्ये वीजवहन होऊन पेशी नष्ट होतात. काहींना वाटत होते, तिथे उष्णता निर्माण होते. पण जशी संशोधनाची साधने सखोल, सूक्ष्म होऊ लागली; तसे कळले, की किरणोत्सर्गामुळे पेशीतील डीएनएचे तुकडे होतात, मुक्तमूलक (फ्री-रॅडिकल्स) तयार होतात. पेशी मरतात. ज्या पेशी सतत विभाजित होत असतात, त्या पेशींवर किरणोत्सर्गाचा जास्त परिणाम होतो. कर्कपेशी सतत विभाजित होत असतात. म्हणून त्या किरणोत्सर्गाला बळी पडतात. त्याचप्रमाणे शरीरातील सतत विभाजित होणाऱ्या सामान्य पेशीसुद्धा किरणोत्सर्गाला बळी पडतात. उदाहरणार्थ: अस्थिमज्जा, जेथे रक्तपेशी सतत विभाजित होतात. वृषण आणि बीजांडकोश, जेथे पुरुषबीजे आणि स्त्रीबीजे तयार होतात, यावर रेडिएशनचा परिणाम होतो. किरणोत्सर्गाच्या उपप्रभावाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

ज्या ऊतींमध्ये जास्त प्राणवायू असेल, त्या गाठींवर किरणोत्सर्गाचा उत्तम प्रभाव पडतो. ज्या गाठींमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी असेल, तेथे किरणोत्सर्गाचा प्रभाव कमी असतो. हे सर्व कळल्यामुळे कोणती रसायने वापरून गाठ किरणोत्सर्गाच्या प्रभावाखाली येईल, अशा रसायनांचा शोध सुरू झाला. या रसायनांना ‘रेडिओ सेंसिटायझर्स’ म्हणतात. याचा शोध ‘रेडिओ-बायोलॉजी’ या शाखेने घेतला. निरनिराळे रेडिओ सेंसिटायझर्स तयार करता येऊ लागले. किरणोत्सर्ग जास्तीतजास्त प्रभावी करण्याचे मार्ग सापडले. कमीतकमी किरणोत्सर्ग वापरून जास्तीत जास्त प्रभाव साधता आला. किरणोत्सर्गाचे उपप्रभाव कमी कमी होऊ लागले.

मोजमाप

आरंभाला स्वघोषित ‘रेडिएशन तज्ज्ञ’ स्वत:च्या अनुभवानुसार क्ष-किरण तसेच रेडिअम हे किरणोत्सर्गासाठी वापरत असत. ना मोज, ना माप. असे विज्ञानात फार काळ चालत नाही. ‘ज्या पद्धतीने आज किरणोत्सारी उपचारपद्धती केली जात आहे, त्यामुळे आज तरी या थेरपीला विज्ञान म्हणता येत नाही.’ असे जे. बेलॉट यांनी १९०४ मध्ये सांगितले. याचा वैज्ञानिक जगतात सर्वदूर प्रकाश पडला. किरणोत्सारी उपचारपद्धतीला विज्ञानाच्या पायावर उभे करण्याचे श्रेय रॉबर्ट केनबॉक या व्हिएन्नातल्या वैज्ञानिकाकडे जाते. क्ष-किरण निर्माण करणाऱ्या नळीमध्ये हवा किती प्रमाणात असते, पोकळीचे प्रमाण किती त्यावर कोणत्या प्रकारचे किरण तयार होतात, हे अवलंबून असते, त्यावर त्या क्ष-किरणांची उपचारक्षमता ठरते, हे रॉबर्ट केनबॉक यांनी दाखवून दिले.

किरणोत्सर्गाची मात्रा मोजणारी यंत्रे हळूहळू तयार होऊ लागली. १९१० नंतर रेडिओमीटर वापरात येऊ लागले. यात निरंतर सुधारणा होत गेल्या. किरणोत्सर्गाची मात्रा ठरविण्यासाठी विज्ञानाची चौकट मिळाली.

