या शासनाचा हिंदू राष्ट्र घडविण्याचा उद्देश आहे, असे ते म्हणतात. परंतु असे राष्ट्र कसे काय उभारणार याचा त्यांच्याकडे आराखडाही नाही आणि तंत्रही नाही. सर्व उद्ध्वस्त केल्यावर राष्ट्र उभारणीची साधने कोठून आणणार, विविध समाजांना, संस्कृतींना एकत्र कसे जोडणार, एक देश म्हणून देशाची प्रतिमा आणि वास्तव कसे साध्य करणार ह्याचा काही एक विचार दिसत नाही...
देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फुल
मनी मंतरली सृष्टी.
-बहिणाबाई
बहिणाबाईंच्या ‘मन’ कवितेतील ह्या सुंदर ओळी आर्किटेक्टची सर्जनशीलता नेमक्या शब्दात व्यक्त करतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अलौकिक, वैश्विक दृष्टी असलेले, सर्जनशील व्यक्तिमत्व होते. म्हणूनच तर त्यांना भारताचे आर्किटेक्ट म्हटले जाते.
५० वर्षांपूर्वी मी मुंबईच्या जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घ्यायचे ठरवले, तेव्हा आर्किटेक्चर म्हणजे काय असा प्रश्न विचारला जात असे. आजही अनेकांना त्याची कल्पना नसल्याने नेहरूंना भारताचे आर्किटेक्ट का मानले जाते, हे अनेकांना समजत नसते. त्यामुळे आधी थोडे आर्किटेक्चरबद्दल.
आर्किटेक्चरच्या व्यवसायात तत्वज्ञान, विज्ञान, कला आणि सिद्धांत अशा अनेक विषयांची सरमिसळ असते. उत्तम आर्किटेक्टजवळ संकल्पना शक्ती असते, नवनिर्मिती करण्याची क्षमता असते. आपल्या संकल्पना इतरांना समजावून सांगण्याची कला असते. आर्किटेक्टना मानवी स्वभाव आणि वृत्ती जाणून घेण्यात रस असतो. त्यांना भोवतालचे जग, निसर्ग समजून घेण्यात रस असतो. या व्यतिरिक्त त्यांच्याजवळ गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्याचे कौशल्य असते. आर्किटेक्चर म्हणजे प्रत्येक संस्कृतीमधील सत्य, शिव आणि सुंदरता सामावून घेणाऱ्या सर्व प्रकारच्या मानवी कलाकृती. अशा कलाकृती निर्माण करणाऱ्या कलासक्त व्यक्ती व्यवसायाने नसल्या, तरी मनाने आर्किटेक्टच असतात. त्यांच्या नवनिर्मितीमुळे मानवी उत्क्रांतीचे, विकासाचे नवे मार्ग खुले होतात.
प्रतिभावंत आर्किटेक्टची खरी ओळख
भव्य, उत्तुंग वास्तूंच्या संकल्पना करणारे आर्किटेक्ट लहानात लहान आणि सूक्ष्मातील सूक्ष्म घटकांचा आणि त्यासाठी आवश्यक अशा विविध मार्गांचाही विचार करतात. काय बांधायचे हे अनेकांना समजते, मात्र ते कसे बांधायचे ह्याचाही विचार आर्किटेक्टला करावा लागतो. त्यासाठी इतर अनेक तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा लागतो. अन्यथा ते पोकळ स्वप्नरंजन ठरते. संपूर्ण रचनेबरोबरच त्या भोवतालच्या जमिनीचा, वस्तीचा, समाजाचा, संस्कृतीचा विचारही आर्किटेक्ट करतात. ते विचारी चिंतनशील असतात. एखाद्या संकल्पनेच्या खोलात जाऊन विचार करतात, तसाच त्या विचारांच्या विस्तारही करतात. सर्व विरोधाभासांमध्ये संतुलन साधण्याची कसरत त्यांना जमते. रंगाच्या अनेक सूक्ष्म छटा त्यांना ओळखता येतात. त्यातून निर्माण होणारे भाव-तरंग आणि मनावर होणारे परिणाम त्यांना दिसतात. सर्व प्रदेशातील कलांचा आणि कलाकारांचा ते आदर करतात. त्यांचे आत्मिक बळ मोठे असते. कोणतेही निर्णय ते घाईगडबडीत घेत नाहीत. असे सर्व गुण पंडित नेहरुंपाशी होते म्हणूनच तर त्यांना आर्किटेक्ट म्हटले जाते. आधुनिक लोकशाही राष्ट्र उभारणी काही वास्तूसारखी नसते तर ती दीर्घ काळ चालणारी, असंख्य पिढ्यांच्या कार्यकर्तृत्वातून साकार होणारी प्रक्रिया असते ह्याचे त्यांना भान होते. हे सर्व जाणूनच गांधीजींनी देश उभारणीची कामगिरी पंडित नेहरूंवर सोपवली होती.
