अंटार्क्टिकावरील एका तळाचे तापमान १८.३ अंश सेल्सियस

अंटार्क्टिकावरील एका तळाचे तापमान १८.३ अंश सेल्सियस

जिनिव्हा/ब्युनॉस आयर्स : शीतखंड समजल्या जाणाऱ्या अंटार्क्टिका खंडावरच्या उत्तरेकडील ‘एसपेरेन्झा’ या तळावरचे तापमान १८.३ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेने शुक्रवारी दिली. अंटार्क्टिका खंडावरचे गेल्या काही वर्षांतले हे सर्वोच्च तापमान असल्याचे संशोधकांचे म्हणणे असून जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका खंडावरील दक्षिणेचा भाग वितळू लागल्याची चर्चा आजपर्यंत केली जात होती पण आता उत्तरेत एका तळाचे तापमान एवढे वाढल्याने शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

गुरुवारी ‘एसपेरेन्झा’ या तळाचे तापमान अर्जेटिनातील एका तळावरून मोजण्यात आले होते.

उन्हाळ्याच्या मोसमात अंटार्क्टिकावर एवढे तापमान वाढताना दिसत नाही. १९८२साली जानेवारी महिन्यात अंटार्क्टिकावरच्या एका भागात १९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५मध्ये या खंडावरच्या एका भागाचे तापमान १७.५ अंश सेल्सियस नोंदले गेले होते. त्यानंतरचे हे सर्वोच्च तापमान आहे.

अंटार्क्टिका हा जगातील वेगाने गरम होत जाणारा खंड असून आजपर्यंत तापमान वाढीचा धोका आर्क्टिक क्षेत्राबाबत बोलला जात होता. पण आता अंटार्क्टिकालाही तापमान वाढीचा धोका पोहोचत असल्याचे जागतिक हवामान संघटनेच्या प्रवक्त्या क्लेअर न्युलिस यांनी जिनिव्हात पत्रकारांना सांगितले. ‘एसपेरेन्झा’ या तळावरच्या काही हिमखंडांमध्ये मोठ्या भेगा पडल्या असून हिमखंडांना अधिक भेगा पडल्यानंतर समुद्र पातळी वाढत जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जागतिक तापमानवाढीने अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावरचा बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढत असल्याची भीती यापूर्वी अनेक वर्ष शास्त्रज्ञांकडून बोलली जात आहे. गेल्या १०० वर्षांत जागतिक तापमानवाढीने समुद्राची पातळी १० फूट वाढल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे. १९७९ ते २०१७ या काळात अंटार्क्टिकावरील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात सहा टक्क्याने वाढ झालेली आहे.

मूळ बातमी

COMMENTS