किरणोत्सर्गाचे उपप्रभाव जसे रुग्णावर होत होते, तसेच ते किरणोत्सर्ग देणाऱ्या डॉक्टरांवरही होत होते. १९१९ मधल्या ‘जर्मन मेडिकल जर्नल’मध्ये किरणोत्सर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या जगभरातल्या १६९ डॉक्टरांची यादीच प्रकाशित झाली होती. १९५० मध्ये पुढची यादी प्रकाशित झाली, त्यात १९० मृत डॉक्टरांची भर पडली.

ज्ञानाचा साठा वाढला म्हणजे त्याची शैक्षणिक व्यवस्था आकारात येते. रेडिएशन थेरपी, रेडिऑलॉजी, रेडिओ-बायॉलॉजी अशा ज्ञानशाखा तयार झाल्या आणि त्याचे शैक्षणिक अभ्यासक्रम पाश्चात्त्य देशात सुरू झाले. त्याचा पुढे जगभर प्रसार झाला. सगळ्यांचा फायदा झाला.

कृत्रिम किरणोत्सर्ग

कुतूहल हा मानवाचा एक गुणविशेष. या कुतुहलामुळे मानवी भविष्यकाल सुरक्षित, सुखावह आणि ज्ञानाची जाणीव जागृत ठेवणारा होण्याची शक्यता असते. या कुतुहलापोटी माणसाची कल्पनाशक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. निसर्गातील किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लागला, हे खरे. पण किरणोत्सर्ग निर्माण करणारे पदार्थ कृत्रिमरित्या तयार करता येतील का, असा प्रश्न वैज्ञानिकांना पडला. मेरी क्युरीची मुलगी आयरिन क्युरी आणि तिचा नवरा फ्रेडरिक यांनी मिळून कृत्रिम किरणोत्सर्गाचा शोध १९३३ मध्ये लावला. कृत्रिम किरणोत्सर्ग म्हणजे मानवनिर्मित किरणोत्सर्ग. त्यानंतर हळूहळू किरणोत्सर्ग निर्माण करणारे कृत्रिम पदार्थ तयार होऊ लागले.

अणूमधून प्रचंड ऊर्जानिर्मिती होते, याचा दाहक अनुभव हिरोशिमा-नागासाकी घटनेवरून (दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने अणूबॉम्ब टाकून बेचिराख केलेली जपानमधली शहरे) सबंध जगाला आला होता. पण या अणुऊर्जा संशोधनाचा जोडफायदा म्हणजे ‘रेडिओ-अॅक्टिव आयसोटोपची’ निर्मिती. हेच ते किरणोत्सर्ग निर्माण करणारे मानवनिर्मित पदार्थ.

या रेडिओ-आयसोटोपचा उपयोग आधुनिक वैद्यकीय विज्ञानात निदान आणि उपचार या दोहोंसाठी होऊ लागला. रेडिओ-आयसोटोपचा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे ‘हाफ लाइफ’ कमी असते. हाफ लाइफ याचा अर्थ रेडिओअॅक्टिव-आयसोटोपमधील ऱ्हास पावत असलेल्या शक्तीचा अर्धाभाग नष्ट होण्यास लागणारा वेळ. म्हणजे, त्यांची किरणोत्सर्गाची क्षमता फार काळ टिकणारी नसते. रेडिअमचे हाफ लाइफ तब्बल १६०० वर्षे, तर ‘कोबाल्ट ६०’ या रेडिओ-आयसोटोपचे हाफ लाइफ ५.३ वर्षे इतकेच असते. ‘फ्लुओरिन १९’ या रेडिओ-आयसोटोपचे हाफलाइफ फक्त १०९ मिनिटे इतकेच असते. याचे सुलभ स्पष्टीकरण असे – एखादा रेडिओ- आयसोटोप माणसाच्या रक्तात टोचला, तर त्याचे रक्तातील प्रमाण अर्ध्यावर येण्यास लागणारा वेळ म्हणजे ‘हाफलाइफ’ -‘अर्धायुकाल’. हा अर्धायू काल जितका कमी तितका किरणोत्सर्ग कमी, त्यानुसार त्याचे उपप्रभाव कमी. ज्या कामासाठी रेडिओ-आयसोटोप वापरायचा आहे, तोपर्यंतच तो टिकला पाहिजे, हा त्यामागचा विचार. हे समजण्यासाठी इतिहासातील एक उदाहरण बोलके आहे.