नेहरूंचा राष्ट्र उभारणीचा अभिकल्प
आधुनिकता हे नेहरूंच्या भारताच्या अभिकल्पाचे (design) मूलभूत गाभ्याचे तत्व होते. त्या गाभ्यांच्या भोवती सर्वांनी मिळून राष्ट्र घडवायचे, अशी ती संकल्पना होती. राष्ट्रीय एकात्मता, संसदीय लोकशाही, औद्योगिक विकास, समाजवाद, वैज्ञानिक वृत्तीची जोपासना, मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आणि जगातील महासत्तांपासून अलिप्तता अशी आधुनिक भारताच्या रचनेची तत्त्वे त्यात अंतर्भूत होती. प्रत्यक्षात नव स्वतंत्र भारतामध्ये सांस्कृतिक, प्रादेशिक वैविध्य तर होतेच, पण त्यातही मोठे विरोधाभास होते. अनेक प्रकारच्या विविधांगी संस्कृतीच्या आदान-प्रदानासाठी संस्थांची निर्मिती करून देशातील नागरिक राष्ट्रीय एकात्मता साध्य होऊ शकेल, अशी त्यांची धारणा होती. त्या प्रत्येक विषयासाठी ते बहुआयामी सर्जनशील, कुशल, कलासक्त व्यक्तींची निवड/ नेमणूक ते करीत. त्यामुळेच त्यांनी ज्या आयआयटी, आयआयएम, भाभा अणुसंशोधन केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट, विद्यापीठे निर्माण केली, त्या सर्व संस्थांमध्ये तंत्रज्ञान, विज्ञान, कला, संगीत, नाटक, सिनेमा, साहित्य आणि वास्तूशास्त्र ह्यांचा मिलाफ दिसतो. भारताच्या या बहुआयामी अभिकल्पानुसार रचना करण्यासाठी त्या काळी अनेक वैज्ञानिक, तंत्रज्ञ, कलावंत, साहित्यिक, आर्किटेक्ट सरसावले यात नवल नाही. स्वाभाविकपणे जागतिक कीर्तीच्या होमी भाभा, विक्रम साराभाई, डॉ. कोसंबी, महालनोबीस, यांच्यापासून ते सर्व प्रकारच्या सर्जनशील कलावंतांशी, कलाकारांशी त्यांचे वैयक्तिक नाते होते.
