शोपियन बनावट एन्काउंटः लष्करी अधिकाऱ्यावर कोर्ट मार्शल

शोपियन बनावट एन्काउंटः लष्करी अधिकाऱ्यावर कोर्ट मार्शल

नवी दिल्लीः १८ जुलै २०२०मध्ये काश्मीर खोऱ्यात शोपियन जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांकडून तीन मजुरांना दहशतवादी समजून ठार मारल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी कॅप्टन भूपेंद्र सिंह यांच्याविरोधात कोर्ट मार्शलची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या आधी कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये आपल्या सैनिकांकडून आफस्पा या कायद्याचे उल्लंघन झाल्याची कबुली लष्कराने दिली होती. त्यानुसार ६२ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन भूपेंद्र सिंग यांच्यावर कोर्ट मार्शल सुरू झाले आहे.

नेमके प्रकरण काय?

१८ जुलै २०२० रोजी भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी या दहशतवाद्यांची ओळख पटली नसल्याने या तिघांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. पण या छायाचित्रातील मृत हे दहशतवादी नसून मजूर आहेत आणि ते आमच्या कुटुंबातले महिन्याभरापासून बेपत्ता झालेले तीन सदस्य असल्याचा आरोप राजौरीतील मोहम्मद युसूफ यांच्या कुटुंबाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला व चौकशी सुरू झाली.

त्यानंतर १३ ऑगस्टला शोपियन पोलिसांनी युसूफ यांच्या घरी राजौरीत जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेतले होते.

जूर मारले गेल्याची लष्कराची कबुली

सप्टेंबरमध्ये भारतीय लष्करांकडून तीन मजुरांना दहशतवादी समजून झालेल्या एनकाउंटर प्रकरणात लष्कराने आपल्याला जवानांना दोषी मानले होते. हे एनकाउंटर एफ्स्पा १९९०च्या कायद्याचे उल्लंघन असून आपल्या जवानांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे लष्कराने म्हटले होते. या प्रकरणातील जवानांवर लष्करी कायद्यानुसार अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाईल, असेही लष्कराने स्पष्ट केले होते. एनकाउंटरमध्ये मारण्यात आलेले तिघेजण राजौरीतील रहिवासी होते, अशीही कबुली लष्कराने दिली होती.

भारतीय लष्कर आपल्या कारवाईत नैतिकदृष्ट्या प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असते व कायद्यानुसार या प्रकरणातील प्रत्येक घडामोड पुढे ठेवली जाईल, असे लष्कराच्या पत्रकात म्हटले होते.

त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२०मध्ये जम्मू व काश्मीर सरकारने पुरलेले तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले व ते संबंधितांच्या कुटुंबियांच्या हवाली केले होते.

आरोपपत्रात काय म्हटले होते?

लष्कराच्या या भूमिकेनंतर जम्मू व काश्मीर पोलिसांनी कॅप्टन भूपेंद्र सिंह यांच्यासह तीन जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ६२ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन भूपिंदर व अन्य स्थानिक नागरिक बिलाल अहमद व ताबिश अहमद या दोघांची नावे बनावट एन्काउंटरचे प्रमुख आरोपी म्हणून नोंदवण्यात आली होती. एन्काउंटर झालेले युवक राजौरी जिल्ह्यातल्या धारसाकरी व तारकासी गावातील असून त्यांची नावे इम्तियाज अहमद (२०) मोहम्मद अबरार व अबरार अहमद (२५) अशी आहेत. या तिघांचे त्यांच्या रुममधून अपहरण करून त्यांचे एन्काउंटर करण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणातील दोन स्थानिक नागरिक ताबिश व बिलाल या दोघांनी वर उल्लेख केलेल्या तीन युवकांचे अपहरण करून त्यांचे एन्काउंटर होईल अशी व्यवस्था केली होती, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते. कॅप्टन भूपिंदर यांनी आपले सहकारी व अन्य वरिष्ठांना संबंधित प्रकरणाची माहिती दिली नव्हती, त्यांना अंधारात ठेवले व दहशतवादी मारले अशी पोलिसांत फिर्याद करून आपल्याला बक्षिसी मिळेल असा कट रचल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.

शोपियानमधील अमशीपुरा येथे तीन मजुरांची हत्या झाल्यानंतर हे वृत्त सोशल मीडियात पसरले त्यानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली होती. प्राथमिक तपासात लष्कराने आफ्सा कायद्यांतर्गत अधिकारांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लष्कराने चौकशी सुरू केली होती.

मार्च २०००मध्ये अनंतनाग जिल्ह्यात पाथरीबल येथे पाच निष्पाप नागरिकांना ते दहशतवादी असल्याच्या कारणावरून सुरक्षा दलाने ठार मारले होते. तसेच २०१०मध्ये मचिल येथे पोलिस एन्काउंटरमध्ये तीन नागरिकांना ठार मारण्यात आले होते, या दोन घटनांनंतरची ही तिसरी हृदयद्रावक घटना ठरली आहे.

मूळ बातमी

COMMENTS