१९१४ साली मेरी क्युरी यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत किती रेडिअम साठवला आहे, याचा रिपोर्ट तयार केला होता, त्या रिपोर्टवर त्यांची सही आहे. हे कागद अॅमस्टरडॅम येथील कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जतन करून ठेवले आहेत. २००६मध्ये हे कागद फोटोग्राफिक प्लेटवर ठेवले, तेव्हा ही प्लेट उजळली. ज्या लोकांनी तो कागद हाताळला होता, त्यांच्या बोटांचे ठसे त्यावर उठले होते. याचा अर्थ, तो कागद रेडिअममुळे १९१४ मध्ये गढूळला होता. २००६ मध्येसुद्धा त्यातून किरणोत्सर्ग बाहेर पडत होता. याचे कारण रेडिअमचे आयुष्य १६०० वर्षे असते. ज्यांनी तो कागद हाताळला होता, त्यांना किरणोत्सर्गाचा प्रसाद मिळाला होता. मात्र आता हे पत्र हाताळताना, सुरक्षेच्या सर्व काळज्या घेतल्या जातात.

मानवनिर्मित आयसोटोपचा अर्धायुकाल कमी असल्यामुळे अशा आयसोटोपचा उपयोग ‘पेट स्कॅन’ आणि ‘न्यूक्लियर स्कॅन’ यासाठी करता येतो. ‘आय १३१’ हा आयोडिन आयसोटोप थायरॉइडच्या कर्करोगावर उपचार म्हणून वापरला जातो.

आजचे शतक आणि किरणोत्सारी उपचारपद्धती

डिजिटल-संगणकीय तंत्रज्ञानामुळे किरणोत्सारी उपचारपद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. संगणक छोटे, अगदी छोटे झाले आणि त्याबरोबरच त्यांच्या कामाची गतीही वाढली; त्यामुळे हे शक्य झाले आहे. या नूतन संगणकांमुळे गतिमान सिटी, पेट-सिटी स्कॅनर, फंक्शनल एमआरआय स्कॅनर हे उपलब्ध झाले. हे स्कॅनर वापरून कर्कगाठींची शरीरातील जागा अचूकपणे शोधता येऊ लागली. किरणोत्सर्गाचा झोत अचूकपणे फक्त संक्रमित गाठींवर पडेल, अशी योजना करता येऊ लागली. किरणोत्सर्गाची मात्रा कमी झाली. किरणोत्सर्गाचे उपप्रभाव कमी झाले.

प्रत्येक श्वासाबरोबर तसेच हृदयाच्या स्पंदनाने शरीरातील गाठ हलत असते. त्या हालचालीनुसार जर किरणोत्सर्गाचा झोत त्यावर पडला, तर त्याचा जास्तीत जास्त प्रभाव पडतो. आज त्रिमितीबरोबर चौथी मिती म्हणजे ‘काल’ याचे भान असलेली ‘फोर-डी इरॅडिएशन’ यंत्रे वापरात येऊ लागली आहेत. शरीराचे तापमान वाढले, म्हणजे गाठीचा रक्तप्रवाह वाढतो, त्यायोगे प्राणवायूचा पुरवठादेखील वाढतो. याचवेळी किरणोत्सर्ग दिला, तर ते जास्त प्रभावी ठरते. किरणोत्सर्गामुळे कर्कपेशींतील डीएनएला जबरदस्त हानी पोचते. कर्कपेशी ती दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतात, पण वाढलेल्या तापमानामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. जास्त कर्कपेशी मरतात. परिणामी कर्करोगावर लवकर नियंत्रण आणता येते. शरीराचे तापमान वाढवून किरणोत्सर्ग उपचारपद्धती देण्याचे हे प्रयोग सध्या सुरू आहेत.

सध्या कर्करोग बरा होण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. फक्त किरणोत्सारी उपचारपद्धती वापरून १४ टक्के रुग्ण बरे होतात, १३ टक्के रुग्ण किरणोत्सारी उपचारपद्धती आणि त्याच्याबरोबर इतर म्हणजे शस्त्रक्रिया, किमोथेरपी वापरून बरे होतात, तर उरलेले रुग्ण किरणोत्सारी उपचार न घेता फक्त शस्त्रक्रिया वा किमोथेरपीने बरे होतात.

