नवी दिल्लीः मुस्लिम विरोध व उग्र हिंदुत्वाच्या दबावाचा फटका भारतीय लष्कराला नुकताच बसला. २१ एप्रिलला जम्मूमधील संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी कर्नल
नवी दिल्लीः मुस्लिम विरोध व उग्र हिंदुत्वाच्या दबावाचा फटका भारतीय लष्कराला नुकताच बसला. २१ एप्रिलला जम्मूमधील संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देवेंद्र आनंद यांनी ट्विटरवर लष्कराकडून आयोजित इफ्तार पार्टीची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. या छायाचित्रात राष्ट्रीय रायफल्सच्या डेल्टा फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग स्थानिक मुसलमानांशी चर्चा करत होते व एक वर्दीधारी व्यक्ती नागरिकांसोबत नमाज प्रार्थना म्हणत होता. या छायाचित्रांसोबत लष्करातील धर्मनिरपेक्षता आपल्या परंपरांचे जतन करत असते, भारतीय लष्कराने डोडा जिल्ह्यात अरनोरा येथे इफ्तारचे आयोजन केले होते, असा मजकूर लिहिला होता. या ट्विटवर सुदर्शन न्यूजचे प्रमुख सुरेश चव्हाणके यांनी आक्षेप घेत भारताच्या लष्करात आता हा आजार घुसला असून हे दुःखद असल्याचे ट्विट केले.
चव्हाणके यांच्या अशा ट्विट नंतर लष्कराने लगेचच आपले ट्विट हटवले. आपण ट्विट का हटवले याचा खुलासा जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला नाही. इंडियन एक्स्प्रेसने लेफ्ट. कर्नल देवेंद्र आनंद यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
लष्कराच्या या भूमिकेवरून एक पत्रकार अमन सिंह यांनी धर्मनिरपक्षतेचा अंतिम गडही आता खिळखिळा होत चालल्याची टिप्पण्णी केली. तर लष्कराचे माजी जीओसी लेफ्ट. जनरल एचएस पनाग (निवृत्त) यांनी लष्कराने ट्विट हटवून आपण घाबरलो आहोत असे दाखवल्याची टीका केली. भारतीय लष्करात रमझान, इफ्तार परंपरा अनेक वर्ष पाळली जात आहे. ती कायम राखण्यात साहस आहे. त्यात कसलीही चूक नाही. अशा कृती केल्याने स्थानिक जनतेचा विश्वास व प्रेम संपादन केला जात असतो. काश्मीरात लष्कराकडून आर्मी गूडविल स्कूल चालवले जाते. आमची लढाई परदेशी दहशतवाद्यांविरोधात आहे. इफ्तार साजरा करण्यात कोणतीही चूक नाही हे अनेक वर्षे केले जात असल्याचे पनाग यांचे म्हणणे आहे.
पनाग यांच्याबरोबर माजी लेफ्ट. जनरल तेज सप्रू यांनीही लष्कराने ट्विट हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आपल्या ट्विटचे समर्थन लष्कराने केले पाहिजे. दहशतग्रस्त भागात जाऊन लष्कर इफ्तारचे आयोजन करत असते. कारण तेथील स्थानिक नागरिक दहशतवादाविरोधात लढत आले आहेत. जम्मू व काश्मीरमधील मुसलमान तुमच्या माझ्यापेक्षा अधिक भारतीय असल्याचे मत सप्रू यांनी व्यक्त केले.
मूळ वृत्त
COMMENTS