मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात देशभर लोकशाही पद्धतीने आंदोलने होत असताना पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या विरोधात देशभर लोकशाही पद्धतीने आंदोलने होत असताना पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जंगी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. आपला हा मोर्चा त्यांच्या मोर्चाला उत्तर असल्याचे स्पष्ट करत अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने व तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल असा इशारा त्यांनी दिला. हा मोर्चा बघावा, या देशात एकोप्याने राहा, उगीचच ताकद दाखवू नका असा मुस्लिम समुदायाला इशारा देत राज ठाकरे यांनी सीएएच्या विरोधात मुस्लिमांनी मोर्चे काढले त्याचा अर्थ कळला नाही, सीएए किंवा एनआरसी जे जन्मापासून येथे राहात आहेत त्यांना लागू नाही तर तुम्ही कोणाला ताकद दाखवता असा सवाल त्यांनी केला.
या देशातून पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे. त्यात तडजोड होऊ शकत नाही, हा कायदा १९५५ सालचा आहे. त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. आता परिस्थिती बदलली आहे. आता पाकिस्तानची परिस्थिती काय आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी हा देश धर्मशाळा आहे का असा सवाल केला. या देशात कुठूनही कोणीही येते, घुसखोरी केली जाते, बेरोजगारीबरोबर घुसखोरीचे संकट हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचा दावा त्यांनी केला. माझा देश धर्मशाळा नसून कुठूनही लोक या देशात येतात, फक्त बांगलादेशी नाही तर मीरा भाईंदरमध्ये नायजेरियन नागरिक धुमाकूळ घालत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. परदेशांत घुसखोरांना थारा दिला जात नाही. मग माणुसकीचा ठेका काय फक्त भारतानेच घेतलाय का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी देशभर निघत असलेल्या सीएएविरोधी आंदोलनावरही टीका केली. असे मोर्चे काढणाऱ्यांना सीएएबद्दल माहितीही नाही. फक्त व्हॉट्सअपवर चर्चा करून मेसेज पुढे पाठवले जातात. सरकारने एनआरसी करणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे तरीही मोर्चे का निघत आहेत असा सवाल त्यांनी केला.
मराठी मुस्लीम जेथे राहतात तेथे कधी दंगली झालेल्या नाहीत. पण आज असे मोहल्ले उभे आहेत की तेथे पाकिस्तान, बांगलादेशातील मुस्लिम राहात आहेत. तेथे पोलिस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. ते ड्रग्ज विकतात, महिलांची छेड काढतात मग आपण षंढासारखं पाहात राहायचं का, असा संताप त्यांनी व्यक्त केला. एकदाच काय ते दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या, असे ते म्हणाले.
मोर्चाला प्रचंड गर्दी
मनसेचा हा मोर्चा हिंदू जिमखाना येथून सुरू झाला व त्याची सांगता आझाद मैदानात झाली. या मोर्चाला महाराष्ट्रातून हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. या मोर्चात मनसेचा छ. शिवरायांची राजमुद्रा असलेला नवा भगवा झेंडा दिसत होता. कार्यकर्त्यांनी हातावर व आपल्या गाड्यांवर हे झेंडे बांधले होते. अनेक कार्यकर्त्यांनी भगवा वेषही परिधान केला होता.
COMMENTS