“I do not want my house to be walled in on all sides and my windows to be stuffed. I want the culture of all lands to be blown about my house as freely as possible. But I refuse to be blown off my feet by any”
― Mahatma Gandhi
महात्मा गांधींचे वरील वचन पंडित नेहरू जगत होते आणि इतरांना समजावून देत होते. वैश्विक आर्किटेक्चरच्या भाषेत सांगायचे, तर नेहरूंच्या राष्ट्रीय अभिकल्पामध्ये कधी ग्रीक वास्तुकलेतील काटेकोरपणा असे, तर कधी रोमन वास्तुकलेतील तांत्रिकता; कधी फ्रेंच गॉथिक वास्तुशैलीतील रोमँटिक भाव तर कधी भारतीय वास्तुकलेतील अध्यात्माचा स्पर्श असे. भारतामधील विविध संस्कृतींचे ऊर्जेचे स्रोत सामावून घेणे हे त्यांच्या अभिकल्पाचे सार होते. त्यांना जगाच्या आणि भारताच्या इतिहासाचे ज्ञान होते तसेच भारताच्या आणि जगाच्या भविष्याची प्रेमापोटी वाटणारी चिंताही होती. त्यांना भारत हा आधुनिक लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या जबाबदार नागरिकांचा देश घडवायचा होता.
नेहरूंची आधुनिक भारताची संकल्पना व्यापक पर्णसंभार आणि दूरवर आणि खोल मुळे असलेल्या, वादळ-वाऱ्यांना तोंड देणाऱ्या लवचिक पण शक्तिशाली वटवृक्षासारखी होती. कालानुरूप पारंब्या वाढत त्याचा विस्तार होणे अपेक्षित होते. नवीन रचनांचा समावेश करण्यासाठी त्यात अवकाश होता. आधुनिक राष्ट्र कल्पनेच्या विस्ताराबरोबर देशातील सर्व लोकांचा विकास हे ध्येय होते. आधुनिक भारताचे भव्य स्वप्न वास्तवात आणण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात ह्याची त्यांना कल्पना होती. शिवाय ते साध्य करण्यामध्ये वास्तवातल्या भौतिक, आर्थिक, तांत्रिक मानवी क्षमता, सामाजिक वृत्ती यांच्या मर्यादांचेही भान त्यांना होते. त्यांच्या ह्या सर्व संकल्पना, अडचणी, मर्यादा, अपेक्षा, विचार ते शब्दांमधून, भाषणांमधून व्यक्त करीत. जास्तीत जास्त लोकांना भारताच्या या अभिकल्पनेत सामील करून घेण्याचा प्रयत्न करीत. त्यांच्यासाठी सार्वजनिक राष्ट्रीय प्रकल्प म्हणजेच देवालये होती.
आजचे बुलडोझरस्वार
पंडित नेहरूंच्या तुलनेत आज पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना भविष्यात जग आणि भारतील नागरिक कशा स्वरूपात ओळखतील असा प्रश्न जेव्हा मनात आला तेव्हा बुलडोझरस्वार हाच शब्द मनात उमटला!
बुलडोझर: बुलडोझर म्हणजे मानवाने स्वतःच्या विचाराने, बुद्धीने बनवलेले एक निर्जीव यंत्र. ते आकाराने अगडबंब आणि भीतीदायक असते. अशा यंत्राला स्वतःची बुद्धी, स्वतंत्र विचार, चिंतन अशा कोणत्याच मानवी गुणांचा स्पर्श नसतो. खणून काढणे, तोडफोड करणे हेच त्याचे खरे काम. अनेक माणसांचे, निर्बुद्ध श्रमाचे काम हे शक्तिशाली यंत्र अल्प काळात करते. कोणत्याही रचनेचा विनाश करून मलबा, राडा-रोडा करणे हेच त्याचे काम! अनेकदा बुलडोझर आणि रोडरोलर ही दोन यंत्रे जोडीने काम करतात. बुलडोझर तोडफोड करते, मलबा हटवते आणि रोडरोलर डांबर ओतलेल्या जागेवरून अवजड लोखंडी चाक फिरवून सपाटीकरण करतो. अशी वजनदार लोखंडी यंत्रे चालतात तेव्हा वाटेतील सर्व चांगल्या-वाईट गोष्टी त्यांच्या मूल्यमापनाशिवाय उद्ध्वस्त होतात. त्यांचा गडगडाट भय उत्पन्न करतो. अर्थात दृष्टिहीन आणि बहिऱ्या लोकांना ते समजू शकत नाही.