आधुनिक वैद्यकीय विज्ञानातील प्रत्येक उपचारपद्धतीला इतिहास असतो. त्याची तोंडओळख असली; म्हणजे हे विकसित होत असलेले ज्ञान आहे, याचे भान येते. यातही काही त्रुटी आहेत, याची जाणीव होते. या त्रुटी कमी करण्याचे प्रयत्न चालू असतात, हे समजते. या सगळ्याचा गोळाबेरीज परिणाम म्हणजे उपचारापासून रास्त अपेक्षा ठेवता येतात.

‘रेडिअम’ सुंदरी आणि वीर्याकांक्षी मर्द

पहिल्या महायुद्धाच्या अलीकडचा-पलीकडचा हा काळ. न्यू जर्सीमधल्या ‘यूएस रेडिअम कॉर्पोरेशन’ नावाच्या कंपनीने लष्करासाठी मोठ्या तबकड्यांची मनगटी घड्याळे बनवण्याचे भलेमोठे कंत्राट मिळवले होते. या घडाळ्यांची खासियत म्हणजे, रेडिअमचा वापर असलेल्या रंगाने त्यावरचे आकडे लिहिलेले असल्याने काळोखातही सैनिकांना ते सहज वाचता येण्यासारखे होते. त्यासाठी कंपनीने संशोधक डॉ. व्हॉन सोशोकीच्या मदतीने रंगांमध्ये रेडिअम मिसळून ‘अनडार्क’ असे ब्रँडनेम असलेले, कंपनीच्या भाषेत ‘जादुई’ उत्पादन तयार केले होते. पण तशा प्रकारच्या घडाळ्याच्या तबकड्या बनवण्यासाठी कंपनीला तरुण कामगार विशेषत: शिस्तबद्ध बायकांची खूप गरज होती. लष्करासाठीचे हे उत्पादन असल्याने त्याला देशभक्तीचीही किनार होती. कंपनीने मोठ्या खुबीने ही भावना जनतेत पेरल्याने म्हणा किंवा स्वयंस्फूर्तीने म्हणा ‘यूएस रेडिअम कॉर्पोरेशन’मध्ये प्रारंभापासूनच गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांतल्या तरुण वयातल्या बायका मोठ्या प्रमाणात डायल पेंटिंगचे काम करू लागल्या होत्या. १९२०च्या सरत्या दशकात ही संख्या तब्बल चार हजार महिला कामगारांपर्यंत पोहोचली होती.

घड्याळावर आकडे कोरण्याचे काम मोठेच कलाकुसरीचे आणि एकाग्रतेचे होते. आकडे रंगवताना ब्रशला टोकदारपणा यावा, यासाठी सगळ्याच बायका आधी ब्रश ओठाला किंवा जिभेला लावत होत्या. मग तो ब्रश रेडिअमचा वापर झालेल्या चमकदार रंगात बुडवत होत्या आणि त्यानंतर अत्यंत निगुतीने तबकड्यांवर आकडे रंगवत होत्या. ‘लिप, डीप अँड पेंट’ हा त्यांच्या रोजच्या कामाचा शिरस्ता बनला होता. घड्याळाची एक तबकडी रंगवण्यामागे बायकांना प्रत्येकी २७ सेंट्स (साधारण १५ ते १७ रुपये) दिले जात होते. काही काही बायका, तर दरदिवशी जवळपास २५० घड्याळ्यांच्या तबकड्यासुद्धा रंगवत होत्या. त्यांना तेवढा भरघोस मोबादलाही मिळत होता.

रेडिअमने या कामगार बायकांना भुरळ घातली होती. यातल्या काहींनी गमतीगमतीत स्वत:च्या कपड्यांवर, नखांवर, ओठांवर आणि दातांवरही हा रंग लावला होता. त्यामुळे रात्रीच्या अंधारात घरी परतताना या बायका चमकत, तेव्हा त्यांना कौतुकाने कुणी ‘रेडिअम गर्ल्स’ म्हणे, कुणी ‘घोस्ट गर्ल्स’!

