नवी दिल्लीः भारतातील ६६ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात नमूद केले आहे. असंसर्गजन्य रोग म्ह
नवी दिल्लीः भारतातील ६६ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात नमूद केले आहे. असंसर्गजन्य रोग म्हणजे असे रोग किंवा आजार की जे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संक्रमित होत नाही आणि हे रोग किंवा आजार आपल्या जीवनशैलीशी निगडित असतात. असंसर्गजन्य रोगांमध्ये कर्करोग, मधुमेह, श्वसनाचे आजार यांचा प्रामुख्याने समावेश असतो. भारतात दरवर्षी ६०.१ लाख मृत्यू हे अशा आजाराने होतात, यातील मृत्यू वेळीच उपचार घेतल्याने लांबवता येतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
असंसर्गजन्य आजार कोणत्या देशात वाढत आहेत अशा १९४ देशांची यादी जागतिक आरोग्य संघटनेने २१ सप्टेंबरला जाहीर केली. यात भारताचे चित्र स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार भारतातील २२ टक्के मृत्यू हे वय वर्षे ३० व त्यावरील व्यक्ती ते सत्तरी गाठण्याआधी होतात. ही टक्केवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर १८ टक्के इतकी आहे.
भारतात असंसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमधील सर्वाधिक मृत्यू हे हृदयाच्या संबंधित आजाराने होतात. ही टक्केवारी २८ इतकी असून उच्च रक्तदाब हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. उच्च रक्तदाबाने होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी ३१ इतकी आहे. (वय ३०-७९ दरम्यान). गंभीर गोष्ट अशी की भारतातील सुमारे ६३ टक्के व्यक्तींना हृदयविषयक आजाराविषयी कल्पना नसते.
हृदयविकाराखालोखाल लठ्ठपणामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. २००० सालापासून भारतात वय वर्षे १८ व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. हा लठ्ठपणा नियंत्रित करण्याच्या उद्दिष्टापासूनही भारत दूर असून वय वर्षे १८+ असलेली ३४ टक्के जनता शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही टक्केवारी २८ इतकी आहे.
शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय म्हणजे एका आठवड्यात कमीतकमी १५० मिनिटेही कोणत्याही प्रकारची सामान्य शारीरिक हालचाल नसणे.
असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयविषयक आजारानंतर महत्त्वाचा आजार हा श्वसनजन्य आजार हे असून यामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी १२ टक्के इतकी आहे. भारतामध्ये दरवर्षी १ लाख मृत्यूंमध्ये ११३ मृत्यू हे क्रोनिक ऑब्जट्रूक्टिव्ह पलमोनरी डिसिज (सीओपीडी)ने होतात. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. सीओपीडी होण्यामागे हवेतील प्रदूषण हा महत्त्वाचा भाग आहे. भारतात प्रदूषण निश्चित केलेल्या प्रदूषण मानकापेक्षा (पीएम २.५) ९ टक्के अधिक आहे. हे प्रदूषण आफ्रिका, आशिया व प. आशियातील देशातील काही देशांपेक्षा अधिक आहे.
जगभरात तंबाखूचे सेवन कमी होत चालले आहे पण भारतात तंबाखूवर कराचे प्रमाण कमी असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना नाराज आहे.
असंसर्गजन्य आजारामध्ये कर्करोगाने भारतात मृत्यू पावणाऱ्यांची टक्केवारी १० टक्के इतकी असून त्यानंतर मधुमेह, अस्थमा व हृदयविषयक अन्य आजाराचा समावेश होतो. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर ग्रीवासंबंधी कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. पण कर्करोगासंदर्भात ३० ते ४९ वयोगटातल्या केवळ २ टक्के महिला अशा आजाराबाबत प्रतिबंधक पावले उचलतात.
मूळ बातमी
COMMENTS