आज आपल्या देशाच्या पंतप्रधान असलेल्या मोदींना जर कोणती उपाधी द्यायची असेल तर ती बुलडोझरस्वाराची आणि त्यांच्या सहकाऱ्याला, अमित शहा यांना रोडरोलरस्वारांची उपमा द्यावी लागेल. ह्या दोघांकडे भावनांचा पूर्ण अभाव दिसतो आहे. देशातील सर्व काही विविधता उद्ध्वस्त करून सपाटीकरण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. आजपर्यंत देशाची दूरदृष्टीने बांधणी करण्याचे दीर्घ आणि अवघड काम चालू होते, ते नष्ट करण्याचे काम हे दोन स्वार करीत आहेत. नेहरूंच्या आधुनिक राष्ट्र संकल्पनेला द्वेष भावनेने विरोध करणे हाच एककलमी कार्यक्रम असल्याने तसेच मुस्लिम धर्मियांनी हिंदू संस्कृती नष्ट केली, या विचार-विकृतीमुळे त्यांना देशातील विविध प्रदेशांमधील, समाजांमधील वैविध्य, वास्तूशैली, भाषा, साहित्य, कला, संगीत, तत्वज्ञान यांच्यात संकर प्रक्रियेतून आकारास आलेली विविधता समजू शकत नाही. त्यात, भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे सखोल ज्ञान नाही. वर अन्यायग्रस्त मानसिकता आणि सूड भावना अशा मिश्रणातून भारताच्या वसुधैव कुटुंबाच्या संस्कृतीलाच हे बुलडोझर-रोडरोलरस्वार नष्ट करत निघाले आहेत. गतकाळातील तथाकथित हिंदू सुवर्णकाळाची पुनर्स्थापना करताना देशाचा आणि नागरिकांचा वर्तमानकाळ मात्र अंधःकारमय होत चालला आहे. नवनिर्मिती करणाऱ्या आर्किटेक्ट्सारखी सर्जनशीलता, संकल्पना शक्ती आणि भविष्यवेधी दूरदृष्टीचा अभाव हेच त्याचे मुख्य कारण आहे. शिवाय वास्तव इतिहासापेक्षा काल्पनिक भाकडकथांच्या आधारे भूतकाळाचे आकलन असल्याने हे घडते आहे. सर्जन हा बुलडोझर आणि रोडरोलरचा स्वभावच नसतो, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
गतकालीन वारश्याची मोडतोड
त्यांचा आजपर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला तर हे अधिक स्पष्ट होईल. सर्वात प्रथम ह्या विचारसरणीने बाबरी मशीद उध्वस्त केली. नंतर भ्रष्टाचार नष्ट करण्याचे आश्वासन दिले, पण ते काही बुलडोझर घालून नष्ट होऊ शकेल, अशी इमारत नसते, तर मानवी वृत्तीचा एक भाग असतो हे त्यांना माहीतच नव्हते. प्रचाराचा गदारोळ उठवून संसदेमध्ये मिळवलेले बहुमत म्हणजे, सर्वकाही नष्ट करण्याचा परवानाच वाटतो आहे. संसदेचा तर विध्वंसक शस्त्र म्हणूनच वापर सुरू केल्याने ते लोकांवरच वार करते आहे.
