करुर (तामिळनाडू) : बालाकोटवर हवाई हल्ला केला जाणार याची पूर्वमाहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांन
करुर (तामिळनाडू) : बालाकोटवर हवाई हल्ला केला जाणार याची पूर्वमाहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना देण्यात आली, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आपल्या आरोपाचा त्यांनी पुरावा दिलेला नाही तसेच पंतप्रधान कार्यालयानेही या संदर्भात काही खुलासा केलेला नाहीत.
राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौर्यावर असून करूर येथे एका रोडशो मध्ये त्यांनी अर्णव गोस्वामी यांच्या कथित व्हॉट्सअप संभाषणाचा दाखला देत बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती मोदींमार्फत गोस्वामी यांना दिल्याचे सांगितले. एका पत्रकाराला भारताच्या हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये असा हल्ला होणार आहे, याची तीन दिवस आधीच माहिती होती. अशी माहिती देऊन भारतीय वैमानिकांचे प्राण संकटात टाकले गेले. अशा हवाई हल्ल्याची माहिती फक्त पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री व हवाई दल प्रमुखांना होती. पण या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणाला माहिती नव्हती. मग ही माहिती गोस्वामी यांना कोणी पोहचवली. या पांच जणांपैकी कुणीतरी ही माहिती दिली. या पाच जणांनी हवाई दलाचा विश्वासघात केला, या प्रकरणाची चौकशी का सुरू केली जात नाही, असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले. जर पंतप्रधानांनी माहिती दिली नसेल तर त्यांनी चौकशीचे आदेश का दिले नाहीत. ते तसे आदेश देत नाहीत कारण त्यांनीच हवाई हल्ल्याची माहिती गोस्वामी यांना दिली, असे गांधी म्हणाले.
चीनवरूनही मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी चीन-भारत सीमेवरील तणावावरून पुन्हा मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान म्हणतात माझी छाती ५६ इंची आहे पण आज चीनचे सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत. हजार किमी भारतीय जमीन त्यांच्या ताब्यात आहे, इतके होऊनही पंतप्रधान चीनच्या विरोधात एक शब्दही बोलत नाहीत, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.
गेले तीन-चार महिने त्यांच्या तोंडातून चीन हा शब्दही उच्चारला गेला नाही. आपल्या हद्दीत चिनी सैनिक घुसूनही घुसखोरी झालीच नाही असे विधान मोदींनी केले होते पण त्यानंतर भारतीय लष्कर व संरक्षणमंत्र्यांनी चीनचे सैन्य भारतीय हद्दीत घुसल्याचे सांगितले होते. याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
या पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली, देशाचे विभाजन केले, समाजात फूट पाडली, त्यामुळे चीनला भारतात घुसखोरी करण्याचे धाडस झाले, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदींवर केला.
मूळ बातमी
COMMENTS