सगळे कसे छान चालले असताना १९२२च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मॉली मॅगी नावाच्या रेडिअमने डायल रंगवणाऱ्या पण आजारपणामुळे काम सोडलेल्या एका महिला फॅक्टरी कामगाराचा अत्यंत दयनीय अवस्थेत मृत्यू झाला. ‘ए फेनफुल अँड टेरिबल डेथ’ असे तिच्या बहिणीने मृत्यूचे वर्णन केले. आजारपणात मॉली दातदुखीची तक्रार घेऊन दंतवैद्याकडे गेली, तेव्हा त्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुखरा दात उपटून काढला. पण तो काढताना तिचा शेजारचा दातही पडला आणि जबड्याचे हाडही मोडले. ते नुसते मोडले नाही, तर डॉक्टरच्या हात लागल्याने त्याचे अक्षरश: तुकडे झाले. काही दिवसांनी पडलेल्या दाताच्या जागेतून एकसारखे रक्त येऊ लागले. पू जमा झाला. मॉलीचा खालचा जबडा बदलावा लागला. त्यानंतर तिचे सांधे दुखू लागले. हे दुखणे इतके बळावले की, तिला चालणेही अवघड होऊन गेले. डॉक्टरांना वाटले, संधिवाताचा हा प्रकार आहे, म्हणून त्यांनी तिला सरावाप्रमाणे अॅस्पिरीन देऊन घरी पाठवले. पण निदान चुकले आणि त्यातच बिचारी दगावली. जेव्हा मॉली वारली, तेव्हा तिला मृत्युदाखला देताना डॉक्टरांनी- ‘शी डाइड ऑफ सिफिलिस’, म्हणजे रुग्ण गुप्तरोगापैकी एक प्रकार असलेल्या सिफिलिसने मरण पावला आहे, असे खोडसाळपणे त्यात नमूद केले!

त्यानंतर फॅक्टरीतल्या एकेक करत बायका आजारी पडू लागल्या. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पेंटब्रश हाती धरलेल्या कॅथरिन शूबचे दात एकेक करत पडू लागले. लेखिका बनण्याचे स्वप्न अधुरे सोडून वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी ती मरण पावली. साधारण तिच्याच वयाची असलेल्या ग्रेसी फ्रेअरचे दात पडू लागले. हाडे तडकू लागली. अनेकींच्या हातापायांना सूज येऊ लागली. पायांची बोटे झडू लागली. गलगंड झाल्यागत ओठ आणि हनुवटीचा भाग अनिर्बंधपणे सुजू लागला. ज्या ‘यूएस रेडिअम कॉर्पोरेशन’ने ७० बायकांना कामावर घेऊन फॅक्टरीला सुरुवात केली होती, त्यातल्या ५० बायका पुढच्या पाच वर्षांत म्हणजेच १९२७ उजाडेतोवर मरणपंथाला लागल्या होत्या. पण, यात आपला काही संबंध नाही, असा ‘यूएस रेडिअम कार्पोरेशन’चा पवित्रा होता. उलट मॉलीच्या मृत्यूप्रमाणपत्रात उल्लेख झाला, त्या सिफिलिस रोगाचे कारण पुढे करून कंपनीने इतरही महिला कामगारांचे चारित्र्यहनन करत बदनामी सुरू केली.

मात्र १९२५ मध्ये हॅरिसन मार्टलँड नावाच्या ध्येयवादी डॉक्टरने ‘रेडिअम गर्ल्स’च्या कामाच्या स्वरूपाचा आणि आजारी पडण्याचा असलेला थेट संबंध उघड केला. त्यात तो असे म्हणाला, ‘‘सतत पेंटब्रश तोंडाला लावल्याने बहुसंख्य महिला कामगारांच्या शरीरात, हाडांमध्ये विघातक रेडिअमचा शिरकाव झालेला आहे आणि त्यामुळेच ही अवस्था ओढवलेली आहे.’’

