महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
“विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीला आधारच नाही”, असे म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार् यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय दिले आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता. आज पुन्हा पवारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित केले आणि अनिल देशमुख यांना अभय दिले.
“ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
“जर माजी पोलीस आयुक्तांचे पत्र पाहिले, तर त्यांनी त्यात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या काळात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांना दिल्याचे ते म्हणतात. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते”, असं शरद पवारांनी सांगितले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीसाठी सचिन वझे आणि इतर अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे सध्या राज्याच्या राजकरणांमध्ये खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेऊन राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
“परमबीर सिंह यांनी त्यांच्या बदलीनंतर पत्र लिहिले असून, जाणुनबुजून हा पुरावा तयार करण्यात आला आहे, असे दिसते. पत्रात तारखांचा जो उल्लेख आहे, त्याबद्दल वस्तुस्थिती वेगळी आहे. अनिल देशमुख फेब्रुवारीच्या सुरुवातीला जनसंवाद यात्रेत होते. त्यानंतर कोरोना झाल्यामुळे १५ तारखेपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर २७ तारखेपर्यंत क्वारंटाइन असताना कोणाला भेटले नाहीत. अनिल देशमुख वाझेंना फेब्रुवारी अखेरला भेटले असे परमबीर सिंह सांगत आहेत,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.
मलिक म्हणाले, की आरोपांमध्ये सत्य किती आहे याची माहिती घेतल्याशिवाय, तपास झाल्याशिवाय राजीनामा द्या अशी मागणी करणे सोपे आहे. पण बिनबुडाचे आरोप कोणीही करु शकतो. त्यासाठी पक्षाने निष्पक्ष भूमिका घेतली आहे. तपास होईल, त्यानंतर सत्य समोर येईल आणि मग कारवाई केली जाईल
शरद पवारांनी काहीतरी शिजल्यानंतर हे आरोप होत असल्याचे म्हंटले आहे. तपास होऊ द्या, जे सत्य आहे त्यापद्धतीने पुढील कारवाई होईल. सध्या राजीनामा घेण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. आरोप गंभीर असले तरी सत्य आहेत की नाही तपासणं गरजेचं आहे. पत्राबाबत शंका असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, असे मलिक म्हणाले.
दरम्यान परमबीर सिंह यांनी पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत परमबीर सिंह यांनी आपली बदली चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्दतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे.
COMMENTS