सर्वात आधी अचानक ५००-१००० रुपयांच्या नोटा बाद करून देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि बहुसंख्य लोकांच्या रोजगारावर त्यांनी बुलडोझर घातला. त्यातून अर्थव्यवस्था पुन्हा सावरायला लागली तेव्हा, तिला अर्धवटपणे जीएसटीचा तडाखा दिला. हे सर्व कमी म्हणून की काय काश्मिरी नागरिकांचा संपर्क देशापासून तोडला, तेथील राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकले आणि दमन यंत्रणा कार्यरत केली. पुढे देशातील काही विशिष्ट नागरिकांच्या नागरिकत्वाच्या हक्कावर कायद्याचा बुलडोझर घालून त्यांना दाबण्यासाठी रोडरोलरचा वापर सुरू केला. सत्तेला जाब विचारणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे दमन केले. त्यानंतर वक्र दृष्टी गेली ती शेतकरी वर्गावर. पुन्हा बुलडोझर चालवून त्यांना नामोहरम करण्यासाठी सर्व यंत्रणा राबवायला सुरूवात केली. ह्या सर्व काळात सर्वोच न्यायालय, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, देशातील स्वायत्त विद्यापीठे, शिक्षण संस्था, वैज्ञानिक संस्था, वर्तमानपत्रे आणि चित्रपटासारखी करमणूक साधने ह्यांच्यावरही बुलडोझर चालविण्याचे काम सुरूच होते.
त्यातच अनपेक्षितपणे कोविड-१९ महामारी आली, तेव्हा देशामध्ये सर्वांच्या अंगावर अचानक लॉकडाऊनचा बुलडोझर घातला. त्या तडाख्याने गरीब मजूर, कामगार, स्थलांतरित भरडले गेले. अर्थव्यवस्था पुरी खड्ड्यात गेली. या कोणत्याही कृतीमागे लोकांवर काय काही विपरीत परिणाम होऊ शकतात, ह्याची पुसटशी जाणीवही बुलडोझर-रोडरोलरस्वारांना नव्हती. आपल्या चाकांखाली कोण आणि काय चिरडले जाते आहे ह्याची तमा नव्हती. आपण काय काय नष्ट करीत आहोत हेच चालकांना दिसत नव्हते. अजूनही दिसलेले नाही.
बुलडोझर आणि रोडरोलर चालकांना काहीही निर्माण करण्याची क्षमता नसते, हे त्यांनी एव्हाना सिद्ध केले आहे. देशाची अर्धवटपणे बसत असलेली लोकशाहीची घडी उद्ध्वस्त करणे, अधिकारशाही प्रस्थापित करणे आणि दहशत माजवून ७० वर्षातील रचलेले सर्व काही नष्ट करणे, हाच एकलक्षी एक कलमी कार्यक्रम सध्या केंद्रीय पातळीवर सुरू असल्याचे दिसते आहे.
भव्यदिव्यतेचा भूलभुलैय्या
तरीही काही ना काही, लोकांना भुलवणारी भव्य बांधकामे केल्याशिवाय जनमानसात आपली प्रतिमा राखता येणार नाही यासाठीच भाडोत्री आर्किटेक्ट नेमून सरदार पटेलांचा जगातील ‘सर्वात उंच पुतळा’ उभारणारा नेता म्हणून, सरदारांचे नाव असलेले स्टेडियम पाडून स्वतःचे नाव देणारा नेता म्हणून विद्यमान पंतप्रधान मिरवीत आहेत. दिखाऊ भव्यतेचे प्रदर्शन म्हणजे बालबुद्धीचे लक्षण याचे त्यांचे भानदेखील आता पुरते सुटले आहे.
अशी वृत्ती आजपर्यंत अलीकडच्या अनेक हुकूमशहांच्या काळात विविध प्रदेशात दिसली आहे. जर्मनीमधील हिटलरने जर्मनीला महासत्ता बनविण्यासाठी जंग जंग पछाडले, पण युरोपचा सत्यानाश करूनच ते वेड निकालात निघाले. जगातील महासत्ता बनण्याच्या नादात सोव्हिएत युनियनने नेत्यांचे हजारो पुतळे उभे केले, भव्य दिव्य प्रकल्प उभे केले. विविध प्रदेशातील संस्कृतींना जमीनदोस्त केले. तो प्रयोग ७० वर्षांनी अचानकपणे कोसळला. पुतळे तर गाडले गेलेच, शिवाय देशाचे असंख्य तुकडे झाले. महासत्ता बनण्याचे स्वप्न तर हवेत विरले. युगोस्लाव्हियातही तेच घडले. चीनमध्ये माओ यांचा सांस्कृतिक क्रांतिद्वारे बुलडोझ-सपाटीकरण करण्याचा प्रयोग फसला आणि भांडवलशाही देशांचे अनुकरण सुरू झाले. तेथेही महासत्ता बनण्याचे सत्ताधारी नेत्यांचे वेड असले, तरी तेथील जनता ते कितीकाळ सहन करेल हे येत्या काळात दिसेल. अमेरिकेतील बुश महाशयांनी अनेक देशांमध्ये अकारण युद्धखोरी केली. स्वतः तर बदनाम झालेच आणि अमेरिकेलाही बदनाम केले. त्यावर कडी म्हणून ट्रम्प यांनी लोकशाही गाडण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने, अमेरिकेतील प्रगल्भ लोकशाहीने ते वेळीच थांबवले.