या रेडिअमग्रस्तांमध्ये ग्रेसी ही एका कामगार नेत्याची मुलगी होती. तीन-चार वर्षे धडपड करूनही अन्यायग्रस्तांची केस घेण्यास कुणी तयार होत नव्हते. कारण ‘यूएस रेडिअम कॉर्पोरेशन’ ही लष्कराचा वरदहस्त असलेली कंपनी होती. या कंपनीचे प्रशासनातही मोठे वजन होते आणि अमेरिकी समाजात प्रतिष्ठीतसुद्धा. परंतु एक दिवस ग्रेसीची मेहनत फळाला आली. हार्वर्ड विद्यापीठामधून नुकत्याच बाहेर पडलेल्या रेमंड एच. बेरी नामक तरुण-तडफदार वकिलाने तिचा खटला लढण्यात स्वारस्य दाखवले. ग्रेसी, मरण पावलेल्या मॉलीची बहीण अल्बिना, क्विंटा अशा तिघींनी मिळून ‘यूएस रेडिअम कॉर्पोरेशन’विरोधात कोर्टात खटला दाखल केला. तेव्हा प्रथमच ‘रेडिअम गर्ल्स’च्या व्यथा जगाला कळल्या. बड्या बड्या वर्तमानपत्रांत ठळक मथळे छापून आले.

खरे तर तोपर्यंत ग्रेसी आणि इतर बऱ्याच जणींची प्रकृती तोळामासा झालेली होती. पहिल्या सुनावणीच्या वेळेस तर कोर्टात न्यायाधीशाने नाव पुकारल्यावर साधा हातसुद्धा उंचावण्याचे त्राण अनेकींच्या अंगी उरलेले नव्हते. पण तशाही अवस्थेत ‘ग्रेसी आणि मिळून साऱ्या जणी’ कोर्टात हजर राहिल्या होत्या. दुसऱ्या सुनावणीच्या वेळीस तर परिस्थिती अशी होती की, अनेकींना कोर्टात हजर राहणेही शक्य झाले नव्हते. त्यानंतर साक्षीदार उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी युरोपला निघून गेल्याने खटला अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवला गेला होता.

एकीकडे या बायकांच्या फारकाळ तग धरून राहण्याच्या आशा मावळत चालल्या होत्या. अखेरीस परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सगळ्या जणींना कोर्टाबाहेर तडजोड करणे भाग पडले. त्यानुसार बायकांना जवळपास एक लाख डॉलरची नुकसानभरपाई आणि दरवर्षी वैद्यकीय खर्चापोटी सहाशे डॉलर वार्षिक भत्ता देणे अपेक्षित होते. पण पुढच्या दोन वर्षांच्या आतच यातल्या अनेक जणी ल्युकेमिआ आणि इतर कर्करोगाशी संबंधित आजाराने एकेक करत मरण पावल्या.

एका बाजूला रेडिअम सुंदरींची करुण व्यथा, तर दुसरीकडे वीर्याकांक्षी इबेन बायर्सची विचित्र कथा.

इबेन बायर्स हा जिरार्ड आयरन कंपनीचा उत्साही तरुण मालक. उच्चशिक्षित, कायम उच्चभ्रू वर्तुळात वावरणारा. शैलीदार हौशी गोल्फ खेळाडूसुद्धा. आजच्या भाषेत तेव्हाचा, म्हणजेच १९२०च्या दशकातला अमेरिकेतला हा ‘पेज थ्री सेलेब्रिटी’. ‘लेडीज मॅन’ अशी ख्याती झालेला. त्याचे छंद उंची. लाइफस्टाइल भव्यदिव्य. म्हणजे, आताचे सेलेब्रिटी कसे, एक अख्खे विमानच भाड्याने घेतात, तसा हा त्याकाळी प्रवासाला निघायचे म्हणजे, अख्खी रेलगाडीच भाड्याने घ्यायचा. असाच एकदा हार्वर्ड आणि येल मधला फुटबॉल सामना बघून तो आपल्या भाड्याच्या रेलगाडीने घरी परतत होता. वाटेत कधी तरी तो अप्पर बर्थवरून खाली पडला. खाली पडला, तशी त्याच्या हाताला जबर दुखापत झाली. दुखण्यामुळे त्याचे गोल्फही थांबले आणि मैत्रिणींसोबत मौजमस्ती करण्यावरही मर्यादा आल्या. दुखण्यातून बरा होण्यासाठी म्हणून एक दिवस तो डॉक्टरकडे गेला, तर डॉक्टरने त्याला ‘रेडिथोर’ नावाचे औषध लिहून दिले. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार हे एक चमत्कार घडवून आणणारे औषध होते. यामध्ये दीडशेहून अधिक आजार बरे करण्याची क्षमता होतीच, शिवाय मनाला तजेला आणि बायकांना भुरळ घालणाऱ्या पौरुषत्वाला उभारी देण्याचीही मोठी ताकद होती.

