अनिल देशमुख यांना अटक, ईडीची कारवाई

अनिल देशमुख यांना अटक, ईडीची कारवाई

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते अनिल देशमुख यांना आज पहाटे दीडच्या सुमारास ईडीने अटक केली. अनेक महिने बेपत्ता असलेले देशमुख सोमवारी ईडीच्या कार्यालयात अचानक हजर झाले. तेथे त्यांची सुमारे १३ तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीसाठी दिल्लीतून ईडीचे काही अधिकारीही आले होते. नंतर त्यांना उशीरा अटक करण्यात आली.

देशमुख यांना झालेली अटक हा महाविकास आघाडी सरकारला एक राजकीय धक्का समजला जातो. राष्ट्रवादीचा हा मातब्बर नेता मनी लाँड्रिंग व खंडणी वसुलीसारख्या आरोपांच्या प्रकरणात अडकल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथी झाल्या होत्या.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबजीत सिंग यांनी पदावर असताना देशमुख यांच्यावर १०० कोटी रु. खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी अँटिलिया येथे स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर देशमुख, परमबजीत सिंग व पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर राज्याचे राजकारण केंद्रीत झाले होते. ही स्फोटके एका स्कॉर्पिओ गाडीत होती. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या झाल्याचे पुढे निष्पन्न झाले. या हत्येत सचिन वाझे याचा हात असल्याचा पुरावे मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्या नंतर वाझे यांना अटक झाली. पण देशमुख व परमबजीत सिंग हे दोघेही फरार झाले. देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व राज्यातील अन्य शहरातील कार्यालयांवर ईडी, प्राप्तीकर खात्याने अनेक धाडी मारल्या. त्यांना चौकशीसाठी बोलवण्यासाठी अनेक नोटीसा, समन्स पाठवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक, स्वीय सचिवांनाही अटक झाली होती. पण देशमुख कशालाच दाद देत नसल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे होते. ते बेपत्ता झाल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे होते. मात्र देशमुख यांनी आपण ईडी व अन्य तपास यंत्रणांना वेळोवेळी साथ दिल्याचे म्हटले. ईडीने त्यांना चार वेळा समन्स पाठवले होते. त्यालाही ते दाद देत नसल्याची वृत्ते पुढे आली होती. पण देशमुख यांनी आपली एक केस सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याच्यावरच्या निकालावर सर्व काही अवलंबून असल्याचे वक्तव्य एका व्हीडिओद्वारे केले होते. सोमवारी ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांच्या सखोल चौकशीनंतर त्यांना अटक झाली.

COMMENTS