भव्य, सर्वात उत्तुंग इमारती बांधण्याचे वेड जगात अनेक देशांत बघायला मिळते. पण जेव्हा अमेरिकेत एम्पायर स्टेट इमारतीचे उद्घाटन झाले, त्याच वर्षी अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड मंदीमध्ये सापडली. हाच प्रकार मलेशियात पेल्ट्रोन टॉवरचे उद्घाटन झाल्यावर झाला. त्यानंतर चीनमध्येही सर्वात उंच इमारती बांधण्याचा प्रकल्प सुरू झाला, पण आता तोही थांबवावा लागला आहे. अशाच भव्यदिव्य बांधकाम वेडाने आपले पंतप्रधानही पछाडलेले आहेत. त्यांचा साबरमतीच्या गांधी आश्रमाचा पुनर्निर्माण प्रकल्प तर दांभिकपणाचा कळस आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील गांधी द्वेषाचे बाळकडू पिऊन वाढलेल्या पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षात अनेक जागतिक नेत्यांबरोबर गांधींच्या आश्रमात स्वत: मिरवून, फोटोशूट करून घेतले. आता महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाचे प्रतीक असलेला साधेपणा नष्ट करून तेथेही स्वतःची जगातील सर्वात मोठा शांतिदूत म्हणून मिरविण्याची तयारी सुरू आहे. गुजरात सरकारने त्यासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी देऊन साबरमती आश्रम आणि आजूबाजूच्या परिसराला ‘जागतिक स्मारक’ करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी दोनशे कुटुंबाना बेघर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, ह्या प्रकल्पासाठीही दिल्लीच्या सेंट्रल विस्ता प्रकल्पासाठी निवडलेल्या बिमल पटेल ह्यांनाच आर्किटेक्ट म्हणून नेमले आहे. मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरचा प्रकल्पाच्या अभिकल्पाचे कामही त्यांनाच दिले गेले होते आणि अहमदाबादमधील साबरमती प्रकल्पाचही काम त्यांनाच दिलेले होते. अमेरिकेतील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट फिलिप जॉन्सन हा आर्किटेकट्सना उच्चभ्रू वेश्येची उपमा देत असे. त्याचे खालील वचन प्रसिद्ध आहे.
“Architects are pretty much high-class whores. We can turn down projects the way they can turn down some clients, but we’ve both got to say yes to someone if we want to stay in business.”
आज अनेक व्यावसायिक आर्किटेक्ट्स स्पर्धेमध्ये आणि दूषित राजकीय वातावरणात तगून राहण्यासाठी हेच करताना दिसतात. नवी दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प म्हणजे, तर गेल्या साठ -सत्तर वर्षात निर्माण केलेल्या सर्व शासकीय महत्त्वाच्या वास्तूंवर प्रत्यक्ष बुलडोझर घालून त्या पाडून टाकण्याचा आणि ४.५ लाख चौ.मीटर क्षेत्रफळ असलेली, मोठ्या कष्टाने उभी केलेली बांधकामे दुरुस्त करायची सोडून त्या नष्ट करण्याचा प्रकल्प आहे. ५० चौ. मीटरच्या एक लाख घरांच्या इतके हे क्षेत्रफळ आहे. त्यांची निर्मिती करायला किती पैसे, किती साधने, किती विचार, किती श्रम आणि किती काळ खर्च झाला होता, ह्याची काडीचीही पर्वा न करता हे सर्व ऐतिहासिक महत्त्वाचे, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे, विविध वास्तू शैली निवडून उभे केलेले भारताचे सांस्कृतिक वैभव नष्ट करायला आपलेच एक व्यावसायिक बंधू राजकीय बुलडोझरना साथ देत आहेत, हे बघून विशाद वाटतो.