या चमत्कारी औषधाचा निर्माता होता-विलियम जे. ए. बेली. हा बेली हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण अर्धवट सोडून दिलेला महाउचापती गृहस्थ. स्वत:ला विएन्ना युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झालेला डॉक्टर म्हणवून घेत होता – खरेतर आपल्याकडे असतात, तसा हा भोंदूबाबा होता. पण औषधाची जी खासियत सांगितली जात होती, त्याने अमेरिकेतल्या पुरुषांना भलतेच नादावले होते. इबेन बायर्स त्यातलाच एक बहकलेला तरुण होता. बेली हा पाण्यामध्ये रेडिअम मिसळत होता. पाण्यासोबतच सर्दी आणि खोकल्यावरची किरणोत्सारभारित औषधे आणि ‘रेडिओ-एंडोक्रिनेटर’ हे पुरुषांची नपुंसकता (?) घालवणारे उत्पादनही विकत होता. त्याचे म्हणणे पुरुषांनी हे उत्पादन रात्रभर आपल्या अंडकोशाखाली धरले की, शरीरातले वीर्य वाढते. आपले उत्पादन हातोहात खपावे, म्हणून हा बेली डॉक्टरांना घसघशीत असे १७ टक्के कमिशनही देऊ करत होता. योगायोग म्हणजे, या बेलीची ‘बेली रेडिअम लॅबोरेटरी’सुद्धा ‘यूएस रेडिअम कॉर्पोरेशन’च्या परिसरात म्हणजेच न्यू जर्सी भागातच होती.

तर ‘रेडिथोर’ घेऊन बायर्स घरी आला. पौरुषत्वाला उभारी देण्याच्या विचाराने त्याला पछाडले आणि दिवसाला तो ३-३ बाटल्या संपवू लागला. आपले लैंगिक आयुष्य फुलल्याचा दावा करू लागला. असे करता करता त्याने तीन वर्षांत स्वत: ‘रेडिथोर’च्या जवळपास १४०० बाटल्या तर संपवल्याच, शिवाय त्या आपल्या इतर मित्रांमध्येही वाटल्या. आवडत्या मैत्रिणींना आग्रहाने घ्यायला लावल्या. इतकेच कशाला, तबेल्यातल्या उफाड्याच्या घोड्यांनाही रेडिथोर पाजण्याचा आपल्या नोकरांना आदेश दिला. या नंतर इतरांचे काय झाले, हे फारसे पुढे आले नाही. मात्र बायर्सच्या शरीरात, हाडांमध्ये कर्करोगजन्य रेडिअम क्रमाक्रमाने साचू लागले. त्याचे सांधे दुखू लागले. हाडे ठिसूळ होऊ लागली. जबडे सुजले. दात पडू लागले. मेंदू निकामी होऊ लागला. कवटीला छिद्रे पडू लागली. एका गुलछबू बाईलवेड्या धनाढ्याचे रूपांतर हळूहळू एका सापळ्यात होऊ लागले. आयुष्याच्या अखेरीस त्याची अवस्था रस्त्यावरच्या अस्थिपंजर भिकाऱ्यासारखी झाल्याचे निरीक्षण बायर्सचा जबाब नोंदवायला गेलेल्या रॉबर्ट व्हिन नावाच्या वकिलाने त्यावेळी नोंदवले.

सेलेब्रिटी असल्यामुळे बायर्सच्या मृत्यूच्या घटनेला ‘रेडिअम गर्ल्स’च्या तुलनेत अधिक प्रसिद्धी मिळाली आणि रेडिअमच्या अनिर्बंध वापरविरोधी जनजागृतीला गतीसुद्धा आली.

अनभिज्ञ रेडिअम गर्ल्स असो किंवा वीर्याकांक्षी इबेन बायर्स, या घटनांच्या निमित्ताने अनेक दुष्परिणाम समोर आले.

 

कर्कविज्ञानाची गोष्ट 
डॉ. आनंद जोशी, शेखर देशमुख 
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठ- १८२
२५० रुपये

COMMENTS