स्वप्नातल्या राष्ट्राचा आराखडा काय ?
ह्या शासनाचा हिंदू राष्ट्र घडविण्याचा उद्देश आहे, असे ते म्हणतात. परंतु असे राष्ट्र कसे काय उभारणार याचा त्यांच्याकडे आराखडाही नाही आणि तंत्रही नाही. सर्व उद्ध्वस्त केल्यावर राष्ट्र उभारणीची साधने कोठून आणणार, विविध समाजांना, संस्कृतींना एकत्र कसे जोडणार, एक देश म्हणून देशाची प्रतिमा आणि वास्तव कसे साध्य करणार ह्याचा काही एक विचार दिसत नाही. राष्ट्रीय एकात्मता, संसदीय लोकशाही, औद्योगिक विकास, समाजवाद, वैज्ञानिक वृत्तीची जोपासना, मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आणि जगातील महासत्तांपासून अलिप्तता ही भारताच्या घटनेने स्वीकारलेली मूलभूत, सर्वना सामावून घेणारी तत्वे बुलडोझरने तुडवल्यावर देश एकसंध राहील का? की सोव्हियत युनियनच्या मार्गाने जाईल?
दुर्देवाने, हे समजू न शकल्याने सामान्य नागरिक लोकशाही उध्वस्त करण्याच्या कुटील कारस्थानात नकळतपणे सामील झाले. काहीजण अर्थव्यवस्थेमध्ये पंतप्रधान मोदी सुधारणा करतील, ह्या आशेने सामील झाले होते. आज त्यातील किती लोकांचा भ्रमनिरास झाला आहे ह्याचा अंदाज करणेही अवघड आहे. प्रसार माध्यमांना प्रचारसाधने मानल्यावर हेच होते. एकंदरीत सामान्य मतदार फसवले गेले आहेत आणि तेच ह्यातून मार्ग काढू शकतील. आपल्या पुराण कथांमध्ये अनेक राक्षस मायावी रूप घेऊन स्त्रियांना फसवायचे. सध्याच्या नेत्यांचे तेच खरे स्वरूप आहे, हे लोकांना कळेल तो भारतासाठी सुदिन असेल.
अनिश कपूर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकाराने दिल्लीच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करताना मोदींना हिंदू तालिबानी, हिंदू औरंगजेब आणि बुलडोझर अशी विशेषणे वापरली आहेत. नेहरूंच्याच नाही, तर लाखो लोकांच्या स्वतंत्र लोकशाही भारताच्या स्वप्नांवर बुलडोझर-रोडरोलर फिरविण्याचे काम नरेंद्र मोदी-अमित शहा करीत आहेत. येताजाता लोकशाही आणि राज्यघटनेला हात जोडणारे, संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकवणारे हे दोन अवजड यंत्रस्वार बघितले, की मला पुन्हा बहिणाबाईचेच शब्द आठवतात…
इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही
जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही
ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही
ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही
सुलक्षणा महाजन, या नगरनियोजन तज्ज्ञ आहेत.
(हा लेख सर्वप्रथम साधना साप्ताहिकाच्या ७ ऑगस्ट २०२१ अंकात प्रकाशित झाला. या लेखात काही मुद्द्यांची भर घालण्यात आली आहे.)
COMMENTS